Wednesday 8 October 2014

' संवाद '



                      होतं ना असं कधी कधी.… मनातल्या मनात स्वतःशीच स्वतःच द्वंद्व चालू असतं. काही पटत असतं पण परत तेच रुचतही नसतं…. मनातल्या या गोष्टी कोणाला सांगाव्याही नाही वाटत, खरेतर सांगायच्या असतात पण समोरच्याची मानसिकता ते ऐकून घेण्याची नाहीये हे जाणवलं कि घुसमट सुरु होते, मग आधीच बंद झालेल्या दारावर, ते उघडण्याची अपेक्षाच नसताना ठोठावण्यात कसलं आलंय शहाणपण.
               मित्र-मैत्रिणी, facebook, whatsup वर ढिगानी असले तरी अशी घालमेल जाणून घ्यायची इच्छा असणारे कोणीच नाही… मग बोलायचं तरी कोणाशी, हि मनातली घालमेल थांबवाची कशी…या भयंकर विचाराने मग स्वतःशीच संवाद साधायचा प्रयत्न केला, आत्मपरीक्षण म्हणूया हवं तर तसं करायचा प्रयत्न केला, मनातल्या मनात चूक-बरोबर, योग्य अयोग्य, अशी गणितंहि मांडून बघितली. मग तर मनाची अस्वस्थता आणखीच वाढली. मन अजून अशांत झालं……!

                       या सार्यातून एक मात्र नक्की पटलं, माणसाला संवादाची अत्यंत गरज असते, अन्न, वस्त्र, निवार्या इतकीच संवादाचीही महत्वाची मानसिक गरज असते हे प्रकर्षानं जाणवलं. मग काय जेव्हा मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, जवळचे सोबती या सार्यांचे संवादासाठीचे बंद दरवाजे डोळ्यासमोर आले, तेव्हा फक्त एकच आधार खुणावू लागला. टेबलावर ठेवलेली डायरी आणि पेन.…संवादासाठी, आधारासाठी कायम तयार असलेले…….
                     मनात साठलेला सगळा राग भसा भसा एका पानावर लिहून टाकला… तो राग बघून पेनही इतका बिथरला कि अगदीच वेडावाकडा चालायला लागला…. मग दहा मिनिटे शांत बसल्यावर, थोडं मोकळं झाल्यासारखं जाणवल्यावर पुढच्या पानांवर विचारांची वाट नेईल तिकडे, मनाची धाव पोचेल तिथपर्यंत शांतपणे लिहित गेले. एव्हाना पेनही स्थिरावला होता, तो हि नीट चालत होता. मनात उमटलेले सारे स्वल्पविराम, अर्धविराम जस जसे संपत गेले तसे थोडे शांत वाटू लागले, आणि मग थोड्यावेळाने जेव्हा हि शांतता टिकवून ठेवावी असे जाणवले तेव्हा पेनानेच मनाचा ताबा घेतला आणि पानावर पूर्णविराम आपोआप उमटला. त्या रात्रीच्या शांततेत मनाचीही शांतता घेवून मी झोपून गेले.
                    नवीन दिवस, नवीन उत्साह आणि चैतन्य घेवून सूर्यकिरणे जेव्हा दाराशी पोहोचली तेव्हा जाग आली, डोळे उघडल्यावर सर्वात आधी दिसले ते पेन आणि डायरी…. काल रात्री अगदी विषन्न झालेल्या मनाशी संवाद साधून न चिडता त्याचं सारं म्हणणं ऐकून घेवून तिनं (डायरीनं) किती हळुवार शांत केलं त्याला, चूक बरोबर अशी कसलीच टिपण्णी न देता मनावरचं सारं मळभ आपसूक दूर केलं. राग असो, आनंद असो कोणताही भाव असो तो व्यक्त होणं गरजेचंच असतं. कोणीतरी ते आपुलकीने ऐकावं, ऐकून घ्यावं एवढीच आवश्यकता असते. आणि नितळ संवादातूनच ते शक्य होतं. जो काल कोणतेही पूर्वग्रह नसलेल्या माझ्या डायरीने माझ्याशी साधण्याचा प्रयत्न केला.
आनंद, दुःख, राग या भावना मनात येणं हे देखील एक संवेदनशील आयुष्य जगत असल्याचं द्योतक आहे, (आपण नॉर्मल आहोत हे स्वतःला समजवण्यासाठी काढलेली पळवाट असेल कदाचित.) पण असे भाव कमी जास्त प्रमाणात आपल्या भोवती पिंगा घालतच असतात. तुम्हा सर्वांबरोबर हे share करण्यामागे हेच एकमेव कारण होते, कि असाहि एक सुसंवाद होऊ शकतो….कदाचित कधी उपयोगी पडलाच तर…


- अश्विनी- 
३/१०/२०१४


राजस्थान डायरी : उदयपूर

उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थाप...