Wednesday 8 October 2014

' संवाद '



                      होतं ना असं कधी कधी.… मनातल्या मनात स्वतःशीच स्वतःच द्वंद्व चालू असतं. काही पटत असतं पण परत तेच रुचतही नसतं…. मनातल्या या गोष्टी कोणाला सांगाव्याही नाही वाटत, खरेतर सांगायच्या असतात पण समोरच्याची मानसिकता ते ऐकून घेण्याची नाहीये हे जाणवलं कि घुसमट सुरु होते, मग आधीच बंद झालेल्या दारावर, ते उघडण्याची अपेक्षाच नसताना ठोठावण्यात कसलं आलंय शहाणपण.
               मित्र-मैत्रिणी, facebook, whatsup वर ढिगानी असले तरी अशी घालमेल जाणून घ्यायची इच्छा असणारे कोणीच नाही… मग बोलायचं तरी कोणाशी, हि मनातली घालमेल थांबवाची कशी…या भयंकर विचाराने मग स्वतःशीच संवाद साधायचा प्रयत्न केला, आत्मपरीक्षण म्हणूया हवं तर तसं करायचा प्रयत्न केला, मनातल्या मनात चूक-बरोबर, योग्य अयोग्य, अशी गणितंहि मांडून बघितली. मग तर मनाची अस्वस्थता आणखीच वाढली. मन अजून अशांत झालं……!

                       या सार्यातून एक मात्र नक्की पटलं, माणसाला संवादाची अत्यंत गरज असते, अन्न, वस्त्र, निवार्या इतकीच संवादाचीही महत्वाची मानसिक गरज असते हे प्रकर्षानं जाणवलं. मग काय जेव्हा मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, जवळचे सोबती या सार्यांचे संवादासाठीचे बंद दरवाजे डोळ्यासमोर आले, तेव्हा फक्त एकच आधार खुणावू लागला. टेबलावर ठेवलेली डायरी आणि पेन.…संवादासाठी, आधारासाठी कायम तयार असलेले…….
                     मनात साठलेला सगळा राग भसा भसा एका पानावर लिहून टाकला… तो राग बघून पेनही इतका बिथरला कि अगदीच वेडावाकडा चालायला लागला…. मग दहा मिनिटे शांत बसल्यावर, थोडं मोकळं झाल्यासारखं जाणवल्यावर पुढच्या पानांवर विचारांची वाट नेईल तिकडे, मनाची धाव पोचेल तिथपर्यंत शांतपणे लिहित गेले. एव्हाना पेनही स्थिरावला होता, तो हि नीट चालत होता. मनात उमटलेले सारे स्वल्पविराम, अर्धविराम जस जसे संपत गेले तसे थोडे शांत वाटू लागले, आणि मग थोड्यावेळाने जेव्हा हि शांतता टिकवून ठेवावी असे जाणवले तेव्हा पेनानेच मनाचा ताबा घेतला आणि पानावर पूर्णविराम आपोआप उमटला. त्या रात्रीच्या शांततेत मनाचीही शांतता घेवून मी झोपून गेले.
                    नवीन दिवस, नवीन उत्साह आणि चैतन्य घेवून सूर्यकिरणे जेव्हा दाराशी पोहोचली तेव्हा जाग आली, डोळे उघडल्यावर सर्वात आधी दिसले ते पेन आणि डायरी…. काल रात्री अगदी विषन्न झालेल्या मनाशी संवाद साधून न चिडता त्याचं सारं म्हणणं ऐकून घेवून तिनं (डायरीनं) किती हळुवार शांत केलं त्याला, चूक बरोबर अशी कसलीच टिपण्णी न देता मनावरचं सारं मळभ आपसूक दूर केलं. राग असो, आनंद असो कोणताही भाव असो तो व्यक्त होणं गरजेचंच असतं. कोणीतरी ते आपुलकीने ऐकावं, ऐकून घ्यावं एवढीच आवश्यकता असते. आणि नितळ संवादातूनच ते शक्य होतं. जो काल कोणतेही पूर्वग्रह नसलेल्या माझ्या डायरीने माझ्याशी साधण्याचा प्रयत्न केला.
आनंद, दुःख, राग या भावना मनात येणं हे देखील एक संवेदनशील आयुष्य जगत असल्याचं द्योतक आहे, (आपण नॉर्मल आहोत हे स्वतःला समजवण्यासाठी काढलेली पळवाट असेल कदाचित.) पण असे भाव कमी जास्त प्रमाणात आपल्या भोवती पिंगा घालतच असतात. तुम्हा सर्वांबरोबर हे share करण्यामागे हेच एकमेव कारण होते, कि असाहि एक सुसंवाद होऊ शकतो….कदाचित कधी उपयोगी पडलाच तर…


- अश्विनी- 
३/१०/२०१४


Saturday 13 September 2014

एक सुंदर नाट्याविष्कार


    मागच्या आठवड्यात सकाळी mailbox चेक करताना महाराष्ट्र मंडळ लंडन चे एक मेल दिसले. येत्या १६ ऑगस्ट ला सत्य घटने वर आधारित एक मंत्रमुग्ध करणारा एकपात्री प्रयोग, सौदामिनी दामले-वाडेकर-मुल्हेर-लीन. सादरकर्त्या सौ. अमृता सातभाई, पुणे.
              हे नाव जरी मला आधी माहीत नसले तरी या परदेशी भूमीवर मराठी नाटक बघण्याची संधी मिळणे हे काही साधे नव्हते. मनात उगीच एक आनंदाची लहर उठली. मग चहा घेता घेता मंदार ला मेल दाखवले. आणि त्याची पहिली प्रतिक्रिया, तू जा नाटक बघायला. मी सांभाळेन दोघांना. मला प्रचंड आनंद झाला. मी आयुष्यात आजपर्यंत जी काही नाटके पहिली ती लग्नाच्या आधी. लग्न होवून एका अतिशय संपन्न सांस्कृतिक वारसा असलेल्या शहरात जरी आले तरी बिऱ्हाड लगेच परदेशात हलवावे लागले होते त्यामुळे पुण्यात नाटके बघायची संधी मात्र हुकत गेली होती. पण फलटण सारख्या गावात मी 'कुसुम मनोहर लेले, हम तो तेरे आशिक है, गेला माधव कुणीकडे, वय लग्नाचं, एका लग्नाची गोष्ट, चार चौघी, शामची मम्मी अशी बरीच नाटके बघितली. आणि आता त्या नंतर जवळपास ८ वर्षांनी मला लंडन मध्ये केवळ मंदारच्या सहकार्यामुळे नाटक बघायला मिळणार होते. आणि तोही एकपात्री प्रयोग. मी फोनवरून तिकीट बुक केले आणि तयारीला लागले. तयारीला म्हणजे त्या नाटकाच्या दोन तासात नील आणि अनुष्काला सांभाळण्या साठी लागणाऱ्या गोष्टींच्या तयारीला. महाराष्ट्र मंडळापासून जवळची पार्क बघून ठेवली. पावूस आला तर indoor play centre बघून ठेवले. खाणे पिणे खेळणी अशी सारी जय्यत तयारी करून finally आमची कार महाराष्ट्र मंडळ लंडन कडे धावायला लागली. नाटक संध्याकाळी ४ ते ६ असे होते. आम्ही तिथे वेळेत पोहचून मंदार ला ऑल द बेस्ट म्हणून मी एकटीने नाटकासाठी आत गेले. प्रेक्षकांमध्ये जवळपास सगळे जण साठी आणि सत्तरीतले. माझ्या वयाचे मला तिथे कोणीच दिसले नाही. नाटक वेळेत सुरु झाले. 
                   
           हे नाटक एका सत्य घटनेवर आधारित आहे. साधारण ४०-५० वर्षापूर्वीच्या पुण्यातील एक अतिशय धाडसी, मध्यमवर्गीय, बंडखोर व्यक्तिमत्वाची मुलगी कु. सौदामिनी दामले. आजोबांकडून धाडसी आणि स्वच्छंदी वागण्याचे बाळकडू मिळालेली सौदामिनी मुठा नदीच्या पुरात मुलांबरोबर उडी मारून पोहत जाते, हिमालयात ८ महिने सफर करते आणि नंतर अमेरिकेला जायचा ध्यास घेते. त्याकाळी GRE, TOFEL ची परीक्षा देवून फिलाडेल्फिया ला MS साठी admission मिळवते. आई-वडील लग्नाची अट घालतात मग त्यांच्या वाड्यातल्याच एका उच्चशिक्षित मुलाशी मधुकर वाडेकर शी पटकन लग्नाचा बार उडवून देतात आणि मग ती अमेरिकेला जाते. नवरा उच्चशिक्षित... नासा मध्ये मोठी नोकरी....मोठ्ठा पगार ! तीही शिक्षण पूर्ण करून वेगवेगळ्या कंपन्याची accounts ची कामे बघू लागते. पण अतिशय बुद्धिमान असलेल्या नवर्याला दारूचे व्यसन जडते आणि होत्याचे नव्हते होते. त्याला व्यसनातून बाहेर काढण्यासाठी ती आतोनात प्रयत्न करते पण अखेर आपले घरच यात उध्वस्त होत आहे असे लक्षात आल्यावर नवर्याला घटस्पोट देण्याचा धाडसी निर्णय घेते. त्यानंतर तिची स्वतःची एक मुलगी आणि दोन दत्तक मुले (शेजारी राहणार्या मराठी दाम्पत्याचा अचानक अपघातात मृत्यू होतो, त्यांची दोन मुले सौदामिनी दत्तक घेते) यांना मोठ्या हिमतीने अनेक वादळांना धैर्याने सामोरी जात वाढवते आणि आयुष्याला एका पानावरून पुढच्या पानावर नेते. त्यानंतर एका टप्प्यावर तिचे एका जर्मन माणसाशी (मुल्हेर) लग्न होते. ज्याचा नंतर त्त्यांच्याच घरी दुर्दैवी खून होतो. या सार्यातून ती तेवढ्याच हिमतीने परत उभी राहते. आयुष्यात इतके धक्के पचवून मुलांना सांभाळताना होणारी आर्थिक ओढाताण कमी करण्यासाठी ती accountancy बरोबरच बेकरी व्यवसायात घुसते. बेकारीच्या orders वेळेत पोचविण्यासाठी ती एक ट्रक विकत घेते. त्याकाळी फिलाडेल्फिया मध्ये ट्रक चालवणारी ती एकमेव महिला ठरते. याहीपुढे जावून ती तिच्या बोर्न अमेरिकन (लीन) माणसाबरोबरच्या तिसर्या लाग्नाबाबतचा खुलासा करते. या सगळ्यामध्ये ती तिच्या तीनही सासू-सासर्यांची (मराठी, जर्मन आणि अमेरिकन) तेवढ्याच आपुलकीने सेवा करत असते. वयाच्या बावन्नाव्या वर्षी नर्सिंगचा साडे तीन वर्षांचा कोर्स पूर्ण करून आता ती पुढचे सारे आयुष्य एक निष्णात नर्स म्हणून घालवत आहे. जिच्या आयुष्यावर हे कथानक आहे, या बाईंचे वय आज ६९ वर्षांचे आहे. कोणी सहजासहजी पेलू शकणार नाही असे असामान्य आयुष्य त्या जागल्या. हे करताना अनेक वेळा उन्मळून पडल्या. पण जगातील प्रत्येक स्त्रीला मिळालेल्या एका दैवी गुणावर अर्थात खचून न जाता पुन्हा नव्याने उभारी घेण्यावर विश्वास ठेवत त्या पुढे चालतच राहिल्या. 
       
               हे सारे चित्तथरारक कथानक हळू हळू प्रेक्षकांसमोर उलगडताना सौ अमृता सातभाई यांनी अभिनयाच्या अनेक छटा अतिशय सुरेखपणे पेलल्या. अकरा वर्षाच्या छोट्या मुली पासून, आई, वडील, आजोबा, स्वतःची लहान मुले, सासू, सासरे, अमेरिकेत त्यांना भेटलेली वेगवेगळी माणसे या साऱ्यांच्या भूमिकेत त्या खूप सहजतेने शिरत होत्या. एका भूमिकेतून हमसुन हमसुन रडत तेवढ्याच सहजतेने दुसर्या अतिशय आनंदी भूमिकेत शिरणे हे अभिनयाचे शिवधनुष्य ९५ मिनिटे त्यांनी खूप ताकदीने पेलेले. अप्रतिम पाठांतर, आवाजातील योग्य चढ उतार, अचूक शब्दफेक, body language या गुणांनी संपन्न अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनाचा अचूक ठाव घेतला. मी तर जणू मंत्रमुग्ध होवून ते सारे बघत होते. किती दिवसांनी इतकी सुंदर, गोड मराठी माझ्या कानांवर पडत होती. 


या नाटकातील काही प्रेरणादायी वाक्य जी माझ्या अगदी काळजाला भिडली. त्यातीलच काही……. 

१. "हा उभा हिमालय, या पर्वत रांगा, या झुळूझुळू वाहणाऱ्या नद्या, या केवळ नकाशात नक्षीकाम भरण्यासाठी म्हणून आहेत का? खुल्या दिलाने निसर्गाला भिडलेच पाहिजे, बसेल एखादा वादळाचा तडाखा जोरात, पण त्यातूनच नव्याने उभे राहण्याचे धैर्य मिळतेच कि, हा निसर्ग आपल्याला काय नाही शिकवत, चुकतात गणिते आयुष्याची कधी कधी, पण निर्णय घेण्याची क्षमता यातूनच तर मिळते."
२. प्रत्येक संकट हे एका नवीन संधीचे उगमस्थान असते. 
३. आपण जेव्हा चालायला लागतो, तेव्हा रस्ता आपोआप तयार झालेला असतो. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जेव्हा आपण मनापासून प्रयत्न करतो, तेव्हा ती मिळणे हा आपला अधिकारच होवून जातो. 
४. कोणत्या एका धर्मात सांगितले आहे म्हणून दारुड्या नवर्याला कवटाळत बसून मी हि त्याच्या सकट बुडून जाणे हे मी स्वतःवर अन्याय करण्यासारखे होते. मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे, माझ्या काही आकांक्षा आहेत. हे एकदाच मिळणारे आयुष्य समरसून जगणे हा माझा अधिकार आहे. 
५. दत्तक घेतलेल्या मुलांची मी आई झाले खरी, याचा अर्थ त्यांनी मला आई म्हणून स्वीकारले होते म्हणून. आई होणं हा एक दैवी संकेत असतो. परमेश्वरानंच त्या मुलांसाठी माझी निवड केली होती. ती माझी जबाबदारी होती. पण त्यांच्या बरोबरच माझे स्वतःचे ही एक आयुष्य होते. 
६. आज मी जे आयुष्य जगत आहे, जी माणसे जोडली आहेत, तेच माझ्याबरोबर कायम राहणार आहे. पैसा नाही. 

७. जीवनात लहान मोठी वादळे येत राहणार, पण पुढे गेलेच पाहिजे, कारण माझे आजोबा सांगायचे, 'थांबला तो संपला'. 

या प्रयोगानंतर मी त्यांना भेटायला गेले. आणि त्यांना मनापासून धन्यवाद दिले. मी आज अगदी भरून पावले होते. त्यांच्या बरोबर फोटो घेण्यासाठी मी एका आजोबांना माझा mobile दिला खरा पण त्यांना काही फोटो काढता आला नाही. असो पण पुण्यात जेव्हा कधी हा प्रयोग लागेल तेव्हा नक्की आवर्जून सार्यांनी बघायला जावा असाच आहे. 


अश्विनी वैद्य 
१७.८.१४

Friday 12 September 2014

निरागसता - मनाला वेड लावणारा शब्द.


             जन्मतःच अगदी भरभरून मिळालेली निरागसता, लहानपणी हि माझी आई, हि ताई, हे पप्पा, हे आजोबा याच कोवळ्या विश्वात रमलेली निरागसता. आईस्क्रीम, चोकलेट मागण्यासाठी आईला बिलगण्यात लपलेली निरागसता, नको असलेल्या गोष्टीसाठी तोंड वेडावून, खट्टू होवून बसण्यातली निरागसता, पप्पानी कशाला नाही म्हटले कि जोरजोराने रडून गोंधळ घालण्यातली निरागसता, 'लोक काय म्हणतील' या जाणीवेचा जराही स्पर्श न झालेली अल्लड निरागसता, पहिल्यांदाच स्टेजवर नाच करताना एकटक आईकडेच बघत राहण्यातली निरागसता, मग हळू हळू मोठे होत, समज येत कधी आईला खूष करण्यासाठी बाहेरून आलेले कपडे न सांगता बदलण्यातली निरागसता, न सांगता स्वतःची रूम नीट अवरण्यातली निरागसता. आई, पप्पांच्या वाढदिवसाला दुकानाच्या एका isle मध्ये उभे राहून कमरेवर हात ठेवून गोड हसत 'हं यातले तुला काय हवे ते घे आई, माझ्याकडून तुला birthday गिफ्ट' हे असे म्हणण्यातली त्याच्या किमतीशी (price) जराही नातं नसलेली मौल्यवान निरागसता. मित्रांशी क्षणात भांडण्यातली आणि लगेच परत खेळण्यातली निरागसता.

                 मग असेच कधीतरी बालपणीच्या संध्याकाळी थोडीशी maturity कडे वळलेली निरागसता, 'हे असं केलं तर मला लोक हसतात', 'माझं असं वागणं लोकांना नाही आवडत', 'मी हे कपडे घातले तर सगळ्यांना खूप आवडते' या आणि अशा अनेक प्रकारे मनाचं behavioral conditioning वाढत्या वयाबरोबर होत गेल्यामुळे ओहोटीला लागलेली निरागसता, व्यावहारिक समाजात वावरताना जिला जराही जागा नाही आणि म्हणूनच बालीशपणा, खुळेपणा अशी नकारात्मक लेबलं चिकटलेली निरागसता, आणि त्याचमुळे आयुष्याच्या रहाटगाडग्यात, जबाबदार्यांच्या ओझ्यात, आर्थिक जुळवणीत तिचा विचारही मनाला कित्येक दिवस न शिवलेली आणि शेवटी संपून गेलेली निरागसता. 

                 काय आहे हि भावना, एखाद्या घटनेमुळे मनात उस्त्फुर्तपणे उमटलेला प्रतिसाद जगाची, लोकांची कसलीही तमा न बाळगता आपल्याच उघड्या कानांनी ऐकणे यातच निरागसता आहे का? आपल्याला जे आवडेल, पटेल ते त्याच क्षणी करणे याच्याशी जोडली आहे का ही मनाची संवेदना. माहित नाही. पण एक मात्र नक्की, कि ती कोवळी, अल्लड, हळुवार निरागसता कोणत्याही रुपात आपल्या बरोबर असेल तर आपलं मन प्रफुल्लित, तजेलदार आणि हलकं फुलकं राहायला मदतच होईल. आणि म्हणूनच होत असेल कदाचित रम्य ते बालपण. 

- अश्विनी वैद्य

एकसष्टी

 

                 पप्पा, आज तुमचा ६१व्वा वाढदिवस. सर्वप्रथम आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. पप्पा गेलेला ६० वर्षांचा काळ असा भुर्कन उडून गेला असं नाही म्हणणार मी. कारण खूप खूप सुंदर आठवणींनी भरून ओथंबलेली गेली हि पाच तपं. मग असा कसा पटकन गेलेला असेल तो काळ. ज्यातून तुमच्याबरोबर आम्हीही तेवढेच सर्वार्थानं समृद्ध होत गेलो.

        असं म्हणतात, लहानपणी जे वातावरण तुम्हाला मिळतं, जे स्किल्स तुम्ही स्वतः आत्मसात करता ते पुढचे सारे आयुष्य घडवण्यात मोलाचे ठरतात. इतकं रखरखतं बालपण, पितृछायेचं परकेपण आणि लक्ष्मीची अवकृपा या सार्यांच्या श्रीमंतीत वाढलेलं रोप तितकीच खंबीर, गोड, रसदार फळे स्वतःत रुजवत स्वतःच्या पायावर उभं राहिलं, हिमतीने. अजाणते वयात जबाबदारींची जाण पेलत स्वतःचं हरहुन्नरी आयुष्य तुम्ही भरभरून जगलात ते केवळ यामुळेच असेल कदाचित. तुमचं बालपण तुम्हाला खूप काही देवून गेलं पप्पा. त्या वेळी आयुष्याच्या शाळेत गिरवलेले ते धडे कोणतीही घोकमपट्टी न करता आजपर्यंत कानात गुंजत राहिले आहेत, आणि त्या मुळेच आमचेही बालपण, तरुणपण खुलण्यासाठी, बहरण्यासाठी मम्मी बरोबर तुम्हीही तेवढेच प्रयत्न केलेत. 

        आम्हाला कायम तुमचा खूप मोठ्ठा, भक्कम आधार वाटतो. 'हं, पप्पा आहेत ना, होईल काहीतरी' असा विश्वास असतो. कोणत्याही निर्णयात मग ते घरगुती असो किंवा बाहेरचे तुम्ही आमची मतं तेवढीच महत्वाची समजून ग्राह्य धरत आलात. शाळेत असताना डान्स, गाणी, नाटकं या सगळ्यात उत्साहाने मला भाग घ्यायला लावायाचात. आई अभ्यास आणि तुम्ही other activities असं न ठरवता जमलेलं समीकरण आमच्या पायाभरणी साठी खूप महत्वाचं ठरलं. त्यामुळेच निखिलची गाण्यात एवढी प्रगती झाली. माझं बालचित्रवाणीवर झालेलं समूहगान, युवामोहोत्सव आणि तत्सम कार्यक्रमात झालेले डान्स, माझा कथ्थकचा क्लास, आईने तिच्या शाळेतून आणलेल्या अनेक पुस्तकाचं वाचन, चांदोबा, किशोर या लहान मुलांच्या मासिकात माझे छापून आलेले लेख आणि अजून बरच काही हे त्यामुळेच शक्य झाले. 'काय हो पप्पा, थांबा ना तुम्ही जरा…" असं अगदी चिडून तुम्हाला म्हणण्या इतकी मोकळीक आपल्या नात्यात त्यामुळेच निर्माण झाली. अगदी लहानपणापासूनच तुमची एखादी गोष्ट मला नाही पटली कि लगेच तुम्हाला ते सांगण्याचे धाडस त्यामुळेच आले. या परदेशी, अनोळखी भूमीत न गडबडता स्वतःला सावरत जगण्याचे पाठबळ मिळाले तेही केवळ त्यामुळेच. 
    
        आपल्याला उच्च विचारसरणी असलेल्या लोकांचा सहवास मिळावा, जेणेकरून आपली वैचारिक प्रगल्भता वाढीस लागते या हेतूने तुम्ही कायम आम्हाला कोणाकोणाला भेटण्यास घेवून जायचा, यातूनच गवसलेला एक अनमोल क्षण म्हणजे प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या बरोबर शाळकरी वयात माझी झालेली पहिली भेट. 
         आज वयाची तिशी ओलांडताना मी बर्याचदा भूतकाळात रमते. या काळात आपसूक गोळा केलेल्या आठवणींचा खूप गोड ठेवा मनाच्या एका संवेदनशील कोपर्यात जपत आले आहे. त्या कधी कोणाशी शेअर कराव्यात असे नाही वाटले, कारण त्या त्या गोष्टींकडे त्या त्या प्रसंगी बघण्याची ती माझी नजर होती, त्याच दृष्टीने सारे पाहतील असे नाही. पण आजचे एकसष्टीचे निम्मित पुरेसे ठरले त्या सुंदर, मोहक फुलांवर नव्याने मोरपीस फिरवायला, आणि माझे मलाच कळले किती छान सुंदर केलं आहे आमचं बालपण तुम्ही दोघांनी. (आणि तेही कोणतीही parenting वरची पुस्तके न वाचता, आमचा मात्र आधार हि पुस्तकेच.) मी जवाहर नवोदय विद्यालय, सातारला असतानाचे दिवस, तुमचे दरवर्षी बोर्डाचे पेपर तपासण्याचे दिवस, तुमची नाटकातली कामं, आमच्या शाळांमधल्या निबंध स्पर्धा, विज्ञान प्रदर्शनं यामधले आमचे भाग, माझं इंजिनीअरिंग च उप-डाऊन आणि बरच काही… 

           आजुष्य सारेच जगतात, पण ते समरसून, स्वतःच्या मनाचा कौल ऐकत, प्रत्येक गोष्टीत आनंद शोधत, उत्साहानं जगणं साऱ्यांनाच नाही जमत, जे मी तुमच्याकडे बघून शिकण्याचा कायम प्रयत्न करते. एवढा उत्साह कुठून येतो पप्पा तुमच्यात. मग ते अगदी दमलेलं असताना बाहेर जाणं असेल, एखादं नाटक बघणं असेल, वाढदिवसाला अगदी studio मध्ये जावून फोटो काढणं असेल, वयाच्या चाळीशीत लॉ ला घेतलेलं admission असेल किंवा सेवानिवृत्ती नंतरचं कमिन्स मधलं शिकवणं असेल. माझ्यासाठी तर मी जे काही लिहीन त्याला दिलखुलास दाद उत्सुर्तपणे देणाऱ्यामध्ये तुम्ही toplist आहात. 
          आज या साठीच्या वळणावर मन थोडं हळवं होतंय तुमचं, fulfilment ची जाणीव आहेच पण पूर्वीचा खंबीरपणा फुला सारखा नाजूक झालाय. तरीही उत्साह आणि नवीन काहीतरी करण्याची उमेद मात्र काळी इतकीच टवटवीत. प्रवीण दवणे यांनी त्यांच्या एका पुस्तकात म्हटल्या प्रमाणे 'जगत रहा, भरत रहा' या उक्तीनुसार तुमचं अस्ताव्यस्त पसरलेलं आयुष्य आणि त्याला सुगरण आईची मिळालेली नीटनेटकी साथ यामुळे खरेतर आमचीच आयुष्य भरत गेली. या साऱ्याबद्दल धन्यवाद असं म्हणून मी त्याचं मोल बिलकुल कमी करणार नाही. पण आजच्या दिवशी या साऱ्या भावनांना विसावण्यासाठी मोकळी वाट दिसली ती तुमच्या पर्यंत पोहोचणारी म्हणूनच हा लेखन प्रपंच.

      अखेरीस, अनेक वादळांना धैर्याने सामोरे जात एकटीच्या सामर्थ्यावर जगलेल्या आईचं मूल कसं असणार अजून, नाही का? पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…. 

तुमची अशु 
अनंतचतुर्दशी 


स्कूल चले हम…. !



         गेल्या आठवड्यात अनुष्काच्या नवीन शाळेचा उदघाटन समारंभ खूप दिमाखात पार पडला. दिमाखात म्हणजे सगळीकडे रोशनाई, जोरदार आतषबाजी, मंत्र्यांच्या गाड्या, त्यांची मोठमोठाली मुलांना न समजणारी भाषणं यातलं काहीही नाही, तर सारं काही मुलांसाठी या भावनेतून शाळेच्या प्रांगणात मुलांसाठी वेगवेगळ्या activities ठेवल्या होत्या. एका कोपऱ्यात धनुष्य बाण चालवणे, सर्कस मधले छोटे छोटे खेळ करणे, bubble mixture ने bubbles करणे, face-painting, पुस्तक वाचन अशा वेगवेगळ्या गोष्टी. 

         प्रांगणाच्या दुसऱ्या बाजूला पूर्णवेळ मंजुळ स्वरात वाजणारा ब्यांड चालू होता. जवळपास ३५० पालक या कार्यक्रमाला आले होते. आम्ही बरोबर दिलेल्या वेळेनुसार ११ ला शाळेत पोहोचलो. 

        दारातच शाळेचे मुख्याध्यापक प्रत्येकाच्या स्वागतासाठी थांबले होते. सगळीकडे पालक त्यांच्या पाल्याबरोबर काही न काही कला- कौशल्य कृती करण्यात गुंग होते. सगळी मुलं अगदी उत्साहात इकडून तिकडे बागडत होती. शाळेच्या नवलाईच्या गाण्यावर जणू आनंदानं नाचत होती. सारीकडे अतिशय उत्साही आणि प्रसन्न वातावरण होतं. 

         आम्ही नव्याने ओळख झालेल्या दोन चार पालकांना भेटून, थोड्या गप्पा मारून शाळेच्या इमारतीमध्ये शिरलो. अनुष्काचा क्लास पाहिला. २५ मुलांचा तो वर्ग सर्व गोष्टींनी परिपूर्ण होता. त्यामध्ये प्रत्येक मुलाला लागणारी स्टेशनरी त्याच्या नावाच्या ट्रे मध्ये ठेवलेली, कोपऱ्यात त्यांच्या क्लास् पुरती छोटी library होती. टेबल, खुर्च्या आणि इतर शिकविण्यास उपयुक्त साधनांनी वर्ग अगदी सुसज्ज होता. 

     आम्ही क्लास टीचर ला भेटलो. त्याना दुसर्यांदाच भेटत असूनही अनुष्काचे नाव तिच्या लक्षात होते. शाळेबद्दलची, शाळेतील रोजच्या रुटीन बद्दलची माहिती तिने नीट समजावून सांगितली. तोपर्यंत बरोबर जेवणाची वेळ झाली. 

      तिथे आलेल्या सर्वांसाठी (३५०लोकांसाठी) ब्रिटीश पद्धतीचे लंच होते. अर्थात वेगवेगळी स्यांड विचेस, पिझ्झा, स्प्रिंग रोल्स, डेकोरेटेड कप केक्स , चहा, कॉफी, ज्यूस अशी पेये. 

        त्या नंतर शाळेच्या मागच्या मैदानात साऱ्या मुलांनी (जवळपास १००) गोल करून बसायचे होते आणि पालकांनी त्यांच्या मागे उभे राहायचे. मध्ये शाळेचे मुख्याध्यापक आणि या शाळा उभारणी साठी महत्वाचा हातभार लागलेल्या इतर २ व्यक्ती आणि एका चर्चचे फादर हे साध्या खुर्च्यांवर बसले. शाळेच्या उभारणीची थोडक्यात माहिती देवून 'फीत' कापण्याच्या कार्यक्रमाला सुरवात झाली. 

         त्या साठी बोलावण्यात आलेले प्रमुख अतिथी होते, शाळेतलीच मुले. हो, हि सारी चिमुरडीच आज प्रमुख अतिथीची भूमिका बजावणार होती. हे सारे काही चालले होते ते केवळ या मुलांसाठीच. आणि म्हणूनच एक मोठी, लांब रिबीन गोल करून बसलेल्या मुलांच्या हातात दिली, आणि प्रत्येकाला एक छोटी कात्री दिली. कोणताहि नेता, संस्थाचालक किंवा खुद्द ज्यानं हि शाळा उभारण्यासाठी अक्षरशः जीवाचं रान केलं ते मुख्याध्यापक या पैकी कोणीही नाही तर चक्क सर्व मुलांनी मिळून फीत कापली आणि जल्लोषात शाळेचे औपचारिकरीत्या उदघाटन केले. साऱ्या मुलांना ते महत्वाचे( व्ही आय पी) असल्याची जाणीव करून देवून त्यांच्या कडूनच शाळेचे उदघाटन करण्याची कल्पना मला खूप भावली. यावरूनच मुले हीच कोणत्याही शाळेचा आत्मा असतात याची जाण इथल्या साऱ्या जणांना आहे हे प्रत्यक्षात पाहायला मिळाले. 


          मुलान्च्या चेहार्यावरचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता. अनुष्का तर रिबन कापल्यावर तिचा एक तुकडा हातात मिरवत अगदी हसत माझ्याकडे पळत आली आणि म्हणाली, "आई, I am VIP today. I cut the रिबन". आम्हाला हे सारं अगदी नवीन होतं. या साऱ्या कार्यक्रमाचे क्षण मनात साठवत आम्ही जेव्हा घरी परत निघालो तेव्हा अनुष्का आम्हाला म्हणाली, "I cant wait for tomorrow to come to the school for whole day." आणि अशा प्रकारे शांत पण प्रसन्न वातावरणातील एक वेगळा कार्यक्रम आम्हाला अनुभवण्यास मिळाला. 

        शाळा ही - प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग. कोवळं, निरागस बालपण आणि शाळा हे एक अतूट नातं. संस्कारांची बीजे पेरणारी, ज्ञानाची कवाडं खुली करणारी, स्वतःतील आत्मविश्वास जागवायला मदत करणारी, मैत्रीचे अतूट बंध निर्माण करणारी… थोडक्यात काय जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी आई- वडिलांनंतर तेव्हढीच महत्वाची असणारी शाळा. प्रत्येकाप्रमाणे विद्यार्थी म्हणून मला शाळेकडे बघता आलेच, पण आई- वडील शिक्षण शेत्रात असल्यामुळे त्यांना आलेल्या अनुभवातून शिक्षक आणि प्राचार्य यांच्या दृष्टीनेही शाळा कशी असते हे थोडेफार जाणता आले. 

     मुलांना कायम धाकाच्या ओझ्याखाली दाबत, स्वतःची अधिकारशाही मिरवत, आणि मनात पगाराशी गाठ बांधत शाळेत वावरताना कसले आलेत संस्कार आणि कसलं आलंय ज्ञान…. पुस्तकातला अभ्यासक्रम दिलेल्या वेळेत पूर्ण झाला म्हणजे जबाबदारी संपली. अशा विचार धारेचे शिक्षक असणाऱ्या या विद्येच्या मंदिरात मग काही मुलांना शाळा नको झालेले ओझे वाटू लागते तर काही मुले पाठांतराच्या जोरावर मार्कांचे कागदी certificates मिळवण्यासाठी धडपडत रहातात. पण या दोन्हीतही जगण्याचे धडे गिरवायचे राहूनच जातात. स्वतःची ओळख शोधायची आहे हे कोणी त्यांच्या ध्यानीच आणून देत नाही. 

           आपल्या भारताचे नवे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका भाषणात त्यांनी सांगितलेला एक किस्सा याच अनुषंगाने आठवला. एक B.Com झालेल्या मुलाला त्यांनी विचारले, तुला काय येतं, या वर तो म्हणाला, मी B.Com आहे. यावर ते म्हणाले, ते ठीक आहे, पण तुला येतं काय? मी B.com केलय. त्यावर पुन्हा ते म्हणाले, ''अरे तुला ब्यालंस शिट वैगेरे त्यातल काही येत असेल ना…. मग ते सांग ना, मला हे करता येतं जे कंपनीच्या कामासाठी अशातर्हेने उपयुक्त असतं.'' वैगेरे. खरच किती मार्मिक सत्य आहे ना हे. डिग्रीची certificates हीच स्वतःची ओळख आहे असे मानत एकदा का या विद्येच्या दालनातून बाहेर पडले कि मग खरी कसोटी लागते ती आयुष्याच्या वास्तव शाळेत. आणि मग वास्तवात समोर येते ती अशातूनच तयार होणारी काहीही धड येत नसलेली, पण हातात डिग्री हेच ओळखपत्र बाळगणारी सुशिक्षित बेकार पिढी… नोकरीच्या शोधात फिरणारी. कॉम्पुटर इंजिनिअर होवून कॉम्पुटरचा क्लास लावणारी, इलेक्ट्रोनिक्स इंजिनिअर होवून टी व्ही - रेडीओ उघडू हि न शकणारी, आणि खरच हे खूप भीतीदायक वास्तव आहे जे स्विकारायला मन भांबावतय. असो सगळीकडे अशीच शाळा, कॉलेजे आहेत असे नाही पण याचे प्रमाण नक्कीच जास्त आहे . 

          या साऱ्या आधारावर मला हि अनुष्काची जी नवीन शाळा सुरु होत आहे त्याचे खरच खूप कौतुक वाटले. परदेशी आहे म्हणून कौतुक असे नाही तर तिथे चालणारा स्वच्छ कारभार, मुलांचा केला जाणारा आदर, स्वतःच्या आवडीने या क्षेत्रात पदार्पण केल्यामुळे १०० टक्के झोकून देवून कष्ट घेणारे शिक्षक आणि या साऱ्या मुळे शाळेत जायला कायम तयार असणारी- मुले. हे सारेच खूप स्तुत्य आहे आणि अनुकरण करण्याजोगेही. 

 अश्विनी वैद्य. 
  ९.९.२०१४

राजस्थान डायरी : उदयपूर

उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थाप...