Friday 6 October 2023

Meanwhile, in Lisbon... 😀




ऑफिसच्या कामा निमित्त Lisbon, Portugal ला गेल्या आठवड्यात जाऊन आले. Covid मुळे कायमच virtually connect केलेल्या Portuguese colleagues, manager आणि architects laa त्यामुळं प्रत्यक्ष भेटता आलं. टीम lunch, dinner, get togethers ला जाता आलं. ऑफिसची कामं झालीच पण या भेटींमधून Portuguese कल्चर जवळून बघता आलं. Lisbon शहराबद्दल जाणून घेता आलं. 



Lisbon अतिशय सुंदर आणि एकटीने फिरायला खूप सुरक्षित शहर आहे. ५ दिवस ऑफिस नंतर आलेला weekend इथेच राहून शनिवार-रविवार एकटीने या देशात फिरण्याचा सुंदर अनुभव घेतला. प्रवासानंतर माणूस खूप अनुभव संपन्न होतोच शिवाय एकट्याने केलेल्या प्रवासात खूप जास्त शिकतो, हे मात्र खरंच.

इथे माझी मीच एकटीने फिरताना भाषेची अडचण खूपदा आली. सगळीकडे लोकं फक्त आणि फक्त पोर्तुगीजच बोलणारी, इंग्लिशचे सगळ्यांना फारच वावडे. मोठे हॉटेल्स किंवा tourist locations च्या ठिकाणी असलेला माहिती देणारा staff वगळला तर इतर लोकांना (म्हणजे रस्त्यावरून जाताना कोणाला पत्ता विचारला किंवा कॉफी shops, restaurants मधले waiters अशा कोणालाही) अजिबात इंग्लिश बोलता येत नाही. त्यांना समजलं तरी उत्तर द्यायला बोलता आलं नाही. त्याने खरंतर माझं फार काही अडलं नाही. आताशा बऱ्याच मोबाईल apps दिमतीला असतातच तसंही. पण त्यांची भाषा येत नसताना लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करणं मला जाम मजेशीर वाटलं.

कुठलीही गोष्ट पहिल्यांदा करताना जो गोंधळ उडतो, त्यातली नाविन्यता अनुभवता येते, ती गोष्ट पुन्हा करताना मात्र येत नाही. त्यामुळं मला असे पहिले वहिले अनुभव गाठीशी जमवायला अगदीच आवडतं. त्यामुळं मग लिस्बन मध्ये फिरण्यासाठी उबर न करता शहरभर पसरलेले मेट्रोचे जाळे वापरायचे ठरवले. त्यानिमित्तानं पूर्ण शहराचा विस्तार समजला. शिवाय ते सुरक्षित होतंच आणि त्यामुळं Lisbon चा बराचसा भाग निवांत फिरता आला. मेट्रो, सिटी बस आणि शेजारच्या शहरात जायला ट्रेन वापरली. 

दोन दिवसात मी लिस्बन मध्ये भेट दिलेल्या जागा : 

1 Arch Augusta - 
2 Gloria elevator - Santa justa elevator - To see  amazing top view of the city
3 Jerónimos Monastery 
4 Belem Tower 
5 Padrão dos Descobrimentos 
6 Vasco da Gama bridge 




सगळ्या जागा खूप सुंदर, शांत आणि स्वच्छ आहेत. या सगळ्या ठिकाणी मेट्रोने फिरणे सहज शक्य आहे. स्टेशनची नावं उच्चारायच्या भानगडीत न पडता (कारण मला तरी ते फारसं जमलंच नाही) स्टेशनच्या नावाची picture memory लक्षात ठेवली आणि नकाशा समजला कि झालं. 



Lisbon मध्ये जुनं शहर आणि नवीन शहर असे दोन भाग आहेत. 1755 च्या भूकंप/त्सुनामी मध्ये शहराचा जो भाग उध्वस्त झाला ते Downtown - जुनं Lisbon. नंतर त्या भागात तळात जमिनीत wooden structure उभारून (like Japan) मग त्यावर उध्वस्त झालेली सगळी घरं, इमारती पुन्हा नव्याने बांधल्या. वर्षातून एका ठराविक दिवशी जमिनीखालचं ते पूर्ण wooden structure खाली तळात जावून तिथल्या नागरिकांना बघता येतं. त्यासाठी खूप मोठी que असते म्हणे. पण ते बघता येतं असं एका colleague ने सांगितलं. नवीन लिस्बन, शहराचा हा भाग त्सुनामी मध्ये फारसा परिणाम न झालेला.

ऑफिस मधल्या पोर्तुगीजांबरोबर या देशातल्या लोकांचं Football प्रेम, ट्रॅफिक किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचे issues, घरांच्या किमती, inherited properties चे hastles, Taxation, EV promotion साठीचे government चे फारसे नसलेले प्रयत्न वैगेरे बद्दल वायफळ गप्पा ही interesting च होत्या. 


इथली कॉफी - पाव ते अर्धा लिटरच्या कपात मिळणारी अमेरिकन किंवा इटालियन coffee म्हणजे सध्याचे सर्वपरिचित सगळे प्रकार पोर्तुगाल मध्ये एअरपोर्ट सोडले तर मला कुठेही मिळाले नाहीत की दिसले नाहीत. इथे कॉफी शॉप्स मध्ये फक्त Portuguese expresso मिळते जी नॉर्मल एक्सप्रेससो पेक्षा तीनपट स्ट्रॉंग आणि म्हणून अगदीच थोडीशी म्हणजे आपल्या भातुकलीच्या खेळातल्या छोट्या कपा मध्ये. त्यात जेमतेम दोन घोट मावणारी expresso... No milk, no sugar. 

प्रत्येक जेवणानंतर ही Portuguese coffee घेण्याची इथल्या प्रत्येकाची पद्धत, even after a three course meal at night पोर्तुगीज लोकं असली स्ट्रॉंग expresso घेतात आणि नंतर लगेच झोपूही शकतात, कसे कोण जाणे. मला ही coffee आधी खूप कडू वाटली, विशेष आवडली नाही, पण तरी तीन-चार वेळा घेतल्यावर मग मात्र ती चव नीटशी कळली, रोस्टेड कॉफी बीन्स मधले फ्लेव्हर्स सुद्धा मग समजायला लागले आणि आवडलेही. 


दुसऱ्या दिवशी Lisbon पासून ट्रेनने साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या Sintra नावाच्या गावात गेलेले. तिथे Pena palace म्हणून अतिशय सुंदर पॅलेस आहे. तिथे जाण्यासाठी आधी हॉटेल पासून मेट्रोने Lisbon central train station ला गेले. तिथून Sintra या गावाला चाळीस मिनिटात ट्रेनने पोचले. Sintra train station गावात खाली पायथ्याशी आहे. तिथून डोंगरावर असलेल्या Pena Palace पर्यंत जाण्यासाठी buses, tuk tuk वैगेरे सोय आहे. 

                                       

माझ्या नशिबाने एवढ्या प्रवाशांच्या गर्दीत मला एकटी साठी एक मस्त electric tuk tuk मिळाली. Portuguese driver बरोबर छान गप्पा मारत पुढच्या पंधरा मिनिटात वर पॅलेस पाशी पोचले. Sintra गावाचा इतिहास आणि इतर बरीच माहिती ड्रायव्हरने त्याला जमत असलेल्या इंग्लिश मध्ये अगदी उत्साहाने सांगितली. पॅलेसचे तिकीट आधीच ऑनलाईन book केलं होतं त्यामुळं मोठ्या que मध्ये थांबणं टळलं. 

पॅलेस फारच सुरेख आहे. आजूबाजूचे गार्डन पण खूप सुंदर आहे. दोन तास तीस डिग्रीच्या तळपत्या प्रखर उन्हात फिरून पॅलेस आणि आजूबाजूचा भाग पाहिला. Bright, colourful and very well maintained sacred gem in Sintra. मग परत तोच सगळा म्हणजे आधी tuk tuk, मग ट्रेन आणि नंतर हॉटेल पर्यंत चालत अशी मजल दर मजल करत परत आले.

जेव्हा आपण एकटे फिरतो तेव्हा इतर म्हणजे फॅमिली किंवा मैत्रिणींबरोबर वेळे पेक्षा एक वेगळं विश्व अनुभवायला मिळतं. किंवा आपला view जरा वेगळा म्हणजे क्लिअर असतो, diluted नसतो. बरोबर कोणी असेल तर त्यांच्या खाण्यापिण्याच्या सोयीची, फिरण्याच्या स्टॅमिनाची काळजी घ्यावी लागते, पण एकटीने फिरताना स्वतःची जबाबदारी स्वतःवरच असते, त्यामुळं एक छान अलर्टनेस आपोआपच येतो.



मी शनिवारच्या संध्याकाळी नदी किनारीच्या एका कॉफी शॉप मध्ये रस्त्याकडेच्या छोट्याशा टेबल खुर्चीवर बसलेले. Pestal De Nata बरोबर Portuguese coffee घेत समोरचा शांत नदी किनारा, सूर्यास्ताची वेळ, केशरी होत जाणारं निळशार आकाश हे सारं सुरेख दृश्य एकटीने अनुभवलं ते फार सुंदर होतं. आजूबाजूला फक्त पोर्तुगीज भाषा कानावर पडत होती, जी एक अक्षरही मला कळत नव्हती. पण त्या वेळचा तो माझा एकटेपणा मला खरंतर हवासा वाटला. खूप शांत वाटत होतं. 

पोर्तुगाल मध्ये एकटीने फिरताना मी काय शिकले- 

१. Follow your gut feeling - आपण एखाद्या शहराच्या पूर्ण अनोळखी ठिकाणी आलो की आपल्याला तिथल्या जागेच्या vibes लगेच लक्षात येतात. आजूबाजूची माणसं कशी आहेत हे पटकन जाणवतं. मग तिथं त्या वेळी एकटीने फिरणं सुरक्षित आहे ना हे gut feeling काय सांगतं तेच ऐकायचं. 

मी Belem Tower या ठिकाणी रात्री उशिरा पोचले. तेव्हा त्यावेळी गेले नसते तर तो tower बघायला मला नंतर जमणार नव्हतं, म्हणून उशीर झाला तरी गेले. मग अंधार असताना मला एकटीने फिरायला रात्री 8.30-9 ला ती जागा तिथे पोचले तेव्हा सुरक्षित वाटली. मी बेलम टॉवरचे लांबून फोटो घेऊन दहा एक मिनिटात लगेच परत निघणार होते. कारण टॉवरपाशी अगदी जवळ जायचं म्हणजे बरच पुढे जावून नंतर रस्त्याखलाच्या tunnel मधून चालत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जावं लागणार होतं. आणि त्यावेळी भोवताली माणसं फारच तुरळक (अगदीच पाच-सहा) दिसत होती. तरी थोडं धाडस करून इथवर आलोय तर जाऊया असा विचार करून हो-नाही करत शेवटी गेलेच. टॉवर च्या आजूबाजूचा तो भाग थोडा पायी फिरले. तेव्हा मला जाणवलं कि मी इथे टॉवर पाशी येण्याचा निर्णय घेतला, फिरले आणि जवळून Belem Tower पाहिला, इथली सुंदर संध्याकाळची हलकी थंड हवा अनुभवली हे खूप छान केले. फोटोत सगळं नाही बांधता येत, तिथे जाऊन ते अनुभवणं यातून वेगळंच समाधान मिळतं.


२. समोरचा माणूस किंवा आजूबाजूचे लोक (टॅक्सी ड्रायव्हर्स, पत्ता सांगणारे) आपण त्यावेळी तिथे एकटी मुलगी आहोत म्हणून मला फसवणारच आहेत असा विचार सारखा करत राहिलो तर आपण ट्रीपचा आनंद घेवू शकत नाही. माझ्या नशिबाने लिस्बन मध्ये मला अशी कोणीही माणसं दिवसाच्या, संध्याकाळच्या कुठल्याही प्रहरी जिथे कुठे गेले तिथे कुठेच भेटली नाहीत. 

‘ही व्यक्ती इथली नाही‘, हे स्थानिक लोकांना आपल्याकडं बघून लगेच कळतं पण म्हणून मला कुणीही फसवलं नाही. पॅरिसचा अनुभव यापेक्षा पूर्ण वेगळा, फार काही बरा नसल्यानं ही बाब मला आत्ता प्रकर्षानं सांगावी वाटली. 

एकदा आतल्या रस्त्यानं पायी जाताना कुठेतरी बाहेर मेनरोडला लागायला मला रस्त्याच्या नावाची पाटी कुठे दिसेना म्हणून मी एकाला माझ्या फोनवर मॅप दाखवून रस्ता विचारला तर इंग्लिश येत नसतानाही त्याने हातवारे करून मला बरोबर रस्ता दाखवला. किंवा एकदा रात्री उशीर झाला म्हणून १०.३० वाजता टॅक्सीने हॉटेल पर्यंत पंचवीस एक मिनिटं अंतर एकटीने अगदी सुरक्षित गेले.



 ३. जसा देश तसे खाणे - नाकं न मुरडता तिथे मिळणाऱ्या जेवणाचा छान आस्वाद नक्की घ्यावा. त्यात हल्ली vegan, vegetarian ऑपशन्स प्रत्येक रेस्टॉरंट मध्ये किमान एक तरी असतोच त्यामुळं फार काही अडत नाही. मी तिथल्या संपूर्ण मुक्कामात एकदाही इंडियन रेस्टॉरंट मध्ये मुद्दाम गेले नाही. पोर्तुगाल मध्ये seafood खूप छान मिळते. अगदीच काही जमलं नाही तर सूप्स आणि तिथले ब्रेड चे प्रकार खूप छान आहेत. 

मी तिथले कॉफी, pastries, Pastel Da Nata भरपूर खाल्ले.  Pastel Da Nata म्हणजे छोटे कस्टर्ड क्रिम पाय हे पोर्तुगाल चे जागतिक पातळीवर खूप प्रसिद्ध असलेले dessert. एका १८३७ सालापासून सुरू असलेल्या pastery शॉपला जाऊन तिथून अगदी Authentic Pastel Da Nata घेऊन आले. ते कसे करतात हे त्या शॉप मध्ये बघायलाही मिळाले. 

तर एकूणच नवीन अनुभवाने समृध्द करणारी ही पोर्तुगाल सोलो ट्रीप सफल संपूर्ण. 


Thanks to my workplace 😊
-- अश्विनी वैद्य
०५/१०/२३

Saturday 15 April 2023

मनात




'सुख हे ट्रेड मिल सारखं असतं. ते स्थिर राहण्यासाठी सुद्धा पळावं लागतं. सगळ्यांनी सतत असंतुष्टच असणं हेच या व्यवस्थेला हवं असतं.' 
'आपल्या जगण्यावर आणि एकूणच मानसिकतेच्या घडण्यावर धर्म आणि अर्थ या दोन व्यवस्थाच मुळात कारणीभूत असतात.'  किती कमी शब्दात पण किती चपखल लिहिलेली वरची ही दोन वाक्य!

या आणि अशा संदर्भातलं खूप तपशीलवार लिखाण ज्या पुस्तकात वाचायला मिळालं ते मानसशात्रावर आधारित एक अप्रतिम पुस्तक नुकतच वाचलं ते म्हणजे 'मनात'. अच्युत गोडबोले यांचा हा थोडा क्लिष्ट पण प्रचंड माहितीपूर्ण असा सहाशे पानांचा एक मोठा ग्रंथच आहे. मानशास्त्रामधल्या पूर्वीपासून आत्तापर्यंतच्या वेगवेगळ्या कल्पना, शोध, अनेक शास्त्रज्ञांचा त्यावरचा अभ्यास, त्यांनी मांडलेली मतं, वेगवेगळ्या धर्मामधल्या मन, आत्मा या कल्पना, या आणि अशा बऱ्याच गोष्टींचा परिपाक या पुस्तकात वाचायला मिळाला आणि तो ही अगदी साध्या सोप्या शब्दात.

खरंतर सहा वर्षांपूर्वी अल्बर्ट एलिस या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाचं चरित्र मी वाचलेलं आणि त्याने मांडलेली REBT (रॅशनल इमोटीव्ह बिहेव्हिअर थेरपी) खूप जास्त भावलेली. स्वतःच्या विचारांचं विवेकी पृथक्करण. ते पुस्तकही माझ्यासाठी तरी एक milestone वाटावं असं पुस्तक होतं. पण तरीही मनातले इतर अनेक प्रश्न अनुत्तरितच राहतात. स्वतःच्या दोन मुलांना वाढवताना, त्यांच्या वयाप्रमाणे बदलणाऱ्या मानसिकता समजून घेताना बरेच गोंधळ उडतात. त्यात मुलगा आणि मुलगी यांच्या वागण्यातला, दृष्टिकोनातला फरक, त्यांच्या आकलन करण्याच्या पद्धतीमधला फरक, त्यांच्या भावनिक वाढीतला फरक, मोठ्याची पद्धत धाकट्याला लावणंही शक्य नाही. शिवाय स्वतःबद्दलचे काही प्रश्न जसे की विचार आणि अतिविचार यातली सीमा रेषा नक्की कुठे असते? ती मी कशी ठरवणार? मला आत्ता हे असंच का वाटतंय, राग येतो किंवा भीती वाटते म्हणजे मेंदूत नक्की काय होतं किंवा माझं व्यक्तिमत्व मुळात कसं आहे, हे मला समजलंय का? मी ते आहे तसं आधी स्वतः स्वीकारलं आहे का? संवेदनशीलता म्हणजे नक्की काय, ती कशावरून ठरते. आनंद, दुःख याची तीव्रता भासवणारी कोणती संप्रेरकं मेंदूत त्यावेळी स्रवतात. प्रेम, आपुलकी, वासना याचा परस्पर संबंध असतो का? आणि या भावना स्त्री आणि पुरुष यांच्या मध्ये जेव्हा निर्माण होताना त्यात फरक असतो का? प्रेम, राग, भीती अशा भावना आणि त्याचे उद्रेक मनात येणं हे स्वाभाविक आहे का? त्या भावना बरोबर किंवा चूक आहेत हे  ठरविण्याआधी त्या आहेत तशा मनात येऊ देणं आणि त्या स्वीकारणं गरजेचं का आहे? मुळात त्या स्वतः स्वीकारणं म्हणजे तरी नक्की काय? या आणि अशा बऱ्याच गोष्टींचं कुतूहल या न त्या कारणानं कायम मनातअसतंच. पण त्याची शास्त्रशुद्ध माहिती दर वेळी मिळेलच याची खात्री नसते.

त्यामुळं अच्युत गोडबोले यांचं हे पुस्तक दिसल्या बरोबर मी ते लगेच वाचायचं ठरवलं. मुळात माझ्या डोक्यातल्या वरच्या प्रश्नांचे शास्त्रीय विश्लेषण यात सापडेल या उद्देशाने हे पुस्तक वाचायचं ठरवलं. या सगळ्याची उत्तरं मला या पुस्तकात पटापट मिळाली असं मी अजिबात म्हणणार नाही. पण हे पुस्तक वाचतानाचा माझा मानसिक प्रवास फार सुंदर झाला हे नक्की. कुतूहल शमल्याचं समाधान देणारा आणि नवीन भरपूर काही पहिल्यांदा वाचल्याचा एक आनंददायी असा माझा अनुभव होता.

मुळात मन म्हणजे काय. मन आणि बुद्धी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत का? मेंदू मधली त्याची स्थानं नक्की काय, त्याच्या शोधाचा अगदी इसवीसन पूर्व काळापासून अनेक वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केलेला अभ्यास, मांडलेल्या थेअरी, या सगळ्याचा आजवरचा संपूर्ण इतिहास या पुस्तकात आहे. अच्युत गोडबोले यांनी मानसशास्त्रावर आधारित शंभर एक पुस्तकं आधी स्वतः वाचून मग हे पुस्तक लिहिलं आहे.

या पुस्तकातली मला उपयोगी किंवा संदर्भ/नोट्स म्हणून माझ्याकडे असावी अशी वाटलेली माहिती मी संक्षिप्त रूपात लिहून ठेवली, ती खाली देते. त्यातून पुस्तकाची हलकीशी ओळख नक्की  होईल.

मनात 

ग्रीक भाषेमध्ये आत्म्याला psyci and अभ्यासाला लॉजिया असं म्हणतात. म्हणून मग आत्म्याच्या अभ्यासाला psychology हा शब्द आला. Psychology and neurology यामध्ये फरक आहे का आणि असेल तर तो काय आहे हे एका ओळीत समजून घ्यायचं तर neurology हा वस्तुनिष्ठ आणि Psychology हा व्यक्तिनिष्ठ अभ्यास असं या पुस्तकात वाचायला मिळालं.

ख्रिसतपूर्व पाचव्या शतकात लिहिलेल्या पतंजली त्यांच्या योग सुत्रात मानसशास्त्राचे अतिशय सखोल विश्लेषण केले आहे. ते एक वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले योगी होते. सम्यक ज्ञान, मिथ्या ज्ञान, कल्पनाशक्ती, निद्रा, स्मृती या मनाच्या पाच वृत्ती त्यांनी सांगितल्या. मनाला समजून घ्यायचं असेल तर पतंजलीच्या योगमार्गाला समजून घेतले पाहिजे. योग आंधळेपणाने विश्वास ठेवायला सांगत नाही तर अनुभव घ्यायला सांगतो. चित्तवृत्ती निरोध म्हणजे योग. मनाचं संपून जाणं. समर्पित होणं. मनात कुठलाही विचार नसणं अशी अवस्था म्हणजे योग. माणूस एखाद्या कलेत रमून जातो ती त्याची अमनीय अवस्था असते. (थोडक्यात आत्ताच्या काळात याच्या जवळ असणारी अवस्था म्हणजे मेडिटेशन/ध्यान असं आपण म्हणू शकतो). 

पतंजलीच्या म्हणण्यानुसार निसर्गाला अव्यवस्थितपणा आवडत नाही, त्यामुळं कुठलीही गोष्ट वाऱ्यावर सोडून द्या, तिचा नाद सोडून द्या. ही गोंधळाची अवस्था तात्पुरती असते. ती नैसर्गिक रित्या आपोआप स्थिर होईल असं पतंजली ने सांगून ठेवले आहे.

झेन हा जापनीज शब्द योगामधल्या ध्यान या शब्दावरून आला आहे. उपनिषद, पतंजली, चार्वाक, महावीर, गौतमबुद्ध यांचं तत्वज्ञान, मनाला लक्षात घेवून, दुःख, वेदना आणि मृत्यू यांच्या बद्दल सांगतं. आपल्या इच्छा आणि वासना यावर नियंत्रण कसं ठेवायचं हेही ते सांगतं. मनाच्या प्रवाहाला हवं तसं वाहू दिलं की ते निवळत जातं. जाणिवेची विचलित अवस्था म्हणजे मन.

Aristotal या इसवीसन पूर्व ३०० शतकातल्या विचारवंताने मांडलेले स्मृती, संवेदना, भावना, व्यक्तिमत्व यावरचे फार सखोल विचार, जाणीवेवरचं त्याचं विशेष महत्वाचं लिखाण त्याचे सगळे संदर्भ या पुस्तकात आहेत. त्याच्या म्हणण्या नुसार आत्मा, शरीरापासून वेगळा असतो आणि आत्मा हा आपल्या सगळ्या विचारधारेचे मूळ आहे. आपल्या विचारशक्तीने दुःख आपण बाजूला सारून आनंद मिळवू शकतो असं तो म्हणे.

Sigmond Froid : मनोविकाराचा लैंगिकतेशी संबंध विचारात घ्यायलाच हवा असं ठाम मत असणारा, मानस शास्त्रा च्या अभ्यासात क्रांती घडवून आणलेला हा एक मानसशास्त्रज्ञ. आपल्या कृतींच्या आणि भावनांच्या मागे लैंगिक प्रेरणा असतात असं फ्रॉइड म्हणे. त्यानं १९०० साली लिहिलेलं Interpretation of Dreams हे पुस्तक खूप गाजलं. त्याच्या म्हणण्यानुसार मानवी मन म्हणजे हिमनग. जसा हिमनगाचा जेवढा भाग पाण्यावर दिसतो त्या पेक्षा खूप मोठा भाग पाण्याखाली लपलेला असतो. तसच आपलं मन आहे, त्याने unconscious mind चा खूप सखोल अभ्यास केला. नैतिकतेची बंधनं पळत जगताना माणूस ज्या भावना, इच्छा मनात दडपून टाकून पुढे जात राहतो त्या कल्पना, इच्छा कधी कधी स्वप्नांमधून माणसाला समोर प्रत्यक्ष दिसतात.
सुपर इगो (वास्तव आणि आदर्श यातला फरक) आणि इडिपस कॉम्प्लेक्स या दोन संकल्पना त्याने मांडल्या. इगो अँड इड ही खूप इंटरेस्टिंग थेअरी त्याने मांडली.
त्याची आणखी दोन प्रसिद्ध झालेली पुस्तकं जी त्या काळी खूप अभ्यासली गेली, त्यामुळं समाजात वादंग ही निर्माण झाले ती म्हणजे Psychopathology of everyday life आणि 3 essays on the theory of sexualities. मनो विश्लेषण - psychoanalysis ही टर्म वापरणारा तो पहिला मानशास्त्रज्ञ आहे. त्याच्या म्हणण्यानुसार माणसाच्या आर्ट/ कलेमध्ये ही खूप खोलवर दडलेल्या मनाच्या unconscious भागात आलेल्या अनुभवांचा आरसाच असतो. म्हणून कोणतीही कला (संगीत, नृत्य, चित्र, गायन) माणसाचं मन शांत व्हायला मदत करते आणि समाधानाचे सुख देते. पण पुढच्या संशोधनानं त्याच्या सगळ्या थेअरी सिद्ध होऊ शकल्या नाहीत.

कार्ल ह्युंग - प्रत्येक माणसाची मनोवृत्ती ही मूलतः धार्मिक च असते. आणि धर्माबद्दल अधिक जाणून घेण्यात त्याला रस असतो असं म्हणणारा तो पहिलाच मानसशास्त्रज्ञ मनाला जातो. मनोविकार दूर करण्यासाठी कलेचा उपयोग होतो. असं तो म्हणे. चिंता, भीती, trauma यावर विशेष करून खूप चांगला परिणाम होतो असं तो म्हणे. 1937 डिसेंबर मध्ये तो भारतात आला. माणसाच्या अध्यात्मिक उन्नतीसाठी spiritual cha खूपच वाटा आहे असं त्याला वाटत असे. पौरात्य तत्वज्ञानाचे महत्त्व त्याला होतं. स्वप्नं ही आपल्या unconscious मनाच्या खिडक्या आहेत. त्याच्या मते, कोणत्याही कलेचा उपयोग मानसिक आघात, भीती किंवा चिंता कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो. व्यक्तिमत्वाचे चार प्रकार असतात असं तो मानी - अंर्तमुख, बहिर्मुख, खंबीर आणि निष्क्रिय.

या पुस्तकात इतर अनेक शात्रज्ञ, त्यांचा अभ्यास, त्यांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांनी केलेले प्रयोग याची विस्तृत माहिती वाचायला थोडी क्लिष्ट, काही भाग थोडा स्लो pace चा असला तरी समजून घ्यायला खूप छान वाटली.
वेस्टर्न आर्ट हिस्टरी मधला प्रसिद्ध चित्रकार - Van gogh याला त्याच्या आयुष्याच्या उत्तरार्धात वेड्यांच्या इस्पितळात ठेवलेलं. आणि शेवटी त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या सगळ्या मागची मानसिकता, मनाच्या अशा कुठल्या अवस्था गाठला गेल्या असतील यावरचं विश्लेषण या पुस्तकात वाचायला मिळतं.

मार्क्स - आपल्या सर्व कृतींच्या, विचारांच्या आणि भावनांच्या मागे आपण कुठल्या वर्गातून आलेलो असतो, उत्पादन व्यवस्थेमधलं आपलं स्थान काय अशा गोष्टींचा सगळ्यात जास्त प्रभाव असतो, असं तो म्हणे.

बर्ट्रांड रसेल - निरिश्र्वर वादी, नोबेल पुरस्कार सन्मानित - ब्रिटिश गणितज्ञ, तत्वज्ञ, साहित्यकार त्याचं marriage and morals हे अतिशय गाजलेलं पुस्तक.

रेने देकार्त - मानसशास्त्रमधला हा पहिला विचारवंत (फ्रांस - 1596- 1650) म्हणजे जेव्हा आपल्याकडे महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या लढाया चालू होत्या साधारण तेव्हाचा काळ. आणि इंग्लड मधला न्यूटन चा काळ. देकार्तच्या मते माणसामध्ये 6 मूळ भावना असतात. आश्चर्य, प्रेम, द्वेष, इच्छा, आनंद, दुःख.

फ्रान्सिस गॅल्टन - बुध्यांक हा अनुवांशिकतेनुसार जन्मापासूनच ठरतो आणि बुद्धी ही जन्मजात असते, नंतर ती बदलत नाही असं galton ची थेअरी सांगते. पण फ्रांसच्या बीने या सायकलॉजिस्टच्या थेअरी नुसार मात्र प्रयत्नानं आणि प्रशिक्षणानं बुद्धी वाढू शकते हे सिद्ध केलं.

मनाच्या अभ्यासात क्रांती घडवलेली किंवा प्रचंड गाजलेली ही काही ऐतिहासिक पुस्तकं. 
Thomas Harris चे पुस्तक - I am ok you are ok.
Sons and lovers - Lawrence
Robert Huston - Human mind
कृष्णाजी केशव कोल्हटकर यांचं पातंजली योग दर्शन
Edwin Smith - Egyptian historian - Edwin Smith papyrus granth - 3700 वर्ष जुना आहे.
फ्रान्स mesmer - 1740 - On the influence of the planets
Mat Ridley - red Queen sex and the evolution of human nature

1912 साली William Stern जर्मन मानसशास्त्रज्ञाने mental quotient काढण्याची पद्धत सुचवली. जी त्याकाळी प्रचंड लोकप्रिय झाली. Intelligent quotient = प्रत्यक्ष वय/मानसिक वय *100.

अनेक बिहेव्हिअरिस्टस ने आपलं व्यक्तिमत्व हे आपल्या अनुभव वरून ठरतं आणि त्याचं कंडीशनिंग करून ते बदलता ही येतं, हे प्रयोगांनी सिद्ध केलं. अनुवंशिकता म्हणजे mature आणि अनुभव म्हणजे nurture याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होतो असं त्या काळी मांडलेलं मत आजही मानलं जातं.

कॉग्निटिव्ह बिहेव्हिअर थेरपी - माणूस शिकतो कसा, लक्षात ठेवतो कसा, विचार कसा करतो, भाषा शिकतो कसा, तर्क, निष्कर्ष कसा काढतो याचा विचार आणि संशोधन १९५० च्या दशकात सुरु झाले. computer science चा या संशोधनावर त्या काळात जास्त प्रभाव पडला आणि विकास झाला.

१९६७ च्या नंतर मेंदू बद्दलचं ज्ञान जसजसं वाढत गेलं तसतसं मन ही गोष्टच अस्तित्वात नाही, मन म्हणजेच मेंदू, आणि मनातल्या भावना या मेंदूच्या ठराविक अवस्थेवरून ठरतात. जर मेंदूमधले न्यूरॉन्स आणि रसायनं आपण बदलवू शकलो तर मनो अवस्था ही बदलू शकू अशी थेअरी पुढे येऊ लागली.

दोन न्यूरॉन्स एकमेकांना सिनॅप्सच्या फटीने जोडले जातात. या सिनॅप्समध्ये जेव्हा बदल होतात तेव्हा आपण माहिती मिळवत असतो. जेव्हा काही सिनॅप्स सारखे ऍक्टिव्हेटेड स्टेट मध्ये असतात तेव्हा ती गोष्ट आपल्या मनात पक्की होत असते. म्हणजे आपण ती गोष्ट शिकत असतो. आपल्या मेंदूत दहा हजार कोटी न्यूरॉन्स असतात. मेंदूतली न्यूरॉन्सची पक्की झालेली सर्किट्स आपली स्मृती आणि आपण शिकलेल्या गोष्टी दाखवतं हे हेब या शास्त्रज्ञाने १९७० च्या दशकात मांडलं.

प्रेम मेंदूंत कुठे असते, स्त्री आणि पुरुष त्या बद्दल वेगळा विचार कसा करू शकतात याचे संदर्भ पुस्तकात आहेत. प्रेम आणि कामवासना या दोन वेगवेगळ्या गोष्टी असून त्यांची मेंदूमधली जागाही वेगवेगळी असते.
मेंदू मधल्या कॉर्डेट निक्लिअस या ठिकाणी तीव्र इच्छा, स्मरण शक्ती, भावना आणि अवधान याची निर्मिती होते.
दीर्घकाळ मैत्री, जिव्हाळा हे मेंदूच्या पुढच्या भागात व्हेंट्रल पुटामेन आणि वॅलेडीअन इथे असते.
डोपामाईन - happiness हार्मोन मेंदूमध्ये ventral tengmental इथून स्त्रवते तर स्टरोटोनिन  हे हार्मोन स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात निर्माण होते.

या पुस्तकाच्या सुरुवातीच्या अर्ध्याहून अधिक भागात मनाच्या अभ्यासाची उत्क्रांती कशी होत गेली याबद्दलची खूप विस्तृत माहिती आहे आणि शेवटच्या तीन भागात गेल्या ४० वर्षात मानसशास्त्राच्या, मेंदूच्या अभ्यासात तंत्रज्ञानामुळे जी झपाट्याने वाढ होत गेली त्या बद्दल लिहिले आहे. त्यात अगदी शेवटच्या भागात अल्बर्ट एलिसच्या संशोधनाबद्दल परत वाचायला मला खूप आवडलं. १९८२ साली आठशे मानशास्त्र मानसशास्त्रज्ञानच्या एका सर्वेक्षणावरून एलिस हा दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रभावशाली सायकोथेरपिस्ट मनाला गेला आहे. त्याला मानवता वादी म्हणून गौरवलं गेलं. आयुष्यातलं विनोदबुद्धीचं स्थान तो प्रचंड महत्वाचं मनात असे.

मला या पुस्तकातला शेवटचा भाग खूप जास्त आवडला. ज्यात आत्ताच्या जगातली वास्तविकता, समाधान, जगण्याचा अर्थ, चंगळवाद, सततच्या स्तुतीची अतीव गरज, त्याच्याशी निगडित मानसिक असंतुलन, जगण्याचा वेग, दान, दया, आत्मसन्मान याबद्दल लिहिलं आहे. 

मी हे पुस्तक या इस्टरच्या सुट्ट्यांमध्ये वाचून काढायचं पक्कं ठरवलेलं, ते आज पूर्ण होऊ शकलं याचं अगदी समाधान आहे. ते इतरांनीही नक्की वाचावं यासाठी हे सगळं लिहिण्याचा खटाटोप केला. तेव्हा नक्की वाचा 'मनात'. 
Happy reading!


अश्विनी वैद्य
१५.०४.२०२३

Friday 24 March 2023

आवरण


सध्याचा WhatsApp, FB किंवा एकूणच सोशल मीडियावर येणाऱ्या मोठमोठ्या forwards चा जमाना. मग ती forwards अगदी इमाने इतबारे वाचून पुढच्या अनेक जणांना तशीच पुढे डकविण्याचा आटापिटा करण्यात धन्यता मानणारे बहुसंख्य. म्हणजे यात काही वाईट आहे असं नाही. फक्त वाचणाऱ्यांकडून त्याची कुठलीही सत्यता पडताळून पाहण्याची सुतराम शक्यता नसते आणि शिवाय अशा forwards मध्ये सांगितलं ते खरंच असतं, असं मानणाऱ्याची संख्या सुध्दा खूप पटीत आहे, भीती या गोष्टीची वाटते. कारण अशा बहुतांशी समाजाच्या याच अंधविश्वासाचा दुरुपयोग करून घेणारे तो आपसूक करून घेत आहेत. खऱ्या माहितीपेक्षा त्यांना हवी असलेली किंवा लोकांची एखाद्या गोष्टीबद्दल तीव्र आणि त्यांना अपेक्षित मतं तयार होतील अशीच माहिती या forwards मधून समाजात सावकाश पसरवली जाते. हळू हळू पेरली जाते. या माहितीची कसलीही खातरजमा करण्याचा कोणीही विशेष प्रयत्न करत बसणार नाही, याची त्यांनाही खात्री असते. फार फार तर लोक कानाडोळा करतील पण किमान काही टक्के लोकं तरी त्यावर विश्वास ठेवतीलच ही गोष्ट हेरून अशी forwards पसरवली जातात. खासकरून धर्माबद्दलची, मूलतत्ववादी विचारांबद्दलची, रुढी-परंपरा याबद्दलची, ऐतिहासिक कथांबद्दलची वैगेरे. यात हल्ली सारासार असा विचार बाजूला पडून, टोकाची, प्रक्षोभक मतं बाळगणाऱ्यांची संख्या हल्ली खूप जास्त वाढत आहे. त्याला या अशा काही फुटकळ, आधारहीन forwards चं खतपाणी मिळतं आणि समाजातली दुफळी अगदी मुळातून वाढण्यास हातभार लागतो म्हणून याची भीती वाटते. आणि या सगळ्या मागची किंचितभरही जाणीव बहुतांशी सामान्य लोकांना नसतेच. वस्तुस्थिती किंवा सत्य काय आहे याच्या शोधात जाणारे फार कमी जण असतात.

ही सगळी पार्श्वभूमी सांगण्याचं कारण म्हणजे कालच वाचून संपलेले एक अतिशय सुंदर पुस्तक. आज त्या पुस्तकाबद्दल सांगायचं आहे. पद्मश्री, २०२३ म्हणजे या वर्षीचे पद्मभूषण पुरस्कार सन्मानित S.L. भैरप्पा या कानडी विचारवंत, लेखक, अभ्यासक यांनी २००७ साली सत्याच्या शोधात लिहिलेलं हे एक वादळी पुस्तक म्हणजे आवरण. एका आवरणाखाली झाकल्या गेलेलं किंवा मुद्दाम झाकलेलं सत्य शोधण्याचा प्रवास म्हणजे आवरण हे पुस्तक.


धर्माबद्दलच्या अनेक शतकांपासूनच्या इतिहासाच्या खुणा, अनेक ऐतिहासिक ग्रंथांमध्ये सांगितलेली त्याची सत्यता आणि आत्ताची वस्तुस्थिती हे सगळं शोधण्याच्या प्रवासात लिहिलेली ही एक अतिशय अभ्यासपूर्ण अशी कादंबरी आहे. ही मूळ कन्नडमध्ये लिहिलेली, नंतर उमा कुलकर्णी यांनी मराठीमध्ये अनुवादित केलेली कादंबरी ऑडियो बुक स्वरूपात मी ऐकली.

प्रकाशित झाल्यानंतरच्या पुढच्या पाचच महिन्यांत दहा पुनर्मुद्रण झालेली, अनेक भाषांत अनुवादित झालेली ही एक अतिशय गाजलेली कादंबरी. ही कथा जरी काल्पनिक पात्रांभोवती गुंफली असली तरी त्यातले संदर्भ हे वस्तुनिष्ठ आहेत आणि सत्याच्या शोधात गवसत गेलेला इतिहास स्पष्ट करणारे आहेत.

धर्म ही प्रत्येकाच्याच आयुष्यातली एक अतिशय संवेदनशील गोष्ट. त्यामुळं मुळात धर्म या विषयावर त्यातही हिंदू आणि मुस्लिम या विषयावर लिहावं हाच खूप प्रगल्भ आणि धाडसी विचार. असं लिखाण वादग्रस्त ठरू शकतं, याची पूर्ण कल्पना असतानाही सत्य काय आहे हे वस्तुनिष्ठ संदर्भाच्या आधाराने लोकांसमोर मांडण्याचं धारिष्ट्य दाखवणारे भैरप्पा यांच्याबद्दल मला कमालीचा आदर आणि उत्सुकता वाटते. हे एक पुस्तक लिहिण्यासाठी त्यांनी अनेक ऐतिहासिक ग्रंथांचा सखोल अभ्यास केला आणि मगच ते लिहिलं आहे.

मुळात इतिहास म्हणजे काय? इतिहासाला काही ध्येय आहे का? या प्रश्नाचं उत्तर मला या पुस्तकात मिळालं ते असं, 'समाजवादी, आधुनिक मार्क्सवादी, वस्तुनिष्ठ, वैज्ञानिक चळवळी, सिद्धांत, आदर्श यापासून स्वतःला सोडवून घेवून, घडलेल्या घटनांकडे पाहणं म्हणजे इतिहास समजून घेणं. इतिहासाच्या अभ्यासाचं ध्येय म्हणजे सत्याचा शोध घेणं' इतक्या सोप्या शब्दात भैरप्पांनी ते स्पष्ट केलं आहे.

इतिहासाची सामग्री शोधणं, त्याची निवड करणं आणि वस्तुनिष्ठ व शिस्तबध्द पद्धतीनं त्यावर मत बनवणं, ही खरंतर अत्यंत कठीण गोष्ट. पण त्यांनी ती अचूक साधली आहे. ते म्हणतात, "वर्तमानात निर्माण होणाऱ्या प्रश्र्नांपासून स्वतःला सोडवून घेवून, भूतकाळ कसा समजून घेता येईल? भूतकाळ आपलं सत्य अनेक ग्रंथ, अनेक खुणा, अनेक भग्नावेश यातून स्पष्टपणे दाखवत असतो. पण वर्तमानकाळ आपल्या डोळ्यांवर वेगवेगळी झापडं बांधत असतो. त्यामुळं सत्य आपल्यापासून लपूनच राहतं."

या पुस्तकातल्या कथेतली नायिका ही अगदी आत्ताच्या काळातली, स्वतःचे ठाम विचार असणारी, स्वबळावर स्वतःचं करिअर उभारणारी, पुरोगामी विचारांना जवळ करणारी एक धाडसी मुलगी. धर्माबद्दलच्या तिच्या सुरुवातीच्या संकल्पना म्हणजे अगदी मार्क्सिस्ट विचारांप्रमाणे म्हणजे धर्म ही गरिबांना दिलेली अफूची गोळी आहे, वैगेरे अशा स्वरूपाच्या असतात. पण नंतर तिचं आयुष्य पुढे जाताना तिने अनुभवलेल्या प्रसंगातून, धर्माबद्दलच्या ऐतिहासिक ग्रंथांच्या तिच्या अभ्यासातून, भोवती दिसणाऱ्या वास्तविकतेतून सत्य उलगडत गेल्यानं धर्माबद्दलच्या तिच्या भावना कशा प्रगल्भ होत जातात, हा प्रवास मांडणारी ही कथा आहे. 

भैरप्पा यांच्या या लिखाणाला हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मांवरच्या अनेक ऐतिहासिक ग्रंथांमधल्या ठोस संदर्भांचा आधार आहे. अगदी फारसी भाषेतल्या औरंगजेबच्या मूळ चरित्रात सुद्धा काय लिहिलं आहे याचे दाखले त्यांनी या पुस्तकात दिले आहेत.

मुळातच एखाद्या विशिष्ट धर्मात जन्मलेल्या, ठराविक सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या लोकांच्या धर्माबद्दलच्या भूमिका किंवा मतं ही एक तर परंपरागत रूढींच्या पगाड्यातून किंवा ऐकीव वा तुटपुंज्या माहितीवर आधारित किंवा कोणाचे तरी व्यक्तीपूजक अथवा समर्थक म्हणून किंवा केवळ विरोधाला विरोध म्हणून किंवा अगदी कातडी बचाव या भावनेतून तयार झालेल्या असतात. त्याला बऱ्याचदा कसलाच ठोस आधार वा संदर्भ नसतो. हेच भैराप्पांनी पुस्तकात येणाऱ्या वेगवेगळ्या पात्रांकरावी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

पुस्तकातला काशी विशवेश्वराच्या मंदिराचा इतिहास, बेचिराख केलं गेलेलं नालंदा विद्यापीठ, तिथली जाळून नष्ट केलेली दुर्मिळ ग्रंथसंपदा, हजारो मंदिरांचे आत्ता दिसत असलेले भग्नावशेष याबद्दल वाचून अक्षरशः शहरा येतो अंगावर.

'हे सगळं खूप पूर्वी होऊन गेलं त्याचा आत्ताच्या वर्तमानात संदर्भ आणून कशाला वाद निर्माण करायचे आणि राष्ट्रीय ऐक्य धोक्यात आणायचं' या बद्दलचं अतिशय सुंदर विवेचन भैरप्पा त्यांच्या नायिके करवी असं देतात, "असत्यावर समाज ठाम उभा राहणं शक्य नाही. पाया बळकट करून त्यावरच इमारत नीट उभी राहू शकते. स्वतःच्या गरजेनुसार इतिहासाची मोडतोड करून स्वार्थी राजकारणी आधुनिक इतिहासकारांकरावी ऐतिहासिक व्यक्तीचं त्यांना हवं असलेलं पुनर्चित्रण करण्याचं जे काम करतात ते कितपत समर्थनीय आहे? त्यामुळं मुळात उपलब्ध असलेले पुरावे, संदर्भ यावरून हा सत्याचा शोध घेणं आणि तो मान्य करणं महत्त्वाचं आणि गरजेचंच आहे.

तर असं हे एक वादग्रस्त ठरलेलं पण तरीही अगदी प्रत्येकानं नक्की वाचावं असं एक खूप सुंदर, वैचारिक पुस्तक - आवरण.

- अश्विनी वैद्य
२३/०३/२०२३

राजस्थान डायरी : उदयपूर

उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थाप...