Tuesday 20 December 2016

प्रेम



खूप भयाण शांतता सगळीकडे, सगळं अपरिचित, अनोळखी....

मी अगदी एकटी चालली आहे..... बरीच लांब कुठेतरी...
अंधुक, धूसर वाट, वाटेला अनोळखी वास....
परिचितता कणाकणांत शोधण्याचा माझा हव्यास... 
पण नाही... एकटेपणाच्या दुबळ्या वाटा खोल दरीत जाणाऱ्या... 
माझं असं कोणीच नाही जवळ.... चाचपडत पाय पडतो कुठेतरी...
आणि एकदम अचानक एक खूप मोठ्ठा आवाज येतो....
जीवाचा थरकाप उडवणाऱ्या असुरक्षिततेच्या भीतीचा तो उच्चांक असतो.
मी प्रचंड घाबरते आणि डोळे गच्च मिटून घेते... 
पुढे काय नि कसं... 
या पेक्षा... 
त्या क्षणाला मला माझे म्हणवणारे असे सगळे चेहरे माझ्या भोवती दिसतात 
बंद डोळ्यांच्या पडद्याआडचे ते आपुलकीचे स्पर्श जाणवतात 
मला त्या शेवटच्या क्षणी आधार म्हणून नाही, 
तर आजवर मला नकळत दिलेल्या अपरिमित सुखाच्या क्षणांची सोबत म्हणून 
सारं काही, सोडून जातानाच्या, अतीव समाधानाच्या क्षणांची नांदी म्हणून 

काहीच उरलं नाहीये, पण केवळ एक ऊर्जा... सकारात्मक.... मला त्या अनंतात सुद्धा त्यांच्याशी जोडणारी, 
कोण होती ती माणसं... माझ्या रक्ताची, नात्याची...?
 कदाचित प्रेमाची... अतिशय पवित्र अशा निस्सीम प्रेमाची,
खऱ्या नि शुद्ध विचारांची...आणि त्यामुळंच अगदीच थोडीशी...! 
वाटेवर नकळत भेटलेली, आपोआप जोडली गेलेली...!
माझी...!    




---अश्विनी वैद्य 
२०. १२ . १६

टीप : प्रेम नक्की काय असतं, याचा स्वतःशीच घोळ घालत जे सापडतंय असं वाटलं ते लिहिण्याचा प्रयत्न केलाय...! 
कदाचित पटेल, कदाचित नाही....!

Friday 14 October 2016

प्रिय जी. ए.



         आजवर पुलंची बरीच पुस्तकं वाचली आहेत. पण गायन, अभिनय, विनोद या साऱ्याने लोकांची मनं रिझवणारा, तासंतास गप्पांच्या मैफिली रंगवणारा, नाटक-सिनेमात रमणारा, एक प्रतिभावंत नट-लेखक-संगीत दिग्दर्शक आयुष्याचा जोडीदार म्हणून जिला लाभला होता... अशा 'सुनीताबाईंचाही' लेखनप्रवास जाणून घ्यायची मग खूप इच्छा झाली. मग असेच एकदा 'आहे मनोहर तरी' वाचून काढले. तेव्हा, 'पु.ल. देशपांडे यांच्या पत्नी' या व्यतिरिक्त एक अतिशय 'शिस्तप्रिय, परखड, स्पष्ट स्वभावाच्या, जिद्दी सुनीताबाई' ही अशी काहीशी त्यांच्या बद्दलची मनात तयार झालेली प्रतिमा. पण त्यांच्याच म्हणण्यानुसार, एखादा लेखक संपूर्णपणे जाणून घ्यायचा असेल तर त्याची सगळी पुस्तकं वाचली पाहिजेत, तरच तो पूर्णत्वाने उलगडतो. म्हणून मग त्यांचं 'समांतर जीवन', 'सोयरे सकळ', 'मण्यांची माळ' हे वाचले, आणि मग 'प्रिय जी ए' वाचायला सुरु केले. जे नुकतंच वाचून पूर्ण झालं. या पुस्तकाचा थोडक्यात सारांश किंवा ओळख म्हणूया हवं तर, करण्याचा माझंक्सा हा छोटासा  प्रयत्न.


           तर या पुस्तकात सुनीताबाईंनी जी ए कुलकर्णी यांना आठ वर्षात (१९७७ ते १९८४) लिहिलेली एकूण ४० पत्रं समाविष्ट केली आहेत. ही एकतर्फी (जीएंनी सुनीताबाईंना लिहिलेली पत्रोत्तरं यात नसल्यानं 'एकतर्फी' असा उल्लेख केला आहे) पत्र वाचताना सुनीताबाईंच्या स्वभावाचे वेगवेगळे कंगोरे हळुवार उलगडत जातात. त्यांची बुद्धिमत्ता, संवेदनशीलता, स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता, प्रचंड वाचनाने आलेली वैचारिक प्रगल्भता, लोकांबद्दलची त्यांची ठाम मते, प्रसंगी आलेला हळवेपणा आणि या साऱ्याबरोबरच न कुरकुरता जपलेली घरातली सततची माणसांची ऊठबस, आदरातिथ्य, स्वयंपाकातले नैपुण्य या साऱ्या गोष्टी जाणून घेता घेता अगदी स्तिमित व्हायला होते. 

        पुस्तकाच्या सुरवातीलाच, अरुणा ढेरे यांनी लिहिलेली प्रस्तावना (आपुला ठावो न सांडितां...) अतिशय सुरेख आहे. जणू त्या साऱ्या पत्रांचे एकूण सारच त्यांनी त्यात मांडले आहे. सुनीताबाई आणि जी ए यांच्या तरल मैत्रीच्या संवेदनशील नात्याचा त्या साऱ्या पत्रांतून त्यांनी घेतलेला आढावा खूप सुंदर लिहिला आहे. या मैत्रीची तहान दोघांनाही होती. सुनीताबाईंच्या लेखी तर मैत्री हे एक जीवनमूल्य होते. त्यात अगदी समान पातळीवरची स्त्री-पुरुष मैत्री ज्यात दोघांचंही व्यक्तिमत्व अबाधित राहून सुखदुःखाची सह-अनुभूती घेण्याइतके घनिष्ट संबंध असलेली मैत्री त्यांना अपेक्षित होती. 

       जीएंच्या 'पिंगळावेळ' या पुस्तकाच्या निमित्ताने या दोघांमधला पत्र व्यवहार सुरु झाला, आणि मग सुनीताबाईंनीच त्यांच्या एका पत्रात म्हटल्याप्रमाणे, 'एक पहिलं पत्रं सोडलं तर त्या नंतरची पत्रं ही पत्रोत्तरचं असतात, जसं मुंग्याच्या रांगेतली प्रत्येक मुंगी समोरून येणाऱ्या दुसऱ्या मुंगीला कानाशी काहीतरी सांगत असते, तसे पत्रोत्तरातले शब्द हे आलेल्या पत्रातल्या शब्दांशी संवाद साधत असतात. एरवी माणसांपासून दूर राहणारे, अलिप्त, लोकांतात पायही ठेवायला तयार नसलेले, अबोल, मितभाषी जीए सुनीताबाईंना सातत्याने दीर्घ अशी पत्रं लिहीत राहिले. अशा दीर्घ पत्रांची त्या अगदी आतुरतेने वाट बघायच्या. एक हळवा, सौजन्यशील, मनस्वी कलावंत जीएंच्या रूपाने पत्रातून त्यांना भेटला. आणि त्यांनीही मग त्यांच्यावर, त्यांच्या कुटुंबावर स्नेहाचा, जिव्हाळ्याचा वर्षाव केला. जीएंसारखे मैत्र लाभावे म्हणून अनेक ठिकाणी माघार घेत सुनीताबाईंनी त्यांच्या मूळ स्वभावातला धारदारपणा, कठोरता, आत्मसन्मान या सर्वांवर पाणी सोडल्याचे जाणवते. 

       'आपापली सुखदुःख, कोणातरी जीवाभावाच्या व्यक्तीला सांगावी ही एक नैसर्गिक गरज असते...त्या शिवाय का मित्र, सखा, सोबती या कल्पना जन्माला आल्या. काही माणसं या बाबतीत फार सुदैवी असतात. त्यांना पोत्यानं मित्र लाभतात. पण काही तुमच्या सारखी जात्याच अबोल असतात, मग ती कोणाचा संपर्क नको म्हणून अगदी कडेकोट बंदोबस्तात स्वतःचं घर उभारतात, वाचन-मनन-चिंतनातून स्वतःचे विचार-विकार घोळवून घोळवून त्यांचा अर्क काढतात, आणि प्रतिभेचं लेणं लाभल्यामुळं त्या अर्काचं अत्तर होऊन साहित्य सुगंधित करतात' एका पत्रात इतक्या तरल शब्दांत सुनीताबाईंनी जीएंच्या साहित्याशीच असलेल्या त्यांच्या मैत्रीची जाणीव करून दिली आहे. 

         सुनीताबाईंनी पत्रातून वेगवेगळे विषय जीएंसमोर मांडत, त्यावरची त्यांची मते जाणून घ्यायची इच्छा दर्शवत पत्रांचा प्रवास चालू ठेवला. आवडणाऱ्या पुस्तकांबद्दल, लेखक-कवींबद्दल त्यांनी भरभरून लिहिले आहे. बंगाली लेखक शरदबाबू, मामा वरेरकर, खानोलकर, कवी बा.भ. बोरकर, ग्रेस त्यांच्या प्रत्येकाच्या शैलीवर दोघांनी केलेली टिपण्णी आपल्या सारख्या वाचकांना भारावून सोडते. जर्मन कवी Heine चे चरित्र, The Little Prince, Voltaire in Love, Worlds in Collision, The romance of Leonardo da Vinci अशा अनेक पुस्तकांवर अनेक मुद्दे मांडत चर्चा केल्या आहेत, कसलीही भीड न ठेवता आपली आवड-निवड त्यांनी जीएंना कळवली आहे, मोठ्या धिटाईने स्वतःची मतभिन्नता मांडली आहे. माणसांच्या गरजा, The emptiness of existence वैगेरे संदर्भात किंवा अशाच अनेक मुद्द्यांवर जीएंशी वाद घातले आहेत. त्यांच्याच सांजशकून संग्रहातली 'सोयरे' ही कथा तितकीशी रुचली नसल्याचं स्पष्ट मत त्यांनी अगदी प्रांजळपणे एका पत्रात लिहिले आहे. राम-सीतेच्या बाबतीत त्यांनी लिहिलेली मते एक स्त्री म्हणून अगदी विचार करायला लावणारी आहेत. काही गोष्टी अगदी संयमानं लिहीत त्या म्हणतात, "लेखणीच्या जिभेवरही अनेक प्रश्न येतात, पण त्यातलं पत्राला कोणतं विचारावं आणि डायरीसाठी कोणतं राखून ठेवावं याचा विवेक ठेवावाच लागतो ना? 

         जीए एकदा निराशेच्या स्वरात, हल्ली नवीन काही लिहिण्याची उर्मीच येत नाही अशा अर्थाचं, "आजकाल मी फार असमाधानी आहे, कारण साऱ्या कथा undigested वाटू लागल्या आहेत... त्यातून एखादं सूत्र निर्माण होत आहे असं मला वाटत नाही म्हणजे मी सध्या doldrums मध्ये आहे...." असं पत्राद्वारे कळवतात, त्यावर पत्रोत्तरात सुनीताबाई अतिशय मार्मिकपणे त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात. त्या लिहितात, "विचारी प्रकृतीच्या प्रगल्भ माणसापुढं हे विचार अपरिहार्यपणे येतातच. दिव्यत्वाचा स्पर्श लाभलेला कलावंत स्वतःच्या कुवती प्रमाणे निर्मिती करतो, पण त्या कलाकृतीचे मोल ठरवण्याची क्षमता त्याच्यात असतेच असं नाही. असावी असाही हट्ट नाही. पण विश्वाचा हा पसारा म्हणजे आहे तरी काय या प्रश्नांत डोके खुपसून घेणारा विचारवंत हा मूळचा कलावंत असेल तर मात्र पंचाईत होते, तो स्वतःच्या कलाकृतींना अधिक जड आणि वेगळी मोजमापं लावतो आणि पूर्वी केलेल्या स्वतःच्याच निर्मितीवर अन्याय करतो, मग या चिरजागृत अवस्थेत त्याला नवनिर्मितीची स्वप्न पडेनाशी होणं स्वाभाविक नाही का?" 

        सुनीता बाईंना आत्मचरित्र लिहायचे एका पत्रात सुचविल्यावर त्याला उत्तर देताना सुनीताबाईच जीएंना आत्मचरित्र लिहायची गळ घालतात, त्या लिहितात, ''कवी तो होता कसा आननी' हे जाणून घ्यायची इच्छा वाचकाला असतेच असते, सर्वसामान्य जीवनापासून अलिप्त असा जाणीवपूर्वक स्वतःचा वेगळा संसार थाटणाऱ्या एखाद्या असामान्य व्यक्तीचं चरित्र जर अगदी तितक्याच पण वेगळ्या अर्थानं असामान्य शैलीनं लिहिलं गेलं तर तो मराठीतला अपूर्व चरित्रग्रंथ होईल.' 

       जीएंची गांधींजींबद्दलची नाराजी त्यांच्या एका पत्रातून व्यक्त झाल्यावर, त्याबाबत पत्रोत्तरात लिहिताना त्या म्हणतात, 'वयाची सोळा ते वीस ही अतिशय महत्वाची चार वर्ष गांधीवादी प्रवाहात गेली, त्याच काळात हाताला चार-दोन रत्न लागण्याचं भाग्यही लाभलं, त्यांचं हे ऋण मी कधीच विसरू शकत नाही.' सुनीता बाईंनी मांडलेलेत्या या साऱ्या बद्दलचे विचार, अर्थात गांधीजींचा शिष्यगण, त्यांची राजकीय मतप्रणाली, त्यांचं राष्ट्र-उभारणीचं कार्य, त्यांचं पूर्वायुष्य हे सारं त्यांची वैचारिक सखोलता स्पष्ट करतात. याबाबत गांधीजींचं भगवं तत्वज्ञान त्यांनाही हास्यास्पद वाटलं खरं...पण त्याचंच स्पष्टीकरण देताना त्या म्हणतात, 'संदर्भ सोडून पाहिली कि प्रत्येक गोष्ट हास्यास्पद वाटते खरं..त्यात आपलेच प्रत्येकाकडे बघायचे चष्मे वेगवेगळ्या नंबराचे आणि रंगाचे असतात आणि हे नंबरही सतत बदलत असतात. शेवटी अंधार काय नि प्रकाश काय, त्यांची intensity प्रमाणाबाहेर वाढली तर दोहोंचा परिणाम एकच होणार- निरर्थकता.' 

      लोकांचे सुनीताबाईंना आलेले बरे वाईट अनुभव आपल्या या मित्राबरोबर वाटताना त्यांनी लिहिलेली विधाने, खूप मोठं तत्वज्ञान जाता जाता अगदी सहज सांगून जातात. जसे कि, ' ज्ञानामुळे नम्रता न वाढता जर नुसता अहंकारच वाढत असेल, तर ते ज्ञान नव्हेच, तो फक्त माहितीचा साठा. ज्ञान पचलं तर त्याची वृत्ती होते आणि नाही पचलं तर त्याचा अहंकार होतो.', ' आपण ज्याला शिक्षण, संस्कृती, प्रगती वैगेरे म्हणतो, त्यांनी माणसातली माणुसकी कमी होत जाऊन लोभ, स्वार्थ, दुष्टावा यांचीच वाढ होते का? दिलेला शब्द मोडणं आणि मग मोडलेला शब्द कायद्यात बसवणं याचसाठी शिक्षण घ्यायचं का?'


      या अशा सोज्वळ पत्रव्यवहाराने तयार होत गेलेल्या आणि दर पत्रागणिक हळुवारपणे उलगडत जाणाऱ्या या दोन दिग्गजांच्या सुरेख मैत्रीचा हा आढावा साहित्याच्या दृष्टीने खूप मोलाचा तर आहेच, पण पानागणिक एक वेगळी विचारधारा वाचकांच्या मनात उमटवणारा वाटला. म्हणून हा लिहिण्याचा खटाटोप. 

---अश्विनी वैद्य 
१३. १०. २०१६ 

Sunday 25 September 2016

रायगडावर जेव्हा जाणे होते


निश्चयाचा महामेरू l बहुत जनांसी आधारु 
अखंड स्थितीचा निर्धारु l श्रीमंत योगी ll
यशवंत कीर्तिवंत l सामर्थ्यवंत वरदवंत 
पुण्यवंत नीतीवंत l जाणता राजा ll


      सर्वात प्रथम चौथीच्या पुस्तकात ओळख झालेला शिवाजी महाराजांचा इतिहास, आठवीच्या उन्हाळ्याच्या सुट्टयांत रणजित देसाईंचे श्रीमान योगी भान हरपून वाचताना डोळ्यांसमोर उभा राहिलेला शिवरायांचा इतिहास आणि आज परत एकदा बऱ्याच वर्षांनी रायगडावर पाऊल टाकताच वाचलेल्या अनेक प्रसंगांच्या खुणा, अवशेष धुंडाळत त्याच्या खूप जवळ जाता येणारा छत्रपतींचा तो अजरामर इतिहास. 

        लेकीला महाराष्ट्राच्या या महान इतिहासाची थोडीफार तरी ओळख व्हावी या हेतूने आज तिथे जायचा बेत आखला होता. पाचगणी, महाबळेश्वर, महाड या वाटेने पुढे जात रायगडाच्या दिशेने निघालो. खूप वर्षांनी या भागात आल्यामुळे नजर जाईल तिथंवर पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगांचे सौंदर्य कॅमेराच्या जोडीने डोळ्यातही किती साठवावे असे होत होते. ढगांमध्ये बुडालेली सह्याद्रीची शिखरं आणि त्या वरून जागोजागी खळाळत वाहणारे लहान मोठे धबधबे, बघावं तिकडं निसर्ग सौंदर्याची अशी उधळण डोळ्यांचे पारणे फेडत होती. हवेतला गारवा थोडासा वाढवत मध्येच येणारी पावसाची सर आणि पाठोपाठ त्या थेंबांना सोनेरी करण्यासाठी पडणारा उन्हाचा हलकासा शिडकावा, अशा या ऊन-पावसाच्या पाठशिवणीच्या खेळात कायम साथीला असलेली धुक्यात हरवलेली घाटातली वळणावळणाची वाट. महाराष्ट्राला निसर्गतःच भरभरून लाभलेले सह्याद्रीचे हे सौंदर्य श्रावणातल्या पावसाळी हवेत अनुभवणे याला तोड नाही आणि ते शब्दांत मांडणं तर केवळ अवघड. 



       महाबळेश्वर ते पोलादपूर हा जवळपास ४० किलोमीटरचा घाट साधारण दीड एक तासात संपवत पुढे महाडच्या दिशेला लागलो, आणि माध्यान्हीच्या उन्हाला रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड या गावात पोचलो. 'सहावीत शाळेच्या सहलीमध्ये खूप मस्ती आणि दंगा करत चढलेल्या रायगडाच्या पायऱ्या', एवढीच काय ती या आधीची या दुर्गम गडाबद्दलची प्रत्यक्ष आठवण. आज मात्र माझीच छोटी पिल्लं बरोबर असल्यानं गड पायी चढण्याच्या माझ्या अति उत्साहावर पाणी सोडले आणि रोपवे च्या आधाराने पायथ्यापासून सातव्या मिनिटाला गडावरच्या हिरकणी बुरुजावर पोचलो. 
रोपवे मधून पायथ्याशी दिसणारे पाचाड गाव 

       गडाची उंची २८०० फूट आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी वेढलेला आणि त्या वेळी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला शंभर एकरात पसरलेला आहे. किल्ल्यावर पाऊल टाकताच त्याची विशालता नजरेत भरते. 



राणीवसा 
       गडावर पुढे पालखी दरवाजाने आत गेल्यावर उजव्या बाजूला सात राण्यांच्या सात महालाच्या खुणा दिसतात. राणीवशाच्या डाव्या बाजूला दासदासींच्या राहण्याच्या ठिकाणांचे अवशेष आहेत. तिथून सरळ थोडे पुढे गेल्यावर मेणा दरवाजा लागतो.  

मेणा दरवाजा 

       दासींच्या निवासस्थानाच्या मागच्या बाजूने दरवाजातून आत गेले की, जो मोठ्ठा चौथरा दिसतो, ते म्हणजे महाराजांचे राजभवन, ज्याच्या उजव्या पण थोड्या खालच्या बाजूला अष्टप्रधानांच्या महालांचे अवशेष आहेत. त्याच दिशेने (दक्षिणेला) लांबवर टकमक टोक दिसते. कडेलोटाची शिक्षा आमलात आणण्यासाठी माहितीत असलेल्या या टकमक टोकाचा वापर शिवरायांच्या कारकिर्दीत कोणाला शिक्षा देण्यासाठी कधीच करण्यात आला नसल्याची माहिती आज नव्यानेच गडावर मिळाली. 


राजभवन 
      राजभवनातून बाहेर पडून समोरच्या बाजूला अलीकडेच सिमेंटने बांधलेली एक भली मोठी प्रशस्त भिंत दिसते त्याच्या पलीकडे राजसभा आहे, जिथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या राजसभेच्या वास्तुरचनेचे वैशिष्ट्य म्हणजे, त्याच्या कुठल्याही कोपऱ्यातून कितीही कमी आवाजात केलेली कुजबुज महाराजांच्या सिंहासनापर्यंत सहज ऐकू जाई, ज्याची पडताळणी करणे आम्हाला आजही शक्य झाले. 

      किल्ल्याच्या बांधकामासाठी लागणारे दगड, तिथल्या खोदकामात सापडलेलेच वापरण्यात आले होते. गड बांधताना दगड एकमेकांना जोडण्यासाठी गूळ, चुना आणि शिसे यांचा वापर करण्यात आला होता. 
नगारखाना 
       सिंहासनाच्या अगदी समोर एक भव्य दगडी दरवाजा आहे त्यास नगारखाना असे संबोधले जाते, हेच राजसभेचे मुख्य प्रवेशद्वार. तेथून बाहेर पडले कि उजव्या हाताने होळीचा माळ, बाजारपेठ, हत्तीखाना या गोष्टीचे अस्तित्व सांगणारे अवशेष दिसतात. बाजापेठेमधून पुढे गेल्यावर साधारण एक किलोमीटर अंतरावर जगदीश्वराचे मंदिर आहे, ज्याचा कळस मुद्दामहून एखाद्या मशिदी सारखा बांधण्यात आला आहे. मंदिरात प्रवेश केला कि समोर असलेला अष्टकोनी चौथरा म्हणजे महाराजांची समाधी. ज्या पवित्र ठिकाणी इतिहासातल्या एका मोठ्या पर्वाचा अंत झाला. 

    गड पहात असताना तिथल्या कणाकणात, भरलेली भव्यता, अद्वितीयता, पावित्र्य, तिथे त्या काळी घडलेल्या ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाच्या अनेक प्रसंगांचे संदर्भ दाखवत त्यांचे आजारामरत्व स्पष्ट करत होते आणि त्यामुळे आम्हा सर्वांना त्या साऱ्या भारलेपणामुळे महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी आपोआप नतमस्तक व्हायला झाले. 

       या साऱ्या गडाचे, तिथल्या इतिहासाची साक्ष असलेल्या अगदी प्रत्येक जागेचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी तिथे काम करणारे लोक खूप मनापासून करत होते याचे अगदी कौतुक वाटले. स्वच्छतेच्या बाबतीतही संपूर्ण गडावर तितकीच काळजी घेत असल्याचे जाणवत होते. तिथे फिरताना कागदाचा एखादा कपटा किंवा प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या, रॅपर्स असा कुठलाच कचरा दृष्टीस पडला नाही. 

      शिवाजी महाराजांनंतर अनेक वर्षांनी म्हणजे १८१८ मध्ये इंग्रजांनी रायगडावर केलेल्या हल्ल्यामुळे गडावरच्या मूळ बांधकामापैकी २५% हूनही कमी भाग आता शिल्लक राहिला आहे. या हल्ल्यानंतर गड अकरा दिवस जळत असल्याची माहिती तिथल्या मार्गदर्शकाने दिली.

        जवळपास ४-५ तास गडावर थांबून आम्ही रोपवेने परत खाली पाचाड या गावी जिजाबाईंचा वाडा बघण्यासाठी आलो. गडावरची थंड हवा सोसत नसल्याने महाराजांनी त्यांस खाली प्रशस्त वाडा बांधून दिला होता. त्या साऱ्या ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन घेऊन, त्या सगळ्या आठवणी मनात साठवत आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. 

अश्विनी वैद्य 
२५. ०९. १६

Thursday 11 August 2016

लंडन-पुणे-लंडन


    मुंबईला विमानातून उतरल्यावर सगळे सोपस्कार पार पाडून बाहेर आले आणि दमट हवेची एक झुळूक मला हलकेच येवून बिलगली, तेव्हा त्याला चिकटलेला भूतकाळ एकदम असा क्षणात समोर उभा राहिला.

    Zara, Armani, H&M, Debenhams, Walis, D&G, Hugo Boss, TopShop अशा चकचकाट, झगमगाट नि लखलखाट या टकारान्त शब्दांच्या चौकटीत ज्यांचं वर्णन चोख बसावं अशी outlets असलेला टकटकीत देश विमानानं सोडला होता आणि मी सरळ चामुंडा गिफ्ट आर्टिकल्स, अंबिका ज्यूस सेंटर, नागराज मेटल मार्ट, गोरे व्हिडिओ शूटिंग आणि फोटोज, तुळजाभवानी लौंड्री, महालक्ष्मी इडली गृह, स्वामी शूज, कालिदास डेअरी फार्म अशी एक से बढकर एक अस्सल मायदेशी, एका शेजारी एक वर्षानुवर्षे सुखानं नांदणारी, पिढ्या न पिढ्या चालणारी दुकानं असलेल्या रोडवर येऊन पोचले होते.



   रस्त्याच्या कडेने समोरासमोर असणारी ही भरगच्च दुकानं, संध्याकाळच्या वेळेला त्यातून हवेत विरत जाणारी उदबत्त्यांच्या धुराची वलयं, आजुबाजूला माणसांची प्रचंड गर्दी, त्यांचे बोली भाषेतील वेगवेगळ्या टोन मधले संवाद , त्या नुसार बदलणारे त्यांचेे चेहरऱ्यावरचे हावभाव, भरधाव नाही पण जागा मिळेल तिथून वाट काढत धावणाऱ्या रिक्षा, बाइक्स, बसेस, चौकातल्या कोपऱ्यावर उभे असलेले फळांचे गाडे, बाजूला रिक्षेसाठी हात करत उभी असलेली चार दोन मंडळी, त्याच चौकात अगदीच दुर्लक्षिलेले, दर काही सेकंदाने लुकलुकणारे लाल, पिवळे, हिरवे दिवे, तिथून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाकडे बघत स्वतःच्या वाढदिवसानिमित्त मोठ्ठया होर्डिंग मधून अगदी गोड हसणारे कुलदीप घोडे, नागेशभाऊ धोतरे, रजनीताई पिसे नामक दादा, ताई, काका, आक्का. हा असा सगळा माहोल, अशी गर्दी, हा सगळा गोंधळ, ही दमट धुराळलेली हवा, त्यात भरलेला तो एक प्रकारचा वास, एकूणच या सगळ्या वातावरणात असलेला एक ठसठशीत जिवंतपणा, चैतन्य, एक वाहतेपण आज खूप दिवसांनी अनुभवत होते. आधी जगलेल्या अशा बऱ्याच क्षणांशी, आठवणींशी स्वतःला जोडत होते. कदाचित त्यामुळंच पूर्वी खूप त्रासिक वाटणाऱ्या याच सगळ्या गोष्टी आज अगदी जवळच्या वाटत होत्या. आपल्या वाटत होत्या. क्षणांचं महत्व समजायला त्यांना आठवणींचंच रूप घ्यावं लागत असावं. तेव्हाच त्याचं मोल जाणवतं. शेवटी मध्यमवर्गीय विचारांची झेप जाणार तरी कुठंवर म्हणा...अशा आनंदाच्या, समाधानाच्या कल्पनांची नांदी या अशा हाकेच्या अंतरावर वसलेल्या छोट्याशाच चौकटीत मावणारी.


लक्ष लक्ष वेळ तुला रिकामेच पाठवावे,
लक्ष लक्ष वेळा तुला आठवावे साठवावे,
पहाटेच्या कळ्यांपाशी थोडे मागावे इमान,
थोडे सांगावे तुलाही माझ्या मनाचे प्रमाण,
लक्ष लक्ष तू अन लक्ष लक्ष वेळ,
मी एक अनंताचे चुकले पाऊल.

  खानोलकरांच्या या ओळी दर वेळी नवीन अर्थाने मला आठवतात. आज त्या पुन्हा एकदा रितेपण देणाऱ्या वाटल्या.

  बाकी काहीही असो, पण या सगळ्यामुळे, घर, उब, माया या शब्दांभोवती फिरणारे विचार त्या वेळी तरी आत कुठेतरी विसावलेत ही जाणीव परत जागी झाली आणि त्यामुळं कदाचित विसावण्याचं समाधान आणि समाधानानं विसावणं याच्या अगदी बारीकशा सीमारेषेवर मनात कायमच चाललेल्या द्वंद्वाला थोड्यावेळासाठी तरी एक पक्की बाजू मिळाली.


असो, तर रोजच्या घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या routine ला सुखाने फाटा देत, खाणे, फिरणे आणि झोपणे या त्रिकुटात बसवलेल्या, घड्याळाशी काहीही संबंध नसलेल्याने पार ढेपाळलेल्या दिनक्रमाचा सुखाने आनंद लुटणे चालू झाले. मागच्या वेळीपेक्षा बदलत गेलेला आजूबाजूचा परिसर यावर कसलीच टिपण्णी न करता त्याचा केवळ सुखाने आनंद लुटणे या सारखी मजा नाही. अशा रितीने आता इथे आल्यावर करायच्या गोष्टींची यादी हळू हळू संपवण्याचा दिनक्रम पार पाडायला सुरवात केली आहे.

अश्विनी वैद्य 
१०.०८.१६ 

Sunday 31 July 2016


दहा वर्ष 

पावसाच्या पाण्याचा खिडकीच्या काचेवरून वाहत येणारा एखादा ओघळ, शेजारून वाहणाऱ्या दुसऱ्या ओघळाला कधी कधी जितका सहजपणे जाऊन मिळतो ना, तितके सहज आपण एकमेकांना भेटलो आणि तेव्हापासून वाहत आहोत एकत्र... आता तुझं पाणी कुठलं आणि माझं कुठलं होतं...वेगळं कसं मिळायचं रे....! 

खरंतर लग्न कशाशी खातात याची जराही जाण नसलेल्या मानसिक वयाची मी असताना बोहल्यावर चढलेले..... आणि अजाणतेची तीच सावली तुझ्याही डोक्यावर.... अर्थात दोघांनाही सगळंच नवखं…!

वाट नवी, अनोळखी पण त्यामुळंच  हवीशी... कुठल्याही पूर्वनियोजित (preset) संकल्पना डोक्यात नसल्यानं निखळतेचा आनंद देणारी....! 

कितीवेळा पडलो, झडलो, भांडलो, पार टोकाचे वाद घातले... अगदी टुकार गोष्टीवरून... सुरवातीला एकमेकांना समजण्याच्या धडपडीत आणि नंतर समजलेलं एकमेकांवर लादण्याच्या गडबडीत…! 

काही साचेबद्ध ठरवलं तरी कुठं होतं आपण कधी, आणि ठरवून तरी ते तसं होतच असही नाही म्हणा...पण आयुष्यं नेतंय तसं वाहतोय अगदी सहज आणि तरीही सुंदर....!  

ज्या गोष्टी मिळण्यासाठी नशिबाची साथ लागते असं म्हणतात त्याही बाबतीत भाग्यवान ठरलो आपण. 

जीवाभावाची चार माणसं भेटली वाटेवर... दोन गोंडस जीवांची साथ मिळाली एका वळणावर... त्यांच्या जन्माचे एकत्र अनुभवलेले ते सुंदर क्षण... आजही रोमांच आणणारे…  
पुढे आपलं असं म्हणणारं जगही बरच विस्तारलं रे, गजबजलं, अगदी भरून गेलं... पण त्याचं कधी ओझं नाही झालं. 

आज बरोबर दहा वर्ष झाली,  
मागे वळून बघितलं तर आत्ता अगदी गोड गोड वाटणाऱ्या बऱ्याच गोष्टी त्या त्या वेळी खूप अवघड होत्या खरंतर... पण निघाले मार्ग त्यातूनही... नव्हे आपण काढले...एकत्र...मिळून…! 

दिवस पुढे जातातच मुळी आठवणी निर्माण होण्यासाठी...आणि नंतर त्या जपत राहण्यासाठी…!
 
केक, फुलं, कार्ड, भेटवस्तू यात गुंफलेल्या वाढदिवसाच्या  सुरवातीच्या संकल्पना हल्ली तुझ्या डोळ्यांत बघूनच पुऱ्या होतात…नाही वाटत गरज कशाचीच...पण केवळ तुझ्या साथीचीच…! 


                                                            —— अशु 
                                                          १२ जुलै २०१६

Thursday 7 July 2016

Isle of Wight



       सलगच्या तीन आठवड्याच्या पावसाच्या पिरपिरीने अगदी वैताग आला होता तेव्हा अचानक दोन दिवसांनंतर येणारा विकांत सूर्यदर्शनाने उजळून निघणार आहे असे weather app ने दाखवले, तेव्हा लागलीच बुकिंग केले आणि गेल्या शुक्रवारी संध्याकाळी Isle Of Wight या British Island कडे जायचे पक्के झाले. तसे आम्ही South Of England मध्येच असल्याने राहत्या ठिकाणापासून साधारण तासाभराच्या अंतरावर असलेल्या इंग्लिश खाडीमध्ये दिसणाऱ्या या Island वर जाणे फार काही कष्टाचे नव्हते. याआधी एकदा तिथे जाणे झाले होते, पण यावेळी नवरा आणि दोन मुले असा लवाजमा सांभाळत दुडक्या चालीने बेटावर फिरावे लागेल अशी शक्यता होती. 

      तर मुलांना शाळेतून आणि नवऱ्याला ऑफिसातून उचलून शुक्रवारी संध्याकाळी आम्ही Southampton या शहराच्या वाटेला लागलो. तिथून फेरीबोटने या बेटावर जाण्याची सोय आहे. (Lemington, Portsmouth आणि Southampton या तीन ठिकाणाहून Isle Of Wight इथे जाण्यासाठी फेरी बोट उपलब्ध असते.) वाटेत खाण्यापिण्याची आणि बेटावरच्या दोन दिवसांची राहण्याची सोय एवढी तयारी करून मी निघाले होते. दिवसभराच्या कामाने थकलेल्या नवऱ्याला आणि मुलांना गाडीमध्ये जरा निवांत विसावा दिला आणि मी इंग्लंडमधल्या सुसाट रस्त्यांचा सुखाने आस्वाद घेत गाडी हाकायला सुरवात केली. 

    विकांताला घडणाऱ्या सूर्यदर्शनाची चाहूल लागायला जणू आत्ताच सुरवात झाली होती. कारण शुक्रवारच्या संध्याकाळच्या साडेसात वाजता सुद्धा गाडीच्या खिडकीतून तिरक्या येणाऱ्या प्रखर सूर्यकिरणांनी डोळे दीपत होते...आकाश अगदी निरभ्र होते. त्यामुळे बेटावर जायचा उत्साह अर्थातच दुणावला. घड्याळच काय ते संध्याकाळ झालीये असं सांगत होतं, बाकी इतका सूर्यप्रकाश चहूकडे पसरला होता, की ती कातरवेळ लख्ख चमकावत उगवू पाहणाऱ्या चंद्राला मागे खेचत होता. 

     जवळपास तासा-दीडतासाचं अंतर कापत आम्ही Southampton ला पोहोचत आलो. साथीला त्या मूडला साजेशी मस्त गाणी चालू होतीच. अचानक लागलेलं "खोया खोया चाँद, खुला असमान...." हे देवानंदचं गाणं कानांवर पडायला आणि सूर्यास्त व्हायला जणु एक वेळ आली. आता मात्र संध्याकाळचं पांघरूण पायांवर अलगद ओढत सूर्यकिरणांना आत घेणं सूर्यालाही भाग पडलं आणि शेवटी आकाशात चंद्राचं शीतल चांदणं हलक्या पांढऱ्या ढगांना मागे सारत पाझरलं एकदाचं. मी गाडी बोटीवर चढवली आणि बोटीनं इंग्लिश खाडीतलं दहा मैलाचं अंतर कापायला सुरवात केली. साधारण ५५ मिनिटात आम्ही Isle Of Wight वर असणाऱ्या Cowes या बंदरावर पोहोचलो. 



       जवळपास चारशे स्क्वेअर किलोमीटर एवढे क्षेत्रफळ असणाऱ्या या छोट्याशा बेटावर Sandown नावाच्या गावात आम्ही राहणार होतो. Cowes पासून Sandown पर्यन्तचा २०-२५ मिनिटांचा बेटावरचा ड्राइव्ह देखील अतिशय सुरेख होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लांबवर पसरलेली खुरटी झुडुपं, गालिचा सारखे भासणारे पिवळ्या फुलांचे मोठमोठे मळे, नैसर्गिकपणे तयार झालेले चढ -उतरणीचे रस्ते, मध्येच एखाद्या वळणावर दिसणारं टुमदार Thatched roof house, हवेत असलेला हलका गारवा, बघावं तिकडे निसर्गाची अशी उधळण त्या अंधुकशा संधीप्रकाशात अनुभवणं अतिशय आल्हाददायी वाटत होतं. साथीला "धीरे धीरे चल चाँद गगन में....! " हे त्या वेळेला अजून मोहक करणारं गाणं नेमकं चालू होतच. बेटावरचं आगमन तर खूप सुरेख झालं होतं. थोड्यावेळाने शेवटी राहण्याच्या ठिकाणी पोहोचलो आणि उद्याचा सूर्य आता या बेटावरचे अजून काय काय नव्याने उजळवणार याच्या प्रतिक्षेत मग आजचा दिवस संपवला. 

Thatched Roof House

     हवामान खात्याचा अंदाज अचूक होता, सकाळी जाग आली तेव्हा सूर्यकिरणं खिडकीच्या पडद्याशी येऊन घुटमळली होती. आपल्या देशात जेवढी चर्चा पावसाळ्यात पाऊस पाडण्यावर होते त्याहूनही जास्त चर्चा इंग्लंड मध्ये दिवस लख्ख असेल, की झाकोळलेला की ओला यावर होते बहुदा. असो सूर्याची मौल्यवान साथ लाभलेली बघून आम्हीही पटापट आवरून जवळच्या Shanklin नावाच्या कोस्टल टाउनकडे निघालो. 



      या बेटावरचे जवळपास सर्वच beaches अवॉर्ड विंनिंग का आहेत हे तिथे जाता क्षणीच लक्षात येते. प्रचंड स्वच्छता, प्लास्टिक आणि इतर सगळ्याच कचऱ्याची योग्य विल्हेवाट, स्फेटी अन हॅझार्ड वार्निंग्जच्या स्पष्ट खुणा आणि एकूणच नैसर्गिक सौंदर्य आहे असे जपण्याचा प्रयत्न या सर्वांमुळे पर्यटकांना तिथल्या निसर्गाचा पुरेपूर आनंद लुटता येतो. काही sandy तर काही pebble beaches त्यामुळे मुलांच्या दोन्ही प्रकारच्या हौस पूर्ण झाल्या. पाणी मात्र अतिशय थंड होते. तरीही काही हौशी लोक त्यात खेळण्याचा आनंद लुटत होतेच. 


इथला अथांग सागर किनारा मनाला वेड लावणारा वाटला.... लाटांचा वाळूमध्ये होणारा एक वेगळाच नाद तासंतास ऐकत राहावा इतका सुखकर होता...तिथल्या वाळूमध्ये चालताना माझ्याच उमटलेल्या पाऊलखुणा मला दिसल्या. मागच्या काहीशा अंधुकशा होत गेलेल्या आणि पुढच्या थोड्या अस्पष्ट वाटणाऱ्या...पण आत्ताच्या मात्र अगदी खोलवर उमटलेल्या....स्पष्ट...(माझ्या ब्लॉगच्या नावाला साजेश्या) असो! 


      किनाऱ्याला लागूनच बरीच सीफूड मिळणारी रेस्टोरंटस आहेत. साधारण अर्धा दिवस तिथे घालवून टीपीकल ब्रिटिश (cod) फिश न चिप्सचा आस्वाद घेतल्यावर मग आम्ही दुपारनंतर तिथून काढता पाय घेतला. पुढे Needles Park या UK मधल्या नैसर्गिकदृष्ट्या अतिशय देखण्या गणल्या जाणाऱ्या ठिकाणी निघालो. शॅन्कलीन हून नीडल्सला जाणारा जवळपास ४० मिनिटांचा costal drive हा तर अक्षरशः संपूच नये असं वाटणारा होता. एका बाजूला निळाशार समुद्र आणि दुसऱ्या बाजूला लांबवर पसरलेले हिरवेगार गवत. बरोबर सायकली आणायला हव्या होत्या याची खंत यावेळी मात्र प्रकर्षाने झाली. असो, तर फ्रेशवॉटर गावाजवळच्या नीडल्स पार्कला पोहोचलो तेव्हा सोसाट्याचा वारा काय असतो हे खूप दिवसांनी परत अनुभवायला मिळाले. या cliff वर असलेल्या या पार्क मध्ये chairlift ने खाली समुद्रकिनाऱ्यावर उतरता येते. तिथून छोट्या बोटीने समुद्रात असलेल्या सुईसारखी टोके दिसणाऱ्या डोंगरापर्यंत (नीडल्स) जाता येते. हा संपूर्ण अनुभव परत एकदा घेतानाही तितकीच मजा आली. राहिलेला दिवस तिथल्या समुद्र किनारी घालवून सूर्यास्त बघून राहण्याच्या ठिकाणी आम्ही परत आलो. या ठिकाणच्या अधिक माहितीसाठी http://www.theneedles.co.uk

Needles Park

     आजच्या शेवटच्या दिवशी आम्ही समुद्र किनार्याना थोडा फाटा देत 'The Garlic Farm' या ठिकाणी जायचे निश्चित केले. तशीही वेगवेगळं खाण्याची दांडगी हौस घरात सगळ्यांनाच, त्यामुळं या बेटावर लसणाची शेती बघायची इच्छा आवारता आली नाही. हे ठिकाण Sandown पासून अगदी १५ मिनिटांच्या अंतरावर, पण तेथे coach ने जाता येत नाही. जवळपास शंभर एकरात पसरलेली Boswell नावाच्या फ्रेंच माणसाची ही शेत जमीन लोकांना बघण्यासाठी खुली आहे.


लसणाची रोपे 


     एखाद्या गोष्टीचे मार्केटिंग किती सुंदर प्रकारे करता येते याचे अतिशय छान उदाहरण इथे फिरताना दिसत होते. कांदा, लसूण, मसाल्याच्या उग्र वासावरून एरवी नाकं मुरडणाऱ्या गोऱ्या ब्रिटिश लोकांना इथे वेगवेगळ्या प्रकारचे लसूण आणि त्यापासून तयार केलेले अनेक पदार्थ विकत घेताना पाहायला जाम मजा आली. लसणाच्या उगमापासून त्याचा ब्रिटिश भूमीतील आगमनाचा इतिहास, त्याच्या जगातील वेगवेगळ्या जाती, शेतीच्या पद्धती वैगेरे बरीच माहिती तिथे मिळाली. 

शेताभोवती फिरताना दिसलेली एक रम्य जागा 

     मी जन्मात कधी कल्पनाही करू न शकणारे असे Black Garlic n Chocolate chip Ice cream हे भन्नाट आईस्क्रीम चाखायला मिळाले. शिवाय शेताभोवतीचा long Farm Walk ही खूप छान वाटला. 


      मेनलॅन्डला परतण्यापूर्वीची संध्याकाळ या बेटावरच्या पुन्हा एकदा एखाद्या समुद्रकिनारी घालवावी या हेतूने मग आम्ही वाटेत लागलेल्या एका बीचवर थांबलो. हे बेट तसं खूप लहान आहे, तेथील Shanklin, Sandown, Ventnor, Ryde सगळेच समुद्र किनारे अतिशय सुरेख आहेत. कधी अगदी सपाट तर आधी चुनखडकाच्या पांढऱ्या डोंगराच्या पायथ्याशी असे प्रत्येक किनाऱ्याचे सौंदर्य वेगळे आणि केवळ अप्रतिम. आत्ता जिथे थांबलो तिथं खाली समुद्रकिनारी जाण्यासाठी पायऱ्या होत्या. मुलांबरोबर खाली उतरण्यासाठी त्या खूप सोयीच्या वाटल्या. तिथे आम्ही पश्चिमेकडच्या क्षितिजावर झुकलेल्या सूर्याला पहात समुद्रकिनारी फेरफटका मारला आणि पुन्हा वर चढण्यासाठी मात्र छोटासा फॅमिली ट्रेक केला. 




   शेवटी कसाबसा जड पावलांनी या बेटाचा निरोप घेत घरी परतण्यासाठी पुन्हा एकदा Cowes या बंदरावरच्या बोटीत गाडी चढवली. समुद्रात तरंगणाऱ्या बोटीबरोबर इंग्लिश खाडीमध्ये इंग्लंडच्या अगदी जवळ असणाऱ्या या बेटावरच्या गेल्या दोन दिवसाच्या सगळ्या आठवणी मनातही तरंगू लागल्या. 






टीप : - या बेटावर बघण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत, advantre activities आहेत. जसे की, Robin Hill Advanture Park, Butterfly world, Dinosour Heritage,  Zoo, Steam Railway, Blacking Chine, Water sports

आधीच्या चार दिवसाच्या भेटीत आम्ही बऱ्यापैकी सारे बघून घेतले होते. त्यामुळे या वेळच्या भेटीत त्याचा उल्लेख आलेला नाहीये. यावेळी बेटावर समुद्रकिनारी तिथल्या निसर्गाचा आस्वाद घेत नुसते फिरणेही खूप छान वाटले.    
अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्यावी. 
http://www.visitisleofwight.co.uk/things-to-do/attractions



अश्विनी वैद्य 
६. ७. २०१६ 

Saturday 18 June 2016

कै च्या कै


        फार फार पूर्वी किनई नोकरी करणाऱ्या बायकांना कमी समजलं जायचं, (म्हणजे पैसे कमावण्यासाठी बाईला बाहेर पडावं लागणं हे कमीपणाचं मानायचे ना त्या काळातलं बरंका हे) अगदी तसंच तेव्हा हाटिलात खाणाऱ्यानाही कमीच समजलं जायचं ("आई, घरी नीट सैपाक करत नाही का रे" असे टोमणे मिळायचे त्यावेळी.) म्हणजे आज्जी, आई, बायको, बहिण या by default सुगरणच असायच्या ना तेव्हाचं हे…गेला बाजार ३०-४० वर्षांपूर्वीचं. (सध्या आई-आज्जीचे वाढदिवस सुद्धा मोठ्या मोठ्या डायनिंग हॉल मध्येच तिथल्या 'सुगरण' शेफ (स्वयापाकी पुरुषांना पण सुगरणच म्हणत असावेत असं मानते आता)(हे कंसात कंस टाकायची लैच घाणेरडी सवय लावलीये राव....श्या) तर त्या 'सुगरण शेफ' च्या हातच्या चवीचे कौतुक करतच आयोजिले जातात हा भाग वेगळा. असो, तर मुद्दा हा की, ही अशी हाटिलात खायची वाईट सवय तेव्हापासूनची, इतकी जुनी…पण हल्ली मात्र या अशा सवयीला 'ष्टेटस शिम्बोल' वैगेरे मानायला लागल्यापासून हाटेलात खाणे ही एक अभिमानाचीच बाब झालीये हे एक माझ्यासारख्यांसाठी बरंच झालंय. 

         तर ही सगळी प्रस्तावना लिहिण्यामागचे कारण एव्हाना लक्षात आलेच असेल. इथून भारतात यायचे तिकीट काढल्यापासून actual निघे पर्यंतच्या काळात बरीच तयारी (अर्थातच shopping) असते खरंतर… म्हणजे इकडून तिकडे न्यायाच्या गोष्टींची, भेटवस्तूंची खरेदी वैगेरे तर आहेच पण महत्वाचं म्हणजे वेगवेगळं खायची लैच हौस ना जीवाला, त्यात स्वतःच्या स्वयंपाक घरात बरेच प्रयोग यशस्वी-अयशस्वी रित्या पार पाडले असल्याने आता कंटाळा आला होता, त्यामुळं या भारत (पुणे) वारीत कुठं कुठं हादडून यायचं याची मोठी यादीच करायाची मी ठरवलं. म्हणजे खरंतर बऱ्याच दिवसांनी घरी जाणार असल्यामुळं, "आपल्या लेकीला, स्वतःच्या हातचं हे खायला घाल, ते करून घाल, वैगेरे घरचा पौष्टिक खुराक (सासर-माहेरच्या आया) दिवसाचे चार प्रहरी, सगळेच दिवस नेहमी प्रमाणे करत राहणार होत्याच, पण हल्ली कसलं भारी भारी मिळायला लागलंय ना हाटीलात…म्हणजे आत्ता नुसत्या कल्पनेनेच तोंडातून ओघळ वैगेरे पाझरायलेत. म्हणून मग ही अशी लिस्ट handy असणं कधीही सोयीचंच नाईका…! ती बनवणं मग मी फारच मनावर घेतलं ब्वा. वेळ मिळेल तशी माहिती जालावर शोधमोहीम चालू केली. 

        'श्री उपहार गृहातली मिसळ, अनारसे सामोसेवाले, पुष्करणी भेळ, गणेश भेळ, बेडेकर मिसळ, इंद्रायणी आणि मुरलीधरचा उसाचा रस, ग्रीन बेकरीतले व्हेज पाटिस, सुजाता मस्तानी, relax ची पाव भाजी, अप्पाची खिचडी, अमृततुल्यचा चहा…' आमच्या सारख्या बाहेरगावहून पुण्यात आलेल्या लोकांची धाव तुळशी बागेत मिळणाऱ्या या कानातल्या-गळ्यातल्या इथवरच. याच्या पुढे यादी वाढवली पाहिजे म्हणून केलेली ही सगळी उठाठेव. 

       पुण्यातले मॉल्स, तिथली प्रसिद्ध आणि नामांकित restaurants यांची महती बऱ्याच ओळखीच्यांकडून आधीच पोहोचली होती, आणि त्यानुसार त्याची चव चाखालीही होती. पण यावेळी मला छोट्या छोट्या कोपऱ्यावरची साधीच पण स्वर्गीय चव असणारी ठिकाणं शोधायची होती. 'तेव्हा खाण्यासाठीच जन्म आमुचा' या typical कॅटेगरी मध्ये मोडणाऱ्या माहितीजालावर वावरणाऱ्या कधीही न भेटलेल्या पण अस्सल खवैय्यांनी दिलेल्या माहितीने तोंडाला अशक्य पाणी तर सुटलंच पण, ज्या काही नवनवीन ठिकाणांची माहिती मिळत गेली, त्याच्या नावांनी, तिथे मिळणाऱ्या पदार्थांच्या रसभरित वर्णनांनी, त्या सांगण्याच्या पद्धतींनी मला हे सगळं लिहायला भाग पाडलं. 

तर "पुण्यात चांगली बाकरवडी कुठे मिळते? चितळे सोडून !" या धरतीवर आधारित माझ्या टुकार प्रश्नांना मला माहितीजालावर मिळालेली माहिती खालीलप्रमाणे 

ठिकाण : अर्थातच पुणे (इकडच्या ब्रिटीश मैत्रिणीला पुणे जितके अनभिज्ञ दुर्दैवाने तितकेच मलाही… असं मला कायम वाटतं, असो )   
तर मिळालेली माहिती इटालिक फोन्ट मधील आणि ती वाचून त्या क्षणी मनात आलेले भाव त्याच्या खाली लिहिले आहेत.  

* चांदणी चौकातल्या टेस्टी टंग्स मध्ये डॉलर जिलबी आणि मालपुआ अप्रतिम मिळतो. * 

माझे सामान्य ज्ञान जरा जास्तच सामान्य असल्याने आधी कधीही न ऐकलेला हा 'डॉलर जिलबी' प्रकार माझ्या टंगला कितपत टेस्टी लागतोय हे बघण्यासाठी मला डॉलर नाही पण पौंड तरी नक्कीच खर्च करून तिथे जावे लागणार होते. 

*आपटे रोडवरच्या शाहजी पराठा हाउस मध्ये पराठे अप्रतिम मिळतात. थोडे महाग आहेत. पण वर्थ व्हिजिट. इथला चुर चुर नान, अमृतसरी नान आणि बनारसी आलू पराठा केवळ अप्रतिम.*

आता हा 'चुर चुर नान' काय प्रकार असेल ब्वा… म्हणजे तो दाताखाली आला की असा चूर चूर वैगेरे आवाज येत असेल का? की तो भाजण्या ऐवजी चूर्र आवाज करत तळत-बिळत असावेत कोण जाणे. 

*ढोले पाटील रोडवर द्रविडाज बिस्ट्रो नव्याने सुरु झाले आहे. सिटी पॉइंट मध्ये. उत्कृष्ट दाक्षिणात्य पदार्थ मिळतात.* 
एक तर ढोले पाटील हे नाव कानावर पडले की, लेंगा-सदरा-गांधी टोपी घातलेली ढेरपोटी व्यक्ती डोळ्यासमोर येते त्याला जेवायला याच रेश्टोरंट मधील डोसा वाढून त्याच्या पुढ्यात या बिस्ट्रोतले काटे-चमचे देवून, 'हं करा आता डोश्याशी युद्ध' म्हणत स्वतः मात्र मनगटा पर्यंत हात भरवत सांबार-भाताचे गोळे कचाकाच चापत बसलेला लुंगीतला शेट्टी भटारखान्यात बसलाय असलं चित्र डोळ्यासमोर तरळलं. 

याच धरती वरचे 'भाऊ पाटील चौकात दिल्ली चाट दरबार सुरु झाले आहे.' म्हणे 

*कोथरुडला कोकण एक्स्प्रेसच्या गल्लीत मस्ती मिसळ आणि पौड फाट्यावर किमयाच्या पुढच्या (कोथरुड कडुन नळ स्टॉप कडे जाताना) गल्लीतली कोल्हापुरी मिसळ निरातिशय सुंदर.* 
कोथरूड मधली कोकण एक्स्प्रेस नामक गल्ली, तिथली ही मस्ती मिसळ आणि तिला लाभलेली कोल्हापुरी चव… म्हणजे हा सगळा नावांचा योगायोग मानावा की जागेचा 

*कोथरुडलाच करिष्माच्या येथील खाऊ गल्लीत सिन सिटी नावाची बेकरी आहे. येथील सर्वच केक्स सुंदर. खास करुन इटालियन कसाटा, हनी अल्मंड तर लय भारी.* 
माझ्यासाठी खाऊ गल्ली म्हणजे, 'अस्सावा सुंदर चोकोलेटचा बंगला' मधील तो 'बंगला' ज्या गल्लीत आहे ती खाऊ गल्ली… मग तिथे मी वाट्टेल तो खाऊ वाट्टेल तसा खातीये, वाढायला डॉक्टरच बसलेत… 'खा गो पोरी, हवं ते हवं तितकं हावरटा सारखं फक्त खा' असं मला ते म्हणताहेत…शिवाय या सगळ्यामुळे माझे वजन जराही वाढत नाहीये… असलं कै च्या कै वाटायला लागतं. 

*Bounty sizzlers कल्याणीनगर, पुणे. अप्रतिम शाकाहारी आणि मांसाहारी सिझलर्स मिळतात.
कसे जावे: पुणे नगर रस्त्यावर रामवाडी जकात नाक्यच्या चौकातुन उजवीकडे वळावे. बिशप स्कुलची इमारत गेली की पुढच्या बाजुला उजव्या हाताला छोट्याशा रस्त्यावर वळालात की लगेच दिसेल. *
हे मात्र काहीही झालं तरी या ट्रीप मध्ये नक्कीच खाणार… अर्थात डावं-उजवं नीट कळलं की पत्ताही सापडेल म्हणा …!
मागे अशाच एका खादाडीच्या ठिकाणाचा पत्ता कोणाला तरी विचारला होता तेव्हा, "दुर्वांकुरच्या समोरचा बोळ, म्हणजे दुर्वाकुरच्या दारात अलका कडं तोंड करुन उभं राहिलं की डाव्या हाताचा बोळ" असं काहीसं उत्तर आलं होतं, म्हणजे अलका नावाचे टोकीज हे सिनेमा बघण्यासाठी कमी पण पत्ता शोधण्यासाठीच तिथे बांधले गेले आहे असं वाटावं इतक्या वेळा मला त्याचा उपयोग केवळ पत्ता शोधण्यासाठीच  झाला आहे. सिनेमाही दाखवत असावेत म्हणा तिथे.   

*एफ सी च्या वाडेश्वर ची मोहीम हाती घ्यावी आणि नियमित पणे हजेरी लावून सगळे पदार्थ निदान एकदा खाल्ल्याचं पुण्य पदरात पाडून घ्यावं. *
हे बाकी खरंय हो, म्हणजे अंदाजे २५-३० पदार्थ जर यांच्या मेनूकार्डावर असतील तर किमान रोज एक च्या हिशेबाने सगळेच दिवस तिथे जाणे आले. 

*गांधी लॉन्स च्या लायनीत म्हणजे कोथरुड आय्सिआय्सिआय्च्या समोर एक काळुबाई गार्डन वडापाव नावाचं दुकान आहे, अगदी खास मराठी वडे असतात त्याच्याकडे.*
वडापाव हे एकतर समस्त मराठी लोकांचे खूप जिव्हाळ्याचे श्रद्धास्थान आणि ते चिरकाल तसेच राहो यासाठी 'देवी काळूबाई' चा आशीर्वाद त्या गार्डन मध्ये उभा राहून 'काळ्याकुट्ट' तेलात वडे तळणाऱ्या त्या दुकानाच्या मालकाला कायम लाभत राहो, हीच सदिच्छा. बाकी, दोन पावांच्या मध्ये वड्या बरोबर कैरीची बारीकशी फोड घातलेला हा वडापाव सध्यातरी लिस्ट मध्ये टोप लाच ठेवलाय. 

*मॉडेल कॉलनी /शिवाजीनगर मध्ये (खूप आत खोपच्यात आहे हे हॉटेल.) राधिका व्हेज. इथला मसाला पापड ऑस्सम एकदम. * 
पुण्यात लोक मसाला पापड खाण्यासाठी सुद्धा बाहेर जेवायला जातात, खरच शिकण्यासारखी गोष्ट आहे नाई ही. या शोधावरून मला तरी असंच वाटतं, 

*शुक्रवार पेठेत केळकर संग्रहालयाच्या जवळचे बापट उपहारगृह. इथली कारल्याची भाजी, भाकरी, मटकी आणि मटार उसळ एकच नंबर.*
चला म्हणजे हेही नसे थोडके, जिभेचे चोचले पुरवायचे म्हणजे किती चमचमीत खावं, काही भान म्हणून मग हे असं घरगुती ट्राय करायला काहीच हरकत नाहीये. अर्थात घरी रोज याच ढाच्यातलं खातो, त्यामुळं इथं खाण्याचा चान्स तसा कमीच आहे. कधीमधी घरचं खावं लागणारच.   

*कोथरुडला (पौड रोड) स्ट्यु आर्ट हे अतिशय अप्रतिम छोटेसे हॉटेल आहे. वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्यु अतिशय दर्जेदार मिळतात. हंगेरियन गुलाश खास प्रसिद्ध *
जेवढा वेळ नकाशावर हंगेरी शोधायला लागेल त्याच्या निम्म्या वेळात हे हंगेरियन गुलाश का काय आहेत ते नक्कीच चापून होतील….! 

*सदाशिव पेठेमधलं "रस्सा: जसा हवा तसा" झॅक जागा आहे चिकन आणि फिश खायची. *
कधी कधी आपली कल्पना शक्ती किती तोकडी पडते नाई…सदाशिव पेठेत हे असं काहीसं मिळत असेल हे स्वप्नात सुद्धा नसतं वाटलं मला. पण या येळेला नक्की खाणार. 

*हातभर लांबीची सुरमई .. बिनसाउथइंडियन मसाला भरलेली.. काय सॉलिड असते राव.. जोडीला लेयरवाले फ्रूट पंच...*
हे वाचून तर अक्षरशः कोकणात खाल्लेली मालवणी मसाल्यातली ताजी सुरमई क्षणभर तोंडातल्या तळ्यात पोहायलाच लागली. नक्कीच जाणार. 

या पृथ्वीतलावरचे माझे सगळ्यात आवडते पेय म्हणजे 'चहा'. दहावी, बारावीत पहाटे अभ्यासाला उठण्याची सवय लावून घेतली ती केवळ हा चहा मिळणार याच आशेपायी. बाकी अभ्यास वैगेरे उगाच आपलं. तर हा तरतरी देणारा चहा कधीही, कुठेही, कितीही वेळा पिण्याची इच्छा झाली तर माहित असावा या कै च्या कै विचाराने गम्मत म्हणून माहितीजालावर शोधला. 

*माउली चहा (पिंपरीगाव)- कराची चौक, जयहिंद हायस्कूल मागे टाकत सरळ पुढे जायचे. एका ठिकाणी डाव्या बाजूला प्रचंड गर्दी दिसेल तोच माऊली चहा. कुठलाही मसाला न घालता केलेला अतिशय कडक चहा. जबर्‍याच आहे एकदम फक्त १० रूपयांत. वर्षानुवर्ष तीच चव…!*

कसं जमतं ना त्यांना… म्हणजे माझ्या सकाळच्या पहिल्या चहाची चव सुद्धा संध्याकाळच्या चहासारखी नसते आणि हे वर्षानुवर्ष तीच चव कसे मेंटेन करत असतील नै. मला आपले बाहेर पडल्यावर गावात दिसणारे 'अमृततुल्य'च चहासाठी स्वर्गीय वाटलेत आजवर. पण गेलेच चुकून त्या भागात तर नक्की लक्षात ठेवेन माउली चहा. 

आमची घरची बिर्याणी तशी लय भारी असते पण तरीही घरातल्यांना अशीच एकदा सीकेपी style खायची काय हुक्की आली कोण जाणे. मग आम्ही स्वारगेट हून कमिन्स कॉलेज च्या परिसरात असणाऱ्या अशाच एका खोपचीतल्या बिर्याणी स्पॉट कडे भर उन्हाची धाव घेतली. जायचा यायचा उन्हात निथळण्याचा एक-एक तास सोडला तर बाकी कष्ट त्या बिर्याणी च्या चवी पुढे खरच काहीच नव्हते… खावून संपवल्यावर त्यांचे ते बिर्याणी चे स्पेशल भांडे (दम दिलेले) दुसऱ्या दिवशी परत नेवून द्यायला आम्ही पुन्हा कमिन्स कॉलेज गाठले. किती ती खाण्याची हौस ना….असो, 

एकदा असंच माझ्या एका मैत्रिणीच्या सांगण्यावरून अग्रज फूड्स मध्ये जाणं झालं, तिथं शहाळ्याच्या पाण्यात भिजवून तयार केलेले खारेदाणे, कमळाच्या बिया फुलवून तयार केलेल्या 'कोलेस्टेरॉल विरहित लाह्या, उपासाची शिंगाड्याच्या पिठाची कुरडई, उपवासाची मिसळ, उपवासाचे लाडू, बिस्किटे, नाचणी, ज्वारी ची बिस्कीटं, कधी कल्पनाही न केलेल्या धान्यांचे पापड, अनंत प्रकारच्या चटण्या, लोणची,  डाएट चिवडा, काकवी, हे असले अति म्हणजे अतिचहुच्च पदार्थ मी मोठ्या हौसेने विकत घेतले…बिल बघून मिनिटभर मलाच कळेना की मी साड्यांच्या दुकानात आहे की खादाडीच्या…एक तर हे असलं काहीतरी विकत घ्यायची दांडगी हौस आणि मग ते खाताना आणि खाऊ घालताना "कसलं भारीये ना !" म्हणत इतरांना पटवून द्यायचा आटापिटा…शिवाय इकडं परत आल्यावर त्याची जाहिरातबाजी…आणि माझं हे सगळं सहन करावं लागलेला सोशिक पुणेरी नवरा. 

असो, तर पुढे पुढे बार्बिक्यू नेशन, तिरंगा, सावजी, ब्लू नाईल, समुद्रचे सी फूड, नॉट जस्ट जाझ बाय द बे मधला लंच बुफ्फे, रोल्स मॅनियाचे सगळेच सुंदर रोल्स, एम. जी. रोडवरील मार्झोरीन ची सँडवीचेस, काटा किर्र ची मिसळ, ले प्लाझिर चा चीजकेक, कॅम्पातले द प्लेस, म्यारीऑट चा स्पैस किचन चा बुफ़ॆ, इ-स्क्वेअरच्यावर असलेले ऑल स्टर फ्राय, औंधमधल्या स्किप्स कॅफेतला ब्रेकफास्ट आणि सँडविचेस, 'वे डाऊन साऊथ' नावाचं फाईन-डाईन रेस्टॉरंट, मॉडेल कॉलनीतलं हॉल्ली क्रेप्स, बर्मीज खाउ सी, शिवाजी पुतळ्याजवळ कोथरूड ला खत्री यांचे गुलकंद किंवा मैंगो आइसक्रीम, डेरीडोन ची आईस्क्रीम्स…काय नि काय नि काय….बापरे, आता मात्र browser बंद केला. 

यादी चांगलीच वाढायला लागली. म्हणजे, मी भारतात सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त आणि फक्त खाण्यासाठीच निघालीये की काय असं वाटायला लागलं. UK मध्ये राहिल्यामुळं गेल्या वर्षभरात जे काही मिस केलं ते एका महिन्यात रिचवणार असंच एकूण चित्र दिसायला लागलं. या आधी यातल्या नामांकित ठिकाणी खाणे  झाले होतेच, नाही असे नाही. पण त्यात snacking तसे कमीच, खूप वाट्या वाला थाळी प्रकारही तसा थोडा अप्रियच (चव घेण्या ऐवजी वाट्या मोजण्यातच माझा बराच वेळ जातो म्हणून झेपत नसेल कधीच) म्हणून मग हा सगळा कै च्या कै उद्योग. या सापडलेल्या ठिकाणातली सगळीच उत्तम नसतीलही कदाचित, यापेक्षाही भन्नाट ठिकाणं राहून गेलीही असतील. पण या सगळ्यामुळं पुण्यावरचे माझे खाद्यप्रेम कैकपटीत वाढले, हे बाकी 'कै च्या कै' च झाले.    


                                                                                अश्विनी वैद्य 
                                                                                 १८. ०६. १६  

Friday 10 June 2016

Nature's Thoughtful Trail



         असंच एका पहाटे अर्थातच सुट्टीच्या दिवशी, पाठीवर छोटी bag अडकवून (पोटापाण्याची सोय) आणि आवडत्या गाण्यांची playlist load केलेला फोन बरोबर घेवून अगदी एकटीने पायी बाहेर पडले. ठरवले असे काहीच नव्हते. म्हणायला तरी, रस्ता नेईल तिकडे पाय वळवणार होते… पण पायाखालची माती अगदीच अनोळखी नव्हती, त्यामुळे नेहमीच्या रस्त्याने गावाबाहेर पडले. बाहेर पडताना आजवर चिकटलेले किंवा चिकटवून घेतलेले सगळे मुखवटे, सगळ्या जबाबदाऱ्या, सगळी लेबलं, तात्पुरते तरी काढून ठेवून, निदान तसा प्रयत्न करून घराबाहेर पडणार होते. एका मोड मधून दुसऱ्या मोडमध्ये स्वतःला असं पटकन स्विच करणं तितकंसं नाही जमत, पण तरी हे सारं अडकलेपण थोडसं उसवून, गुंता थोडा सैल करायचा होता. 

गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळूदे थांब ना 
हूल की चाहूल तू इतके कळू दे थांब ना 
गुंतलेला श्वास हा, सोडवू दे थांब ना 
तोल माझा सावरू दे थांब ना 

         सुदैवाने आमच्या गावाच्या जवळच एक भरपूर उंच, मोठ-मोठी, दाट झाडी असलेला जंगल वजा विस्तीर्ण भाग आहे, मी चालत असलेली वाट तिकडे वळाली. साधारण अर्ध्या तासात चालत मी तिथे पोहोचले. पहाटेला प्रसन्न करण्याचं कोणतं सामर्थ्य या निसर्गात असतं ना कोण जाणे, मग ते अगदी घनदाट जंगल असो, एखादं लहानसं खेडं असो, गजबजलेलं मोठ्ठं शहर असो किंवा अगदी माळरान असो…पहाट जन्मते तीच मुळी प्रसन्नतेची आणि प्रफुल्लतेची आभूषणं लेवून आणि तेच सौंदर्य नुसतं डोळ्यांनी टिपण्यासाठी नाही तर अगदी कणाकणानं अनुभवण्यासाठीच आज ही पहाटेची वेळ गाठायची होती. 



          नुकतच उजाडू लागलं, उंच झाडांच्या दाट पडद्याआडून कोवळी सूर्यकिरणं जणू लाजत खाली जमिनीकडे हळूच डोकावत होती. त्यातल्या काही खालपर्यंत पोचलेल्या सोनेरी रेषा जमिनीवर वाढलेल्या खुरट्या गवतावर जमलेल्या दवाबिंदुना मोत्याचे रूप देत होत्या, मध्येच पसरलेले जांभळट, गुलाबीसर fuschia चे बहरलेले गुच्छ डोळ्यांना तृप्त करत होते. मधून मधून येणारे वेगवेगळ्या पट्टीतले पक्षांचे गूज कानांना सुखावत होते. पायवाटेवर पडलेल्या पानांचा सडा ती पायवाट आहे हे कळण्या इतपटच विरळ होता. त्या क्षणी तिथे अगदी भरभरून पसरलेली ती प्रसन्न शांतता खूप हवीशी वाटत होती. खूप छान वाटत होतं…कधी कधी हे असं वाटणं व्यक्त करण्यासाठी शब्द किती अपुरे असतात ना.




         निसर्गाने उभारलेल्या त्या शोभिवंत मांडवातून पुढे पुढे तशीच चालत राहिले, थोड्या अंतरावर एक छोटा तलाव पसरलेला दिसला. त्याच्या काठावर कोवळी उन्हं अंगावर घेत चार-सहा बदकं आणि साधारण आठ-दहा canadian geese आरामात बसले होते तर काही जणू शुचिर्भूत होण्यासाठी तलावात पोहत होते. त्यांच्या पोहण्याने पाण्यावर हलकेच उमटलेले तरंग काठावर येवून विरत होते. तलावाच्या दुसऱ्या बाजूने दोन राजहंस माझ्यापासून जवळ असलेल्या काठाकडे येताना दिसले. त्या निळसर हिरव्या अंथरलेल्या पाण्याच्या गालिच्यावर हे देखणे, शुभ्र हंस अगदी राजाच्या डौलात येत होते. 




         आत मध्ये येताना या भागाचा नकाशा आणि इथे दिसणारे पक्षी, प्राणी यांची विस्तृत माहिती दिली होती. त्यामुळं एखादं गोजिरं हरीण या तलावाकडं येताना दिसावं असं खूप वाटत होतं. पण अजून तरी दिसलं नव्हतं. बाकी विशेष काही प्राणी असण्याची शक्यताच नव्हती. पण पानांचा आडोसा घेतलेले पक्षी मात्र बरेच असावेत असा अंदाज बांधायला काहीच हरकत नव्हती, इतकी त्यांची गोड गाणी कानांवर पडत होती. बराच वेळ चालल्यामुळं पायांना जरा विसावा देत बाजूच्या गवतावर मग मी ही खाली टेकले. कुठे कसली गडबड नाही, गोंधळ नाही, कोणाची कशासाठी घाई नाही. सगळं कसं शांत, सुंदर. हे सारं डोळ्यांकरावी आतपर्यंत किती आणि कसं साठवावं, किती भरून घ्यावं कि नुसतच त्यात सामावून जावं, कळेना. बराच वेळ बसले, ती शांतता आत कुठेतरी रुजत होती.  


सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला 
नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला 

            एक इटुकली खार अगदी पायाजवळून गेली, तेव्हा तंद्री भंग पावली…कधी कधी काहीच न बोलताही आपण स्वतःशीच खूप बोलत असतो. माझं ते बोलणं तोडत ती खार पायाजवळून सरसर झाडावर चढली. मग मीही उठले, मगाशी धरलेली ती वाट पुढे कुठे जातीये हे बघण्यासाठी परत चालायला लागले. दोन्ही बाजूंना पसरलेल्या उंच झाडांमधून जाताना निसर्गापुढे असलेलं आपलं खुजेपण परत परत जाणवत होतं. कैक वर्ष कणखरपणे, मजबूतीने उभ्या असलेल्या त्या झाडांना, हलक्या, नाजूक पण त्यांवर विश्वासाने लपेटलेल्या वेलींना, बहारलेल्या फुलांना, त्या स्थितप्रज्ञ राजहंसाना एका पाठोपाठ एक शृंखलेत ओवत ती पायवाट रुंद होत होत जंगलाबाहेर पडली. पुढे एका हमरस्त्याला मिळाली. तिथून मी दोन गावांना जोडणाऱ्या एका आतल्या रस्त्याला लागले. 

        आता उन्हं चांगली डोक्यावर यायला लागली होती. सुट्टीचा दिवस असल्यानं विशेष रहदारी नव्हती. काही उत्साही लोक पळायला बाहेर पडले होते, तर काही सायकलिंग करणारे ग्रूप ने दिसत होते. उन्हाची तीव्रता हवेत असलेल्या गारव्याने नाहीशी होत होती. खूप दिवसांनी मी अशी रस्त्याच्या एका बाजूने पायी चालले होते. एरवी गाडीतून जाताना लक्ष न गेलेल्या बऱ्याच गोष्टी त्यामुळं दिसत होत्या. एकसंध आकाशाला छेदणारे पाखरांचे थवे मधून मधून उडत होते. हलक्या वाऱ्याबरोबर dandelion चे तुरे फुलापासून विलग होवून गवतावर जावून पडत होते. इथून पुढच्या आठवड्याभराच्या तरी उन्हाची खात्री देणारे ladybirds गवतावर मध्येच उठून दिसत होते. या दिवसात हमखास दिसणारे ब्रिटीश रॉबिन अगदी आपल्याकडच्या चिमण्यासारखे जागोजागी उडत होते.


       निसर्गाच्या शांत सानिध्यात जेव्हा जेव्हा जायला मिळतं तेव्हा स्वतःच्याही जरा जवळ जाता येत' असं आपलं मला नेहमी वाटतं. स्वतःपासून थोडं बाजूला होवून स्वतःकडेच पाहता येतं, मग तेव्हा उगाचच खूप बाऊ केलेल्या गोष्टी अगदी क्षुल्लक भासतात, छोट्या गोष्टींमधले आनंद जाणवतात, स्वतःचे चूक-बरोबरचे पारडे अगदी सरळ धरता येते, झालेल्या चुकांमुळे येणारा अपराधी भाव निवायला उभारी मिळते. शेवटी काय तर, घरातून निघताना उतरवून ठेवलेले सगळे मुखवटे दारात वाट बघत थांबले होते, त्यांना परत चढवावे तर लागणार होतेच, पण ते कायम स्वरूपी चिकटून आतल्या खऱ्या चेहऱ्याला कायमचे पुसून तर टाकणार नाहीत ना एवढीच खबरदारी घ्यायची होती ही जाणीव कुठेतरी झाली बस्स एवढंच. 

बावऱ्या माझ्या मनाचे उलगडे ना वागणे 
उसवणे होते खरे कि हे नव्याने गुंतणे 

           पुढे बराच वेळ चालल्यानंतर रस्ता ओळखीचा वाटू लागला. माझ्या गावाच्या खुणा लांबून दिसू लागल्या आणि मगापासून bag मध्ये ठेवलेला फोन गाणी ऐकण्यासाठी मी बाहेर काढला.  




अश्विनी वैद्य 

१०. ०६. १६

Tuesday 31 May 2016

शब्द


                                                               
लिहायचं तर खूप होतं, पण आज शब्दच हरवलेत कुठेतरी…
संदर्भ चुकताहेत, अर्थ लागत नाहीयेत, वाक्य सुचत नाहीयेत, 

जुळवा-जुळव शब्दांची करावी की, त्याला चिकटलेल्या अर्थांची,
कि नुसत्याच भाव हरवलेल्या अर्थहिन शब्दांची, काहीच स्पष्ट नाहीये, 
त्यात समोर असलेली डायरीची ती कोरी पानं स्वस्थ बसूही देत नाहीयेत…! 

ही अस्वस्थता, हे असं हरवलेपण, व्यक्त न करता येणारी ही कासाविसता
आज अगदी छळतीये, नकोशी झालीये, असं वाटतंय, 

मुसळधार पाऊस यावा आणि सगळं मळभ कसं अलगद दूर व्हावं, स्वच्छ व्हावं 
आणि मग त्या भिजलेल्या हिरव्यागार पायवाटेवर सांडलेले, 

हरवलेले सारे शब्द सहज सापडावेत, अगदी नितळ, कोरे, रेखीव, 
त्यांना अलगद उचलून, गोंजारत नवे अर्थ जोडावेत…! 

मनातली कासाविसता त्यांच्या आधाराने कागदावर उतरावी, 
आतल्या साचलेपणाला एक वेगळी पायवाट सापडावी 

पण हे बरसणे, ओघळणे, वाहणे आणि त्या नंतर रित्यापणी निरभ्र होणे, 
याचे समाधान देणारा हा पाऊस हवा तेव्हा पाडायचा कसा हाच मोठा प्रश्न आहे! 




-अश्विनी वैद्य 
३१.०५.१६

राजस्थान डायरी : उदयपूर

उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थाप...