Monday 3 December 2018

' बोले तो एकदम.... कड्डक '





....आणि डॉ. काशिनाथ घाणेकर. हा बहुचर्चित चित्रपट काल मोठ्या पडद्यावर इंग्लंडात पाहिला. या चित्रपटाबद्दलचे बऱ्याच जणांचे चांगले वाईट reviews गेल्या आठवड्यात वाचले होते. ते reviews वाचून आणि ट्रेलर्स बघून सिनेमा बद्दल खूप उत्सुकता होती. 
खरंतर या अभिनेत्याच्या लोकप्रियतेचा काळ अनुभवलेली माझी पिढी नाही. म्हणजे, दर रविवारी दुपारी चार वाजता संध्याकाळच्या चहा बरोबर सुरु होणारे लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांचे मराठी चित्रपट शाळेत असताना दूरदर्शनवर पाहिलेली माझी आत्ताची तिशीतली पिढी. त्यांच्यासाठी घाणेकर म्हणजे 'हा खेळ सावल्यांचा' या चित्रपटातून माहित झालेला घाऱ्या डोळ्यांचा नायक, 'गोमू संगतीनं...' या त्याच्या केवळ गाण्याच्या रेफरन्सनेच लक्षात असलेला. अर्थात त्यांनी गाजवलेली बरीच नाटके केवळ ऐकून माहित होती, पण प्रत्यक्षात कधीही पहिली नव्हती. कुठे एखाद्या लेखाच्या निमित्ताने किंवा पुस्तकातल्या रेफरन्सने थोडाफार माहित असलेला हा अभिनेता. तर थोडक्यात, या अभिनेत्याची खूप तुटपुंजी ओळख मला होती. त्यामुळं 'डॉ. काशिनाथ घाणेकर' या नावाच्या भोवती असणाऱ्या त्याकाळच्या लोकप्रियतेच्या वलयासाठी हा सिनेमा बघायचा असा काही माझा हेतू नव्हता. त्यांच्या कारकिर्दीचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा उलगडून दाखवणाऱ्या या सिनेमाच्या ट्रेलर मध्ये दिसलेल्या घाणेकरांच्या व्यक्तिरेखेतला सुबोध बघण्यात मला खरा रस होता. आणि मराठी पॉपकॉर्नच्या कृपेने आज इंग्लंड मध्ये मला तो मोठ्या स्क्रीनवर बघता आला. 


कुठलाही बायोपिक चित्रपट त्या व्यक्ती बद्दलची थोडक्यात तोंड ओळख करून देऊ शकतो, पण तो चित्रपट त्या व्यक्तीची जीवन कथा, सार वैगेरे सांगू शकतो असे मला वाटत नाही. खऱ्या आयुष्यात घडलेल्या घटना चित्रपटात जशाच्या तशा उमटवताच येऊ शकत नाहीत. दोन-अडीच तासाच्या रोलमध्ये आयुष्यात घडलेल्या ठळक घटना इतर कोणाच्या तरी दृष्टिकोनातून फार फार तर दाखवता येतात. पण त्यावरून, घडलेले प्रसंग त्याचे रेफेरेंन्सस यावरून चूक, बरोबरची अनुमानं काढून ठराविक लेबलं प्रिंट करणं आणि ती त्या व्यक्तीला चिकटवणं हेही बरोबर वाटत नाही. त्यामुळे मी हा सिनेमा बघताना, ती एक कलाकृती म्हणून पहिला. त्यातले संदर्भ, त्या काळातल्या इतर दिग्गज व्यतिरेखा, त्यांची एकमेकांबरोबरची नाती, त्यांचे स्वभाव केवळ एखाद्या कथेतल्या पात्रांचे स्वभाव, कथेचा गाभा म्हणून तितक्या दर्जेदार उमटल्यात का या दृष्टीने मी पहिले आहे. त्यावरून त्याबद्दलचे मत मांडत आहे. इतर चित्रपटांना जशी एक कथा असते आणि ती परिणामकारकपणे प्रेक्षकांसमोर मांडण्याचे कसब चित्रपटाचा दिग्दर्शक, संवाद लेखक, कलाकार, निर्माते आणि पूर्ण टीमचे असते तसेच यालाही आहे. फक्त इथली कथा ही एका खऱ्या व्यक्तीची खरी कथा आहे. 

अभिजित शिरीष देशपांडे यांनी चित्रपटाचे अतिशय उत्तम लेखन आणि दिग्दर्शन केले आहे यात शंकाच नाही. प्रसंग इतके सुंदर आणि उठावदार मांडले आहेत. घाणेकरांच्या आयुष्यातले कुठले प्रसंग सिनेमामध्ये दाखवावेत याची नेमकी जाण त्यातून दिसते. वसंत कानेटकर लिखित ' रायगडाला जेव्हा जाग येते... ' या नाटकातून घाणेकरांनी साकारलेला संभाजी इतिहासातल्या संभाजी इतकाच तंतोतंत उभा करून खरा संभाजी लोकांपर्यंत पोचवण्याचा बिनतोड प्रयत्न करून अजरामर केला आणि घाणेकरांच्या रंगभूमीवरच्या करिअरला तिथून सुरवात झाली. हा भाग सिनेमामध्ये खूप उत्कृष्ट संवाद लेखन आणि प्रसंग यातून मांडला आहे. घाणेकरांच्या शीघ्रकोपी, संतापी स्वभावामुळे त्यांचे कानेटकरांशी उडालेले खटके, पराकोटीचे वाद त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत आलेले चढ उतार, पण तरीही स्वतःच्याच मतांप्रमाणे पुढची वाट तयार करत गाजवलेली रंगभूमी हे सगळं या चित्रपटात सुबोधने इतकं चपखल साधलं आहे कि त्याला तोड नाही. खरे घाणेकर कसे असतील याचे संदर्भ शोधत राहण्यापेक्षा सुबोधने साकारलेले घाणेकर मनाचा ठाव घेतात, हे मात्र नक्की. 'अश्रूंची झाली फुले' या अजरामर झालेल्या नाटकातील 'लाल्या' या घाणेकरांनी साकारलेल्या पात्राने तर त्या काळाच्या रसिकांना वेड लावले, कॉलेजकुमार कधी नव्हे ते नाट्यगृहात त्यांची नाटकं बघायला येऊ लागले, त्यांचे लोकप्रिय डायलॉग्ज त्याकाळी प्रत्येकाच्या तोंडी असायचे. हे सारं  सिनेमात बघताना त्या काळात म्हणजे साठ ते सत्तरच्या दशकात आपण सहज जाऊन पोचतो, एका सेकंदासाठीही चित्रपट कुठे रेंगाळतोय असं वाटत नाही. सुलोचना दीदींमुळे मराठी सिनेसृष्टीत पाऊल टाकून तिथेही स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर अनेक इतिहास रचत वाटचाल करणारे देखणे घाणेकर एक अभिनेते म्हणून खरंच खूप भावतात. या सगळ्या प्रवासात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांच्या पहिल्या पत्नी डॉ. इरावती घाणेकर यांच्या बरोबरचे त्यांचे नाते, त्यांना समजून घेणारी, सुलोचना दीदींची मुलगी कांचन हिचे त्यांच्या आयुष्यात हळुवार येणे हे सगळे प्रसंग या सिनेमात अगदी ओघवते उभारले आहेत. सुमित राघवनने साकारलेले डॉ. लागू, मोहन जोशी यांनी साकारलेले भालजी पेंढारकर, प्रसाद ओकने उभे केलेले घाणेकरांचे जीवश्च मित्र प्रभाकर पणशीकर आणि सोनाली कुलकर्णीने साकारलेली सुलोचना या सगळ्यांनीच महान कामे केली आहेत, म्हणजे अगदी पूर्ण सिनेमात दोन- तीन मिनिटांसाठी पिंजरा चित्रपटातल्या 'तुम्हावर केली मी मर्जी बहाल...' या गाण्यातून दिसणारी अमृता खानविलकर सुद्धा संध्या लाजवाब उभी करते, तिच्या हातांच्या आणि मानेच्या विचित्र हालचाली अमृताने हुबेहूब टिपल्या आहेत. 


आनंदी गोपाळ, इथे ओशाळला मृत्यू, गारंबीचा बापू अशी बरीच नाटके अजरामर करून रंगभूमी गाजवत, मराठा तितुका मेळवावा, मानला तर देव, हा खेळ सावल्यांचा हे आणि असे अनेक चित्रपट गाजवणारा पणशीकरांच्या मते, मराठी चित्रपट सृष्टीतील अखेरचा सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर यांची ही ओळख या चित्रपटाच्या निमित्ताने नक्की घडते. नेहमीच उत्तम अभिनय करत अनेक व्यक्तिरेखा सुंदर रंगवत, हल्ली सगळ्यांच्या घरात त्यामुळेच लोकप्रिय असलेल्या सुबोधने त्याच्या उच्च अभिनयाने याही भूमिकेचे सोने केले आहे. 


त्या काळी घाणेकरांच्या अभिनयावर वेडी झालेली ती पिढी, कलेवर निस्सीम प्रेम करत त्याला तितकीच उस्फुर्त दाद देणारे, धो धो पावसात, गुडघाभर पाण्यात, पाणी गळत असलेल्या थिएटर मध्ये नाटक बघायला येणारे तेव्हाचे रसिक प्रेक्षक या  चित्रपटात बघताना त्या काळच्या या हाडाच्या कलाकारांच्या नशीबाचा क्षणभर हेवा वाटतो. कलाकार म्हणून घाणेकरांवर जीव ओतून प्रेम करणारे त्यांचे चाहते, त्यांना वाटेवर भेटलेली माणसे अगदी क्षुल्लक प्रसंगातूनही या सिनेमात लक्ष वेधून घेतात. 


नाटक संपल्यावर प्रेक्षकांच्या गर्दीतून चालत जाताना, लोकांच्या टाळ्यांच्या गडगडाने चढत जाणारी लोकप्रियतेची नशा, दारूच्या नशेपेक्षाही किती घातक असते हेच इथे दिसते. या लोकप्रियतेच्या नशेचा शाप पचवायची ताकद भल्या भल्या दिग्गज्जांना पेलली नाही आणि त्यातलेच एक घाणेकर. निळ्या डोळ्यातली समोरच्याला भेदणारी तीक्ष्ण नजर आणि उच्च अभिनय याच्या जोडीला असणारा संताप, बेफिकीरी, बेदरकार स्वभाव या जन्मतःच चिकटलेल्या भांडवलामुळे एका उत्तम अभिनेत्याचा, उत्कृष्ट आणि देखण्या कलावंताचा व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकून करुण अंत होतो. ते त्यांचा अखेरचा श्वास त्यांची प्रेयसी, सखी असलेल्या त्यांच्या रंगभूमीवर 'अश्रूंची झाली फुले' या नाटकाच्या अमरावतीच्या प्रयोगात, प्रयोग चालू असतानाच घेतात. हे सगळं मोठ्या पडद्यावर बघत असताना अगदी भारून जायला होतं हे नक्की, आणि तेच या चित्रपटाचं यश आहे असं मला तरी वाटतं. 


एक अभिनेता, कलाकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीतले प्रसंग आणि एक माणूस म्हणून त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातले प्रसंग, हा गोफ, हा एक चित्रपट आहे याचे भान बाळगून बघितले की हा चित्रपट नक्कीच खूप आवडतो. आणि सुबोधच्या चाहत्यांसाठी तर हा चित्रपट म्हणजे एक मेजवानीच आहे. तेव्हा हा दर्जेदार चित्रपट नक्की बघावाच असा आहे. 

---- अश्विनी वैद्य

राजस्थान डायरी : उदयपूर

उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थाप...