Friday 12 September 2014

एकसष्टी

 

                 पप्पा, आज तुमचा ६१व्वा वाढदिवस. सर्वप्रथम आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. पप्पा गेलेला ६० वर्षांचा काळ असा भुर्कन उडून गेला असं नाही म्हणणार मी. कारण खूप खूप सुंदर आठवणींनी भरून ओथंबलेली गेली हि पाच तपं. मग असा कसा पटकन गेलेला असेल तो काळ. ज्यातून तुमच्याबरोबर आम्हीही तेवढेच सर्वार्थानं समृद्ध होत गेलो.

        असं म्हणतात, लहानपणी जे वातावरण तुम्हाला मिळतं, जे स्किल्स तुम्ही स्वतः आत्मसात करता ते पुढचे सारे आयुष्य घडवण्यात मोलाचे ठरतात. इतकं रखरखतं बालपण, पितृछायेचं परकेपण आणि लक्ष्मीची अवकृपा या सार्यांच्या श्रीमंतीत वाढलेलं रोप तितकीच खंबीर, गोड, रसदार फळे स्वतःत रुजवत स्वतःच्या पायावर उभं राहिलं, हिमतीने. अजाणते वयात जबाबदारींची जाण पेलत स्वतःचं हरहुन्नरी आयुष्य तुम्ही भरभरून जगलात ते केवळ यामुळेच असेल कदाचित. तुमचं बालपण तुम्हाला खूप काही देवून गेलं पप्पा. त्या वेळी आयुष्याच्या शाळेत गिरवलेले ते धडे कोणतीही घोकमपट्टी न करता आजपर्यंत कानात गुंजत राहिले आहेत, आणि त्या मुळेच आमचेही बालपण, तरुणपण खुलण्यासाठी, बहरण्यासाठी मम्मी बरोबर तुम्हीही तेवढेच प्रयत्न केलेत. 

        आम्हाला कायम तुमचा खूप मोठ्ठा, भक्कम आधार वाटतो. 'हं, पप्पा आहेत ना, होईल काहीतरी' असा विश्वास असतो. कोणत्याही निर्णयात मग ते घरगुती असो किंवा बाहेरचे तुम्ही आमची मतं तेवढीच महत्वाची समजून ग्राह्य धरत आलात. शाळेत असताना डान्स, गाणी, नाटकं या सगळ्यात उत्साहाने मला भाग घ्यायला लावायाचात. आई अभ्यास आणि तुम्ही other activities असं न ठरवता जमलेलं समीकरण आमच्या पायाभरणी साठी खूप महत्वाचं ठरलं. त्यामुळेच निखिलची गाण्यात एवढी प्रगती झाली. माझं बालचित्रवाणीवर झालेलं समूहगान, युवामोहोत्सव आणि तत्सम कार्यक्रमात झालेले डान्स, माझा कथ्थकचा क्लास, आईने तिच्या शाळेतून आणलेल्या अनेक पुस्तकाचं वाचन, चांदोबा, किशोर या लहान मुलांच्या मासिकात माझे छापून आलेले लेख आणि अजून बरच काही हे त्यामुळेच शक्य झाले. 'काय हो पप्पा, थांबा ना तुम्ही जरा…" असं अगदी चिडून तुम्हाला म्हणण्या इतकी मोकळीक आपल्या नात्यात त्यामुळेच निर्माण झाली. अगदी लहानपणापासूनच तुमची एखादी गोष्ट मला नाही पटली कि लगेच तुम्हाला ते सांगण्याचे धाडस त्यामुळेच आले. या परदेशी, अनोळखी भूमीत न गडबडता स्वतःला सावरत जगण्याचे पाठबळ मिळाले तेही केवळ त्यामुळेच. 
    
        आपल्याला उच्च विचारसरणी असलेल्या लोकांचा सहवास मिळावा, जेणेकरून आपली वैचारिक प्रगल्भता वाढीस लागते या हेतूने तुम्ही कायम आम्हाला कोणाकोणाला भेटण्यास घेवून जायचा, यातूनच गवसलेला एक अनमोल क्षण म्हणजे प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या बरोबर शाळकरी वयात माझी झालेली पहिली भेट. 
         आज वयाची तिशी ओलांडताना मी बर्याचदा भूतकाळात रमते. या काळात आपसूक गोळा केलेल्या आठवणींचा खूप गोड ठेवा मनाच्या एका संवेदनशील कोपर्यात जपत आले आहे. त्या कधी कोणाशी शेअर कराव्यात असे नाही वाटले, कारण त्या त्या गोष्टींकडे त्या त्या प्रसंगी बघण्याची ती माझी नजर होती, त्याच दृष्टीने सारे पाहतील असे नाही. पण आजचे एकसष्टीचे निम्मित पुरेसे ठरले त्या सुंदर, मोहक फुलांवर नव्याने मोरपीस फिरवायला, आणि माझे मलाच कळले किती छान सुंदर केलं आहे आमचं बालपण तुम्ही दोघांनी. (आणि तेही कोणतीही parenting वरची पुस्तके न वाचता, आमचा मात्र आधार हि पुस्तकेच.) मी जवाहर नवोदय विद्यालय, सातारला असतानाचे दिवस, तुमचे दरवर्षी बोर्डाचे पेपर तपासण्याचे दिवस, तुमची नाटकातली कामं, आमच्या शाळांमधल्या निबंध स्पर्धा, विज्ञान प्रदर्शनं यामधले आमचे भाग, माझं इंजिनीअरिंग च उप-डाऊन आणि बरच काही… 

           आजुष्य सारेच जगतात, पण ते समरसून, स्वतःच्या मनाचा कौल ऐकत, प्रत्येक गोष्टीत आनंद शोधत, उत्साहानं जगणं साऱ्यांनाच नाही जमत, जे मी तुमच्याकडे बघून शिकण्याचा कायम प्रयत्न करते. एवढा उत्साह कुठून येतो पप्पा तुमच्यात. मग ते अगदी दमलेलं असताना बाहेर जाणं असेल, एखादं नाटक बघणं असेल, वाढदिवसाला अगदी studio मध्ये जावून फोटो काढणं असेल, वयाच्या चाळीशीत लॉ ला घेतलेलं admission असेल किंवा सेवानिवृत्ती नंतरचं कमिन्स मधलं शिकवणं असेल. माझ्यासाठी तर मी जे काही लिहीन त्याला दिलखुलास दाद उत्सुर्तपणे देणाऱ्यामध्ये तुम्ही toplist आहात. 
          आज या साठीच्या वळणावर मन थोडं हळवं होतंय तुमचं, fulfilment ची जाणीव आहेच पण पूर्वीचा खंबीरपणा फुला सारखा नाजूक झालाय. तरीही उत्साह आणि नवीन काहीतरी करण्याची उमेद मात्र काळी इतकीच टवटवीत. प्रवीण दवणे यांनी त्यांच्या एका पुस्तकात म्हटल्या प्रमाणे 'जगत रहा, भरत रहा' या उक्तीनुसार तुमचं अस्ताव्यस्त पसरलेलं आयुष्य आणि त्याला सुगरण आईची मिळालेली नीटनेटकी साथ यामुळे खरेतर आमचीच आयुष्य भरत गेली. या साऱ्याबद्दल धन्यवाद असं म्हणून मी त्याचं मोल बिलकुल कमी करणार नाही. पण आजच्या दिवशी या साऱ्या भावनांना विसावण्यासाठी मोकळी वाट दिसली ती तुमच्या पर्यंत पोहोचणारी म्हणूनच हा लेखन प्रपंच.

      अखेरीस, अनेक वादळांना धैर्याने सामोरे जात एकटीच्या सामर्थ्यावर जगलेल्या आईचं मूल कसं असणार अजून, नाही का? पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…. 

तुमची अशु 
अनंतचतुर्दशी 


No comments:

Post a Comment

राजस्थान डायरी : उदयपूर

उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थाप...