Friday 18 December 2015

तो प्रवाही प्रवास…!


              नदीकिनारी चालत जाताना उन्हाची ऊब जरा जास्तच जाणवत होती. तळपायांना थोडा गारवा मिळावा म्हणून किनाऱ्यावर लांबच लांब पसरलेल्या हिरव्या, थंडगार लुसलुशीत गालिच्यावर शूज काढून पाय टेकवत एका झाडाखाली बसले. तिथल्या नीरव शांततेचाही एक वेगळाच आवाज कानांना जाणवत होता. 

            थोड्यावेळाने सहजच लक्ष गेलं. माझ्यापासून अगदी दोन पावलांवरच मुंग्याची चाललेली एक लांबच लांब रांग दिसली…एक एक मुंगी अगदी ओळीने पुढचीच्या बरोबर मागे जात होती…मध्ये येणारे छोटे छोटे दगड, खळगे एका मागोमाग एक सहज ओलांडून पुढे चालली होती. गवताच्या पात्याच्या अगदी वरच्या टोकावरून मध्येच धपकन खाली पडत होती, पण परत तेवढ्याच तत्परतेने वर चढत होती. पुढे काय होते माहित नाही… 'कुठे पोहोचणार, किती लांब जाणार, अजून किती दगड, खड्डे पार करावे लागणार, किती वेळा पडणार', कसलीच कल्पना नाही. पण त्यांचे चालणे मात्र चालूच होते. त्या लांबपर्यंत पसरलेल्या हिरव्यागार गवताच्या एका कोपऱ्यात कुठूनशी सुरु झालेली ती मुंग्यांची रांग आज उगीच जरा जास्तच लक्ष वेधून घेत होती. 

            वाटलं, असाच चालू असतो का आपला पण प्रवास… चालत आहोत आपण पण त्याच वेगाने…पुढे पुढे….ठरवलंय बरच काही… असं करायचंय, हे करायचंय, ते करायचंय…किती वेळ लागेल, कशा अडचणी येतील माहित नाही… पण चालणं चालूच आहे.…अव्याहत… 'आलंच बहुदा…पोहोचूच आता', असं वाटतंय तोवर त्या ठिकाणांच मृगजळ होतंय…परत नवीन उमेद… नवीन उदिष्ट… पण चालणं चालूच आहे… अविरत…जायचंय कुठेतरी…पण, तो 'कुठेतरी' कुठे आहे हेच कळत नाहीये. सापडेल कदाचित, असेल इथेच…सगळेच चाललेत ना…मग हाच रस्ता बरोबर असेल.…सगळ्यांबरोबरच धरला ना आपण हा रस्ता…भरपूर पगाराचा किंवा परदेशातला जॉब मिळवायचा होता… सगळे हेच करत होते ना…आपणही त्यांच्या बरोबरीने चालत आलो…

                                 
          
          हेच तर ठरवलं होतं ना शाळेत असताना, कि खूप कोणीतरी मोठ्ठ व्हायचंय. मग बरेच छोटे-मोठे खड्डे, दगड पार करत आलोय कि आज इथपर्यंत, नोकरी मिळाली, घर झालं, लग्न झालं, कार झाली, परदेशवाऱ्या झाल्या, मुलं झाली, त्यांची चांगल्या शाळेत admissions झाली, हे सगळे आत्ता छोटे छोटे वाटणारे टप्पे पूर्वी खूप लांबचे पल्ले वाटायचे…तेव्हाची 'big destinations होती ती.…सुदैवाने गाठली आपण. पण तरीही या सगळ्या गाठण्यात तो 'कुठेतरी' सापडलाच नाही असंच अजूनह वाटतंय…हरवलाय कुठेतरी…! आज वाटतंय, हे नव्हतं final destination…! चुकला का मग आपला रस्ता, सगळ्यांबरोबर एकाच प्रवाहात वाहत आलो….आयुष्याचे ठोकताळे सगळ्यांचे होते तेच आपणही ठरवले. आनंद, सुख यांच्या पुस्तकात वाचलेल्या व्याख्या खऱ्या आयुष्यातही प्रत्येकाच्या सारख्याच असतात हे गृहीत धरलं. आणि तेच सारं मिळवण्यातला आनंदच खरा मानला. पण मग तरीही अजून का नाही पोहोचलो समाधानाच्या आलेखाच्या त्या उंच टप्प्यावर. अजूनही शोधतच आहोत तिथपर्यंत जायचा रस्ता.


            हे असं प्रवाहात वाहत जाण्यापेक्षा जे आतून करावसं वाटतंय त्याचाच ध्यास घेवून केलेल्या प्रवासाचा रस्ता आपल्यापुरता आपणच तयार करायला हवा होता का… कदाचित नसतो पोहोचलो अगदी शेवटच्या destination पर्यंत, पण तो स्वतः निवडलेला रस्ता चालण्यातला प्रत्येक टप्प्यावरचा आनंद हेच त्या प्रवासाचं समाधान तरी असलं असतं. परवा पाहिलेला इम्तियाज अली चा 'तमाशा' त्यामुळंच खूप क्लिक झाला बहुदा. 

           पूर्वीची पेन्शन वाली सरकारी नोकरी आणि आत्ताची पाच-सहा आकडी पगार असलेली IT मधली नोकरी…परिस्थितीत फरक फक्त एवढाच पडलाय…पण रस्ता अजूनही तोच…तसाच… प्रवाहानं ठरवलेला…सगळे करताहेत म्हणून बरोबरच आहे असं ठरवून निवडलेला….यात चुकीचं काही नसेलही…पण त्या प्रवासात आनंद आणि समाधान कुठेतरी मिळतंय का हे महत्वाचं…. कारण प्रवासाच्या शेवटी destination असं काही नाहीच मुळी… आयुष्यभर आपण जे चालतोय, पळतोय तेच जगणं होतं. आणि म्हणून फक्त तो प्रवासच महत्वाचा होता… त्या वरची समाधानाची ती ठिकाणं महत्वाची होती… आणि त्यामुळच तो रस्ताही महत्वाचा होता… आणि म्हणूनच कदाचित आपण स्वतः निवडलेला…! 

            तेवढ्यात, हा सगळा मनातला विचित्र गोंधळ चालू असताना त्या झाडावरून एक छोटंसं पान हळूच निखळून पायाजवळ पडलं, वाऱ्याच्या हलक्या झोता बरोबर हेलकावे घेत जमिनीपासून परत थोडं वर उडालं, परत खाली आलं, वजनानं हलकं असल्यानं वाऱ्याबरोबर पुन्हा उडून थोडं लांब गेलं…त्या हेलकावे घेणाऱ्या पानावर स्थिरावलेल्या नजरेसमोर मग आयुष्यात अनुभवलेले हेलकावेही त्या क्षणी उगाच जाणवले…पुढे किती उडणार होतं आणि शेवटी कुठे जावून पडणार होतं ते पान, कोण जाणे. आपलाही प्रवास पुढे अजून त्या 'कुठेतरी' च्या शोधात किती हेलकावे खाणार आहे कोण जाणे. त्या मुंग्यांची रांगही पुढे इतकी लांब गेली होती, कि नजरेच्या एका टप्प्यापर्यंतच ती दिसत होती, ती ही पुढे कुठे गेली कोण जाणे.…! 

                                                             अश्विनी वैद्य 
                                                              १७. १२. १५

  

Thursday 3 December 2015

तो भला मोठा एक तास...!



                कितीही organised आहोत असे वाटले तरी शेवटच्या मिनिटाची पळापळ होणे काही चुकत नाही. शाळा असो, स्विमिंग असो, scout असो…कुठेही जाताना घड्याळाबरोबरची आमची कायमची रेस. परवा असेच अनुष्का ला gymnastics ला घेवून जाताना आधी नेहमीची तयारी झाली होती तरीही शेवटच्या ५ मिनिटात सगळा गोंधळ सावरत गाडी मध्ये बसताना, bag, costume, slippers अशी cheklist तोंडाने बडबडत, घाईचा पाढा वाचत शेवटी दोघी गाडीत बसलो. आणि मग रस्त्याला लागल्यावर heavy traffic मुळे गाडीच्या वेगाच्या दृष्टीने असलेल्या स्थिर क्षणी आठवले कि, आपण आपला भ्रमणध्वनी अर्थात 'स्मार्ट फोन' स्मार्टपणे घरीच विसरलो आहोत. ट्राफिक मध्ये स्थिरावलेल्या गाडीबरोबर मी ही क्षणिक स्तब्ध झाले. स्वतःचाच राग येत सगळ्यात आधी डोक्यात विचार आला तो हा की, 'आता भाजीचा ग्यास १० मिनिटांनी बंद कर', हे मंदारला बजावून सांगितलेले आणि तरीही तो १०० टक्के विसरणार हे गृहीत धरून स्मार्ट फोन वरून (whatsapp वरून) आपण त्याला आठवण करून देणार होतो, त्याचे काय करायचे. शिवाय नील ला भरवायची टेबलावरच ठेवलेली वेगळी मीठाची भाजी आख्खे किचन शोधूनही त्याला नक्की सापडणार नाही आणि मग 'ती कुठे आहे' हे विचारण्यासाठी लावलेला फोन तिथेच वाजल्यामुळे दोघांचाही होणारा त्रागा…हे सारं चित्र क्षणात डोळ्यासमोर तरळलं. त्यात गाडी मुंगीच्या वेगाने पुढे ढकलत वेळेशी शर्यत चालू होती ती वेगळीच. या सगळ्या भांबावलेल्या विचारांमधून वाढत चाललेला मनस्ताप थोड्यावेळाने गाडीचा वेग वाढल्यानंतर हळू हळू कमी झाला.

              शेवटची ५ मिनिटे राहिली असताना आम्ही मोठ्या मुश्किलीने कसे बसे एक पार्किंग मिळवत क्लास ला वेळेत पोहोचलो. आता ब्रिटन मधील कार पार्किंग या विषयावर मुक्ताफळे उधळण्याचा मोह त्याच्या आकारमानाचा (महाराष्ट्राहूनही लहान) विचार करता टाळलेलाच बरा…! उगीच विषयांतर नको…! 

                तिथे पोहोचल्यावर अनुष्काला आत पाठवून वेटिंग रूम मध्ये खुर्चीवर बसले त्या क्षणी आपल्या जवळ mobile नसल्याचा राग गाडीत आला होता त्याच्या कितीतरी पटीने जास्त आला. आत्ता पर्यंत घड्याळाशी लावलेली शर्यत एव्हाना संपली असल्यामुळे समोरच्या भिंतीवर लावलेल्या मोठ्या घड्याळातले मोठ-मोठे दोन्ही काटे, 'आता पळून पळून आम्ही दमलोय म्हणून जरा झोपतो', असे भाव आणून कुजकटपणे माझ्याकडे बघत असल्याचा भास मला त्या वेळी झाला. इथून पुढचा एक तास नुसतं बसून राहायचंय, ही कल्पनाच खूप भयंकर वाटली. या सारखी जगात कोणतीही शिक्षा नाही असं त्या वेळी तरी मला वाटलं. 

                  एरवी जात नाही पण आता पर्याय नसल्यामुळे आजूबाजूला जरा लक्ष गेलं. त्या रूम मध्ये बसलेल्यांपैकी ८०% लोक त्यांच्या स्मार्ट फोन च्या स्क्रीन ला नजर स्थिरावून बसले होते. त्या वेळी तरी मला त्यांचा खूप हेवा वाटत होता. काहीजण  kindle वर पुस्तकं वाचत होते. नाही म्हणायला २-३ जणं एकमेकांशी बोलत होते. अगदीच रिकामं बसण्यापेक्षा आपणही स्वतःहोऊनच बोलूयात जरा कोणाशीतरी असा विचार मी 'पुणेकर' नसल्यामुळे मनात आला. पण ब्रिटीश आणि पुणेकर यांच्यात आजपर्यंत जाणवलेल्या बऱ्याच सार्धम्यामुळे तो मी मनातच ठेवला. अर्थात 'आम्हाला सगळ्यातलं सगळं कळतं', असे भाव चेहेऱ्यावर असताना, पुढचे संभाषण किती मोकळेपणाने होऊ शकेल याचा अंदाज आजपर्यंतच्या इथल्या वास्तव्यावरुन मला नक्कीच बांधता येवू लागला आहे. 

                 'आपण भले आणि आपले काम भले', हा सुविचार सदैव उराशी बाळगून लांबलचक सरळ नाकासमोरुन तेव्हढीच सरळ चालणारी पण तरीही साधी वैगेरे नसलेली ही इथली ब्रिटीश लोकं आणि समोरचा शब्दात, बोलण्यात कुठे चुकतो याच्या शोधात असलेली, भाषेच्या आधारावर अर्थात सगळ्याच आधारावर स्वतःचे श्रेष्ठत्व स्वतःच ठरवत स्वतःच्याच जगात वावरणारी 'साधी-सरळ' पुणेरी लोकं. या साऱ्याच्या सुखद पार्श्वभूमीवर गप्पा मारणे म्हणजे जरा जास्तच वाटले. त्यामुळे तो ही रस्ता बंद झाला. 

                  जवळच्या टेबलावर वाचयला मासिकेही नव्हती. बाहेर जावून मस्त फेरफटका मारून यावा इतके रम्य वातावरणही नव्हते. नेहमीची पावसाची पिरपिर चालूच होती. घरी जावून परत येणेही शक्य नव्हते. घरामुळे एकदम भाजीचा विचार डोक्यात येवून, करपलेले भांडे, घरात झालेला धूर आणि त्यामुळे वाजलेला स्मोकिंग अलार्म हे सारे चित्र क्षणात परत एकदा डोळ्यासमोर तरळले. कदाचित मंदारने केला असेल वेळेत ग्यास बंद असा उगाच स्वतःशी नाईलाजास्तव समज करून दिला. जवळ असलेली स्वतःची bag दोनवेळा परत परत आवरली. आता याउपर अजून काही करण्यासारखे नव्हते, तेव्हा लक्ष परत त्या भिंतीवरच्या मोठ्या घड्याळाकडे गेले. बिचारे झोपेतही माझी दया येवून हळू हळू का होईना पुढे जात होते. 

                अर्धा तास सरला, अजून राहिलेला अर्धा तास मनाला कुठेतरी अडकवून ठेवायाचे होते. 'फोन नव्हते तेव्हा माणसं अनोळखी लोकांशीही किती मोकळेपणानं बोलायची, गप्पा मारायची, विचारांची देवाणघेवाण व्ह्यायची' आणि आत्ता काय ही परिस्थिती श्या…या digitization मुळे रोजच्या गोष्टी सुखकर सोप्या झाल्या खऱ्या पण त्या सोप्या झाल्याने वाचणाऱ्या वेळचे रिकामे गणित लक्षात आलेच नाही. अर्थात वाचणारा वेळ सत्कारणी लावायचा कसा हे गणित जरी ज्याचे त्याचे वेगळे असले तरी, परत परत त्याच त्या (digital ०-१) शुन्याभोवती फिरणाऱ्या 'एका' मध्येच अडकत राहिले. नवीनवीन गेम्स, whatsapp, facebook आणि तत्सम गोष्टींमध्येच अतिरिक्त गुंतले. हे सगळे विचार त्या वेळी खूप गांभीर्याने डोक्यात पिंगा घालत होते, खरे वाटत होते…त्यामुळे पटतही होते. (आता पिंगा = बाजीराव-मस्तानी + प्रियांका-दीपिका नऊवारी डान्स हा विचार तात्पुरता तरी बाजूला ठेवते). 

               डोळे बंद करून खुर्चीवर बसून शांतपणे चालू असलेल्या या विचारांची मालिका मोठ्या बेलच्या आवाजाने थांबली. अर्थात ज्याची इतकी वाट बघत होते तो एक तास संपल्याची ती खूण होती. मी आनंदाने त्या भिंतीवरल्या मोठ्या घड्याळाकडे परत एकदा पहिले तेव्हा त्यातले काटे मस्त झोपा काढून ताजेतवाने होवून, 'आम्ही परत शर्यतीला तयार आहोत' असे कुत्सितपणे हसत मला सांगत होते. आणि अशा येन-केन-प्रकारेन तो भला मोठ्ठा एक तास शेवटास संपला. 



टीप :- वर मांडलेले पुणेकर आणि ब्रिटीश यांच्याबद्दलचे मत सर्वस्वी वैयक्तिक आहे तरी त्याचा वास्तविक जीवनाशी काही संबंध आढळल्यास तो योगायोग न समजता वरील म्हणणे पटलेले आहे असे समजावे. धन्यवाद. 

                                                                     अश्विनी वैद्य 
                                                                     ०३/१२/१५


                                                                                                                      
  
                                                                                                                            






Monday 23 November 2015

असाही कधी एक दिवस यावा…. !




घड्याळाच्या गजराशिवाय डोळ्यांना हलकेच उजाडल्याची जाणीव व्हावी….!
पापण्यांना उगाच जड करणारे काल-परवाचे सारे ताण कुठंतरी हरवून जावेत…! 
कोवळ्या उन्हातला हलका गारवा अंगावर घेत वाऱ्याच्या झुळूकेबरोबर आलेल्या मोगऱ्याच्या सुवासानं मन प्रफुल्लित व्हावं.…! 
रेडीओवरचं हलक्या स्वरातलं एखादं अगदी आवडीचं गाणं खूप दिवसांनी बेसावधपणे कानांवर पडावं….! 
आणि या साऱ्याची मधुरता पूर्णत्वानं अनुभवण्यासाठी बुद्धी, मेंदू, मन हे एकत्रितपणे जे काही आहे हे तेवढच शांत असावं…!
ज़ेणेकरुन ती प्रसन्नता मनाच्या गाभाऱ्यात खोल कुठेतरी तळाशी अलगदपणे रुजेल. रुजायला तिला तेवढा शांत वेळ मिळेल. 
रोजच्या ठरलेल्या घाईघाईच्या कृत्रिम दिनचर्येला छोटासा अर्धविराम देत मनाच्या हिंदोळ्यांवर भटकून यावं लांब कुठंतरी स्वतःच्याच जगात….! 
जिथे एखाद्या रानोमाळी पायवाटेने चालताना हलकेच होणारे वेलींचे, पानांचे नाजूक स्पर्श सहज जाणवतील
आभाळात उडणाऱ्या बगळ्यांच्या थव्याला पाहण्यासाठी डोळे आपोआप त्यांवर स्थिरावतील 
पुस्तकात वाचताना केवळ अभासलेली पक्ष्यांची ती गोड गाणी, फुलांचे ते नैसर्गिक रंग प्रत्यक्षात अनुभवता येतील
संध्येच्या शांत केशरी प्रकाशात न्हावून निघणं म्हणजे नक्की काय असतं हे त्या क्षितिजाच्या पलीकडल्या डोंगराला पाहून जाणवेल 
कधी निवांतपणे चहा पिताना होणाऱ्या स्वतःच्याच फुर फुर आवाजाला स्वतःच मनमुराद हसता येईल 
डाएट चा विचार करत केवळ डोळ्यांनीच चाखलेले कितीतरी पदार्थ जीभेनेही चाखत तिचे मनमुराद लाड पुरवता येतील 
स्वतःच केलेल्या आळूच्या भाजीचे स्वतःच कौतुक करत समाधानाने स्वतःचीच पाठ थोपटवता येईल. 
लहानपणी आईने शाळेत खूपदा डब्यात दिलेला तो मलिद्याचा (गूळ-तूप-पोळी चा) लाडू लेकीबरोबर निवांतपणे टीव्ही बघत गट्टम करता येईल
खूप आवडीचा पण प्रसंगाला साजेसा नाही म्हणून उगाच बाजूला राहिलेला ड्रेस स्वतःसाठी आणि त्याच्याही हवापालटासाठी अंगावर चढवता येईल
बरेच दिवस नुसतं ज्याच्याकडे लांबूनच बघत होते त्या आवडीने म्हणून आणलेल्या पुस्तकात अगदी मनसोक्त बुडून जाता येईल, जिथे कोणाच्या आवाजाचा, बोलण्याचा, हाकेचा पार विसर पडेल….!  
आणि तेवढ्यात अचानक हे सारं कल्पनातीत नाट्य मनाच्या पडद्यावर चालू असताना, 'आई, माझा होमवर्क फोल्डर सापडत नाहीये…' या वाक्याने शेवटचा पडदा पडला. 
मग काय 'back to routine' म्हणत गाडी पूर्ववत रुळावरून धावायला लागली…. पण त्या तात्पुरत्या का होईना कल्पित सुखावलेल्या भावाविश्वाने….


          'जगण्याच्या गाण्याचं पालुपद तेच ते आणि तेच ते असं झालं कि आधी आपल्याला आपला कंटाळा येतो, आणि मग भोवतीचही सारं कंटाळवाणं वाटायला लागतं. कोऱ्या चेकप्रमाणं मिळालेल्या आयुष्याला मोल येतं ते प्रयोगशील जगण्यानं. हा प्रयोग कुठल्या बंद भिंतींच्या प्रयोगशाळेत करायचा नसतो, उघड्या डोळ्यानं अन खुल्या मनानं नवेपण स्विकारत तो होत जातो.' हे खूप पूर्वी प्रवीण दवणे यांच्या एका पुस्तकात वाचायला मिळालं होतं. आज परत एकदा ते जाणवलं. रोजच्या त्याच त्या पणाचं ओशाळवाणं रूप जाणवायला लागलं कि मग 'असाही कधी एक दिवस यावा' म्हणत कधी काळी मनात रचलेल्या पण करायच्या राहून गेलेल्या बऱ्याच गोष्टींना मोकळी वाट करून देत मनाचा आणि परिस्थितीचाही तजेलदारपणा जपायला काय हरकत आहे…! 


अश्विनी वैद्य 
२३/११/२०१५






Monday 9 November 2015

दिवाळी 

      भल्या पहाटे उदबत्तीच्या सुगंधानं जाग यावी, आईची अभ्यंग स्नानाची गडबड कानांबरोबर डोळ्यांनीही टिपावी,
पहाटेच्या चंद्रप्रकाशात अंगणात मांडलेल्या पणत्यांची माळ जमिनीवर सांडलेल्या चांदण्यापरी भासावी,
तिथेच शेजारी काढलेल्या सुंदर रेखीव रांगोळीने आणि त्यातल्या रंगांनी दिवाळीच्या त्या गोजिऱ्या सकाळची प्रसन्नता अजूनच वाढवावी…
नवीन कपड्यांचे ते कोरे वास, स्वतः तयार केलेले झुरमुळ्याचे आकाश कंदील-शुभेच्छापत्र, चिखलात बरबटून साकारलेले इटुकले रायगड-प्रतापगड,
'खुसखुशीत झाली कि नाही बघू गं' म्हणत करता करताच संपवलेले चकलीचे अर्धे अधिक घाणे आणि खूप प्रयत्न करूनही लक्ष्मीपूजनाला डोळे मिचकावत हसलेले अनारसे…
दरवर्षी येणारे दिवाळीचे हे इतके लोभस रूप… तेच…तसेच पण अगदी हवेहवेसे वाटणारे…


जगलेल्या क्षणांच्या आठवणी झाल्या कि त्या उगीच मौल्यवान भासू लागतात.
मग आपल्या लहानपणीची दिवाळी मनात सकारात तो आनंदाचा ठेवा पुढच्या पिढीनेही तसाच जपावा यासाठी आपल्याच नकळत सुरु होते एक लगबग, धावपळ.... जी असते यावर्षीच्या दिवाळीच्या स्वागताची जय्यत तयारी…






तुम्हा सर्वाना दिवाळीच्या मनापासून खूप शुभेच्छा.....Happy Diwali 2015 !



                                                                                     -- अश्विनी वैद्य

Monday 28 September 2015


  डॉ. प्रकाश बाबा आमटे 

                     डोक्यावर सुरक्षित छप्पर आणि पाठीवर मायेचा भक्कम हात या शिवाय बँकेत भविष्याची तरतूद हेच सारं गाठीशी जमवू पाहणाऱ्या आपल्या सारख्या अतिशय सामान्य लोकांसासमोर जेव्हा, ज्या जगाची पुरेशी माहितीही आपल्याला नाही अशा काळोखी जगात राहणाऱ्या निराधार, असहाय्य लोकांसाठी काम करणारी थोर माणसं प्रत्यक्षात समोर येतात, दिसतात तेव्हा आपलं ते सामान्यपण सुद्धा खूप खूप खुजं वाटू लागतं. परवा डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांना प्रत्यक्षात पाहिल्यावर, त्यांचे जीवनानुभव ऐकल्यावर हि माणसे कोणत्या मातीची बनलेली आहेत हेच कळेना कि बहुदा तीच खरी माणसे आहेत ज्यांच्या जगण्याला मोह, माया आणि लोभ यांची तसूभरही ओळख नाही. आणि आम्ही मात्र सामाजिक संवेदना बोथट झालेली, स्वतःच्या विश्वात दंग असलेली, एकाच कारखान्यातून बाहेर काढलेली मनुष्यरुपी कृत्रिम यंत्र आहोत जी नुसतीच धावताहेत, कधी घर मिळवण्यासाठी, कधी मुलांना चांगल्या शाळेत घालण्यासाठी तर कधी त्यांच्या भविष्याची तरतूद बँकेत साठविण्यासाठी…असो. 

                             या आधीही डॉ. आमटे यांच्या मुलाखती टीव्ही वर पहिल्या होत्या, त्यांच्या आजवरच्या कामाचा आढावा घेणारा सिनेमाही पहिला होता. पण प्रत्यक्षात झालेली त्यांची भेट 'आजी म्या ब्रम्ह पाहिले' ची प्रचीती देणारी होती. माणसाच्या मोठेपणाला त्याचं दिसणं, त्याचे कपडे, त्याचा धर्म- जात, त्याची भाषा किंवा त्याचा प्रांत या कशाकशाचीही बंधनं लागू होत नाहीत, हे माहित होतं पण या दोघांना बघून ते पुन्हा प्रत्यक्षात जाणवलं. स्वछ फिकट निळ्या रंगाचा कुर्ता, पांढरा शुभ्र पायजमा आणि पायात अत्यंत साधी वहाण अशा रुपात जेव्हा स्टेजवर डॉ. प्रकाश आमटे यांची मूर्ती उभी राहिली तेव्हा साधेपणाच्या व्याख्या पुन्हा नव्याने  प्रकटल्या असे भासले. बाबा आमटे यांनी आनंदवन येथे केलेल्या कामाचा त्यांच्या (प्रकाश आणि विकास आमटे) बालपणावर झालेला परिणाम कसा सकारात्मक होता हे सांगत त्यांच्या मुलाखतीला सुरवात झाली. पेशाने डॉक्टर नसलेल्या बाबांना महारोग्यांची सेवा करताना आलेल्या अडचणी, लोक-नातेवाइक यांनी केलेली हेटाळणी, त्याबरोबरच बाबांच्या या कामामुळे या दोघा भावांच्या शिक्षणाची लहानपणी झालेली हेळसांड आणि या साऱ्यातून घडत गेलेले त्यांचे व्यक्तिमत्व. हे सारेच कायम comfort zone मध्ये राहणाऱ्या व्यक्तीसाठी कल्पने पलीकडले होते. मोठ्या भावापेक्षा दोन वर्षांनी लहान असूनही MBBS ला एकत्र admission घेवून पुस्तकांचा खर्च वाचवत दोघांनी शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या कामाला सुरवात. हे सगळं ते इतक्या सहजपणे सांगत होते कि यात काही विशेष नाही, बाबांकडून प्रेरणा घेवून पुढे हे असे आयुष्याचे रस्ते आपोआप तयार होत गेले, आणि त्यावरून चालताना तशाच समविचारी लोकांची साथही मिळत गेली असे ते म्हणाले. 

                            कायम security शोधू पाहणाऱ्या आपल्या जगात मुलाची कायम स्वरूपी नोकरी आणि राहण्यासाठी स्वतःचे घर या ठोकताळ्यनवर आधारलेली आपली पारंपारिक लग्नसंस्था पूर्णतः मोडीत काढत त्या काळी, डॉ. प्रकाश आमटे यांच्या, " या पुढील आयुष्य आदिवासींबरोबर काम करण्यात घालवण्याची तयारी आहे का" या प्रश्नाला होकार देत डॉ. सौ. मंदाताईनी त्यांच्याबरोबर लग्न करण्याचा धाडसी निर्णय घेतला. याची दिलखुलास कबुली देताना त्या म्हणाल्या, त्यावेळी एवढा विचार केला नव्हता पण आजवर कधीही त्याचा पश्चातापही झाला नाही. परवडत नसतानाही त्या काळी डॉक्टरकीचे शिक्षण घेवून लग्नानंतर खाण्याचे, राहण्याचे हाल सोसत, नवऱ्याला त्याच्या कामात निर्मोही साथ देत आजही त्या खंबीरपणे त्यांच्या बरोबरीने उभ्या आहेत. त्या दोघांना काम करताना आलेल्या अनेक अडचणी, बिकट प्रसंग, त्यातून त्यांनी शांतपणे काढलेले मार्ग या सगळ्याचा उलगडा करत मुलाखत पुढे छान रंगत गेली. आता त्यांची पुढची पिढी अर्थात त्यांची मुले आणि सुना यांनीही याच कार्याला किती वाहून घेतले आहे हे सांगताना ते म्हणाले, मुले आज तिथे आहेत म्हणून आम्ही इथे येवू शकलो. एकदा मुळे रुजली कि ती त्या मातीतच सौख्याने वाढतात. मुले तर आहेतच पण बाहेरून आलेल्या सुना तर मुलांपेक्षाही या कामात जास्त रमल्या आहेत. आणि मला या सर्वाहून थक्क करणारी जी गोष्ट वाटली ती ही कि, त्यांनी त्यांच्या मुलांना (डॉ. प्रकाश आणि मंदाताईयांच्या नातवांना) कुठल्या CBSE किंवा ICSE अभ्यासक्रमाच्या उच्चस्तरीय शाळेत न घालता तिथल्याच आदिवासी शाळेत घातले आहे. त्या शाळेत त्यांची ही दोनच आदिवासी नसलेली मुले इतर आदिवासी मुलांबरोबर पाटीवर अक्षरे गिरवत आहेत. 

                           काम करायला सुरवात केल्यापासून सतरा वर्ष लाईट पोचू न शकलेल्या, सरकारची मदत न मिळालेल्या अशा दुर्गम भागात जनावारांसारख्या राहणाऱ्या आदिवासींना माणसात आणण्यासाठी, त्यांच्या जगण्याला अर्थ देण्यासाठी, एक डॉक्टर या नात्याने त्यांच्या शारीरिक पीडा, रोग- आजार यांवर सुसह्यपणे मात करण्यासाठी अक्षरशः आयुष्य वेचणारी हि माणसं खूप मोठी आहेत. त्यांच्या थोड्या वेळच्या सहवासानेही मनाला एक वेगळीच शक्ती मिळाली. High commision of India, Nehru Centre, London येथे डॉ प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या मुलाखतीचा हा कार्यक्रम सुट्टीच्या दिवशी, रविवारी आयोजित करून इतिहासातही त्याची नोंद झाली. (नेहरू केंद्र या आधी रविवारी कधीही उघडले गेले नव्हते.) कमीतकमी तो दिवस तरी सत्कारणी लागल्याचा आनंद मनात साठवत आम्ही कार्यक्रम संपवून घरी परतलो. 


                     
                                 
                                                                                                               अश्विनी वैद्य 
                                                                                       २८. ०९. २०१५ 






Wednesday 13 May 2015

पालकत्व



                     "चल्ल्ला जावू…चल्ला चल्ला" अशी मोठ्या आवाजात जवळपास गर्जना करतच सकाळी ६.३० च्या ठोक्याला नील राजे उठले… "वीकेंड ला तरी थोडे झोपू दे रे अजून…" असे त्याला समजावून सांगून समजणारे नव्हतेच म्हणून मग त्याला ताईच्या अंगावर सोडून पुढच्या १५-२० मिनिटांच्या शांत झोपेची तरतूद केली. अनुष्काला मी उठवले तर तिची जोरदार चिडचिड असते पण आपला खोडकर भावूराया अंगावर बसून नाचायला लागला तरी ते तिला चालते…याचा फायदा करून घेण्याची इतकी हुशार कल्पना मला योग्यवेळी सुचली हि केवढी मोठी गोष्ट आहे नाई… कारण सध्या हुशारी, अभ्यास यांचा आणि माझा संबंध जवळपास संपल्यात जमा आहे. सध्या डोक्यात सकाळी उठल्यापासून चला चला, लवकर आवरा, शाळा-डबा- उशीर, युनिफोर्म, इस्त्री, बुकब्याग, homework, अंघोळ, दात, केस (हि खूप मोठी प्रकरणे आहेत बरका), खेळ, पार्क, मैत्रिणींचे playtime, त्यांची खाणी- पिणी, मग तब्येती, vitamins, औषधे, दोघांचा सो called बौद्धिक, मानसिक, शारीरिक विकास, स्विमिंग, scout, डान्स क्लास, गाणी-गोष्टी, १ टू १ रीडिंग, toddler groups visit, library, मग त्या पुस्तकांच्या लेट फीज, अशा असंख्य गोष्टीनी मेंदूमध्ये इतकी खचाखच गर्दी केली आहे कि आपण या पूर्वी काय करत होतो हेही आठवत नाही. इतके सगळे करूनही कधी कोण्या मुलीचे लांब लचक केस बघितले कि अरे गेल्या आठवड्यात आपला अनुष्काला डोक्याला मसाज करायचा राहूनच गेला (स्वतःचे केस पांढरे होवून टक्कल पडले तरी ते लक्षात येत नाही)… किंवा अनुष्का जेव्हा नील एवढी होती तेव्हा सगळे letters, numbers पटापट सांगायची, नीलला आपण अजून त्याची ओळख सुद्धा करून दिली नाही…कसे होणार म्हणून स्वतःलाच दूषणं देणं चालू होतं, मग तिला पियानो चा सुद्धा क्लास लावायचा आहे, तिला किती आवडते, स्केटिंग शिकवायचंय, आणि या सगळ्यात भर म्हणून मधून मधून शोभा भागवत यांचे लोकसत्ता मधील बालक पालक सदरातील लिखाण न राहवून(आपण कुठे कमी पडायला नको या बावळट कल्पनेने) वाचल्यामुळे मुलांना पक्षी निरीक्षणाला नेले पाहिजे, निसर्गात रमविले पाहिजे, हस्तकला शिकवल्या पाहिजेत, समाजाबद्दलचा दृष्टीकोन दिला पाहिजे हे धडे उमजून सुद्धा अमलात आणायला वेळ न मिळाल्यामुळे अजून थोडे आलेले दडपण…! अरे हो अजून बरेच राहिले कि, गुड मानर्स, kindness, नम्रपणा, confidance बिल्डिंग, socialism असे खूप काही… हुश्श….! आणि एवढे सगळे करूनही आमची पोरं showtime ला आमची इज्जत काढतात…जरा कौतुक म्हणून पाठ असलेले गणपती स्तोत्र म्हणायला सांगितले कि ह्यांना ते बिलकुल म्हणायचे नसते तर TV वर काहीतरी बघायचे असते…मग पुढचा सल्ला, अरे डोळे खराब होतील, मग विटामिन अ साठी carrots भरपूर खाल्ली पाहिजेत यावरून त्यांना दामटणे चालू होते …… ! बापरे….पालकत्व पालकत्व म्हणतात ते काही सोपे नाही, आमच्या आई वडिलांनी कसे जमवले कोण जाणे…


                           आमच्या आयुष्यात या पालकत्वाची जबाबदारी अनुष्काच्या जन्मानंतर सुरु झाली आणि ती नील च्या जन्मानंतर दुप्पट वाढली, बरोबर आजच्या दिवशीच दोन वर्षांपूर्वी घरात अजून एक आनंदाचा खळखळणारा झरा पाझरला… नील च्या रूपाने अनुष्काला एक गोड भाऊ मिळाला. आम्ही आई पप्पा तर आधीपासून होतोच पण अनुष्का हि ताई झाली…. सुरवातीच्या काही गमती जमती तर अगदी गोड होत्या … नील हा फक्त अनुश्काचाच होता, मग तिलाच त्याचे सगळे करायचे असायचे, nappy पासून ते कपडे घालणे, खावू घालणे, झोपवणे, गाणी म्हणणे… सगळे ती मोठ्या उत्साहाने करायची तयारी दाखवत. त्याला हात धरून चालायला सुद्धा ती बर्याचदा तत्पर असे. गेल्या वर्षभरात तर दोघे घरभर धिंगाणा घालत, पसारा करत फिरत असतात. ताईच्या मागे हा आपला लुटुलुटू पळत असतो, तिने घेतलेली वस्तूच याला हवी असते… मग दोघांची भांडणे…मग त्यानंतरचं अनुष्काचं शहाण्यासारखं वागणं….त्यांचं sharing, त्यांचं एकमेकांवरच आणि आमच्यावरचं प्रेम, त्यांचं खेळणं, मोठं होणं, त्यांची बडबड, बोबडे शब्द, त्यांची गाणी, त्यांच्या गोष्ठी, त्यांची खेळणी आणि या सार्या सार्या निखळ निरागसतेमध्ये गुंफलेलं आमचं आयुष्य…मग या दृष्टीकोनातून, पालकत्व हि जबाबदारी न वाटता मुलं आणि आईवडील यांच्यातील एक अतिशय गोड बंध आहे हे जाणवतं …. ती अगदी सहज सुंदर एकमेकांत ओवली जाणारी कळ्यांची माळ आहे हे पटतं…. जिच्या आपोआप, हळुवार उमलण्यानं घर सुगंधून जातं….ज़िच्या प्रेमाच्या घट्ट कुशीमध्ये जबाबदारीची बोथट किनार गळून पडते… आणि मग उरतो तो केवळ आनंदोत्सव……!


                    आम्हाला या पालकत्वाचा आनंद देणाऱ्या अनुष्का आणि नील चे खरेतर आम्हीच ऋणी आहोत …. आज नील च्या दुसऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा घेतलेला हा एक छोटासा आढावा तुमच्या बरोबर share करावा वाटला…. त्याला भरपूर आयुष्य उत्तम आरोग्य आणि गुणसंपन्न जीवन मिळो हीच बापडी इच्छा… तुमचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहेतच……Happy Birthday Neil…!



                                                                                     अश्विनी वैद्य
                                                                                      १३ मे २०१५

राजस्थान डायरी : उदयपूर

उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थाप...