Wednesday 29 March 2017

Priorities



    सकाळी जाग आली... नेहमीप्रमाणे ६.३० झाले होते. पापण्यांआड पडलेल्या  स्वप्नांना पांघरुणाबरोबर बाजूला सारून सकाळच्या स्वच्छ, प्रसन्न दिवसाला सुरवात केली. काल बराच उशिरा डोळा लागला आपला. अर्ध्यात सुरु केलेलं ते पुस्तक वाचून पूर्ण केलं आणि त्या ओघानं येणारे विचार मनात घोळवत बरीच  उशीरा कधी झोप लागली कळलंच नाही. नेहमी असंच होतं आपलं, एखाद्या गोष्टीचा वेगवेगळे चष्मे लावून उगाच अती विचार करत बसणं होतं. त्या पुस्तकात लेखकानं उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा जवळच्या वाटल्या खऱ्या पण पटल्याच असं नाही, बरेच संदर्भ अजून खोलवर पोचायला हवे होते. आता उठल्यावर पण तेच सगळं डोक्यात चालू आहे. नेहमीची सकाळची गडबड आहेच पण आत मात्र त्या विचारांनी घेरलंय. 

    एखादं वेगळा विचार मांडणारं पुस्तक हातात आलं कि, स्वतःच्या त्याबाबतच्या विचारांचेही वेगवेगळे धागे आपोआप तयार होतात, आणि मग त्याचा थोड्यावेळाने इतका गुंता होतो कि, कुठली परिमाणं कुठं लावायची सगळाच गोंधळ उडतो. कळत नाही असं नाही, पण स्वतःशीच असलेले स्वतःचे वाद मिटवायला कधी कधी कोणाची तरी मदत लागते. कोणाशी तरी बोलावं असं खूप वाटत होतं. पण कोणाशी बोलणार. वेळ असा कधी नसतोच कोणाकडे, किंवा priorities वेगळ्या असतात. असं एखाद्या पुस्तकाविषयी, त्यात मांडलेल्या मताविषयी वैगेरे तर शक्यच नाही. जिथे आपण केलेल्या मेसेजला उत्तर येणं मुश्किल, तिथं अशी एखाद्या पुस्तकाविषयी चर्चा म्हणजे, काहीही अपेक्षा करते मी. 

    सकाळची सगळी गडबड उरकल्यावर थोडासा वेळ होता, नेमका तेव्हाच फोन वाजला. मोबाईलच्या स्क्रीनवर नाव दिसलं आणि खूप आनंद झाला. किती दिवस झाले होते शेवटचं बोलून, तो आवाज ऐकून... त्यात स्वतः होऊन फोन आला म्हणजे मला बोलायचं आहे हे कळलं असेल का तिला. कोण जाणे... पण आज अगदी भरभरून बोलूयात दोघीजणी, खूप गप्पा मारुयात असं म्हणत पटकन फोन घेतला. पलीकडून अगदी आनंदात येणाऱ्या आवाजावरून, तिच्या चेहऱ्यावरचे भाव मला इकडे जाणवत होते. खळाळत्या झऱ्यासारखी ती बोलत होती. तिचा आवाज, तिचं बोलणं, शब्दाशब्दांतून सांडणारा आनंद हे सारं काही मी फोनवरून टिपत होते. लग्न ठरल्याची गोड बातमी द्यायला तिने फोन केला होता. ते ऐकून मलाही खूप आनंद झाला. तिचं बोलणं थोडं ओसरल्यावर तिला मनापासून शुभेच्छा दिल्या आणि "बाकी तू काय म्हणतेस?" या तिच्या प्रश्नावर "ठीक, मस्त" असं काहीतरी न ठरवता, सहज ओघानं येणारं उत्तर तोंडून निसटलं. "चल, जरा गडबडीत आहे, बोलू परत" असं म्हणत तिने मग फोन ठेवून दिला. किती खूष होती ती...मलाही छान वाटलं. भरभरून बोलणं झालं खरं, पण ते तिचं, तिच्या बाजूनं... मला बोलायचं होतं ते राहिलंच... अर्थात वेळच नव्हता तिला. हरकत नाही, माझे विचार परत माझ्याभोवतीच फिरत राहिले.

    राहिलेली कामं पटापट आवरून मी ही कामाला बाहेर पडले. दिवसभर कामाच्या गोंधळात पुस्तकाचे विचार बाजूला पडले खरे, पण ती अस्वस्थता संपली नव्हती.  त्याच त्याच विचारात अडकून पडलं तर काही वेळानं त्याचं डबकं होतं, ज्याचा नंतर त्रास व्हायला लागतो, पण म्हणून मग ते असेच सोडून देऊन त्याचा पाचोळा  असा मातीमोल झाल्याचं वाईटही वाटतं. प्रवाही विचार मनाच्या cleansing साठी किती आवश्यक असतात ना... मग काय शेवटी, रात्री सगळ्यांची निजानीज झाल्यावर दिवसभर आतल्या आत चाललेली तगमग कागदावर उतरवून मोकळी केली...आणि माझी माझी मी एकटीच शांत झाले.

---अश्विनी वैद्य 
२८. ०३. १७

Wednesday 22 March 2017

सवय


आधी ओढ, मग काहूर, 
मग स्वतःच्याच त्या 'हो-नाही'च्या हेलकाव्यात उगाच जागवलेल्या रात्री, 
चूक-बरोबरची मांडलेली गणितं, अस्वस्थ करणारी घालमेल, 
आणि अचानक एखाद्या बेसावध क्षणी अगदी वाऱ्याच्याही नकळत शहारून टाकणारी ती हलकी झुळुक, 
उसासून कोसळणाऱ्या थेंबागणिक शमत जाणारी ती तहान, त्यातून जाणवलेली एक वेगळीच त्रुप्तता, ती समाधानी शांतता, 
झाकोळून आलेल्या आभाळाला बाजूला सारत अचानक सूर्य डोकवावा आणि 
निवलेला, पार भकास भोवताल त्या किरणांनी अगदी नसानसांतून तरारून यावा, झळाळून निघावा...तशी काहीशी तृप्त जाणीव...!
एकदम काहीतरी वेगळ्याच जगाची नव्यानं होत असलेली ओळख, 
मग दिवसाच्या चारही प्रहरी त्यातच हरवलेलं मन, त्याभोवतीच वेड्यागत चाललेले सगळे काल्पनिक खेळ, 

त्या त्रुप्ततेचीच अजून अजून वाढलेली तहान, ती शमवण्याची परत परतची आस, 
या साऱ्या साऱ्याच्या हिंदोळ्यांवरच तरंगत राहावं असं वाटणारं भाबडं वेड, 

आणि मग या सगळ्याच्या कायमच हव्याशा सोबतीने , 
 त्या भावविश्वाची मनाला नकळत होत गेलेली ती 'सवय'...!

हो सवयच...लौकिकार्थाने नकारात्मक असलेली अशी एक 'सवय'
किती सावधगिरी बाळगली तरी अंगवळणी पडलेली, पार चिकटलेली ती 'सवय' 
 एखाद्या संध्याकाळी विरत जाणाऱ्या प्रकाशाबरोबर कातर करणारी या सगळ्याची जाणीव 
दिवसागणिक वाढणाऱ्या वयाच्या परिपक्वतेच्या उंबरठ्यावर अजूनच अस्थिर करणारी...!  
'बास..आता थांबूया...' ही संयमाची पुसट रेषा कुठल्या वळणावर ठळक करावी याची पावलागणिक नकोशी वाटणारी जाणीव
खरंच, 
ही वाट कधी सापडायलाच नको हवी होती का? का त्या लाटांबरोबर पार खोल कधी बुडत गेलो कळलंच नाही आपल्याला? वाहवत जाण्याचा मूळ स्वभाव इथेही आड येऊ नये का? 
अशी सवय न लागू द्यायचीच सवय मनाला करून घ्यायला हवी होती का?

--- अश्विनी वैद्य 
  २२.०३.१७   


राजस्थान डायरी : उदयपूर

उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थाप...