Tuesday 8 December 2020

The man who loves his job never works a day in his life




फेब्रुवारी महिन्यातला एक शुक्रवार, वेळ संध्याकाळी अगदी ऑफिस संपायच्या तासभर आधीची. स्लॅक वर एक नवीन मेसेज आलेला दिसला. 
' Hey Ash. If you ever want to pair with someone and you have a headset and don’t mind using vscode with liveshare, I would be happy to pair with you.' 


या टीम मध्ये जॉईन होऊन तीन एक आठवडे झाले असतील. अजून नीटशा ओळखी होत होत्या लोकांशी. त्यात खूप मोठी टीम, त्यातले अर्ध्याहून अधिक सिनियर डेव्हलपर्स. त्यामुळं सुरुवातीला मी आपणहून कोणाशी बोलण्यासाठी थोडी भिडस्तच होते. या पार्श्वभूमीवर आलेला वरचा मेसेज बघून मला आश्चर्य आणि आनंद दोन्ही झाले. ज्यानं मेसेज पाठवला होता तो आमच्या टीम मधला एक सिनियर डेव्हलपर (त्याची profile बघून तेवढेच कळलेले). पण आजपर्यंत कधीच त्याला पाहिले किंवा भेटले नव्हते. टीम जॉईन केल्या पासूनच्या गेल्या तीन आठवड्यातल्या ज्या काही रोजच्या स्टॅन्ड अप्स, प्लँनिंग मिटींग्स, रेट्रो मिटींग्स वैगेरे झाल्या त्या कॅमेरा बंद ठेवून ऑनलाइनच या व्यक्तीने अटेंड केलेल्या. स्लॅक च्या dp ला त्याचे ऍनिमेटेड picture. त्यामुळं ही व्यक्ती कोण असावी काही समजले नव्हते. कायम घरून काम करणारा हा कोण डेव्हलपर आहे ही उत्सुकता होती पण नवीनच नोकरी सुरु केल्यामुळं इतर पुष्कळ गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या, शिकायच्या होत्या त्यामुळं जो माणूस टीममध्ये केवळ virtually च आहे त्याच्याबद्दल टीम मधल्या इतर कोणाला विचारणं ही एव्हाना एव्हढं महत्वाचं वाटलं नव्हतं. 

त्यामुळं जेव्हा त्याचा वरचा मेसेज आला तेव्हा मी त्याला अगदी उत्साहानं रिप्लाय केला. माझा सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून हा पहिला जॉब आणि ही व्यक्ती मात्र खूप एक्सपेरियन्सड सिनियर डेव्हलपर. पण तरी त्याने आपणहून माझ्याशी ओळख करून घेतली, मला मदत करण्याची तयारी दाखवली आणि नंतरही मला या २० जणांच्या मोठ्या टीम मध्ये comfortable करण्यासाठी फार मदत केली. त्याच्याशी ओळख झाल्यानंतर कामाचे स्वरूप, त्याचे वेगवेगळे भाग, टीम चे culture, technical गोष्टींबरोबर हे सगळंही मला समजून घ्यायला पुढे त्याची फार मदत होत गेली. 

यानंतर महिन्या भरातच कोरोना मुळे मार्च मधले पहिले lockdown झाले त्यामुळं पूर्वी टीम मध्ये हा एकटा घरून काम करणारा होता तर आता त्याच्या जोडीला आमची संपूर्ण टीमच घरून काम करू लागली. communication गॅप वाढू नये नि त्याचा कामावर परिणाम होऊ नये यासाठी सगळेच एकमेकांना केवळ virtually च कनेक्टेड राहू लागले. 

मला assign केलेल्या तिकीटावर घरून काम करत असताना खूप प्रॉब्लेम्स यायला लागले, टीम मधल्या इतर कोणाला मेसेज करून विचारणं दर वेळी प्रशस्त वाटत नसायचं, मग अशा वेळी मला स्लॅक वर आलेला त्याचा मेसेज 'Hey Ash, where are you upto on your ticket? are you stuck on something, Let me know, if I can help you out' मला अगदी देवदूता सारखा वाटायचा. मग त्या तिकिटावर पुढे काही दिवस आम्ही pairing करायचो. खूप कॉम्प्लिकेटेड पद्धतीने लिहिलेला कोड समजून घ्यायला बऱ्याच वेळा मला याची इतकी मदत झाली आणि बरीच bugs tickets त्याच्यामुळे मला करता आली. 

How to debug any problem, how to reach to the root cause, याचे कधीच ठोकताळे असे नसतातच पण तरी त्याची Direction of thinking towards solving the problem मला समजत गेली आणि मी ते शिकण्याचा प्रयत्न करत गेले. Javascript सारखी सातत्याने नवीन गोष्टी ऍड होत राहणारी language, नवीन कंसेप्ट्स, नवीन libraries, tools असं बरंच काही त्याच्याबरोबर pair प्रोग्रामिंग करताना मी शिकत गेले. Jenkins pipeline मधले issues असोत, release रिलेटेड काही असो किंवा अगदी PR वरच्या reviews ला उत्तर देणं असो..हे कसे हॅन्डल करायचे ते मी त्याच्याकडून शिकले. टेस्ट ड्रिव्हन डेव्हलपमेंट (TDD) जे केवळ theoretically माहित असावे म्हणून मी मागे शिकलेले ते आता तिकिटावर काम करताना सुद्धा वापरायला तो मला नेहमी इन्सिस्ट करायचा. 

मी जेव्हा जेव्हा त्याच्याबरोबर काम करायचे तेव्हा तेव्हा मला त्याच्याकडून 'How to write a beautiful, easy to maintain and readable code' चे प्रात्यक्षिकच अगदी मिळत गेले जे डेव्हलपर म्हणून काम करण्यासाठी मला कायम उपयोगी पडणार आहे. टीम मधल्या इतरांबरोबरही मी काम करत होतेच पण याच्याकडून मिळणारे insights मला notedown करून ठेवावेत इतके महत्वाचे वाटायचे. कधीही काहीही अडलं तर अगदी बिनधास्तपणे त्याला विचारायला आता मला अजिबात भिती वाट नव्हती तर उलट आधार वाटत होता की, प्रॉब्लेम चे सोल्युशन सापडले नाही तर याला विचारू, नक्की सापडेल काहीतरी. 

कधीच न दिसलेल्या, प्रत्यक्षात न भेटलेल्या त्याच्या वयाचा अंदाज मात्र मला कधी बांधताच आला नाही. सुरुवातीला आवाज ऐकून वाटलेलं, ही व्यक्ती पन्नाशी च्या आसपासची असेल. पण नंतर गप्पांमध्ये तो एकदा जेव्हा म्हणाला की माझा नातू आता युनिव्हर्सिटी मध्ये जाईल या वर्षी तेव्हा त्याच्या लॅपटॉप च्या स्क्रीन पलीकडे माझा अगदी आ वासला होता. नक्की काय वय असावं याचं. याचा नातू १७ वर्षांचा म्हणजे हा माझ्या पप्पांपेक्षा अजून थोडा मोठा पण आजोबा म्हणायला थोडासाच लहान. त्यात त्याच्या एकूण काम करण्याच्या पद्धतीवरून कोणालाही तो वयानं एवढा मोठा असेल असं कधीच जाणवलं नसतं. 

इतका हुशार माणूस, इतक्या नवीन technology मध्ये या वयात सुद्धा इतक्या सहजतेने काम कसा काय करू शकतो, असं मला नेहमी वाटायचं. ज्या वयात रिटायरमेंट नंतरची पेन्शन घेत निवांतपणे आयुष्य घालवायचं त्या वयात हा javascript सारख्या तशा नवीन technology मध्ये सिनियर डेव्हलपर म्हणून काम करतो ते ही प्रचंड passion ने. या सगळ्यामुळे मला त्याच्या बद्दल फार आदर वाटायला लागला. आत्ताही तो काहीतरी नवीन म्हणून वीकएंड ला रुबी नावाची language शिकत होता. मला त्याबद्दल नेहमी सांगायचा. आठवड्यातून किमान एक दोनदा तरी त्याच्याशी कामानिमित्त ऑफिस कॉल व्हायचेच. तेव्हा कामाबरोबर इतरही वेगळ्या विषयांवर आमच्या बऱ्याच गप्पा व्हायच्या. पॅरेंटिंग, ब्रेक्सिट, India as a tourist place, इंडियन फूड अशा खूप गोष्टींवर त्याच्याशी गप्पा होत. वाक्यागणिक ब्रिटिश ह्युमर पेरणाऱ्या, दिलखुलास मनाच्या, कायम हसतमुख, फ्रेश आणि कामाबद्दल passionate असणाऱ्या त्याच्याबरोबर बोलल्यानंतर मला नेहमी खूप positive च वाटलं. 

त्याच्या ऑस्ट्रेलिया ला राहणाऱ्या लेकीबद्दल तो दरवेळी भरभरून बोलायचा. तिच्या मुलांबरोबरही तो लांब असूनही emotionally खूप कनेक्टेड होता असं त्याच्या बोलण्यावरून नेहमी जाणवलं. लेकीचा नवीन बदललेला जॉब, तो मिळवण्यासाठीची तिची धडपड, मग अगदी executive पोस्ट वर तिला सिडनी ला मिळालेला जॉब, तिची मुलं, घर साम्भाळतानाची तिची कसरत सगळं अगदी भरभरून सांगायचा. त्याला त्याच्या लेकीला भेटायला या covid मुळ या वर्षी जाता आलं नाही, पण हे lockdown संपलं कि त्याचा ऑस्ट्रेलिया चा प्लॅन अगदी तयार.

खाण्याबद्दलच्या त्याच्याबरोबरच्या चर्चा तर फार धम्माल. Home cooked इंडियन फूड त्याचं favourite. तेव्हा दाल म्हणजे मराठी पद्धतीच्या फोडणीच्या टोमॅटोच्या वरणाची रेसिपी मी त्याला दिली आणि त्याने लागणारे सगळे spices आणि डाळ वैगेरे सामान online मागवून सुद्धा घेतले. 

गेल्या शुक्रवारी पूर्ण दिवसभर आम्ही एका issue वर एकत्र काम केलं आणि शेवटी संध्याकाळी काम संपवताना मला म्हणाला, " मी मागवलेलं सामान काल डिलिव्हर झालंय आता मी उद्या तू दिलेल्या रेसिपी ने spicy इंडियन दाल करणार आहे". मला फार छान वाटलं. ती केल्यावर फोटो काढून मला नक्की पाठव हे त्याला बजावलं आणि लॉगऑऊट करून लॅपटॉप बंद केला. 

कालच्या सोमवारी तो स्लॅक वर ऑफलाईन दिसला. मंगळवारी पण तेच ऑफलाईन च. आणि बुधवारी सकाळी standup कॉल मध्ये मॅनेजरने संपूर्ण टीम ला कळवले की तो सोमवारी रात्री झोपेतच हे जग सोडून गेला. "He Passed Away in his sleep. Dont know the reason, but he had few health issues." माझा ऐकलेल्या शब्दांवर विश्वासच बसेना. शुक्रवारी संपूर्ण दिवस ज्या व्यक्तीबरोबर मी एकत्र काम केलं, त्याचं उत्साही, प्रसन्न आणि हसतमुख बोलणं ऐकलं, तो आज या जगातच नाही. हे कसं शक्य आहे. हे पचवणंच मला खूप अवघड गेलं. त्याला कधी भेटले नाही, पाहिलं नाही, केवळ काम निमित्ताने होणाऱ्या गप्पांमधून एक सुंदर मैत्रीचं नातं ज्याच्याबरोबर तयार झालं होतं. ज्याच्याकडून मी कैक गोष्टी शिकले, तो मन मोकळ्या, विनोदी स्वभावाचा, कायम हसतमुख असणारा, ऑफिस मधला माझा big support,  माझा जणू ब्रिटिश आजोबाच आता इथून पुढच्या माझ्या करिअर च्या प्रवासात माझ्याबरोबर नसणार आहे. हे मनाला अजूनही मान्य होत नाही. 

आज पाच दिवस झाले, पण मला अजूनही तो आहे टीम मध्ये virtually असाच भास होतो. टीम मधले सगळे जण त्याच्या अशा अचानक जाण्याने खूप हळवे झाले. प्रत्येकाकडून त्याच्याबद्दलच्या सुंदर आठवणी ऐकायला मिळाल्या. 

वीस वर्ष C++ मध्ये एका मोठ्या multinational कंपनीत बँकिंग सॉफ्टवेर मध्ये काम केल्यानंतर सॉफ्टवेर इंजिनीरिंग चा दुसरा एखादा भाग शिकावा आणि त्यात काम करावं या उद्देशानं त्यानं sky मध्ये काम सुरु केलं. NOW TV मध्ये ५ वर्ष काम करत माझ्या या आत्ताच्या टीम मध्ये खूप काँट्रीब्युट केलं. nowtv.com चे वेबपेज उघडल्यानंतर जे बरेच features दिसतात ते घडवून आणण्यात त्याचा पुष्कळ वाटा आहे. हे आता दरवेळी आम्हाला जाणवत राहणार आहे. 

इतक्या गप्पा मारायचो आम्ही पण कधीही त्याने स्वतः कायमचे व्हीलचेअर वर आहोत याचा बाऊ केला नाही कि त्याबद्दल कसली sympathetic चर्चा केली नाही. फक्त एकदा बोलताना ओघात सहज मला सांगितले, आणि मी ही कधी खोलात जाऊन त्याबद्दल त्याला जास्त विचारले नाही. पण परवा तो गेल्यानंतर त्याच्या मुलीचे कंपनीला आलेले ई-मेल मॅनेजर ने टीम बरोबर share केले त्यात तो disabled कसा झाला याचा उलगडा झाला. 

ग्रामर स्कूल मध्ये शिक्षण पूर्ण होतानाच वयाच्या अठराव्या वर्षी त्याला spinal कॅन्सर झाला. केमो, ऑपरेशन्स नंतर पुढच्या संपूर्ण आयुष्यासाठी त्याला व्हीलचेअर चा कायमचा आधार घ्यावा लागला. पण तरीही computer science मध्ये डिग्री आणि पोस्ट ग्रॅड्युएशन पूर्ण करून त्याला एका मोठ्या multinational कंपनीची नोकरी मिळाली. जी त्याने वीस वर्ष केली. हे करताना music ची प्रचंड आवड त्यामुळं एका बॅण्ड बरोबरही तो काम करायचा. व्हीलचेअर टेबल टेनिस खेळायचा. व्हीलचेअर वरून रोज बाहेर फिरायला जायचा. प्रोग्रामिंगच्या नवीन languages शिकायचा. आयुष्य भरभरून जगायचा. कधीही रडका सूर, चिंता, तक्रार नाही. कायम आनंदी आणि उत्साही. शेवटची ही वर्ष आणि हा covid चा अवघड काळ त्याने एकट्याने राहून काढला. कोणीही जवळ नव्हते. पण त्याबद्दल कधीच निराशावादी सूर त्याच्या कडून ऐकायला मिळाला नाही. 

आपण जेव्हा नव्यानं एखादं काम करायला सुरुवात करतो, शिकण्याच्या अगदी पहिल्या पायरीवर आपण असतो, तेव्हा आपल्याला किती मोठ्या व्यक्तीचा सहवास मिळत आहे, ज्यातून आपण घडत आहोत ही जाण तितकीशी ठळक नसते, पण ती व्यक्ती अशी अचानक गेल्यावर ती जाणीव प्रकर्षानं होते. इतक्या हुशार व्यक्तीचा माझ्या या क्षेत्रातल्या करिअरच्या सुरुवातीला मला मिळालेला सहवास virtual का असेना पण माझ्यासाठी अमूल्य ठेवा आहे. पुढच्या प्रत्येक पावलागणिक मला त्याची आठवण येत राहणार आहे. 

त्याच्याबरोबर मला काम करायला मिळालं हे माझं भाग्य. मला अजूनही प्रश्न पडतो, एवढ्या मोठ्या व्यक्तीने मला मी जॉईन केल्यावर आपणहून मेसेज करून मदतीचा हात कसा काय पुढे केला असेल. मी नवीन डेव्हलपर म्हणून त्याच्यासारख्या सिनियर dev ने मला इग्नोर करणं सहज शक्य होतं पण त्याने कधीच तसं केलं नाही. इतकं genuine कसं कोणी असू शकतं. त्याच्या सगळ्या आठवणी आठवून आता खूप भरून येत राहतं. जाण्याआधीच्या संध्याकाळ पर्यंत तो कोडींग करत होता आणि शांत झोपला तो पुन्हा कधीही न उठण्यासाठीच. असं सुखकारी, शांत मरण भाग्याचंच. आयुष्यभर कोडींग चे त्याचे passion त्याने जपले, स्वतःची डिसॅबिलिटी कधीच त्या आड येऊ दिली नाही.

जे वाक्य त्याच्या work profile मध्ये मी सुरुवातीच्या दिवसात वाचलेले ते तो खऱ्या अर्थाने जगला असंच म्हणावं लागेल. 'The man who loves his job never works a day in his life.' 

He was really an amazing human being I have ever met in this country. Missing him a lot. त्याच्या आत्म्यास शांती मिळो हीच इच्छा. 

ही  खालची इमेज माझ्यासाठी एक आठवण म्हणून ठेवावी अशी. ज्यात त्याने स्वतः हून मला केलेला पहिला मेसेज आहे. 






-- अश्विनी वैद्य 
८/१२/२०

Wednesday 16 September 2020

Something random....!


    परवा असच कुठंतरी बाहेर निघालेले तेव्हा ड्राईव्ह करताना इथल्या एका पंजाबी रेडिओ स्टेशनवर एका शो ची जाहिरात ऐकली, 'सोनी टिव्ही वर लवकरच एक शो येत आहे, 'इंडिया वाली मां...  इक मां के संकल्प और समर्पण की प्यारीसी कहानी....!'  हॅं आता हे काय वेगळंच...! 'इंडिया वाली मां' म्हणजे फुल्ल on dramatic असणार. ते नाव ऐकून मला पुढच्या २ मिनिटात मी आजवर पाहिलेल्या बॉलीवूड मधल्या सगळ्या इंडियावाल्या माँ पटापटा आठवल्या. 

"मेरे पास गाडी है, बंगला है, नोकर है, चाकर हैं, तुम्हारे पास क्या हैं?", या यक्ष सवालवर, "मेरे पास मेरी माँ हैं" असं म्हणत गडगंजी अमिताभ ला माँ नसने के वजह से क्षणात भिकारी भासवणारा भाऊक dialogue, गाडी चालवता चालवता speech bubble मध्ये माझ्या डोक्याच्या बाजूला डोळे मिचकावणाऱ्या smiley सकट pop up झालाय असा भास झाला....! पाठोपाठ मग करण अर्जुन मधली, "मुझे पता था, मेरे करण-अर्जुन जरूर आयेंगे", म्हणणारी बेसहारा, दुःखी म्हातारी राखी आम्मा सुद्धा एकदम डोळ्यासमोर तरळली. पढ लिखके बडा आदमी झालेल्या लेकाला तो ऑफिसला निघाल्यावर उसके पसंद के 'आलू के पराठे' आणि 'गाजर का हलवा' डब्यात देणारी सुगरण मां, किंवा डोळ्याची पार खापरं करून शिलाई मशीनवर लोकांचे कपडे शिवू शिवू पोरांना मोठं करणारी कष्टाळू, सहनशील पर हिम्मतवाली माँ, अशा सात आठ वेगवेगळ्या रूपांमधल्या सगळ्या dramatic मां एका पाठोपाठ एक त्या डोक्याशेजारच्या bubble मध्ये लाईनीत उभ्या राहिल्या. काय पण तो इफेक्ट Bollywood चा. 

अर्थात हिंदी भाषा शाळेत शिकण्याआधी हे शिणेमे बघून शिकलेल्या माझ्या सारखीला दुसरं काय आठवणार म्हणा अजून. इंग्लंडात हे 'इंडिया वाली मां' असं शो चं title ऐकून शिणेमातल्या या सगळ्या आजवरच्या, बेट्याच्या प्रेमात पार बुडालेल्या इंडियावाल्या मां पटापटा माझ्या डोळ्यासमोर आल्या.

पण तरी आया या आयाच असतात ना राव. मग त्या कुठल्या का असेनात. इंडियन, मलेशियन, अरेबियन, साऊथ आफ्रिकन, जापनीज, चायनीज. फार फार तर काय मुलाला शाळेच्या डब्यात गूळ तूप पोळी ऐवजी, गोगलगाय फ्राईड राईस किंवा उंटाची बिर्याणी वैगेरे मधल्या सुट्टीत खायला देतील इतकंच. पण डबा देणारच ना हो with माँ का ढेर सारा प्यार. 

कहने का मतबल माँ तो माँ होती है, ये इंडिया वाली अलग कैसे होगी? हा म्हणजे आमची आई आणि आम्हाला दिसलेली इंडियन टीव्ही शिणेमा मधली माँ ये बहोत अलग है. इनका दूर दूर तक कोई रिश्ता नही. म्हणजे अजिबातच संबंध नाही हो. अर्थात आम्ही तरी कुठं त्या टिव्हीतल्या शुभ्र, सुबक, इस्त्राळलेल्या पोरांसारखे गुणी बाळं होतो म्हणा... पण तरी वो इंडियावाली मां आणि मेरी मां यात 'मां' शब्दापलीकडं काईच संबंध नई. 

म्हणजे ना टिव्हीवर मॅगीची जाहिरात चालू असते, टिव्हीतली ती मां तिच्या मुलाला हसऱ्या चेहऱ्याने बाऊलभरून मस्त वाफाळलेलं मॅगी आणून देते आणि तेव्हा आमची आई कारल्याची भाजी आम्हाला वाढत असते. वर गर्जना, 'पानातलं सगळं संपवायचं आहे, काही टाकायचं नाहीये.' पुढच्या मिनिटाला टिव्ही बंद, जेवण सुरू. त्या कारल्याच्या भाजीचा पाहिला घास जिभेवर टेकवताना, ' टीव्ही वरचा तो मुलगा कसा रोज मस्त मॅगी खात असेल ना', डोक्यात असले सुग्रास विचार. इतकी unrealistic पद्धतीने उभी केलेली मां टिव्ही वर बघत आम्ही मोठे झालो. त्यामुळं डोक्यात पक्कं बसलं, इतकं गोड़ गोड़ बोलणारी आई फक्त टीव्ही, सिनेमातच असते, रिअल मध्ये, घड्याळाच्या काट्यावर पळत घरातली कामं, ऑफिसतली कामं उरकणारी आणि तिच्या वात्रट पोट्ट्यांना शाब्दिक, झालंच तर पाठीत धपाटे देणारीच आई असते. आता मी आईच्या रोल मध्ये आल्यावर सुद्धा चित्र फारसं काही वेगळं नाही. म्हणजे पक्ष बदलले, पण सूत्र तीच, तशीच अजूनही. ती टिव्ही मधली इंडिया वाली मां प्रत्यक्षात उतरायला काही राजी होईचना. असो. 

शकुंतला देवी सिनेमा बघितला मागच्या महिन्यात. जाम आवडला. सिनेमा एक तर खऱ्या घटनांवर आधारित. वास्तववादी असूनही, 'असं कसं असेल?' असं बऱ्याचदा भासवणारा. सिनेमा बघताना, 'एखादी मुलगी आपल्या आईचा इतका तिरस्कार कसा करेल', असा विचार सारखा डोकावत होता. हा सिनेमा शकुंतला देवी यांच्या आत्मचरित्राला कितीसा धरून आहे हा पूर्णतः वेगळा मुद्दा. पण त्या सिनेमात दाखवलेली आई मला खूप भावली.

आजवरच्या सिनेमात घर आणि करिअर यात आईची होणारी कसरत कायम एका बाजूनेच मांडलेली दिसली आहे. करिअर, ऑफिस, meetings, यामुळं घराकडे, मुलांकडे दुर्लक्ष. मग तिच्याकडून आई म्हणून असलेल्या आणि पूर्ण न होवू शकलेल्या कुटुंबाच्या, मुलांच्या stereotypical अपेक्षा, या सगळ्यामुळं आईच्या मनात guilt चा उभा राहणारा आणि दिवसागणिक वाढत जाणारा डोंगर, मनातली तिची कासाविसता, तगमग... हेच चित्र आजवर बघत आलोय, किंवा तसंच दाखवलंही गेलंय म्हणूयात. शंकुतला देवी सिनेमातली आई मात्र स्वतःच्या मनाला पटेल असे वागणारी. करिअर पुढे नेत मुलीलाही तिच्या पद्धतीने जपणारी, वाढवणारी. एका टप्प्यावर मुली बरोबरच्या quality time साठी करिअर थोडे दिवस बाजूलाही ठेवणारी. पण स्वतःच्याच terms वर आयुष्य जगणारी. सगळंच पटणारं होतं असं नाही म्हणायचंय, पण आई-मुलीच्या नात्याची दोघींच्या वेगवेगळ्या नजरेतून त्यांना एकमेकींना दिसणारी वेगवेगळी प्रतिमा फारच सुंदर मांडली आहे. 

मुलं आईकडे कायम फक्त 'आई ' म्हणूनच पाहत असतात. एक निव्वळ व्यक्ती म्हणूनच्या स्वतंत्र नजरेतून तिच्याकडं तिच्या मुलांना बघता आलं, तर त्या नजरेतला विश्वास तिच्या डोळ्यातून अगदी ओसंडून वाहील यात वादच नाही. आईपणाच्या त्याच त्या ठोकताळ्यात स्वतःचे कितीतरी कोने मुडपून बसण्याचा तिचा स्वतःचाच किती आटापिटा चालू होता, हे तेव्हा तिचं तिलाच उमजेल, आणि मगच स्वतःचं नवं, लक्ख आकाश तिचं तिलाच दिसेल. मोकळा श्वास घ्यायचा बऱ्याच दिवसात राहून गेला होता हे ही जाणवेल. कदाचित. या सगळ्यासाठी खरंतर शकुंतला देवी सिनेमातली ही इंडिया वाली मां, 'तुसी ग्रेट हो जी' असं म्हणावं इतकी भावली... खऱ्या आयुष्यातल्या आईच्या जवळ नेऊन विचार करायला लावणारी वाटली. म्हणजे अगदी rebellious वैगेरे म्हणजे दुष्टों का संहार करनेवाली 'मां काली' टाईप्स पण नाही किंवा पार दयाळू, कनवाळू, कष्टाळू अशी बच्चों के सहारेबिना बेबस, बेसहारा, दुःख की मुरत वैगेरे पण नाही. अपनी real वाली मां...माझी आई. 

बाकी या शो मध्ये इंडिया वाल्या मां चे कोणते dramatic रूप दाखवणार आहेत कोण जाणे. पण नक्कीच शकुंतला देवी सारखी नसणार हे सांगणे नकोच. जशी ती 'संतूर वाली मम्मी' ही एक अंधश्रध्दा आहे तशा शिणेमातल्या बाकी या इंडीयावाल्या मां पण अंधश्रध्दा वैगेरेच की. जाऊदे, फारच फाफट पसारा झाला. तसाही हा शो बघण्याची माझी तिळमात्र शक्यता नाही. त्यामुळं जाऊच दे... ! 

                                                                                                                                   - अश्विनी वैद्य 
                                                                                                                                 10. 9. 20

Sunday 10 May 2020

सुख म्हणजे नक्की काय असतं !


"सुख म्हणजे नक्की काय असतं?  काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं !"

प्रशांत दामले यांचं एका नाटकातलं हे गाणं... बऱ्याचदा सगळ्यांनी ऐकलेलं. सध्या तर बाहेरच्या covid 19 च्या परिस्थिती मुळं हे सुख घर बसल्याच किंवा घरात बसण्यातच कसं शोधायचं आहे हे ही सगळ्यांना जमू लागलंय...! 



पण खरंच, जगात सगळ्या घडामोडी या सुखासाठीच तर चालू असतात की. सुख, आनंद, समाधान हे मिळवण्याचाच तर सगळा आटापिटा. तात्कालिक सुख, दीर्घकाळ टिकणारे सुख. म्हणजे मी खूप वाट बघत असलेला movie Netflix किंवा prime वर आला की मी आनंदी. उठल्यावर बाहेर सुंदर उन पडलेलं दिसलं की मी खूष, खूप दिवसांनी मला गरमागरम आयता वडापाव खायला मिळाला की मी तुफान खूष, हवा तसा job मिळाला की मी अगदी ' आज मैं उपर, असमान नींचे..' वैगेरे टाइप भन्नाटच खूष. मला respect, appreciation मिळालं की मी मनापासून समाधानी, या आणि अशा माझ्या आनंदाच्या रोज बदलणाऱ्या व्याख्या. 

भरपूर लेख, पुस्तकं केवळ या सुखाच्या शोधाच्या निमित्ताने नामांकित मानस शास्त्रज्ञ, लेखक यांच्याकडून लिहिली गेली. बरीच तत्वज्ञाने मांडली गेली. सुखाच्या वेगवेगळ्या व्याख्या वाचायला मिळाल्या. पण तरी, हा आनंद किंवा सुख, हे feeling नक्की काय आहे, त्याची तीव्रता कशावर अवलंबून आहे, ते मोजण्याचे काही तंत्र आहे का? प्रत्येकाची सुखाची परिभाषा खरंच मुळातच वेगळी असते का? या आणि अशा बऱ्याच गोष्टींचा उलगडा सपियेन पुस्तकात शेवटच्या भागात वाचायला मिळाला आणि त्यावरून जे वाटले ते लिहिले आहे. 

1. आधुनिक तंत्रज्ञान आणि नवनवीन शोध ज्यामुळे दैनंदिन जीवन आधीच्या पिढ्यांपेक्षा सुकर आणि सोपे झाले. सुखी झाले. मेडिकल सायन्स, टेक्नॉलॉजी मधली अफाट वाढ यामुळे मृत्युचे प्रमाण ही कमी झाले त्यामुळं माणसं आधीपेक्षा नक्कीच सुखी झाली. पण या शोधांमुळे माणसाचा अंगभूत कल आणि प्रवृत्ती यांच्या संपूर्ण अभिव्यक्तीला वाव मिळणं कमी झालं, आणि त्यामुळं आरामदायी आयुष्य जगता येवूनही सुखाचं मृगजळ लांबच राहिलं आहे असंच वाटतं. 

यात भर म्हणजे, गेली काही दशकांमध्ये नैसर्गिक संपत्तीच्या अनिर्बंध उपभोगामुळे पृथ्वीवरच्या पर्यावरणाचा तोल अनेक नवनव्या प्रकारांनी आपण बिघडवला आहे, ज्याचे भयानक परिणाम भविष्यात नक्कीच भोगावे लागणार आहेत.

2. पैसा सुख देतो' हे एक कुतूहल जनक विधान. अधिक पैसा म्हणजे जास्त सुख. म्हणजे पगार दुप्पट झाला, शेअर्स returns दणकून मिळाले की खूप आनंद. पण यातून मिळणाऱ्या सुखाचा आवेग फार तर महिनाभर टिकतो. नंतर त्याची सवय होते आणि त्यात नावीन्य राहत नाही... थोडक्यात त्या गोष्टीमुळे मिळालेले सुख काही दिवसांनी लोपते. 

3. आरोग्य, आहार आणि संपत्ती या घटकांच्या उपलब्धतेच्या आधारावर सुखाचा विचार केला तर आरोग्यदायी आणि श्रीमंत लोक अधिक सुखी असायला हवे होते पण तसंही होत नाही. 

4. लोकशाहीत राहणारे लोक हुकुमशाहीत राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक सुखी आहेत का? याचेही उत्तर ठामपणे हो किंवा नाही असे देता येईलच असेही नाही. 

5. कुटुंब आणि समाज याचाही सुखावर खूप impact असतो. ज्यांचे त्यांच्या कुटुंबातल्या लोकांशी, समाजातल्या लोकांशी चांगले निखळ संबंध असतात ती माणसं अधिक सुखी राहतात. सामाजिक, नैतिक आणि अध्यात्मिक घटकांचा प्रभावही सुख या संकल्पनेवर असतोच. 

6. सुखी सहजीवन याचाही सुखाच्या मापात भर पडण्यात हातभार असतो. पण याचा अर्थ असा नाही की विवाहामुळे सुख निर्मिती होते. आणि विवाहित लोक एकेकटे राहणाऱ्या लोकांपेक्षा सुखीच असतात असे सरळसोट विधान करणेही दरवेळी बरोबरच ठरेल असे नाही. 
एखाद्या अपंग व्यक्तीला प्रेमळ जोडीदार, जीवाला जीव देणारं कुटुंब, दिलासा देणारा मित्रपरिवार लाभला तर ती व्यक्ती एकलकोंड्या, आरोग्य संपन्न अब्जाधीशा पेक्षा आत्यंतिक सुखाचा अनुभव घेईल यात वादच नाही.

7. सुख हे व्यक्तिनिष्ठ आकांक्षा वर अवलंबून असतं. तसंच इतर लोक आपल्या तुलनेत किती सुखी आहेत यावरही आपलं सुख अवलंबून असतं. इतरांच्या भौतिक स्थितीवर आपण आपल्या आकांक्षा चिकटवतो आणि त्यांच्या सुखाचा अंदाज बांधतो.

जर जगण्याला उद्देश असेल तर कितीही कष्ट आणि ते कसेही सहन करून, अर्थपूर्ण असलेलं जीवन कमालीचं समाधान देणारं असू शकतं. उदा. देशासाठी सीमेवर लढणारे जवान, स्वातंत्र्याच्या ध्येयाने पेटून उठलेले क्रांतिकारी, वेगवेगळे शोध लावणारे शास्त्रज्ञ, astronauts, आदिवासींसाठी काम करणारे doctors, ही त्याचीच उदाहरणे. 

इथे केलेल्या कर्मातून मृत्यूनंतर स्वर्गात मिळणाऱ्या सुखावर ज्यांची श्रद्धा आहे ते लोक ज्यांची अशी श्रद्धा नाही अशा नास्तिक, निधर्मी लोकांपेक्षा नक्कीच सुखी असावेत. कारण मृत्यूनंतर संपूर्ण आणि अर्थहीन अशा विस्मृतीत जाणाऱ्या अस्तित्वाशिवाय दुसऱ्या कशाचीच अपेक्षा ते ठेवू शकत नाहीत. 

जे हवं ते मिळवण्या पेक्षा जे आहे त्यात समाधान मानणं अधिक महत्त्वाचं असल्याचं कवी, तत्ववेत्ते यांनी फार पूर्वीच सांगून ठेवलं आहे. आपल्या साधू संतांनीही म्हटलं आहे ' ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ' सुख म्हणजे, दुःखी क्षणांपेक्षा, आनंदी क्षणांचं अधिक्य. पण पुन्हा व्यक्ती सापेक्षते नुसार कोणते क्षण दुःखी आणि कोणते आनंदी हेही सापेक्षच. 

या सगळ्या वरून सुख कशा कशावर अवलंबून असतं ते लक्षात येतंय, पण आनंद होतो म्हणजे शरीरात नक्की काय होतं,  याचंही शास्त्रीय विश्लेषण जाणून घेणं महत्वाचं आहे. आपलं मानसिक आणि भावनिक जग वेगवेगळ्या रासायनिक घटकांनी नियंत्रित केलं जातं. मज्जा तंतू, neurons, सेरोटीन, डोपामाइन वैगेरे रासायनिक घटकाच्या पातळीवर ते अवलंबून असतं. म्हणजे लॉटरी लागल्यामुळे, घर विकत घेतल्यामुळे, चांगला जॉब मिळाल्यामुळे कुणीही सुखी होत नाही. लोक फक्त एका आणि एकाच गोष्टीनं - शरीराला झालेल्या सुखकारक संवेदनेनं सुखी होतात. खूप आनंदाने एखादी व्यक्ती उडी मारते म्हणजे, त्या व्यक्तीत त्या वेळी तयार झालेल्या हार्मोन्स आणि मेंदूच्या वेगवेगळ्या भागात झालेल्या रासायनिक क्रियांचा तो परिणाम असतो.

आता ही सगळी सुखाच्या संवेदनेनं शरीरात होणारी रासायनिक क्रिया सुखाची एक ठराविक पातळीच कायम राखते. जगण्यासाठी प्रोत्साहन देणं आणि निराश करणं एवढ्या पुरतीच सुख आणि दुःख यांची भूमिका असते. त्यामुळं आपण कायम सुखीच किंवा कायम दुखीच राहणार नाही याची काळजी निसर्गानेच आधी घेतलेली आहे.

आवडीच्या चमचमीत जेवणावर मनसोक्त ताव मारल्या वर मिळणारी तृप्तता जर कायम टिकून राहिली तर आपण परत जेवणारच नाही आणि भुकेने मरून जावू. त्यामुळं त्या तृप्ततेतून मिळणारं समाधान हे थोड्याच काळात संपतं... ते संपणं हेच पुढे जगत राहण्यासाठी गरजेचं आहे, शरीरात नैसर्गिकच तशी व्यवस्था आहे.

मानसिक सुख नियंत्रित करणारी ही शरीरातली रासायनिक व्यवस्था व्यक्ती गणिक भिन्न असते. 1 ते 10 या मापत आनंदाची मोजणी केली तर काही लोक जन्मतःच आनंदी रसायन घेवून जन्माला येतात, त्यांची सुखाची पातळी त्यामुळं 6 ते 10 मध्ये हेलकावे खाते आणि वयोपरत्वे ती 8 वर स्थिरावते. अशा लोकांना job गेला, मोठं नुकसान झालं, आरोग्य ढासळलं तरी ते फारसे दुःखी होत नाहीत. याउलट खिन्न रसायन घेवून जन्माला आलेली व्यक्ती तिला शंभर कोटींची लॉटरी लागली किंवा, दीर्घकालीन आजार अचानक बरा झाला, career मध्ये खूप मोठं काहीतरी अवघड achieve केलं तरी अशी माणसं निराशाच राहतात. सुखाच्या सातव्या पातळीपेक्षा अधिक सुख त्यांना घेताच येत नाही.

याची कितीतरी उदाहरणे आपल्याला कायम आजूबाजूला दिसतात. काहीही झालं तरी काही लोक तुलनेनं कायम अधिकच आनंदी असतात. आणि जगानं, नशिबानं कितीही मेहरबानी केली तरी काही लोक मात्र कायम कुरकुरणारेच असतात. डिफॉल्ट निराश रहण्याकडेच त्यांचा कल अधिक असतो. 

मातीच्या सध्या घरात राहणारी व्यक्ती आणि आलिशान बंगल्यात राहणारी व्यक्ती यांच्या सुखाची तुलना केली तर मातीचं घर किंवा आलिशान बंगला त्या व्यक्तींची मनस्थिती ठरवू शकत नाहीत पण त्यांच्या मेंदूत स्त्रवणारे सेरोटोनीन मात्र त्यांची मनस्थिती ठरवू शकते.  म्हणजे स्वतःच्या हक्काचे मातीचे घर बांधून झाल्यावर त्या व्यक्तीच्या मेंदूत जेवढं सेरोटोनीन स्त्रवायला लागलं तितकंच दुसऱ्या व्यक्तीचा स्वतःचा बंगला बांधून पूर्ण झाल्यावर त्याच्या मेंदूत स्त्रवलं. त्यामुळं दोघांच्याही आनंदाची पातळी 10 च म्हणजे समानच झाली. त्यांना एकाच मापाचे सुख मिळाले. 

थोडक्यात काय तर, पैसा, सामजिक प्रतिष्ठा, घर, गाडी, सत्तेचे पद, वाहव्वा, यापैकी कोणतीही गोष्ट सुख देत नाही तर मेंदूत स्त्रवणारं सेरोटनिन, डोपामाइन, ऑक्झीटोसिन मुळं सुख निर्मिती होते. या सगळ्या सायंटिफिक विश्लेषणा वरून एक गोष्ट रुढार्थाने खरी जाणवली जी गोष्ट आपले साधू संतही अनेक वर्ष सांगत आले आहेत ती ही की, ' सुखाची सुरुवात आपल्या आतूनच होते ' 

Sapiens पुस्तकात, सुखाबाबत विवेचन करताना बौद्ध धर्मात सुखप्राप्ती बद्दल जे तत्वज्ञान सांगितले आहे ते वाचणे खूप कुतूहल जनक वाटले. समुद्रात तयार होणाऱ्या लाटांप्रमाणेच मनात तयार होणाऱ्या संवेदना असतात, पाच मिनिटांपूर्वी आपल्याला आनंदी आणि ध्येयनिष्ठ वाटत असतं आणि पाच मिनिटानंतर दुःखी, निराश वाटायला लागतं. बौध्द धर्माच्या मते, वेदना, नैराश्य किंवा अर्थहीनता हे दुःखा चं मूळ नाही तर त्या सुखाच्या क्षणिक संवेदनांचा कधीही न संपणारा अर्थशून्य पाठलाग हे दुःखाचं मूळ कारण आहे. या पाठलागा मुळे मन कधीच समाधानी राहत नाही. मला हे वाचताना आईने लहानपणी सांगितलेले एक उदाहरण आठवले, ' आपल्याला घरातून निघताना गाडी पकडायची असते, तेव्हा घरातून निघताना पहिली अपेक्षा गाडी मिळावी इतकीशीच, मग गाडी मिळते, मग बसायला किमान जागा मिळावी ही अपेक्षा, मग ती ही मिळाल्यावर, जरा खिडकी शेजारची मिळाली तर किती बरं होईल ही अपेक्षा...!' असा तो अपेक्षांचा थोडक्यात सुखाच्या संवेदनेचा पाठलाग संपतच नाही. आपल्या भावनांना आपण जितकं जास्त महत्त्व देतो तितक्या उत्कटतेने आपण सुखाचा पाठलाग करतो, आणि अधिक दुःखी होतो. सुखाचा पाठलाग म्हणजे विशिष्ट भवानिक स्थितीचा पाठलाग. पण जेव्हा हा पाठलाग थांबतो तेव्हा मन समाधानी असतं. मग अशा वेळी, आनंद, राग, कंटाळा, वासना निर्माण होतात आणि लोपतात. त्या संवेदना आहेत तशा स्विकारल्या जातात, ' काय झालं असतं, या कल्पनाविश्वात मन रमत नाही. त्यामुळे सुखाच्या संवेदनेचा पाठलाग होत नाही. यातून मिळणारी शांतता कमालीची गाढ असते.

बौद्ध धर्मात सांगितलेले हे सुखाबाबतचे तत्वज्ञान मला आपल्या काही मनाच्या शलोकांमध्येही सांगितले आहे असे वाटले. लहानपणी ऐकताना ते नीटसे कळत नव्हते पण आता माझ्याच मुलांना ऐकवताना त्याचे अर्थ नव्याने स्पष्ट होत आहेत. असो, स्थितप्रज्ञता ही फेज त्या आंतरिक शांततेहून काही वेगळी असेल का? आणि ती मिळवण्यासाठी मनाला trained कसे करायचे हे सांगणारे मार्ग अध्यात्म, ध्यान धारणा आणि योग साधना वैगेरे गोष्टींकडे नेणारे असावेत कदाचित.
 
या सगळ्या सुखा बाबतच्या विश्लेषणावरून, गदिमांची ' सुख' ही कविता इथे नक्कीच अर्थपूर्ण वाटते, एक छोटंसं कुत्र्यांचं पिल्लू आणि वयस्कर कुत्रा यांच्यातला संवाद म्हणजे गदिमांची ' सुख ' ही कविता.


एका वटवृक्षाखाली बसुनिया दोन श्वान
एकमेकांना सांगती अनुभव आणि ज्ञान;

एक वये वाढलेले, एक पिलू चिमुकले,
वृद्ध-बालकात होते काही भाषण चालले।

"कोणाठाई सापडले तुला जीवनात सुख?"
वृद्ध बालका विचारी त्याचे चाटुनिया मुख ।

"मला वाटते, आजोबा, सुख माझ्या शेपटात,
सदाचाच झटतो मी त्यास धराया मुखात ;

माझ्या जवळी असून, नाही मज गवसत,
उगाचंच राहतो मी माझ्या भोवती फिरत"

अजाणत्या बालकाची सौख्य कल्पना ऐकून,
क्षणभरी वृद्ध श्वान बसे लोचन मिटून ;

"कोण्याठायी आढळले तुम्हा जीवनात सुख?
तुम्ही वयाने वडील, श्वान संघाचे नायक"

बाल श्वानाच्या प्रश्नाला देई जाणता उत्तर,
"तुझे बोलणे बालका, बिनचूक बरोबर;

परी शहाण्या श्वानाने लागू नये सुखापाठी,
आत्मप्रदक्षिणा येते त्याचे कपाळी शेवटी;

घास तुकडा शोधावा वास घेत जागोजाग….
पुढे पुढे चालताना पुच्छ येते मागोमाग…! "



अश्विनी वैद्य
10.05.20


Wednesday 22 April 2020

रिपब्लिक ऑफ आयर्लंड


डाव्या बाजूला अथांग निळाशार अटलांटिक महासागर, उजव्या बाजूला उंच उंच डोंगर आणि त्या दरी खोऱ्यांना सजवणारे  नागमोडी रस्ते....हा असा संपूच नये असं वाटाणारा अतिशय सुरेख ड्राईव्ह...!



निसर्गाची मुक्त हस्ते उधळण केलेला रिपब्लिक ऑफ आयर्लंड चा हा दक्षिणेकडचा अतिशय सुंदर भाग. त्यात आम्हाला sunny weather आणि 20 डिग्री तापमान असा निसर्गाचा वरदहस्त सलग तीन दिवस लाभल्याने तर हे इथलं निसर्ग सौंदर्य अजूनच उजळून गेलेलं, फुललेलं दिसत होतं. 

डोळ्यांनी टिपू, कानांनी अनुभवू की स्पर्शाने जाणवून घेवू, किती आणि कसं घेऊ म्हणजे मन भरेल असं इथे येणाऱ्या प्रत्येकाला होईल, इतका हा भाग मोहक आहे. इथे घालवलेल्या पाच दिवसांत आम्हाला इंग्लंडहून आलेले आमच्यासारखे इतर कोणीही भेटले नाही, जे भेटले ते ऑस्ट्रिया, जर्मनी, फ्रांस, पोर्तुगाल, मेक्सिको आणि अमेरिका इथले टुरिस्ट होते. 

1922 साली इंग्लंड पासून स्वतंत्र झालेल्या आणि (इंग्लंड पासून) अगदीच हाकेच्या अंतरावर असलेल्या या देशात कधी येणे झालेच तर नक्की आणि आवर्जून बघावीत अशी आम्ही पाहिलेली south ऑफ आयर्लन्ड मधली ही सुंदर ठिकाणे. 

लंडनहून डब्लिन ला पोचल्यावर एक दिवस तिथल्या गजबजलेल्या शहरी वातावरणात घालवून पुढचे चारही दिवस समुद्राच्या अथांग लाटांच्या सानिध्यात घालवण्याच्या हेतूने डब्लिन पासून जवळपास 350 किलोमीटर वर दक्षिणेकडे असणाऱ्या रिंग ऑफ केरी च्या दिशेने पुढचा प्रवास कारने सुरु केला, तो ज्या वाटेने केला त्याचा हा थोडा आढावा.

वाटेत Killarney नॅशनल पार्क मध्ये थांबलो. तिथे जेव्हा पोचलो तेव्हा अंगावर येणारी थंडगार पावसाची झिरझीर टिपत आणि धबधब्याच्या कोसळण्याचा आवाज कानभर वेचत चालत जात होतो. ओल्याशार, हिरव्या गच्च जंगलातून जाणारी पायवाट वर कुठपर्यंत नेईल हा विचारच डोक्यात येऊ नये, रस्ता संपूच नये असं वाटत होतं. मग दोन तीन तास त्या सुंदर हिरवाईत घालवून नंतर तिथल्याच जवळच्या गावात मुक्काम केला. 






Killarney चा Torc waterfall आणि तिथलं पन्नास घरांचं इटुकलं, छोटुसं गाव मनात साठवून दुसऱ्या दिवशी Muckross House आणि Muckross Abby हे हिरव्यागार कुरणातून मस्त टांग्यात बसून पाहिले. रिंग ऑफ केरी च्या जंगलातून जाणाऱ्या या patch वर वाटेत येणाऱ्या Ross castle आणि मग गॅप ऑफ Dunloe या दोन ठिकाणी थांबलो. Trekking ची राहिलेली हौस गॅप ऑफ Dunloe ला पूर्ण करून मग Glenbeigh ला पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी निघालो.


येता पाऊस पाहुणा आलं हिरवं उधाण 
डोंगरातून फुटलं हिरवळीचं धरण...! 



वाटेत येणारा Rossbeigh beach ही खूप सुंदर आहे. समुद्राच्या पाण्यातून परावर्तीत होणारी सूर्याची तिरकी किरणे, आकाशातील ढगांची नक्षी आणि लाटांचा आवाज या सुरेख बॅकग्राऊंड वर दिसणारं निळंशार क्षितिज... अशा मधाळ हवेत ती संध्याकाळ तिथेच संपवून दुसऱ्या दिवशी Skellig रिंग वर असणारी famous Irish चॉकोलेट फॅक्टरी Skelligs ही पाहण्यासाठी त्या दिशेने निघालो.


निळ्या चांदण्याने निळ्या चंदनाची
भिजेना परी ही निळी पालखी...!

इथले सगळेच ड्राईव्ह फारच सुरेख आहेत...हा ही ड्राईव्ह फार वेड लावणारा होता. तिथे पोचल्यावर निळ्या अटलांटिक महासागरात दिसणारे लख्ख उन्हात चमकणारे Skellig island आणि Valentia island वरचे cliffs पाहून Valentia island च्या दिशेने निघालो. हा संपूर्ण दरी खोऱ्यातून, हिरव्या कुरणातून जाणारा रस्ता म्हणजे अगदी क्लासिक असा ड्राईव्ह आहे. 


पुढे Portmagee या गावातून Valentia Island वर असणाऱ्या Bray head cliffs वर पोचलो, तिथे छोटे छोटे एक दोन ट्रेक करत पुढे Geokaun mountain मधल्या  Fogher cliffs ला गेलो.... इथून दिसणाऱ्या या cliffs चे वर्णन शब्दात करावे तरी किती आणि कसे इतका सुरेख देखावा. आणि मग इथून Dingle या आमच्या पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी निघालो, ज्या साठी परत या पूर्ण island ला वळसा घालून बाजूने असणाऱ्या डोंगरातून जायचे होते. Valentia island वरुन 120 km वर असणाऱ्या Dingle ला निघालो आणि पुन्हा वाटेत Inch बीच वर थांबलो. 


किती खोल आणि किती ओल वक्षी,  तुझा सूर्य आणि तुझे चांदणे?
प्राणातले ऊन प्राणात गेले तुझ्या सागराची निळी तोरणे...!


तिथले local फ्रेश fish खाऊन आणि आयरिश कॉफी चा मस्त आस्वाद घेऊन रात्री आठच्या उन्हात समुद्रभोवतालहून जाणारा Dingle Peninsula चा R559 (Slea head) scenic ड्राईव्ह म्हणजे गेल्या चार दिवसातल्या ट्रिप मधला cherry on top होता. सगळंच अप्रतिम आणि केवळ सुरेख. आणखी एक रम्य संध्याकाळ आयर्लंडच्या या शांत थंड हवेत घालवली. 


निळे घाटमाथे निळ्या राउळांचे
निळाईत माझी भिजे पापणी

एक मागून एक अशा गेल्या चार दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवून आता रात्री झोपताना दिसायला लागली, ती उद्याची परत बॅक to Dublin airport कडे जायला लावणारी नको नको वाटणारी जड झालेली पावले... ही संध्याकाळ संपूच नये असे झाले. 


निळ्याशार मंदार पाउलवाटा
धुक्याची निळी भूल लागे कुणा?

प्रत्येक ठिकाणी वाटेत थांबून कॅमेराशी खेळत राहण्याची माझी दांडगी हौस या ट्रिप मध्येही पुरेपूर भागवून घेतली. निसर्गाला एवढ्याशा फ्रेम मध्ये बांधण्याची कल्पना किती छोटी आहे हे तो निसर्ग अनुभवतानाच जाणवते. 
तरीही, 'picture is worth a thousand words' म्हणून जे काही क्षण टिपण्याचा प्रयत्न केला तो इथे share केला आहे.  


-- अश्विनी वैद्य
 २६. ०६. १९



टीप  :  फोटो खाली लिहिलेल्या ओळी कवी ग्रेस यांच्या निळाई या कवितेतील आणि काही कवी नलेश पाटील यांच्या आहेत.  

Monday 30 March 2020

अर्थकारण जाणून घेताना...!


सध्याच्या करोनाच्या quarentine परिस्थिती मध्ये social distancing पाळण्याची जबाबदारी पार पाडताना social मीडियाशी आपलं distancing मात्र खूप कमी आपोआपच झालं. 
सक्तीने घरात बसून बराच रिकामा वेळ मिळायला लागला तेव्हा हे डिस्टंसिन्ग अजूनच कमी झालं... माझं तरी नक्कीच झालं. जगात कुठे जरा खुट्ट वाजलं की पुढच्या क्षणाला व्हाट्सएप वर टुंग आवाज येतो नोटिफिकेशन चा... त्या मेसेजची विश्वासार्हता वैगेरे गोष्टी हा वेगळा मुद्दा आहे, पण हे distancing कमी झालंय हे जास्तच जाणवायला लागलं. या कोरोनाच्या भयावह परिस्थिती निमित्ताने बरेच लेख वाचायला मिळाले, बऱ्याच देशांमध्ये lockdown जाहीर झाल्याने जागतिक अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामावर पण प्रसारमाध्यमांतून भरपूर काही ऐकायला वाचायला मिळालं. या कोरोनाच्या लढयापुढे विकसित देशांची ज्यांची लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येपुढे अगदीच काहीशी आहे अशा इंग्लंड, जर्मनी, स्पेन सारख्या देशातही अपुऱ्या सुविधांमुळे, वेळीच सतर्क न झाल्यामुळे व्यवस्था कोलमडून गेल्यात जमा झाली. तिथे आपल्या भारतासारख्या विकसनशील देशाची व्यवस्था कशा पद्धतीने उभी राहील, एकूण देशाची आजवरची आर्थिक रचना कशी होती हे समजून  घ्यावे वाटले. 


कोरोनाच्या या परिस्थितीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत झालेला एकूण परिणाम बघता आणि भारतासारखा इतका विशाल देश जिथे पूर्वी सोन्याचा धूर निघत होता हे केवळ ऐकत आपण मोठे झालो तो, संस्कार, परंपरा आणि संस्कृती यांनी प्रचंड समृद्ध असलेला आपला देश कायम विकसनशील अवस्थेतच का अडकलेला राहिला, असे बाळबोध प्रश्न मला पडले. सगळ्याच्या मागे अर्थकारणच असते म्हणून मग त्या अर्थकारणावर अगदी बेसिक तरी माहिती शोधण्याचा प्रयत्न केला. ज्या जागतिक अर्थव्यवस्थेचा आपण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रित्या भाग आहोत त्याची किमान ओळख असण्याबद्दल पण आपली प्रचंड उदासीनता असते त्या आधारावर आपल्या देशाचे पर्यायाने जगाचे अर्थकारण नक्की काय असते, त्या मागची भूमिका, त्याचा इतिहास, त्यातले संदर्भ हा भाग जो इतकी वर्ष माझ्यासाठी पारच दुर्मुखलेला होता त्याच्याकडे नीट समजून घेण्याच्या दृष्टीने माहिती शोधायला सुरुवात केली. त्यातील मला मिळत गेलेल्या माहितीतून मला सापडलेले संदर्भ आणि महत्वाचे वाटलेले काही मुद्दे इथे मांडत आहे. 

पैसे हे देवघेव करण्याचं वैश्विक माध्यम आहे. त्यामुळं सर्वात आधी चलन म्हणजे काय, त्याची किंमत नक्की कशाच्या आधारावर ठरते, कोणत्या देशाने त्यांचे किती चलन छापायचे हे कसे ठरते.. हे पुन्हा नीट समजून घेतेले. या अनुषंगाने नुकत्याच वाचलेल्या sapiens पुस्तकातले काही मुद्देही आधाराला आले. 'पैसे म्हणजे नाणी किंवा नोटा नव्हेत. वस्तूंची किंवा सेवांची देवघेव करण्याच्या हेतूने इतर वस्तूंची किंमत पद्धतशीर रित्या ठरवून ती चलन म्हणून वापरली जाते. नाण्यांचा शोध लागण्यापूर्वी शंख, शिंपले, मणी, कवड्या वैगेरे गोष्टी चलन म्हणून वापरल्या जात होत्या. नंतर नाणं म्हणजे ठसा उमटवलेला धातूचा तुकडा याचा वापर चालू झाला.. भारतातल्या राज्यकर्त्यांनी स्वतःची नाणी पाडली. मुस्लिम व्यापारी आणि युरोपीय व्यापारी यांनी नाणे व्यवस्था जगाच्या कानाकोपऱ्यात पसरवली. 


आजचे प्रचलित चलन नोटा आणि नाणी. सेपियन्स पुस्तकात आलेल्या संदर्भानुसार सध्या जगातला एकूण पैसा साठ ट्रिलियन डॉलर इतका आहे. पण तरीही नाण्यांची आणि नोटांची संख्या ही सहा ट्रिलियन डॉलर पेक्षा कमी आहे. एकूण पैशाच्या ९० टक्के पैसा हा फक्त इलेक्ट्रॉनिक रूपात कॉम्पुटर सर्वर वरच अस्तित्वात आहे. पैसा म्हणजे भौतिक वास्तव नाही ती एक मानसिक रचना आहे, जेव्हा सामायिक कल्पनाशक्तीवर लोकांचा विश्वास असतो तेव्हाच पैसा ही संकल्पना यशस्वी होऊ शकते. टांकसाळीतून बाहेर पडणाऱ्या सर्व प्रकारच्या पैशासाठी 'विश्वास' हा कच्चा माल असतो, त्यामुळे दोन अपरिचित व्यक्तींमध्येही चलनावरच्या विश्वासामुळे व्यापार होणे शक्य होते. 


पूर्वी एखाद्या देशाने किती चलन छापायचे हे त्यांच्याकडे असलेल्या सोन्याच्या साठ्यावरून ठरायचे, पण १९३० साली जी पहिली आर्थिक मंदी आली तेव्हा हे गोल्ड स्टँडर्ड बाजूला पडले. त्यानंतर कोणताही देश त्याच्या गरजेच्या प्रमाणात चलन छापू शकतो, पण याचा अर्थ असा नाही की देशाची गरिबी दूर करण्यासाठी कितीही नोटा छापू शकतो. एखाद्या देशाने त्यांचे चलन गरजेपेक्षा जास्त छापले तर त्या देशात inflation वेड्यासारखे वाढते, लोकांना तीच गोष्ट विकत घेण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात, आणि चलनाची किंमत कमी होते. यासाठी साधारण ठोकताळा असा की, विकसित देशातील सेंट्रल बॅंक त्यांच्या देशाच्या एकूण GDP च्या २ ते ३ टक्के चलन छापतात आणि भारतासारखे विकसनशील देश त्यापेक्षा थोडे जास्त छापतात. 


या चलनाच्या उगम आणि प्राथमिक माहिती नंतर त्याच्या मूल्यांकनाबद्दल माहिती पहिली त्यानिमित्ताने शिवाजी महाराजांच्या काळातील एक किस्सा, या संदर्भाने आला. एकदा शिवाजी महाराजांना इंग्रजांचं देणं रोखीत द्यावं लागणार होतं, तेवढी रोख तेव्हा त्यांच्याकडे नव्हती म्हणून मग ती चांदीच्या रूपात देण्याचे ठरले, त्यावेळी महाराजांनी २४ तासात त्या भागातल्या चांदीच्या किमती जवळपास दुपटीने वाढवल्या. हे स्वराज्याचे कार्य होते, पण अशा पद्धतीने चलनाची किंमत ही manipulate करता येते, हा दुर्लक्षिलेला इतिहास त्यांच्या लढायांइतकाच आपल्याला माहित असणे किती महत्वाचे होते, पण ते झाले नाही. असो. 

लोकसत्ताचे संपादक, गिरीश कुबेर यांनी त्यांच्या वेगवेगळ्या भाषणांमधून मांडलेल्या मुद्दयंमध्ये खालील विचार ऐकायला मिळाले.  हे मुद्दे तपशीलवार माहिती आधारे असल्याने त्याची विश्वासार्हता निःसंशय आहे.

महाराष्ट्राच्या भूमीत आणखी दोन व्यक्तींनी मांडलेले अर्थकारण विषयक विचार ही इतिहासाकडून तितकेसे प्रकाशात आले नाही. ते म्हणजे, लोकमान्य टिळक आणि बाबासाहेब आंबेडकर. १८७६ साली दादाभाई नौरोजी यांनी सर्वप्रथम भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल लिहिले. त्या आधी या विषयावर भारताबाबत कोणीही लिहिले नव्हते. १८९२ साली टिळकांनी केसरी मधून चलन यावर सर्वप्रथम लिहायला सुरुवात केली. चलनाचं मूल्यांकन कसं ठरतं, काहीच घडलं नाही तरी पौंड आणि रुपये हा दर कसा काय बदलतो. या सगळ्याचे अभ्यासपूर्ण लेख त्यांनी त्या काळी देश पारतंत्र्यात असताना केसरीतून लिहिले. चलनाचं महत्व जाणलं आणि लोकांना ते पटवण्याचा पोटतिडकीने प्रयत्न केला. टिळकांनी त्यावेळी मांडलेले एक वाक्य 'जर्मन हा महासत्ता होण्याचे मूळ त्यांच्या लघु उद्योगात आहे ' या आणि अशा अर्थजाणिवा, त्या काळी जेव्हा कोणतीही माहितीची नीटशी साधने उपलब्ध नव्हती अशा काळी त्यांची अर्थव्यवस्थे बाबत असलेली  दूरदृष्टी ही बाब खूप अतुलनीय आहे. 


त्याच दरम्यान महादेव गोविंद रानडे (उंच माझा झोका मालिकेतून ज्यांचे चरित्र दाखवण्यात आले ते) यांची चलन आणि अर्थकारण या संदर्भात चार मोठी व्याख्याने पुण्यात झाली. टिळकांनी शेतीविषयकही अर्थविचार मांडले. ते भारतातले पहिले ऍग्रो इकॉनॉमिस्ट होते. आणि त्यानंतर डॉ. आंबेडकर. 'भारतात जर शेतीची प्रगती साधायची असेल तर औद्योगिकरणास पर्याय नाही' हा आंबेडकरांचा विचार आजही आपल्या देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी लागू पडतो. इंग्लंडमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये अर्थविषयक शिक्षण घेत असताना त्यांनी एलएलबी बरोबरच आणखीही इतर पदव्या संपादन केल्या आणि १९२० पर्यंत त्यांचे अर्थविषयक विचार अतिशय प्रगल्भ झालेले होते. त्यामुळे टिळकांचे चलनविषयक विचार आंबेडकरांनी प्रचंड ताकदीने इंग्लंडमध्ये असताना मांडले कि त्याच्या आधारे इंग्लंड सरकारला भारतीय चलनाचे मूल्य ठरवण्यासाठी एक आयोग नेमावा लागला त्या आयोगातून एका संस्थेचा जन्म झाला तिचं नाव रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. 


दुसऱ्या महायुद्धांनंतर Bretton Woods ला एक परिषद भरली, जगातील महत्वाच्या देशांचे प्रमुख त्या परिषदेमध्ये जमले होते. त्या परिषदेतून दोन संस्था जन्माला आल्या, एक म्हणजे जागतिक बँक (वर्ल्ड बँक) आणि दुसरी IMF (इंटरनॅशनल मॉनिटरी फंड). त्यातल्या वर्ल्ड बँकेचे तेव्हा पासूनचे आजवरचे सगळे प्रमुख हे केवळ अमेरिकी आणि IMF चे सगळे प्रमुख हे युरोपीयच आहेत. हा त्या संस्थांचा एक अलिखित नियमच आहे. त्या परिषदेत आणखी एक निर्णय घेतला गेला तो असा कि, जागतिक चलन हे डॉलर्स च असेल. म्हणजे जगातील कोणतेही दोन देश ज्यांचे चलन डॉलर नाही हे एकमेकांशी कोणताही आर्थिक व्यवहार करतात तेव्हा तो डॉलर मध्येच होतो. आणि डॉलर वर ते जागतिक चलन असूनही ते छापण्यावर अधिकार केवळ अमेरिकेचाच. इतर कोणत्याही देशाला तो नाही. जेव्हा एखाद्या देशाकडे चलन जास्त होतं तेव्हा तो देश डॉलर खरेदी करून तो ठेवून देतो आणि जेव्हा चलन कमी पडतं तेव्हा तो डॉलर विकून बाजारपेठेतून पैसा उभा करतो. या असमान व्यवस्थेचा परिणाम असा होतो कि, काही झालं तरी डॉलरचेच भले होते, काही नाही झाले तरी डॉलरचेच भले होते. या सगळ्यामुळे अमेरिकेला जागतिक बाजारपेठेवर कायम नियंत्रण ठेवता येते. थोडक्यात काहीही झालं तरी फायदा अमेरिकेचाच होतो. मग या अमेरिकी अर्थव्यवस्थेवर संताप व्यक्त करण्याच्या हेतूने दहशतवाद उदयास आला. जे देश अमेरिकेला भिडले त्या सगळ्या देशांना दहशतवादाचा फटका बसला. 


जगात आजवर झालेली धार्मिक युद्ध/ बंड यामागची कारणं ही केवळ अर्थकारणाशी निगडीतच होती. कम्युनिझमला आळा बसवायचा असेल तर आपण इस्लाम ला उत्तेजन द्यायला हवं हे अमेरिकेच्या कागदोपत्री मांडलेलं तत्वज्ञान आहे. सौदी अरेबियाचा सुन्नी प्रभाव रोखण्यासाठी शिया पंथीयांना आपण मदत करायला हवी, ही अमेरिकेची धारणा होती, दहशतवाद हे आंतरराष्ट्रीय व्यापार युद्धाचं बायप्रोडक्ट असतं, त्यातूनच त्यानंतर तालिबान जन्माला आला. आणि त्यानंतरचा सगळा गोंधळ आपल्याला न्यूज मधून समजत होताच. हे सगळे धागे एकमेकांशी अर्थकारणाच्या आधारावर जागतिक पातळीवर एकमेकांशी कसे जोडले गेलेले असतात हे वाचणं खूप रोमांचकारी वाटलं. 



या सगळ्या अर्थविषयक विवेचनांनंतर विज्ञान, अर्थकारण आणि संस्कृती यांचा एकमेकांशी संबंध आहे का? याबद्दलचे गिरीश कुबेर यांचेच विचार ऐकले. त्यांनी मांडलेली मते ही अशी. 
सुबत्ता आणि विज्ञानवाद हे एकमेकांशी संबंधित नाहीत. सुबत्ता महत्वाची आहेच. सुबत्ता आहे म्हणून विज्ञानवाद नाही किंवा विज्ञानवाद आहे मग सुबत्ता नाही.. असा परस्पर संबंध लावणं पूर्णतः चुकीचं आहे.

भारतीय मानसिकतेचं नुकसान या दारिद्र्याच्या प्रचंड उदात्तीकरणामुळे झाले आहे... साधी राहणी उच्च विचारसरणी याचं थोतांडी कौतुक भारतात होतं ते बदलायला हवं, ते बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये विज्ञानवाद नक्की मदत करू शकतो. आणि यातूनच भौतिक प्रगती साधता येऊ शकते. 


पण ती भौतिक प्रगती साधण्याचे महत्व भारतीयांच्या लक्षात आलेले नाहीये. भारतीयांची निम्मी शक्ती मेल्यानंतर स्वर्गात मिळणाऱ्या जागेसाठी आत्ता इथे काय करता येईल यातच खर्च होते...! प्रत्येक गोष्टीला भावनेच्या तराजूत तोलून त्याला धर्म आणि संस्कृतीची मखमली शाल पांघरत ती मिरवणे यातच खर्च होते. विज्ञानाच्या तत्वांवर तपासून पाहणे गरजेचे मानले जात नाही. 
विज्ञानवाद हा भौतिक वादाशीच कायम संबंधित असतो. तो केवळ विज्ञानवाद कधीच नसतो, तो भौतिक जगण्याला श्रीमंती, दिशा देत असतो. त्यामुळे भौतिक जगण्याला, आयुष्याला जर आपण कमी लेखत गेलो तर विज्ञानवाद हा मागेच पडतो. म्हणून विकास करण्यासाठी विज्ञानवादाची कास धरणे महत्वाचे आहे. भारतीय परंपरांचे जे आपण अति उदात्तीकरण करत असतो ते काही अंशी ठीक आहे पण ते विकासाला पुढच्या टप्प्यावर नेण्याच्या प्रयत्नाला अडथळा निर्माण करते आणि तेव्हा मात्र आपण देश म्हणून मागे पडतो. 


आर्थिक सुबत्ता आणि संस्कृती यातला संबंध :
संस्कृती टिकते ती आर्थिक सुबत्ता असते तेव्हाच. हे इतिहासापासून सिद्ध होत आलंय. आजवर ज्या काही संस्कृती लयाला गेल्या त्या केवळ त्याचं आर्थिक पाठबळ, सुबत्ता संपल्याने लयाला गेल्या. रोमन साम्राज्याचा विकास तेव्हा झाला जेव्हा पोप हा राजा होता, पाली भाषा किंवा पाली संस्कृती लयाला गेली ती ही भाषा बोलणारे लोक कमी झाले म्हणून नाही तर त्याचं आर्थिक पाठबळ/ताकद संपली म्हणून. हेच आणखी एका सध्याच्या उदाहरणावरून जास्त स्पष्ट होते ते असे कि, अमेरिकन इंग्लिश चा प्रभाव ब्रिटिश इंग्लिश पेक्षा जगात सगळीकडे जास्त आहे ते ती भाषा लोकांना आवडते म्हणून नाही तर अमेरिकन अर्थव्यवस्था प्रचंड ताकदीने मागे उभी आहे म्हणून. 


विज्ञानवाद हा कुठल्याही राज्यसंस्कृतिक (साम्यवाद, हिंदुत्ववाद) वादांना कधीच नको असतो. कारण विज्ञानवाद हा कायम प्रश्न विचारतो. सोळाव्या शतकात होऊन गेलेल्या शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त मिरवण्यापुरता आपल्याला हवा, त्यांचे किल्ले आपल्याला जपता आले नाहीत, त्यांची मूल्ये आत्मसात करता आली नाहीत... आणि तेच त्यांच्या आधी १६११ साली मरून गेलेल्या शेक्सपिअर ची हस्तलिखितं मात्र इकडच्या पाश्चात्य संस्कृतीने जपून ठेवली, अभ्यासली आणि अजरामर केली. 

आपल्या संस्कृतीमध्ये आपण प्रश्न विचारायला घाबरतो. (घरात मुलांनी विचारलेले प्रश्न, ऑफिस मध्ये कनिष्ठांनी विचारलेले प्रश्न) त्यामुळे प्रश्नांना घाबरणाऱ्या संस्कृतीमध्ये विज्ञानाचा प्रसार कधीही होऊ शकत नाही. दोन शब्दात आपली संस्कृती काय असे सांगायचे झाले तर 'गप्प बसा' हे समर्पक उत्तर आहे. इतका संस्कृतीचा सगळा भोंगळ कारभार आपल्याकडे आहे. नेमकेपणाची विचारांना सवय असली कि विज्ञानाचा प्रसार होतो. याचे एक उत्तम उदाहरण गिरीश कुबेर यांनी झाकीर हुसेन यांची मुलाखत घेतली तेव्हाचं सांगितलं आहे. शास्त्रीय रागांचं प्रमाणीकरण करण्याबाबतच्या प्रयोगावर काम करत असताना झाकीर हुसेन यांचा अनुभव, झाकीर हुसेन भारतीय विद्यार्थ्यांना सहज सांगू शकतात, कि दरबारी कानड्यामध्ये कोमल गंधार लावा, ते लगेच लावतात, गुरूने सांगितलंय त्या पद्धतीने लावतात पण तेच जर अमेरिकन विद्यार्थी कोमल गंधार म्हणजे किती frequency असं विचारतो. त्याचं नेमकं उत्तर द्यावं लागतं. ते येत नाही. कोमल गंधार जर आपल्याला नेमक्या व्याख्येत बसवता येत नाही मग आपण हे ज्ञान पुढच्या टप्प्यावर नेणार कसे. आणि या सगळ्यावर आपण संस्कृती, परंपरा याच्या उदात्तीकरणाची झूल टाकतो.

दैनंदिन प्रश्नांच्या अनुषंगाने आपण आपली मनोभूमिका बदलत नाही, प्रश्न हे जगण्याचा भाग होत नाहीत, भावनेच्या आधारापेक्षा बुद्धीप्रामाण्यवादाने जगण्याची गरज देशाला विकासाच्या नवीन टप्प्यावर नेते. आणि या सगळ्या अनास्थेमुळे सगळ्यात जास्त अर्थांधळे नागरिक हे भारतात आहेत... त्यांच्या धर्म विषयक, संस्कृती विषयक जाणिवा अगदी पोटतिडकीने असतात पण अर्थविषयक जाणिवा अजिबात प्रगल्भ नाहीयेत. त्या जोवर अशक्त आहेत तोवर आर्थिक विकास सशक्त होणं अवघड.

हे सगळं इथे मांडण्या मागे एकच कारण होतं, की आपल्या देशाची, समाजाची अर्थव्यवस्था हा भाग शाळेत असताना इतक्या अनास्थेने केवळ मार्क्स मिळवण्याच्या ओढीने पाठ केला पण आपल्याला तो नीट समजून किंवा समजावून सांगण्यात नाही आला आणि त्यामुळे जी अर्थव्यवस्था रोजच्या आत्ता जगण्याचा भाग आहे ती नीटशी जाणून घेणे कायमच दुर्लक्षिले गेले. म्हणून तिच्याकडे नव्याने नजर टाकावी वाटली. 

टीप:
इथे सांगितलेल्या माहितीबद्दल तुमच्या प्रतिक्रिया वाचायला मला जास्त आवडेल, जेणेकरून मला त्यातून नव्याने काही कळेल. तेव्हा आवर्जून नक्की प्रतिक्रिया कळवा. 


--- अश्विनी वैद्य 
२९.०३. २०  

Saturday 21 March 2020

पत्रवेळा



जी एंची पत्रवेळा उघडलं आज दुपारी असच... कवी ग्रेस यांना ज एंनी लिहिलेली पत्रे यात आहेत. खूप खूप कमी वाचलं आहे मी जीएंनी लिहिलेलं, तेही कोणी असच सुचवलं म्हणून. 
काजळमाया, पिंगळावेळ, सांजशकून यातल्या कथा...पण पुढे आणखी वाचत नाही राहू शकले. त्यांनी लिहिलेलं वाचण्याची ताकद आणि समज इतकी स्वस्त, सहज जिकडे तिकडे कुठे मिळायला. त्यांच्या लेखनाचा गाभितार्थ स्वतःत पचवायला वाचकही एका वेगळ्याच मानसिकतेचा हवा. 'वेगळ्याच' हा खूप बहु अर्थी शब्द आहे खरंतर, आपण भिजवू त्या भावनेत भिजणारा... पण तरीही इथे मला अपेक्षित असलेला त्या वेगळेपणाचा अर्थ त्यांचं लेखन वाचणाऱ्या, पेलणाऱ्या आणि relate करू शकणाऱ्या वाचकांच्या तितक्या संवेदनशील मानसिकतेपर्यंत जाणारा आहे.

त्यांनी लिहिलेल्या पैकी मी ज्या काही कथा वाचल्या त्या समजून घेताना जीएंच्या असामान्य प्रतिभेची मला केवळ ओळखच होवू शकली. ती गोष्ट, त्यातली पात्र, गोष्टीत दिसणारा भोवताल, त्याची तुलनात्मक विषेषणं, आणि ते सगळं गोष्टीत उभारताना त्यांची वाचकाला वास्तविक पण तरीही नेणिवेच्याही पल्याड नेणारी मानसिकता, (असं कसं काय कोणी विचार करू शकतं, हे कसं सुचू शकतं) हे सगळं दैवी प्रतिभेशिवाय कसं शक्य आहे हेच सारखं वाटत राहतं. सगळं अर्थशून्य आहे हे नुसतं म्हणायला माहीत असतं पण त्या सत्यापर्यंत बोट धरून घेवून जाणारं त्यांचं लिखाण आतून खूप अस्वस्थ करत रहातं. आणि एका क्षणी ते खूप असह्य होतं की ते पेलवत नाही... मगाशी चार दोन कथाच वाचू शकले, तेवढ्यावरच थांबले ते म्हटलं ते हे असह्य वाटणं मला पेलू न शकल्यामुळेच अगदी. 

म्हणूनच त्या कथांमधून त्यांच्या प्रतिभेची केवळ ओळखच मला होवू शकली... पूर्ण समजून रिचवता नाही आले त्यांचे लेखन पण निदान एक व्यक्ती म्हणून जीए कसे असतील, एरवी माणसांपासून अलिप्त राहणारे जीए त्यांच्या जिवलग म्हणवणाऱ्या, कधी घरातल्या तर कधी नात्याच्या ना गोत्याच्या पण वैचारिक ओढीने जवळ आलेल्या, बांधल्या गेलेल्या लोकांबरोबरच्या मैत्री सारख्या तरल नात्यात कसे असतील हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातलं अंग जाणून घेण्यासाठी मला त्यांनी इतर लेखक कवी मित्रांना लिहिलेली पत्रे वाचावीत असं वाटलं आणि ही पत्रवेळा लगेच घेतली. मागे वाचलेले सुनीता बाईंचे 'प्रिय जीए' ही आठवले. त्यांनी जीएंना लिहिलेली खूप मार्मिक पत्रे त्यात वाचायला मिळाली आणि मैत्रीच्या नात्याबरोबर त्यांच्यातील पत्राद्वारे झालेल्या साहित्यिक गप्पा अनुभवायला मिळाल्या... !

तसाच सुंदर ठेवा या 'जीएंची पत्रवेळा' मध्ये आहे... त्यांनी कवी ग्रेसांना लिहिलेली पत्रे यात आहेत. काही मोठी, काही छोटी, काही असच मन मोकळं करत मित्राला लिहावं वाटलं म्हणून लिहिलेली, काही आधीच्या पत्रांची उत्तरं म्हणून लिहिलेली अशी कवी ग्रेस यांच्यासाठीची ही जीएंची पत्रे... ग्रेसांच्या अनपेक्षित उत्तरामुळे झालेला आनंद ही काही पत्रात जीएंनी अगदी मनापासून व्यक्त केला आहे. ग्रेसांबद्दल त्यांच्या कवितांबद्दल, पत्रांबद्दल जीएंना 'माहेरमाया' वाटे.. हा शब्द मला खूप भावला... आपल्या नकळत आपल्या आतड्यातून कोणासाठी काही दाटून यावं इतकी भरभरून माया या शब्दात भरली आहे असं वाटलं. जीएंना आयुष्यात मित्र म्हणून ही सगळी प्रगल्भ माणसं लाभली हा त्यांच्यामते सगळा सुदैवी योगायोग. आयुष्यभर टिकणारे आणि आयुष्याला सुखावणारे कृतज्ञतेचे संबंध निर्माण होणे हा सुरेख योगायोगच नाहीतर काय.

मोकळेपणी मनातले मांडण्यासाठी या अशा स्नेह्यांशिवाय दुसरा खण तो कुठला असणार, इतक्या अपलेपणी त्यांनी त्यांच्या जिवलग मित्रांना ही सारी पत्रे लिहिली आहेत. या पत्रांमुळे मी खूप घडत गेलो असेही ते म्हणतात. 

ग्रेसांच्या बऱ्याच कविता, त्यांचे शब्द त्यातल्या सुरेल सच्चेपणामुळे जीएंच्या अगदी जिभेवर रेंगाळत राहणारे होते अस ते म्हणतात आणि तरीही एक कविता वाचताना मात्र एक दोन ठिकाणी त्यांना गोंधळल्यासारखे झाले त्याबद्दल ते ग्रेसांना लिहितात, "ती कविता वाचताना मला वाटले, की आपले बोलणे इतरांना समजत नाही, हे ठीक, पण इतरांचे जिवंत, सुगंधी शब्द समजून न येण्याइतका मी एकाकी झालो की काय? Do I understand myself? हे वाचताना मलाच 2 मिनिटे थबकायला झाले. किती सहज नि किती खरेपणी मैत्रीतला संवाद होत असतो. 

ग्रेसांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर जीएंनी लिहिलेली प्रतिक्रिया त्यांनी एका एका पत्रातून ग्रेसांना कळवली हे ते म्हणतात, "गडद, दाट हिरव्या अंधारात दिसणाऱ्या अस्पष्ट झाडांमधून आत आत हा प्रवास आहे, आणि त्या झाडांना एकेक नाव देता ती स्पष्ट होत जातील..." 

कावळा या ग्रेसांच्या कविते बद्दल त्यांची प्रतिक्रिया मांडताना एका पत्रात जी एंनी भरभरून लिहिलंय, "कावळा हा विलक्षण पक्षी, निःसंशय काळा रंग असूनही त्याच्या बसण्यात किंवा हालचालीत कधी खंत किंवा ओशाळेपणा नाही, मी आहे अशी निर्विकार स्थिर जाणीव आहे आणि भारद्वाजाकडे पाहता, तो मात्र एकदम बिचकतो, बावरतो, आपण फार भडक तर दिसत नाही ना हा बुजरेपणा त्याच्यात आहे." अशा आशयाचे त्या कवितेबद्दल आणखीही खूप काही सविस्तर त्यांनी लिहिले आहे. 

'विशाल उग्र श्र्वापदा प्रमाणे वाटणाऱ्या आयुष्याने मध्येच एक डोळा उघडून आपल्याकडे रोखून पहावे तसा अनुभव देणारी तुमची कविता ' असं ते एका पत्रात ग्रेसांना लिहितात. 

बाकीही असेच खूप संदर्भ आहेत जे वाचताना भारावून जायला होतं. त्यांच्या कथांमधून जीए जितके गूढ वाटतात तोच गूढपणा त्यांच्या पत्रांमधून ही डोकावतो. खूप गोतावळा भोवती नाही पण जिव्हाळ्याची चार माणसे जोडीत, त्यांना भरभरून जीव लावत जगण्याची आसक्ती त्यांच्या पत्रांमध्ये जाणवते. 

वैयक्तिक पातळीवर हा माणूस कसा असेल हे खूपसे स्पष्ट नाही होऊ शकत पण अथांग सागराच्या तळाशी दडलेला त्यांच्या मनाचा तो गूढ भाव तसाच गूढ राहतो. पत्र ही दोन माणसांमधली इतकी जिव्हाळ्याची गोष्ट असूनही त्यांच्या मनाच्या तळाचा या पत्रांमध्येही ठाव लागतोच असे नाही.

कवी किंवा लेखक ज्या कविता, लेख, गोष्टी प्रसिद्ध करतात, तेवढ्यावरच इतरांनी बोलावे, तेवढ्याच खिडक्या उघड्या ठेवण्याचा त्यांचा हक्क आहे. पण त्यांची ही निर्मिती त्यांच्या खाजगी आयुष्यातून, भोगांतून निर्माण झालेली असते, त्यांच्या अनुभवांचे त्यांच्या मनावर उमटलेले रंगीबेरगी डाग, सतत त्रास देणारे आतले कसले तरी वादळ, अस्वस्थता त्यातून कागदावर उतरलेली ती निर्मिती असते हे वाचक जाणतो, त्यामुळं तो लेखक व्यक्ती म्हणून कसा असेल ही थोडीशी तरी उत्सुकता असते... अर्थात मला आहे. त्यामुळंच मी पुलंची लोकप्रिय विनोदी पुस्तके वाचल्यानंतर 'आहे मनोहर तरी' वाचलेले. सुनीता बाईंचे लिखाण समजून घ्यावे म्हणून नाही तर पुलं हे व्यक्ती म्हणून त्यांच्या अर्धांगिनीच्या नजरेत कसे आहेत हे जाणण्यासाठी. तसेच मागे गौरी देशपांडेचेही (मला) खूप practical वाटणारे लिखाण वाचलेले. लेखकाच्या लिखाणावरून त्या निर्मिती मागच्या प्रेरणा काय असतील, इतकं दुःखद लिहिणाऱ्या लेखकाला (हे स्पेसिफिक जीएंबद्दल) त्यांनी भोगलेल्या वेदनेविषयी अपार आसक्ती आणि म्हणूनच आपुलकी असणार, त्या अर्थाने ते जाणून घ्यायची ओढ.

एक मात्र नक्की ही सगळी पत्रे दोन दिग्गज प्रतिभावंतांमधला सुरेख मैत्रीचा धागा उलगडतात आणि वाचनाचा सुखद आनंद देतात.


खूप random, वाटेल तसं अस्ताव्यस्त लिहिलेलं आहे. मन असे मोकाट फिरेल तिकडे उधळून दिले आहे... !


                                           --- अश्विनी वैद्य
                                                २०.०३.२०










Friday 14 February 2020

'Sapiens - A Brief History of Humankind'


Image result for sapiens


    कथानकं असलेली पुस्तकं भाषेच्या, शब्दांच्या ओढीनं वाचायला मला नेहमी आवडतात. पण माहितीपूर्ण पुस्तकं त्यामुळं माझ्यासाठी थोडी बाजूला पडतात. पण यावेळी एका मैत्रिणीने सुचवलेल्या एका पुस्तकाने मात्र अगदी वेड लावले आहे. ते म्हणजे, युव्हाल नोअा हरारी या इज्राईली इतिहासकाराने लिहिलेले ' Sapiens - A Brief History of Humankind ' (न्यूयॉर्क टाइम्स बेस्ट सेलर) हे पुस्तक. हे पुस्तक एक milestone ठरेल इतके भन्नाट आहे.

लेखकाबद्दल चार शब्द : युव्हाल नोआ हरारी (वय 43) हा हिब्रू युनिव्हरसिटी ऑफ जेरुसलेम मध्ये इतिहास विभागात professor म्हणून काम करतो. Original पुस्तक हिब्रू मध्ये आहे. 2014 ला ते इंग्लिश मध्ये प्रकाशित झाले. त्याने लिहिलेले हे पुस्तक बराक ओबामा यांनीही वाचण्यासाठी recommend केले आहे.

    हे पुस्तक आपल्याल्या, वाचताना पहिल्या पानाच्या पहिल्या ओळीपासून हजारो वर्ष जुन्या मानवजातीच्या काळात इतक्या सहजपणे रमवते की मला पुस्तक खाली ठेवूच वाटले नाही. असे असूनही वाक्यावाक्यात मिळत जाणारी माहिती इतकी प्रचंड आहे की ती पचवायला, आत उतरवायला वेळ लागतो. त्यामुळं कितीही वाटले तरी एका वेळी तीस पानांच्या वर मी वाचूच शकले नाही.
एक एक वाक्य हे मोठमोठ्या पुरातन कालखंडाचं सार आहे, असं वाटतं.... कुठेही एवढा सुद्धा फापट पसारा नाही, एखादा भाग गाळून पुढे वाचावं असं नाही... हे वाचताना आपली स्वतःची विचारक्रिया ही background ला चालू होते.

    उत्खनन करताना अवशेष रुपात सापडलेल्या हाडांचे सापळे, छोटे तुकडे त्याचा अभ्यास करून, त्यातल्या जनुकीय विश्लेषणावरून त्या जातीच्या अस्तित्वाचा काळ, शारीरिक रचना, त्या जातीच्या सवयी, त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये, त्या वेळची संस्कृती, आणि या सगळ्याचा आताच्या वर्तमानातल्या सेपियनस् च्या जीवनपद्धतीशी लावलेला संबंध हे सारं वाचताना केवळ भारून जायला मला झालं. त्याने मांडलेल्या संकल्पना इतर अभ्यासकांना पटणाऱ्या आहेतच असं नाही पण आपल्या सारख्या सामान्य लोकांना माणूसपणाच्या पडलेल्या अनेक प्रश्नांच्या उकली या पुस्तकात नक्कीच सापडतील. इतक्या स्पष्ट आणि मुद्देसूदपणे लेखकाने मांडलेल्या निरीक्षणावरून ते लक्षात येत जाते आणि बरेच ' का?' उलगडायला मदत होते.

    अशा पुस्तकातले मला आवडलेले काही मुद्दे मला नोट्स रुपात लिहून ठेवायला नेहमी आवडते, माझ्या weak memory ला भविष्यात लागलाच तर थोडासा आधार मिळेल म्हणून मी कदाचित लिहून ठेवत असेन तर ते काही मुद्दे इथे नमूद करते.



   साडेतेरा अब्ज वर्षांपूर्वी बिग बँग मध्ये आकाश, ऊर्जा, काळ ही मूलभूत तत्त्व जन्माला आली. सत्तर हजार वर्षांपूर्वी होमोसेपियन्स या सजीवांच्या जातीने संस्कृती नामक रचनांची निर्मिती केली. मानवाच्या या इतिहासाला 3 महत्त्वाच्या क्रांती कारणीभूत ठरल्या. १. Cognitive revolution ( सत्तर हजार वर्षांपूर्वी), 
२. Agriculture revolution ( बारा हजार वर्षांपूर्वी) and 
३. Scientific Revolution( पाचशे वर्षांपूर्वी).
या तीनही क्रंतीमुळे मानवावर आणि त्याच्या भोवतालवर काय आणि कसा परिणाम होत गेला याची माहिती या पुस्तकात आहे. तीन भागात पुस्तकातली माहिती विभागली आहे. 

१. कॉग्निटिव्ह रेव्होल्यूशन : 
पंचवीस लाख वर्षांपूर्वी पूर्व आफ्रिकेत अस्त्रेलोपिथिकस या प्रजातीच्या महावनारापासून मानव प्रथम उत्क्रांत झाला. त्यांच्यापैकी काही पुरुष आणि स्त्रिया 20 लाख वर्षांपूर्वी उत्तर आफ्रिका, युरो आणि आशिया भागात स्थायिक होण्यासाठी गेले, उत्क्रांत होत गेले, आणि परिणामी त्यांच्या वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या. युरोप आणि आशिया मधल्यांना शास्त्रज्ञांनी नियांडरथल हे नाव दिले. आणि अतीपूर्व आशियात होमोइरेक्ट्स (ताठ कण्याचा माणूस) जवळपास वीस लाख वर्ष जम बसवून होता... वीस लाख वर्ष हा खूप मोठा काळ आहे. आत्ता पासून पुढे हजार वर्ष सुद्धा आत्ताचे आपण होमो सेपियन्स टिकून राहू की नाही हे सांगता येत नाही.

इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवाच्या मेंदूचा असलेला मोठा आकार ही एक लक्षणीय बाब होती. पण मोठ्या आकराच्या मेंदूमुळे शरीरातली अधिक ऊर्जा खर्च होते. माणूस जेव्हा झोपतो तेव्हा 25% ऊर्जा मेंदूसाठी खर्च होते, तेच चिंपाझी आणि गोरीला यांची केवळ 8 टक्के खर्च होते.

मोठ्या मेंदूची मानवाला 2 प्रकारे किंमत मोजावी लागली. एक म्हणजे अन्नाच्या शोधात खूप वेळ घालवावा लागला आणि दुसरं म्हणजे स्नायूंचा शोष झाला. हे असलं तरी आपल्याला मोठ्या मेंदू मुळे बरच काही दिलं आहे.
स्वरक्षणार्थ हत्यारं तयार करणे, त्यांचा वापर करणे, नवीन शिकण्याची विलक्षण क्षमता वैगेरे.

वीस लाख वर्षांपूर्वी चा माणूस अन्नसाखळी च्या पिरॅमिड मध्ये मध्यभगी होता (आपल्या पेक्षा छोट्या प्राण्यांची तो शिकार करायचा आणि मोठ्या प्राण्यांचा तो शिकार व्हायचा). पण चार लाख वर्षांपूर्वी चा माणूस अन्नसाखळीत एकदम सर्वोच्च स्थानी इतक्या झपाट्याने गेला की त्याने परिस्थितीला जुळवून घ्यायला इतरांना आणि स्वतः लाही अवधीच दिला नाही. त्यामुळं सेपियनस् हा अविकसित राष्ट्रातल्या हुकुमशहा सारखा दुबळा प्राणी ठरला. सतत आजूबाजूच्या वातावरण घाबरणारा.


अनीचा शोध हा मानवाच्या वाटचालीतला महत्वाचा टप्पा : ज्या फळं, भाज्या नैसर्गिक स्वरूपात पचवता येत नव्हत्या ते सोपं झालं, अन्न खायला लगणारा वेळ कमी झाला, त्यामुळे दातांचा आकार आणि आतडही छोटं झालं.
आतड्याची लांबी कमी होण्याचा आणि मेंदूच्या वाढीचा प्रत्यक्ष संबंधही काही शास्त्रज्ञांनी लावला आहे.
आगीवर नियंत्रण म्हणजे ज्योत कुठे आणि केव्हा पेटवायची याची निवड त्याला करता यायला लागली. याचा उपयोग त्याला कितीतरी कामांसाठी व्ह्यायला लागला, जसं की सिंहाला घाबरवणे, रात्रीच्या थंडीत ऊब निर्माण करणे,

आफ्रिकेच्या एका कोपऱ्यात आपली म्हणजे होमोसेपियन्स ची जात अस्तित्वात होती, दीड लाख वर्षांपूर्वी आपल्या सारख्या दिसणाऱ्या होमो सेपियनस् ची वस्ती होती या मताशी बरेच वैज्ञानिक सहमत आहेत. सेपियन्स ज्या ज्या नवीन ठिकाणी गेले तिथल्या स्थानिक मानव जातीला त्यांनी संपुष्टात आणले. होमो सोलोंसिस हे पन्नास हजार वर्षांपूर्वी पर्यंत होते, नियांडरथलच अस्तित्व 30 हजार वर्षांपूर्वी संपुष्टात आलं तर 12 हजार बारा हजार वर्षांपूर्वी फ्लोरेस मधल्या ठेंगु माणसाचं अस्तित्व संपलं. त्यांच्या मागे होमो सेपियन ही अखेरची मानवजाती ठरली आहे. (युव्हाल ने मांडलेल्या थेरीबद्दल बऱ्याच अभ्यासकांना आक्षेपही आहे असं विकिपीडियात तरी म्हटलं आहे. )

इ. पू. सत्तर हजार ते इ. पू. तीस हजार या कालावधीत नीअंडरथल चा नायनाट करणारे, त्यांच्यातले काही गट ऑस्ट्रेलियात जावून स्थायिक होणारे, होडी, तेलाचे दिवे, धनुष्यबाण, शिवण टिपण करणारे, कलाकृती आणि अलंकार म्हणता येतील अशा वस्तू तयार करणारे, सत्तर हजार वर्षांपूर्वीचे सेपियनस् हे आपल्या प्रमाणेच बुद्धिमान, सर्जनशील आणि संवेदनक्षम असल्याचं संशोधकांचे मत आहे. आणि हा सगळा cognitive revolution cha परिणाम. हे असं का झालं, फक्त सेपियनस् च्या मेंदूत अंतर्गत बदल होऊन, जनुकात बदल होऊन तेच यशस्वी का ठरले, नीअंडरथल मध्ये हे बदल का नाही झाले याची कारणे शोधण्यापेक्षा त्याचे परिणाम शोधणं शास्त्रज्ञांना जास्त महत्त्वाचे वाटले.

भाषेचा उगम :
अन्न कुठे आहे आणि धोक्याची सूचना या कारणांसाठी भाषा इतर प्राण्यांप्रमाणे सिपियन मध्ये जन्माला आली. पण ती इतर प्राण्यांपेक्षा विलक्षण लवचिक ठरली, अर्थात असंख्य वाक्यांची रचना, मर्यादित आवाज, वाक्यांचे वेगवेगळे अर्थ, माहिती मिळवणे साठवणे आणि देवघेव करणे, चर्चा करणे, आपल्या जवळचं ज्ञान इतरांना देणे यामुळं आपली भाषा उत्क्रांत झाली. थोडक्यात काय तर गॉसिपिंग हा किडा तेव्हा पासून म्हणजे इ. पू. सत्तर हजार वर्षांपूर्वी ही अस्तित्वात होता. तेव्हा सेपियन्स नी जी भाषिक कौशल्ये आत्मसात केली त्यातलं एखाद्याच्या पाठीमागे बोलणे (back biting) हे आजच्या काळात टीकेचं धन बनलं असलं तरी सत्तर हजार वर्षांपूर्वी त्याचा उपयोग एकमेकांना सहकार्य करण्यासाठी त्यांना झाला. कधीच न पाहिलेल्या किंवा स्पर्श न केलेल्या किंवा वासही न घेतलेल्या गोष्टींवर केवळ सेपियन्सच बोलू शकत असत. त्यामुळे cognitive revolution मध्ये देव, धर्म, राक्षस, दंतकथा, परिकथा याचा उगम झाला, असं मत युव्हाल ने मांडलेले आहे, हे सगळ्या अभ्यासकांना पटणारे आहेच असे नाही पण हा भाग फारच सुंदर पद्धतीने पुस्तकात मांडला आहे.
हे कल्पना करण्याचं सामर्थ्य फक्त सेपियन्स कडेच होतं. त्यामुळे सामुदायिक स्वरूपात कल्पना करण्याची कुवतही त्यांना मिळाली. बायबल मधल्या विश्र्वनिर्मितीच्या कथा, भगवत गीतेतल्या कथा या गोष्टी अस्तित्वात आल्या, यामुळं त्यांना एकमेकांना मोठ्या संख्येने सहकार्य करण्याची क्षमता प्राप्त झाली. देवासारख्या कधीही प्रत्यक्षात न पाहिलेल्या, अनुभवलेल्या संकल्पनेवर करोडो लोक विश्वास ठेवू शकतात ते याच सामर्थ्यामुळे. इतर प्राणीही एकमेकांना सहकार्य करतात पण निकट परिचयात असलेल्या गटांपुरतेच ते मर्यादित असते. पण सेपियन्स असंख्य अपरीचितांबरोबरही या कल्पना करण्याच्या सामर्थ्यामुळे सहकार्य करू शकतात, म्हणूनच सेपियन्स ने जगावर राज्य केलं. मला हे वाचताना हा संदर्भ आजवरच्या युद्धामध्ये ही काही अंशी लावावा वाटला. छत्रपतींनी स्वराज्याचे स्वप्न आधी स्वतः पाहिले आणि ती कळकळ, ते स्वप्न सगळ्या मराठ्यां मध्ये जागवले. पहिले महायुद्ध, दुसरे महायद्ध, भारताचे ब्रिटिशांच्या तावडीतून सुटून स्वतंत्र अस्तित्वाचे अर्थात स्वातंत्र्याचे स्वप्न....त्यासाठी जीवाला जीव देण्याची तडफ हे सगळं कल्पना शक्तीच्या आणि त्यामुळे एकमेकांना केलेल्या सहकार्या च्या जोरावरच शक्य झाले असेल असे वाटले. हा परिच्छेद पुस्तकात खूप सोप्या पण परिणामकारकतेने मांडला आहे. 

काळाच्या ओघात लोकांनी कथांचं क्लिष्ट जाळं गुंफलं. त्याला अभ्यासकांनी ' कल्पित वास्तव ' असं नाव दिलं.
'कल्पित वास्तव' ही अशी बाब आहे जिच्यावर प्रत्येकाचा विश्वास असतो. Cognitive revolution मुळे सेपियन्स अशा दुहेरी वास्तवात जगत आले आहेत. एका बाजूला नद्या, झाडं, डोंगर, सिंह हे वस्तुनिष्ठ वास्तव आणि दुसऱ्या बाजूला देव, धर्म, राष्ट्र, संघटित संस्था यासारखं कल्पित वास्तव. जसजसा काळ पुढे गेला तसतसे हे कल्पित वास्तवच जास्त बलवान होत गेलं आणि आता तर त्याचं बळ इतकं वाढलं की झाडं, डोंगर, नद्या, सिंह यांचं जगणं सर्व शक्तिमान ईश्वर, युएसए, गुगल या सारख्या कल्पित गोष्टींच्या उपकारांवर अवलंबून आहे.'
हा संदर्भ आणि त्याचा आताच्या जगावर होत असलेला परिणाम हे लेखकाचं relational observation मला कमालीचं तुफान वाटलं. या सगळ्यामुळे 'धर्म, जात, आमच्यात हे चालत नाही, ते केलं तर पाप असतं' हे जे आपल्या अवतीभोवती कायम चालू असतं, या सगळ्या कल्पित वास्तवाचा पाया कसा भुसभुशीत आहे, मनाच्या खेळांवर तो कसा अवलंबून आहे असं मला वाटायला लागलं.

प्राचीन मानवाची वर्तन पद्धती ही लाखो वर्ष एका ठराविक पद्धतीची राहिली होती, सेपियन्स मात्र दशकाच्या वा दोन दशकाच्या काळात सामाजिक रचना, आर्थिक व्यवहार या अशा पद्धती बदलू शकत असत, हीच त्यांच्या यशाची आजवरची गुरुकिल्ली आहे.
हे विशिष्ट्य निअंडरथल मध्ये नव्हतं, 'सिंह मागावर आहे का? हे ते सांगू शकत असले तरी, देवतांच्या कथा रचण्याचे, त्यात बदल करण्याचे थोडक्यात कल्पित गोष्टी रचण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नव्हते, तसेच वेगाने येणाऱ्या आव्हानांशी ते आपलं वर्तन जुळवून घेवू शकत नव्हते. तसेच व्यापार ही एक व्यावहारिक कृती आहे आणि सेपियन्स खेरीज कोणीही प्राणी यात गुंतलेला आढळत नाही ही fact आहे.

लेखकाच्या मते, Cognitive revolution हा एक असा पॉइंट आहे ज्यामुळे इतिहास ही शाखा biology पासून वेगळी झाली. याचा अर्थ असा की, या revolution नंतरच्या सेपियन्सच्या विकासाचे स्पष्टीकरण biology ऐवजी ऐतिहासिक साधनांनी केलं. होमोसेपियन्स च्या वर्तनाचे आणि कुवतीचे परिणाम biology ठरवते पण ते वर्तन समजून घेण्यासाठी उत्क्रांत होत गेलेल्या सेपियन्सच्या कृतींचं वर्णन करणं आवश्यक आहे, ते इतिहासाच्या आधाराने होते. 

Agriculture revolution पूर्वी या भूतलावर पाच दशलक्ष ते 8 दशलक्ष लोक राहत होते. ही संख्या सध्याच्या मुंबईच्या लोकसंख्येपेक्षाही कमी होती. हे लोक लहान लहान टोळ्यांमध्ये राहत, ते भटके होते. हजारो वेगवेगळ्या जमातींमध्ये ते विभागलेले होते, त्यांची भाषा, संस्कृती भिन्न होत्या. Cognitive revolution मुळे मिळालेल्या 'काल्पनिक कथानक रचण्याच्या ' क्षमतेमुळे त्या टोळ्यांमध्ये पुष्कळ विविधता होती. 
पंधरा हजार वर्षांपूर्वी होमो सेपियन्सने माणसाळवलेलं पहिलं जनावर म्हणजे कुत्रा. सागर किनाऱ्यावर, नदी काठावर त्यांच्या वसाहती होत्या. पंचेचाळीस हजार वर्षांपूर्वी ही मासेमारी करणारी गावं स्थापन झाली असावीत.
अन्न गोळा करण्याबरोबरच ज्ञान मिळवण्यासाठी ही( उदा. कुठली  विषारी आहे, कुठलं पोषक) हे सेपियन्स स्थलांतरित होत राहिले. 

क्रमशः 

अश्विनी वैद्य 
१४. ०२. २०


राजस्थान डायरी : उदयपूर

उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थाप...