Sunday 6 October 2019

।। लग्न-बिग्न ।।



बऱ्याच दिवसांनी मैत्रिणी बरोबर च्या निवांत गप्पा,
गप्पांच्या ओघाला भारतातल्या आठवणींचा नेहमीचा लळा,
अमुक तमुक सांगत गप्पांचा सूर भारतीय लग्नांवर घसरला,
तिने परवा भारतात हजेरी लावलेला तिच्या मावस बहिणीचा लग्न सोहळा अगदी डोळ्यासमोर उभारला,
लग्नाचा भपकेबाज थाट,
तिथली धम्माल, मज्जा वैगेरे वरून गप्पांची गाडी 'लग्न कसे जमले' या पार्श्वभूमी कडे,
छोट्या गावात वाढलेली तिची मावस बहीण म्हणे अभ्यासात मोठी हुशार, 
बारावी नंतर इंजिनीरिंगचा प्रवेश पुण्यातील प्रख्यात कॉलेजात, 
चौथ्या वर्षी कॉलेजातून शेवटच्या वर्षी पास होण्या आधीच हातात दणदणीत पगाराचा जॉब,
मग लगेच गावाकडे असलेल्या तिच्या आईची लेकीच्या लग्नासाठी स्थळं बघायची जाम घाई. 
स्थळ निवड क्रायटेरिया एकदम ठसकेबाज,
लेकीच्या package च्या दुप्पट पॅकेज वाल्यांचीच फक्त लिस्ट मध्ये गणती. 
ब्रँडेड मॉल मध्ये, महागाचा शर्ट निवडावा तसा सगळ्यांनी मिळून एक मुलगा निवडला. 
त्याच्या पगारा च्या अकड्यावर finally राजी होऊन नाही हो करता करता, गाठ पक्की झाली. एका पगाराचे त्याच्या दुप्पट पगाराशी लग्न होवून बेरीज मूळ पगाराच्या तिप्पट झाली. गुटगुटीत झाली. बाकी दोन कुटुंब जुळणे, नाती, प्रेम, स्वभाव हे बायप्रॉडक्ट्स सरधोपट मार्गी आपोआप मागे मागे चालत आलेलेच, पण मूळ पाया पगारच. वाढता वाढता वाढे शून्य पगारा पुढचे, अशी लग्न उत्तर कहाणी सफल संपूर्ण.



भाग दोन, 
इंग्लंडात मोठ्या पडद्यावर मराठी सिनेमा... आनंदी गोपाळ.
अशी सुवर्णसंधी सारखी सारखी नाही, मग तो बघायला तिकिट मिळवण्याची बरीच मारामारी,
आम्ही चौघी मैत्रिणी finally सिनेमा गृहात दाखल. 
इंग्रजी देशात मराठी सिनेमा मोठ्या पडद्यावर बघायचा आनंद एंट्रन्स पाशी घेतलेल्या वडापाव आणि चहाबरोबर वाफाळत पारच उतू गेलेला, 

आनंदी गोपाळ... कल्पिलेला त्याहून कैक पटीत झक्कास, 
खऱ्याखुऱ्या प्रेरणादायी कथेच्या संगतीला गाणी, संगीत, संवाद, अभिनय याच्या कमाल मर्यादा ओलांडलेला, 
शंभर सव्वाशे वर्ष काळाच्या मागे नेऊन विचार प्रवाह उद्युक्त करणारा... 

दाखवलेले खूप प्रसंग भावले, त्यातला एक... 
लग्नासाठी गोपाळ रावांच स्थळ आल्यावर, 

आनंदी बाईंच्या आईच्या तोंडून सहज गेलेलं एक वाक्य,
" मुलगा सरकारी नोकरीत आहे, आपली मुलगी आयुष्यभर उपाशी नाही राहणार, बिजवर असला म्हणून काय झालं..."
हे ऐकून आम्ही दोघी मैत्रिणी एकमेकींकडे आ वासून बघत राहिलो.
पूर्वी, मुलींसाठी लग्नाचा घाट फक्त एवढ्याच साठी असायचा का?

पण आता
त्यानंतर सव्वाशे वर्ष उलटली, तरी लग्न जुळण्याचा मूळ पाया पैसा, नोकरी अजूनही हाच राहिला. मुलगी कमावती तरी मुलाचा पगार किमान दुप्पट हवा. बाकी कुंडली, पत्रिका हे सोईस्कर पारंपरिक सोपस्कार ही पगाराच्या आकड्या नंतरच. नाहीतर पत्रिका जुळतीये म्हणून कोण्या डॉक्टर मुलीने, घरी बसणाऱ्या मुलाशी लग्न नसते का केले?
आणि मग असा हा सगळा आर्थिक व्यवहार जुळवून आणल्यावर, लग्नाच्या गाठी स्वर्गातच कशा जुळलेल्या असतात असं ठासून सांगायला हात वर करून आम्ही मोकळे. 


भाग 3
सकाळच्या पहिल्या चहा नंतरची ऑफिसातल्या दुसऱ्या कॉफीची वेळ. 
इंग्रजी मैत्रीण आणि मी, बाहेर बऱ्याच दिवसाने पडलेल्या नितळ उन्हाची माझी उगाच वाढीव तारीफ. 
मात्र मैत्रिणीचा चेहरा मलूल...तिच्या ब्रेकअप चा माझा अंदाज अचूक.
तरीही कळेना नक्की काय बिनसलं असेल बुवा त्यांच्यात,
इथे तर हिचा आणि त्याचा दोन्ही पगार दणदणीत, त्यांच्यात ग्रह, ताऱ्यांचा मध्ये मध्ये कडमडायचा या देशात तरी प्रश्न नाही, मग, 'लग्नाचा सिरीयसली विचार करू या का, असं त्याने विचारल्यावर ही का नाही म्हणाली असेल. बहुतेक आता स्वभाव, सवयी वैगेरे गोष्टी व्यावहारिक पातळीवर जुळत नाहीत हे जाणवलं असेल का. माझ्या डोक्यात भुंगा...
किंवा, ' तो हा नव्हेच', असं दोन वर्ष एकाच घरात त्याच्याबरोबर राहून मग उमगलं असेल का. 


असो, तीन वेगवेगळे प्रसंग, लग्न या एकाच गोष्टी भोवती साधारण फिरणारे.
स्थळ आणि काळाच्या वेगवेगळ्या मोजपट्टीवर असल्यानं एकाच ढाच्यात बसणं तसं शक्य नाहीच आहे...!
 पण तरीही मोजपट्टी वरची परिमाणं लॉजिकली झेपणारी, विचार करून ठरवलेली आहेत ना हे पडताळून पाहायला लावणारी.
बरोबर, चूक असं कुठे काय असतं तसंही. सगळं सापेक्षच. 



--- अश्विनी वैद्य
  ६. १०. १९

राजस्थान डायरी : उदयपूर

उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थाप...