Friday 6 December 2019

रंगपंढरी


    ऑफिस ला जाय-यायचा रस्ता चांगला तासदीडतासाचा. त्यामुळं कारमधला ट्रॅफिक बरोबरचा बोअरिंग काळ जरा बरा घालवायला सुरुवातीला रेडिओ, गाणी, पॉडकास्टस वैगेरे सगळं झालं, रोज तेच तेच मग त्याचा कंटाळा आला. 
काही technical ऑडिओ बुक्स ऐकायचा प्रयत्न केला, तर ती सुरु केली की, ड्रायविंग करताना झोप येतीये असं वाटायला लागलं... सो तो आगाऊ नाद सोडून दिला. मग वाटलं लोकांचे interviews ऐकावेत... काहीतरी नवीन, आणि शोधता शोधता मग 'रंगपंढरी' ही एक मस्त series मिळाली. रंगभूमी गाजवलेल्या आजवरच्या दिग्गज अभिनेत्यांच्या कामाचा आढावा घेत त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊन त्याचा उपयोग इतर रंगकर्मींना किंवा आपल्या सारख्या साऱ्यांनाच व्हावा हा या series मागचा उद्देश. मधुराणी प्रभुलकर हिने अशा दिग्गजांच्या घेतलेल्या मुलाखतींची ही series. मग धपाधप चार पाच भाग डाउनलोड करून घेतेले आणि ऑफिस चा कंटाळवाणा ट्रॅफिक वाला ड्राईव्ह पुढचे काही दिवस तरी सुखकर झाला. 


    त्यातली पहिली मुलाखत ऐकली ती मुक्ता बर्वे हिची. मुक्ताच्या अभिनयाची मी प्रचंड फॅन आहे, मला ती खूप आवडते, ते तिच्या सहज अभिनयासाठी, तिच्या भूमिका निवडीसाठी आणि लॉजिकल वागण्यासाठी. मी तिचं पाहिलेलं पाहिलं नाटक 'हम तो तेरे आशिक है ', फलटण ला, बारावीच्या सुट्टीत. तिने त्या नाटकात साकारलेली रुकसाना अजून लक्षात राहिली आहे. तेव्हा 'द मुक्ता बर्वे' अशी तिची ओळख मला नव्हती पण नंतर आणखी काही नाटकं, सिनेमा, सिरिअल्स मधून मुक्ता तिच्या अभिनयामुळं खूप आवडायला लागली. या सगळ्यामुळं आधी तिचीच मुलाखत ऐकली त्याबद्दल थोडेफार इथे सांगावे वाटले.   


    ही मुलाखत तीन भागात आहे, अगदी मनमोकळ्या गप्पा म्हणूया हवं तर. मधुराणीने मुक्ताला विचारलेले प्रश्नही खूप अभ्यासपूर्वक आणि उत्तरांना ओघवत्या गप्पांचे रूप देत पुढच्या पुढच्या टप्प्यावर नेणारे आहेत. पहिला भाग ऐकूनच अगदी भारावून जायला झालं, त्यामुळं पुढचे दोन्ही भाग त्याच ओढीनं ऐकले. अभिनेत्री म्हणून तिचा आजवरचा प्रवास, प्रत्येक भूमिका साकारताना त्या मागचा सखोल विचार, त्यासाठीची तयारी, अभ्यास, कष्ट आणि खूप काही, ते ऐकून अगदी स्तिमित व्हायला झालं. 


    लहानपणी दहावीच्या सुट्टीत राज्यनाट्य स्पर्धेत काम करताना मुक्ताला पहिल्यांदा जाणवलं, की ही स्टेजवरची जागा, तिथलं वावरणं तिला comfort देतं, कितीही लोकांसमोर तिला हवं ते एक्सप्रेस करता येतं आणि ते करणं बेस्ट वाटतं. म्हणून मग कुटुंबातल्या सगळ्यांच्या सपोर्ट मुळे ललित कला केंद्रात प्रवेश मिळवून तिने, ३ वर्ष अभिनयाचं पदवी प्रशिक्षण घेतलं. त्या तीन वर्षात तिच्या वयाच्या अगदी कोवळ्या, टप्प्यावर, नाटक ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारे एक्सप्लोअर केलंय म्हणजे विजया मेहता, भक्ती बर्वे, जब्बार पटेल, विजय केंकरे, विजय तेंडुलकर अशा लोकांचा सहवास, मार्गदर्शन आणि त्यांच्या बरोबर काम करत शिकण्याची संधी मिळण्याचं भाग्य तिला लाभलं. नाटक करायचंय हे कधी कळलं याचं उत्तर देताना ती हे सगळं सांगते.हे सगळं मांडताना ती एक खूप सुंदर बाब सांगते, "जेव्हा समोरची व्यक्ती किती मोठी आहे, याचं भान आपल्याला नसतं तेव्हा त्या अजाणतेपणी त्यांना काहीही क्षुल्लक प्रश्न विचारले जातात, पण त्याची खूप सुंदर उत्तरं मिळत जातात, ती तेव्हा समजतीलच असे नाही, पण ती कुठेतरी स्वतःत मुरत जातात." किती खरंय ना. चांगली माणसं आणि चांगले विचार आजूबाजूला असणं यासारखी दुसरी श्रीमंती ती काय. 


    मुलाखतीच्या पुढच्या टप्प्यांवर, मुंबई या कर्मभूमी मध्ये तिला सुरवातीला लगेच मिळालेलं पाहिलं नाटक 'आम्हाला वेगळं व्हायचंय' रत्नाकर मतकरी यांचं, तो अनुभव ती सांगते. त्यानंतरची काही नाटके, नंतर मग भूमिका निवडीच्या निकषांबद्दल बोलताना ती म्हणते, "ते नाटक कोणी लिहिलंय, कोणती संस्था ते प्रोड्युस करत आहे, नाटकातून मांडलेला विषय मला ethically पटलेला आहे का, या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी दुय्यम ठरतात, या सगळ्या पेक्षा त्या नाटकाची गोष्ट सांगण्याची पद्धत (क्राफ्ट) किती इंटरेस्टिंग आहे, नाटकाची संहिता कशी आहे, मलाच ते नाटक एक प्रेक्षक म्हणून पाहायला आवडेल का, मी तितकी गुंतून राहीन का, या सगळ्या बाबींवर ते करायचं कि नाही हे मी ठरवते." Neutral चेहरा असणं हे एका अभिनेत्यासाठी वेगळ्या प्रकारच्या भूमिका करताना वरदान कसं असू शकतं, हे ती तिच्याच व्यक्तिमत्त्वातून जाणवून देते. ते सांगतानाचा तिचा कॉन्फिडन्स मला कमालीचा महान वाटला. 


    नाटकाच्या तालमींमध्ये पात्र समजून घेत, प्रसंगातले चढ उतार, भाषेचा लहेजा, वाक्यांची उठाण, मध्येच एखादा वेगळा येणारा शब्द, त्यातून आवाजाचं खाली जाणं, वाक्यांचा रिदम, त्यातून उमटणारं लेखकाचं म्हणणं किंवा तो भाव, हे सगळं नाटकातल्या शब्दांबरोबर आपोआप येणंच कलाकारांकडून अपेक्षित असतं असं ती म्हणते. 



    कम्फर्ट झोन च्या बाहेरच्या भूमिका साकारताना काय वेगळं करावं लागतं याचं उत्तर देताना, मुक्ता तिने केलेल्या 'कब्बडी' या नाटकाचा रेफरन्स देते. एका कब्बडी खेळणाऱ्या मुलीची भूमिका करतानाच्या तिच्या तयारी बद्दल ती सांगते, "आयुष्यात कधीच मी मैदानी खेळ खेळले नाहीत, पण या नाटकासाठी स्टेजवर वावरताना प्लेअर ची बॉडी language मात्र दिसली पाहिजे आणि ते मैदानावर दाखवता येणार नाही तर नाटकातल्या प्रसंगात ते जाणवलं पाहिजे कि ही मुलगी बाहेर कब्बडी खेळून येते, मग या सगळ्यातून हे पात्र कुठून आणि कसं स्वतःत आणायचं हा अभ्यास माझा चालू झाला. कब्बडी प्रत्यक्ष खेळून ते आलं नाही. तर त्या प्लेअरच्या डोळ्यातला फोकस, तुफान कॉन्फिडन्स यात ते पात्र दडलंय हे शोधून मग ते आत्मसात करून ती भूमिका साकारली, त्याच्या अगदी विरुद्ध भूमिका, 'दोघी' या सिनेमातली. आयुष्यात खूप काही अनुभवल्यानंतर आतून आलेला शांतपणा, परिपक्वता हे त्या पात्राचे डोळे, शांत हावभाव, आनंद आणि दुःख याच्या पलीकडे पोचलेला एक स्निग्ध आवाज यातून ते उभं करता येणार आहे, हे समजून घेतलं" 
मुक्ताकडून हे सगळं ऐकताना मला खूप भारावून जायला झालं. 


    नाटकातल्या कलाकृतींचं माहित नसलेलं कल्पित भावविश्व् लेखकाच्या दृष्टीनं कसं असेल, ते समजून घेत त्या नाटकापुरतं ते स्वतःत रुजवत, तितक्याच परिणामकारकतेने प्रेक्षकांसमोर उभं करणं ही अभिनय कला मला कायम खूप fascinating वाटते. आणि त्यामुळं या क्षेत्रात आयुष्य घालवलेल्या लोकांबद्दल वाचताना ऐकताना अगदी स्तिमित व्हायला होतं. कलाकार म्हणून त्या भूमिकेला ती व्यक्ती किती न्याय देते याच्या बरोबरच, आपण प्रेक्षक म्हणून ते किती रसिकतेने मुग्ध होऊन त्याला दाद देतो हे ही तितकेच महत्वाचे आहे.


    एक प्रेक्षक म्हणून अभिनयाकडे बघतानाचे वेगळे dimensions मला या मुलाखतीतून सापडत गेले. दोन अडीच तासांच्या पडद्यावरच्या त्यांच्या त्या अभिनयामागे, कलाकारांची किती मेहनत असते, बारीक बारीक खुबी, गोष्टी असतात, एवढे असूनही ती मेहनत प्रेक्षकांना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत काम नये इतका सहजपणा अभिनयात आणत त्या नाटकासाठी ती ती भूमिका जगणं म्हणजे नक्की काय असेल याची माझ्यासारख्याना केवळ कल्पनाच करता येईल. 



    मागे ऐकलेली विजया मेहता यांचीही मुलाखत आठवली. ही 'बाई ' पण या क्षेत्रातले खूप भव्यच व्यक्तिमत्व आहे. पुलंच्या वाऱ्यावरची वरात पासूनच्या प्रवासाबद्दल त्यांनी लिहिलेले मागे वाचलेही होते. जेव्हा तुमचं काम तुमचं passion होतं तेव्हा त्यातून मिळणारं समाधान खूप अमूल्य असतं, हेच अशा कलाकारांच्या मुलाखती ऐकताना जाणवतं. मुक्ता ही अशाच दिग्गजांच्या पोषक सहवासात तयार झालेली एक खूप बुद्धिमान आणि हुशार अभिनेत्री. नक्की ऐकावी अशी तिची ही मुलाखत. 


    पडद्यावरच्या एका वेगळ्या जगात प्रेक्षकांना घेऊन जाणाऱ्या अशा दर्जेदार कलाकृती आणि असे उत्तमोत्तम अभिनेते, अभिनेत्री आपल्या मराठी रंगभूमीला मिळत राहोत आणि आपल्याला त्या कलाकृती अजून अजून पाहायला मिळोत हीच इच्छा. 


अश्विनी वैद्य 
६/१२/१९

राजस्थान डायरी : उदयपूर

उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थाप...