Sunday 25 September 2016

रायगडावर जेव्हा जाणे होते


निश्चयाचा महामेरू l बहुत जनांसी आधारु 
अखंड स्थितीचा निर्धारु l श्रीमंत योगी ll
यशवंत कीर्तिवंत l सामर्थ्यवंत वरदवंत 
पुण्यवंत नीतीवंत l जाणता राजा ll


      सर्वात प्रथम चौथीच्या पुस्तकात ओळख झालेला शिवाजी महाराजांचा इतिहास, आठवीच्या उन्हाळ्याच्या सुट्टयांत रणजित देसाईंचे श्रीमान योगी भान हरपून वाचताना डोळ्यांसमोर उभा राहिलेला शिवरायांचा इतिहास आणि आज परत एकदा बऱ्याच वर्षांनी रायगडावर पाऊल टाकताच वाचलेल्या अनेक प्रसंगांच्या खुणा, अवशेष धुंडाळत त्याच्या खूप जवळ जाता येणारा छत्रपतींचा तो अजरामर इतिहास. 

        लेकीला महाराष्ट्राच्या या महान इतिहासाची थोडीफार तरी ओळख व्हावी या हेतूने आज तिथे जायचा बेत आखला होता. पाचगणी, महाबळेश्वर, महाड या वाटेने पुढे जात रायगडाच्या दिशेने निघालो. खूप वर्षांनी या भागात आल्यामुळे नजर जाईल तिथंवर पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगांचे सौंदर्य कॅमेराच्या जोडीने डोळ्यातही किती साठवावे असे होत होते. ढगांमध्ये बुडालेली सह्याद्रीची शिखरं आणि त्या वरून जागोजागी खळाळत वाहणारे लहान मोठे धबधबे, बघावं तिकडं निसर्ग सौंदर्याची अशी उधळण डोळ्यांचे पारणे फेडत होती. हवेतला गारवा थोडासा वाढवत मध्येच येणारी पावसाची सर आणि पाठोपाठ त्या थेंबांना सोनेरी करण्यासाठी पडणारा उन्हाचा हलकासा शिडकावा, अशा या ऊन-पावसाच्या पाठशिवणीच्या खेळात कायम साथीला असलेली धुक्यात हरवलेली घाटातली वळणावळणाची वाट. महाराष्ट्राला निसर्गतःच भरभरून लाभलेले सह्याद्रीचे हे सौंदर्य श्रावणातल्या पावसाळी हवेत अनुभवणे याला तोड नाही आणि ते शब्दांत मांडणं तर केवळ अवघड. 



       महाबळेश्वर ते पोलादपूर हा जवळपास ४० किलोमीटरचा घाट साधारण दीड एक तासात संपवत पुढे महाडच्या दिशेला लागलो, आणि माध्यान्हीच्या उन्हाला रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड या गावात पोचलो. 'सहावीत शाळेच्या सहलीमध्ये खूप मस्ती आणि दंगा करत चढलेल्या रायगडाच्या पायऱ्या', एवढीच काय ती या आधीची या दुर्गम गडाबद्दलची प्रत्यक्ष आठवण. आज मात्र माझीच छोटी पिल्लं बरोबर असल्यानं गड पायी चढण्याच्या माझ्या अति उत्साहावर पाणी सोडले आणि रोपवे च्या आधाराने पायथ्यापासून सातव्या मिनिटाला गडावरच्या हिरकणी बुरुजावर पोचलो. 
रोपवे मधून पायथ्याशी दिसणारे पाचाड गाव 

       गडाची उंची २८०० फूट आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी वेढलेला आणि त्या वेळी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला शंभर एकरात पसरलेला आहे. किल्ल्यावर पाऊल टाकताच त्याची विशालता नजरेत भरते. 



राणीवसा 
       गडावर पुढे पालखी दरवाजाने आत गेल्यावर उजव्या बाजूला सात राण्यांच्या सात महालाच्या खुणा दिसतात. राणीवशाच्या डाव्या बाजूला दासदासींच्या राहण्याच्या ठिकाणांचे अवशेष आहेत. तिथून सरळ थोडे पुढे गेल्यावर मेणा दरवाजा लागतो.  

मेणा दरवाजा 

       दासींच्या निवासस्थानाच्या मागच्या बाजूने दरवाजातून आत गेले की, जो मोठ्ठा चौथरा दिसतो, ते म्हणजे महाराजांचे राजभवन, ज्याच्या उजव्या पण थोड्या खालच्या बाजूला अष्टप्रधानांच्या महालांचे अवशेष आहेत. त्याच दिशेने (दक्षिणेला) लांबवर टकमक टोक दिसते. कडेलोटाची शिक्षा आमलात आणण्यासाठी माहितीत असलेल्या या टकमक टोकाचा वापर शिवरायांच्या कारकिर्दीत कोणाला शिक्षा देण्यासाठी कधीच करण्यात आला नसल्याची माहिती आज नव्यानेच गडावर मिळाली. 


राजभवन 
      राजभवनातून बाहेर पडून समोरच्या बाजूला अलीकडेच सिमेंटने बांधलेली एक भली मोठी प्रशस्त भिंत दिसते त्याच्या पलीकडे राजसभा आहे, जिथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या राजसभेच्या वास्तुरचनेचे वैशिष्ट्य म्हणजे, त्याच्या कुठल्याही कोपऱ्यातून कितीही कमी आवाजात केलेली कुजबुज महाराजांच्या सिंहासनापर्यंत सहज ऐकू जाई, ज्याची पडताळणी करणे आम्हाला आजही शक्य झाले. 

      किल्ल्याच्या बांधकामासाठी लागणारे दगड, तिथल्या खोदकामात सापडलेलेच वापरण्यात आले होते. गड बांधताना दगड एकमेकांना जोडण्यासाठी गूळ, चुना आणि शिसे यांचा वापर करण्यात आला होता. 
नगारखाना 
       सिंहासनाच्या अगदी समोर एक भव्य दगडी दरवाजा आहे त्यास नगारखाना असे संबोधले जाते, हेच राजसभेचे मुख्य प्रवेशद्वार. तेथून बाहेर पडले कि उजव्या हाताने होळीचा माळ, बाजारपेठ, हत्तीखाना या गोष्टीचे अस्तित्व सांगणारे अवशेष दिसतात. बाजापेठेमधून पुढे गेल्यावर साधारण एक किलोमीटर अंतरावर जगदीश्वराचे मंदिर आहे, ज्याचा कळस मुद्दामहून एखाद्या मशिदी सारखा बांधण्यात आला आहे. मंदिरात प्रवेश केला कि समोर असलेला अष्टकोनी चौथरा म्हणजे महाराजांची समाधी. ज्या पवित्र ठिकाणी इतिहासातल्या एका मोठ्या पर्वाचा अंत झाला. 

    गड पहात असताना तिथल्या कणाकणात, भरलेली भव्यता, अद्वितीयता, पावित्र्य, तिथे त्या काळी घडलेल्या ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाच्या अनेक प्रसंगांचे संदर्भ दाखवत त्यांचे आजारामरत्व स्पष्ट करत होते आणि त्यामुळे आम्हा सर्वांना त्या साऱ्या भारलेपणामुळे महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी आपोआप नतमस्तक व्हायला झाले. 

       या साऱ्या गडाचे, तिथल्या इतिहासाची साक्ष असलेल्या अगदी प्रत्येक जागेचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी तिथे काम करणारे लोक खूप मनापासून करत होते याचे अगदी कौतुक वाटले. स्वच्छतेच्या बाबतीतही संपूर्ण गडावर तितकीच काळजी घेत असल्याचे जाणवत होते. तिथे फिरताना कागदाचा एखादा कपटा किंवा प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या, रॅपर्स असा कुठलाच कचरा दृष्टीस पडला नाही. 

      शिवाजी महाराजांनंतर अनेक वर्षांनी म्हणजे १८१८ मध्ये इंग्रजांनी रायगडावर केलेल्या हल्ल्यामुळे गडावरच्या मूळ बांधकामापैकी २५% हूनही कमी भाग आता शिल्लक राहिला आहे. या हल्ल्यानंतर गड अकरा दिवस जळत असल्याची माहिती तिथल्या मार्गदर्शकाने दिली.

        जवळपास ४-५ तास गडावर थांबून आम्ही रोपवेने परत खाली पाचाड या गावी जिजाबाईंचा वाडा बघण्यासाठी आलो. गडावरची थंड हवा सोसत नसल्याने महाराजांनी त्यांस खाली प्रशस्त वाडा बांधून दिला होता. त्या साऱ्या ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन घेऊन, त्या सगळ्या आठवणी मनात साठवत आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. 

अश्विनी वैद्य 
२५. ०९. १६

राजस्थान डायरी : उदयपूर

उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थाप...