Tuesday 22 March 2016

बोचरी संध्याकाळ

                       
          मुंबई हून निघताना विमानाची चाकं take off च्या वेळी जेव्हा जमीन सोडतात ना, तो एक क्षण श्राव्याला नेहमी अस्वस्थ करतो. त्या क्षणी एक हुरहूर उगाच दाटून येते. "सगळं घेतलंस ना गं नीट…काही विसरू नकोस बाई… तू येणार म्हणून तुझ्यासाठी महिनाभर आधी पासूनच लक्षात येतील तशा गोष्टी घेवून ठेवत होते गं…तू आल्यावर मग खूप धावपळ होते ना, वेळ पण नाही पुरत…तिकडे मिळतंच म्हणा हल्ली सगळं, तरी उगाच आपलं माझं समाधान गं…" श्राव्याच्या आईची अशी सगळी मायेची वाक्यं take off च्या त्या क्षणी तिच्या कानांत तिला परत परत ऐकू येत होती. काय काय घेणार आणि किती किती नेणार…या सगळ्या नश्वर गोष्टी बरोबर नेताना तिच्या हळव्या मनाला मात्र इथेच ठेवून विमानाची ती चाकं नेहमी सारखी भरधाव वेगात जमीन सोडून हवेत उडाली सुद्धा होती. भारतातल्या वास्तव्यातल्या वाऱ्या सारख्या उडून गेलेल्या दिवसांची उजळणी त्या क्षणी तिच्या डोळ्यासमोरून भरकन सरकली. 

           माणसांच्यात रमायची, त्यांच्या वेगवेगळ्या स्वभाव वैशिष्ट्यांना पारखत त्यांना समजून घ्यायची, नकळत जाणायची एक गोड खुबी श्राव्यामध्ये अगदी उपजत होती… आणि त्यामुळं आत्तापर्यंत अनेक माणसं तिनं आपोआप जोडली होती. सासर-माहेरच्या स्वतःच्या माणसांबरोबरच मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, शेजारी, ओळखीचे अशी बरीच मोठी भेटीची यादी दरवेळी भारतात आल्यावर पूर्ण करता करता इथले दिवस कधी संपून जायचे कळायचंच नाही. एक एक दिवस घरात अगदी सणासुदी सारखा वाटावा इतकी सगळ्यांची गडबड, मस्ती, धम्माल चालायची. भेटी-गाठी, मनमोकळ्या गप्पा यातून फुललेले नात्यांचे गुंतलेपण, आठवणींच्या रुपात शिदोरी म्हणून गाठीशी बांधून परत निघताना तिचा पाय मात्र नेहमी तिथेच घुटमळत राहायचा. 

            "माणसांची किंमत कळायला अंतरांची दरी पार करावीच लागते का…कोण जाणे…चालायचंच.…!" शांतपणे डोळे मिटून चाललेल्या या तिच्या विचार प्रवाहाला विमानात सुरु झालेल्या एका सुचनेनं खंड पडला आणि मग कोरड पडलेल्या घशाला घोटभर पाण्याने शांत करत ती थोडी भानावर आली. सहप्रवाशांवर एकवार नजर गेली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे साधारण तिच्यासारखेच असलेले संमिश्र भाव बघून तार्कीकार्थी तरी "We are in the same boat (plane) " या वाक्प्रचाराचा उगम कसा झाला असेल हे त्या क्षणी उगाच पटल्यासारखे वाटले. 

             इथे आत्ता असं अथांगात उडत असताना या वेळच्या भारत भेटीत भेटलेल्या त्या सगळ्या लोकांच्या विचारांनी तिचं मन मात्र राहून राहून खाली जमिनीकडेच झेपावत होतं. भारतातील तिची महिन्याभराची ही सुट्टी अगदी ठरल्याप्रमाणे गेली होती. याच दिवसांत येणाऱ्या तिच्या आजीच्या स्मृती दिनाला यावेळी भारतात असल्याने तिला हजेरी लावता आली होती. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही त्यांच्या ठरलेल्या त्या वृद्धाश्रमातल्या लोकांना गोडाचे जेवण आणि काही पुस्तकं देण्याच्या तिच्या बाबांच्या नेमाला यावेळी तिला हातभारही लावता आला होता. खाणेपिणे, पुस्तकं हे केवळ एक निमित्त…पण तिथे दिवसभर थांबून त्या सगळ्या आजी-आजोबांबरोबर गप्पा मारणे, त्यांचं बोलणं, अनुभव ऐकणे आणि त्या साऱ्यात स्वतःच्या आजीचं हरवलेपण शोधणे यासाठी इथं येणं हा खरतर तिचा मुख्य उद्देश होता. त्या दिवशीचं वृद्धाश्रमातलं ते सारं चित्र आज परत एकदा तिला अगदी जसच्या तसं आठवत होतं. त्या अनोळखी आजी आजोबांचे चेहरे अगदी डोळ्यासमोर येत होते. काही अगदी बोलके, चेहऱ्यावर कायम फक्त हास्यच कोरलेले, आपल्या मुला-नातवंडानबद्दल भेटेल त्यांच्याशी भरभरून बोलणारे, काही अगदीच शांत, स्वतःच्या विश्वात हरवलेले, तर काही तिथे राहावं लागत असल्याचा अपराधीपणा वाटून नजर चुकवत बोलणे टाळणारे हे सारं सारं आठवत होतं. एकदा का एखादी न रुचणारी गोष्ट मनापासून मान्य केली कि त्याचा त्रास होईनासा होतो हे उतरणीला लागलेल्या आयुष्याच्या या टप्प्यावर आमलात आणत त्या आश्रमातही सुखासमाधानात राहणारे आजी आजोबांचे एक जोडपे तिला खूप उत्साही, मनमोकळे, अगदी आनंदी दिसले होते. इथे राहावं लागत असण्याची प्रत्येकाची वेगवेगळी काहीही कारणं असोत, पण या वयात या सगळ्या आजी आजोबांना स्वतःचं घर, माणसं सोडून हे असं होस्टेलवर राहिल्यासारखं बघताना तिचं काळीज मात्र तुटलं होतं. 


              याच आधारावर तिच्या आईच्या घराजवळ राहणाऱ्या आज्जींचीही आत्ता तिला खूप आठवण आली. 'पंधरा वर्षांपूर्वी नवरा गेल्यानंतर एकुलत्या एका मुलाकडे अगदी आश्रिता सारखं त्यांना राहावं लागत होतं. आपण आईकडे गेल्यावर मुद्दाम भेटायला म्हणून आलेल्या त्या आज्जींच्या डोळ्यातले ते बिचारेपण आत्ताही डोळ्यासमोर येवून अंगावर अगदी शिरशिरी आली. ऐंशीच्या घरातले वय, खोल गेलेले डोळे, हाडांना केवळ झाकण्यासाठी उरलेली कातडी असा उंच देह आणि या साऱ्या बरोबर लपवण्याची कुचेष्टा करणारे चेहऱ्यावरचे आगतिकतेचे भाव.' "आजी चहा घ्या ना थोडासा" या आईच्या वाक्यावर, "नको हो, अगदी तुमच्या साठी करणार असाल तरच घोटभर घेईन हो, उगाच माझ्यासाठी नका मुद्दाम करू" असं म्हणताना त्यांच्या डोळ्यातील भुकेले भाव पोटातल्या खड्ड्याच्या वाटेकडे सरकलेले त्यावेळी जाणवले होते. मात्र ती सारी आगतिकता लपवण्याची त्यांची धडपडही लक्षात येत होती. मग आम्ही तिघींनी मिळून घेतलेल्या त्या चहा बिस्कीटाबरोबर मारलेल्या गप्पांनी त्याचं मन थोडं हलकं झाल्याचं जाणवलं होतं . त्या गेल्यावर आईने सांगितलेली त्यांच्या परिस्थिती बद्दलची माहिती खूप काही बरी नव्हतीच म्हणा. घरातल्या सार्यांनी त्यांच्या अस्तित्वाचीच न घेतलेली दखल त्यांना खूप असह्य व्हायची. उच्च कुळातील एकुलत्या एक मुलाने संवाद आणि जेवण या दोन्ही जीवनावश्यक बाबतीत त्यांच्याशी पुकारलेला असहकार त्यांच्या काळजाला घरं करायचा. पण त्यांच्या उच्च कुलाची उच्चता या वंशाच्या दिव्याने आईला वृद्धाश्रमात पाठवून धुळीस मिळवली अशी समाजातील नाचक्की टाळण्यासाठी त्याने अशा प्रकारे घरीच नरक यातना देण्याची पुरेपूर सोय मात्र करून ठेवली होती. या साऱ्या मागची त्यांची घरगुती कारणे काहीही असोत पण हे सारं किमान माणुसकीला धरूनही नव्हतं हे खरच खूप भयंकर होतं. खऱ्या आयुष्यात कोणी असं वागू शकतं हे पचणंच खूप अवघड होतं. मग यापेक्षा त्या वृद्धाश्रमातल्या आजी आजोबांचं कुटुंबाविना पण किमान मुलभूत गरजा भागून तरी चाललेलं आयुष्य त्यामानानं बरं म्हणावं कि काय असं वाटलं. आत्तापर्यंत टीव्ही सिनेमात-नाटकात पाहिलेल्या, वर्तमानपत्रात वाचलेल्या या अशा गोष्टी इतक्या जवळून बघताना एक विचित्र कल्लोळ मनात भरून आला.' 


           इकडे इंग्लंड मध्ये तिची अगदी जवळची एक भारतीय मैत्रीण…जी भारतातून इथे शिकण्यासाठी येवून नंतर इथेच जन्मलेल्या आणि वाढलेल्या अशा भारतीय वंशाच्या ब्रिटीश मुलाबरोबर संसार करत होती. सहजिकच त्याचं अगदी आजी आजोबां पर्यंतचं सारं कुटुंब इथे इंग्लंड मध्येच वास्तव्याला होतं. मग मध्ये अचानक पडल्याचं निमित्त होवून तिच्या आजेसासूबाईनी जेव्हा अंथरून धरलं, त्यावेळी मात्र कोणत्याही पण-परंतु चा स्वर न लावता तिने त्यांचे सारे काही करायला मायेने पुढाकार घेतला. हे सारं त्या आजीनाही खूप कौतुकास्पद वाटलं होतं. भारतातल्या कुठल्यातरी गावात जन्मलेली, वाढलेली मुलगी, आपल्या नातवाची पत्नी या नात्याने या परदेशी भूमीतही अगदी प्रेमानं आपली देखभाल करत आहे हे बघून त्यांचा उरही अगदी भरून यायचा. हे सगळं आत्ता श्राव्याला परत परत आठवत होतं. तिच्या इंग्लंड मधल्या घराशेजारी एकटीने राहणाऱ्या नव्वदीला टेकलेल्या तरीही अतिशय उत्साहाने बागकाम, घरकाम करणाऱ्या, गप्पा मारणाऱ्या ब्रिटीश आजीही एकदम डोळ्यासमोर आल्या. असेच एकदा कामामुळे इंग्लंड मधल्या care home मध्ये जाण्याची संधी मिळाली होती, तेव्हा स्वतःला वेगवेगळ्या उद्योगात गुंतवून ठेवत राहत असलेल्या तिथल्या त्या साऱ्या वृद्ध आजी-आजोबांबरोबर मारलेल्या गप्पाही आठवल्या. 


                          जगण्याच्या कक्षा रुंदावत नेताना, थोडक्यात स्वतःच्या comfort zone मधून बाहेर पडताना आपल्याला माहित नसलेल्या जगाची जी ओळख व्हायला लागते ती पचवणं सुरवातीला नेहमीच थोडं अवघड जातं. त्यामुळंच कदाचित श्राव्याला हे सगळं अनुभवताना आतून काहीतरी हलल्यासारखं झालं होतं. या साऱ्या आधारावर आत्ता तिच्या मनात येत असलेले हे विचार आजपर्यंत अनुभवास आलेल्या प्रसंगांना एकमेकांशी जोडत, नवीन संदर्भ शोधत होते. मग यात संस्कार, परंपरा, परिस्थिती, चूक, बरोबर, भोग, प्राक्तन या साऱ्याच्या पुढे जावून मुळात 'म्हातारपण' या शब्दाला चिकटलेल्या आम्हा सगळ्या तरुणांच्या जाणीवा मात्र किती म्हाताऱ्या झाल्या आहेत हे अगदी ठळकपणे जाणवलं.





            त्या क्षणी विमानाच्या खिडकीतून दिसत असलेल्या त्या सूर्यास्ताच्या वेळी आपल्या आयुष्याची संध्याकाळही कशी आणि किती बोचरी असेल कोण जाणे, या सगळ्या विचारांमुळे त्या कातरवेळेची कातरता श्राव्याला आणखीनच बोचरी वाटत राहिली. अस्वस्थ करत राहिली. 



                                                         अश्विनी वैद्य

                                                          २२/०३/१६   



                                                                                             


Tuesday 1 March 2016

खाद्यपुरण

                             

स्थळ :- इंग्लंड मधील एक भारतीय रेस्टॉरंट 
वेळ :- दुपारची पोटात कावळे ओरडायची 
दिवस :- फेब्रुवारीतल्या थंडीतला एक रविवार 

(इथे कोणी प्रतिष्ठित व्यक्ती वैगेरे बरोबरच्या जेवणाचा उल्लेख किंवा कोणाच्या अचानक झालेल्या भेटीमुळे किंवा ओढावलेल्या प्रसंगामुळे उडालेली धांदल वैगेरे प्रकार लेखात पुढे येणार नसल्याचे आधीच सांगितलेले बरे, लेखाची सुरवात मारे अशी केल्याने उगाच गैसमज व्हायचा. ) 

         तर आज खूप दिवसांनी आम्ही तिघी मैत्रिणी, नवरा आणि मुलं ही मनाला चोवीस तास चिकटलेली कवच कुंडलं घरीच काढून ठेवून आयतं हादडायला (जेवायला) इथे एकत्र जमलो होतो. दिवस ठरवण्यात एक महिन्याहून जास्त काळ गेलेला…कधी मुलीच्या मैत्रिणीची बर्थडे पार्टी, कधी एक जणीच्या ऑफिस ची टीम outing, तर कधी दुसरीच्या पाच वर्षाच्या मुलाची football match, अशी बरीच आडवळणे रहदारीचे सगळे नियम (सगळ्यांच्या वेळा) काटेकोरपणे पाळत पार करता करता सहा रविवार उलटून गेले होते आणि मग त्यानंतर कसाबसा आजचा फ्री रविवार उजाडला होता. तर आम्ही बरोब्बर ठरवलेल्या वेळेवर म्हणजे सर्वश्रुत 'indian time" प्रमाणे नाही हं…इथे राहून कितीही प्रयत्न केला तरी तेवढा वेळ पाळण्याचा वाईट गुण नाही म्हणायला लागलाच शेवटी…असो… तर पोहोचलो होतो. 

        एखाद्या सिनेमाचा अगदी climax चालू असताना लाईट जावी, किंवा बाहेरच्या थंडीतून घरात आल्यावर मस्त आल्याच्या चहाची ऊब घेण्यासाठी चहा टाकावा, आणि फ्रीज उघडल्यावर शेवटचा आल्याचा तुकडा कालच संपलाय हे लक्षात यावं, दरवेळी इतकी मी भाग्यवान असल्यामुळं या वेळी ती रिस्क घेतलीच नाही. फोनवरून आधीच टेबल बुक केले होते. त्यामुळे, आत एन्ट्री करताना "sorry, we are fully booked today..." अशा कडू कारल्याची चव जिभेवर नाचवत केलेल्या 'स्मितवाक्याचा' सामना करावा नाही लागला. तशी सुट्टीमुळे आणि सूर्याच्या कृपेमुळे (sunny weather) आज आमच्या सारख्यांची गर्दी बऱ्यापैकी होती. तर आम्हाला आमच्या जिभेच्या रसना तृप्त करण्यासाठी एका कोपऱ्यातले मस्त प्रशस्त टेबल मिळाले. या आधी बऱ्याचदा मेक्सिकन, इटालियन, जापनीज, फ्रेंच असे बहुराष्ट्रीय मेनु उगाच थोडा चवीत बदल म्हणून चाखले असल्याने आणि त्यावरून एकूण आपल्या वरण-भाताला या विश्वात तोड नाही असे शिक्कामोर्तब झाल्याने रेस्टॉरंट ठरवण्यात आम्हा तिघींचे सुदैवाने एकमत झाले होते. 

          या बहुराष्ट्रीय पदार्थांबाबतीत, मूळ गोष्टीची चव जास्तीत जास्त आहे तशी टिकवत, वरुन लिंबू, मीठ, मिरपूड, बटर किंवा चीज यांपैकी जमेल त्याचा फवारा मारून नंतर त्याची उकड घेवून अथवा ते भाजून किंवा तळून, वाटल्यास एखाद्या सॉसमध्ये थबथबवून, कच्च्या झाडपाल्याबरोबर आकर्षित प्लेट मध्ये पुढ्यात मेन डिश म्हणून आल्यावर, मेनुकार्डात उजवीकडे पाहिलेला आकडा मनात आठवत आपण फक्त या रेस्टॉरंटच्या ambiance ची किंमत मोजतोय की काय, असा typical मध्यमवर्गीय विचार कितीही ठरवलं तरी डोकावतोच. याउलट, भारतात जन्माला आलेले जवळपास ३५० प्रकारचे मसाले त्यांची वेगवेगळी permutations combinations करून अद्वितीय, विलक्षण तीक्ष्ण चवींनी, (इथे तोंडाला पाणी सुटणारी सगळी विशेषणं अपेक्षित आहेत…पण सध्या तहाण दोनावरच भागवते) ओतप्रोत भरलेल्या 'क्हरीज' भात किंवा नान बरोबर पानात आल्यावर डोळे आणि नाकाच्या बरोबरीने जिभेच्या रसनाही तृप्त करतात.थोडक्यात, परदेशी भूमीवर उगाच conservative विचारांना (खाण्याला) पुष्टी देणाऱ्यांच्या प्रजातीत मोडणारी मी…मग हे असलंच आवडायचं…!

        तर असो, या अशा रुचकर, आयत्या जेवणाचा बुफे पद्धतीने (set menu) म्हणजे आपल्याकडच्या वाट्या वाट्या वाल्या थाळी प्रकारात मोडणाऱ्या पद्धतीने आस्वाद घेण्यास आम्ही सुरवात केली. सामोसा, पकोरा, आलू टिक्की, पापडी चाट, मंचुरियन या भारतीय (पंजाबी) स्टार्टरने धक्का देत भुकेची गाडी मेन कोर्स कडे वळवताना हातातल्या प्लेटचा आकारही नकळत वाढला. आता त्या नंतर वाढणाऱ्या पोटाच्या किंवा एकूणच शरीराच्या आकारमान वाढीचा विचार अशावेळी तरी मी वर उल्लेखलेल्या कवच-कुंडलांबरोबरच घरी ठेवून येते. त्यासाठी दुसऱ्या दिवशी जिममध्ये ट्रेडमिल किंवा क्रॉसट्रेनरवर तासभर जास्तीची मेहनत करावी लागली तरी चालेल, पण एकदा का रेस्टॉरंटची पायरी चढली की, जिभेचे मुबलक हट्ट पुरवत, पैसे पुरते वसूल करणे हाच काय तो एकमेव उद्देश. तेवढ्या वेळेपुरते डाएटिंग वैगेरे शब्द माझ्या शब्दकोशातून गायब असतात. या अशा खाण्याबरोबरोर साथीला खूप दिवसांनी भेटलेल्या मैत्रिणींबरोबरच्या गप्पा म्हणजे तर अगदी धम्माल….! 

         तर बर्यापैकी सर्व पदार्थांच्या चवी जिभेवर रेंगाळत असताना, गप्पांचा ओघ थोडा ओसरल्यावर लक्ष जरा आजूबाजूला गेलं. आमच्या एका बाजूच्या टेबलवर साधारण पास्तीशितले आई-वडील आणि त्यांची दोन गोजिरी मुलं मोठा ४-५ आणि धाकटा जवळपास वर्षाचा असं एक भारतीय कुटुंब घरची चूल बंद ठेवून आज दुपारी इथं विसाव्याला आलं होतं बहुदा. किमान अर्धा तरी संसार बाबा गाडीला बांधून त्यातले सामान त्या वर्षाच्या बाळाच्या दिमतीला लागेल तसे दर पाच एक मिनिटांनी पुरवण्याचा कमालीचा संयम त्या आई वडिलांकडे होता. शिवाय मधल्या वेळात मोठ्याचे प्रश्न कम आदेश कम तक्रारी चा सूर सचोटीने सांभाळण्याची कसरतही चालू होती. या सगळ्यातून ज्याच्या साठी ते इथे आले होते तो जेवणाचा द्राविडी प्राणायामही आधी वडील आणि नंतर आई असे आळीपाळीने करत होते. एका क्षणाला धाकट्याचा असा काही मूड गेला कि, आई हातातला घास परत प्लेटमध्ये ठेवत त्याच्या तार सप्तकाला कोमल करण्याची धडपड बिचारी करू लागली. या सगळ्यात 'आस्वाद' मग तो जेवणाबरोबर गप्पांचाही पार दूर दूर पर्यंत डोक्यातही आला नसेल दोघांच्या. 

        उजव्या बाजूच्या टेबलावर जवळपास सत्तरीतले ब्रिटीश आजी-आजोबा मात्र त्या भारतीय जेवणाचा कमालीचा आस्वाद घेत होते. दोघांच्याही प्लेट्स मध्ये एकूण सगळ्या पदार्थांचे मिश्रण होवून एक डोंगर वजा ढीग लागला होता. आपल्या जेवण्याच्या एकूणच पद्धतीची माहिती नसल्याने कदाचित त्यांच्या पानात बरीच भेळ मिसळ झाली होती. पण तरीही प्रत्येक घासागणिक तृप्तता त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडत होती. तसही जगभरात 'भारतीय क्हरीज' त्यांच्या अप्रतिम चवीमुळे उगाच का प्रसिद्ध आहेत. 

        डाव्या कोपऱ्यातल्या टेबलावर आमच्या नंतर थोड्या वेळाने एक दक्षिणात्य कुटुंब त्यांच्या साधारण आठ वर्षांच्या मुलाबरोबर बसलं होतं. रविवारचा केस धुण्याचा कार्यक्रम तिघांनीही नुकताच पार पाडून ते इथे पोहोचले असावेत असा एकूण अंदाज त्या एका typical वासावरून आणि एकूणच त्यांच्या अवतारावरून सहज येत होता. या सगळ्यामुळे आपण परदेशात आहोत याचा मलाही पाच मिनिटं विसर पडला. त्यांच्या बाबतीत मात्र तोंड हे केवळ जेवणासाठीच उघडले जात होते. जेवताना बोलण्यास सक्त मनाई असल्याची अदृश्य पाटी तिघांनीही हातात धरलीये असं वाटलं. आणि त्यामुळं आमच्या नंतर येवूनही पोटं तुडुंब भरून दुपारच्या वामकुक्षीला आम्ही मात्र इथेच असताना ते पोहोचलेही असतील, इतके पटापट त्यांचे सगळे आटोपले होते. 

       आमच्या सारखे जेवणाचा आधार घेत निवांतपणे गप्पा मारायला भेटलेल्या मित्र-मैत्रिणींचेही चार दोन कळप बसले होतेच. त्यांच्या सोशल इमेज सांभाळत चाललेल्या गप्पा, हास्यविनोद याचा साधारण अंदाज येत होता. तसं हे रेस्टॉरंट उत्तम चवीसाठी चांगलं नामांकित होतं, त्यामुळे भारतीय आणि ब्रिटीश दोन्हीही लोकांची इथे चांगलीच गर्दी होती. पलीकडच्या मोठ्या हॉल मध्ये अनेक वर्षांपासून इथेच स्थायिक असलेल्या गुजराती कुटुंबातील कोणाची तरी बर्थडे पार्टी चालू होती. एकूणच त्यांच्या इंग्रजाळलेल्या भाषा, पेहराव अशा बाह्य गोष्टींवरून तसं जाणवत होतं. ती सारी मंडळी त्या उत्साहात अगदी धुंद होती. 



     स्वतःच्या पानातल्या वेगवेगळ्या चवींचा पुरेपूर आस्वाद घेत आज तिथे आलेल्या लोकांचा साधारण अंदाज घ्यायचा उद्योग आमच्या गप्पांच्या बरोबरीने आपोआप कधी सुरु झाला कळलंच नाही. खूप दिवसांनी मिळालेल्या निवांतपणामुळे असेल किंवा अंगच्या वाईट सवईमुळे असेल कदाचित. पण त्यामुळे अनोळखी लोकांच्या स्वभावाचे वेगवेगळे कंगोरे जाताजाता उगाच पडताळले जात होते. जसा हळदीचा कडवटपणा, मिरचीचा जहाल तिखटपणा, लवंग-दालचिनी-तमालपत्राचा उग्रपणा, वेलदोड्याचा सुवास, केशराचा सुरेख रंग, आमचुराचा आंबटपणा किंवा जेष्ठ्मधाचा गोडपणा या साऱ्याच्या मूळ चवी पदार्थांमध्ये चाखत त्याचा माणसांच्या स्वभावाशी असलेला संबंध आज बसल्या बसल्या उगाच परत एकदा जोडला गेला. आणि शेवटी आम्ही 'अन्नदाता सुखी भव' म्हणत घरचा परतीचा रस्ता धरला. 

                                                              अश्विनी वैद्य 
                                                                १. ३. १६ 

राजस्थान डायरी : उदयपूर

उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थाप...