Wednesday 4 April 2018

महिला दिन



      जागतिक महिला दिनाच्या भरघोस शुभेच्छांचा आज दिवसभर नुसता पाऊस अनुभवला...अर्थातच व्हाट्सअँप आणि fb वर.... त्यावरचे अतिशियोक्त जोक्स, टिंगल कशालाच हल्ली कमी नसते सोशल मीडियावर. 

       आई, मावशी, काकू, आत्या, मैत्रिणी, मुली, सगळ्या जणींना हळदी कुंकूवाला असतो अगदी तसा उत्साह fb वर 'आम्ही महिला' या कॅटेगरीतले फोटो टाकण्यात किंवा महिला दिनाचा msg दुसऱ्या ग्रुप वर मनोभावे पुढे सरकावण्यात दिसत होता.... यात काही चुकीचे आहे असे मला अजिबातच म्हणायचे नाहीये. ज्या पिढीने 'बाई' म्हणून कायम एक पाऊल मागे राहण्याचा धर्म (उगाचच म्हणजे तसंच असतं असं मानून... किंवा कोणाच्या लादण्याने) स्वतःत रुजवला होता त्या पिढीला या अशा दिवसाचे अप्रूप वाटणारच. जागतिक महिला दिनानिमित्त वाचल्या गेलेल्या कविता, लेख त्यातून व्यक्त केलेल्या स्त्रीच्या वेगवेगळ्या प्रतिमा, तिचा त्याग,  यात कुठेतरी त्यांना स्वतःला relate करता आल्यानं असेल पण त्या वयातल्या आपल्या आई, मावश्या, यांच्या पिढीतल्या इतर बायका, मग त्या नोकरीतून रिटायर्ड झालेल्या का असेनात पण हा महिला दिन साजरा करण्याच्या निमित्तानं त्यांना इत्तर सगळ्यांकडून मिळालेलं अँप्रिसिएशन हवंसं वाटणं अगदी साहजिक आहे.(सासारी त्रास वैगेरे सहन केलेली ही शेवटची पिढी) असो.

        मागे पाच सहा वर्षांपूर्वी पहिल्यांदाच इंगंडला आलेल्या माझ्या एका मैत्रिणीच्या आईने त्यांचा अनुभव सांगितलेला, त्या इंग्लंडला आल्यानंतर जेमतेम महिन्याभराने मुलीच्या सांगण्यावरून त्यांच्या वयाच्याच अजून एका बाईंबरोबर त्या मॉल मध्ये शॉपिंगला गेलेल्या. दोघीचजणी. घरापासून एक बस बदलून तिथे पोचायचे होते. नवीन जागा, नवीन भाषा, वेगळे चलन...पण दोघीनी जमवले. भारतात, त्यांच्या गावात त्यांनी कधी एकटीने वाण सामान देखील आणले नव्हते की कसले पैशाचे व्यवहार स्वतः एकटीने कधीच बघितले नव्हते. त्या सगळ्यासाठी कायम 'नवरा'. शॉपिंग करून, परतीची बस पकडून, लेक कामावरून घरी येईपर्यंत त्या बरोबर पोचल्या परत. तेव्हा घरी आल्यावर काय आनंद झाला होता त्यांना.  त्या म्हणाल्या "माझ्यासाठी दुकानातून असं काहीच न आणून सुद्धा खूप काहीतरी मिळाल्यासारखं वाटलं होतं, त्या दिवशी मला. स्वतःच्या मर्जीने पैसे खर्च करण्यातला आनंद, स्वातंत्र्याचा आनंद, 'यांच्या' (नवऱ्या) शिवाय मलाही हे जमू शकतं याची स्वतःलाच पटलेली ओळख याचा आनंद... फार छान वाटलं होतं त्या दिवशी मला " असं त्या अगदी भरभरून सांगत होत्या. हे सगळं आत्ता आठवण्याचं कारण म्हणजे त्या पिढीचा जागतिक महिला दिन साजरा करण्या मागचा दृष्टिकोन या भावनेच्या अवती भोवतीच असेल कदाचित. तसं पाहिलं तर किती साधासा प्रसंग...पण त्यांना बरच काही देऊन गेलेला...जो आजवर पुरुषांपेक्षा आपण कमी या त्यांच्याच भावनेतून त्यांना कधीही न घेता आलेला, स्वतःबद्दलची माहित नसलेली बाजू स्वतःलाच समजावून गेलेला. हे अगदी महिला दिनादिवशीच व्हायला हवंय... असं नव्हे... किंवा या एकाच दिवशी नव्हे तर कायमच ती भावना जपता यायला हवी. स्वतःचा एक बाई पेक्षा एक व्यक्ती म्हणून आधी स्वतःने आणि इतरांनीही स्वीकार करावा हे atleast वर्षातून एकदा तरी लोकांना remind करण्याच्या निमित्ताने हा महिला दिन साजरा व्हावा असं या पिढीला वाटणं हे त्यांच्या दृष्टीने अगदीच अपेक्षित आहे.       

      सर्वानुमते ठरवलेले एक माप... 'पुरुष'. त्यांचं वागणं एक प्रमाण मग ते बरोबर असेल, वाईट असेल, जे असेल ते....पण समाजासाठी ते एक प्रमाण असतं. मग कोणी बाई भरधाव गाडी चालवते, तर "एखाद्या पुरुषाला लाजवेल इतकी छान गाडी चालवते ती...!" हा शेरा तिला मिळणं कितपत योग्य आहे किंवा कोणी खूप स्लो चालवत असेल तर, "बाईच चालवत असणार... बायकांना जमत नाही ते कशाला करतात कोण जाणे...! " असल्या प्रतिक्रिया ऐकायला मिळणं किती ठीक आहे? बाईच्या      
        कोणत्याही वर्तणुकीची 'पुरुष' या मापात बसणारी केलेली तुलनात्मक मोजणी... मग ते ड्रायविंग असेल, कुकिंग असेल, बिझिनेस सांभाळणे असेल, उच्चपदस्थ नोकरी करणं असेल, अगदी दारू पिणं असेल किंवा सिगिरेट ओढणंही असेल. 
         या सगळ्या वागण्याला ती एका व्यक्तीची वतर्णूक अशा दृष्टीने न बघता, हे एका बाईचं वागणं आहे अशा नजरेतून त्याचं मोजमाप ठरवणं...हे नकोय व्हायला. दारू पिणं, सिगारेटी ओढणं हे कोणीही केलं तरी वाईटच पण मुलींनी केलं कि, "ती मुलगी असून मुलांसारख्या सिगारेटी ओढते...!" ही कंमेंट बोचणारी आहे. पण केवळ ही दुय्यम भावना पुसण्याच्या उद्देशाने महिला दिन साजरा करणे हा हेतू ही योग्य नाही. एक बाई म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून घेता आलेले विचार स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, आणि ते घेताना त्याबरोबर येणाऱ्या सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची पूर्ण तयारी, या सगळ्याची जाणीव, एक मुलगी, एक बाई म्हणून सतत दुसऱ्यांनी appriciate करण्याची अपेक्षा करत राहण्यापेक्षा आधी आपल्या स्वतःलाही स्वतःबद्दल प्रेम, रिस्पेक्ट वाटतोय ना हे समजण्याची कुवत या गोष्टींचे भानही या महिला दिनाच्या निमित्ताने महिलानांच यायला हवे कि काय असे वाटते.     

       सध्याची पिढी अर्थात सध्याच्या मुली ज्यांच्या साठी त्यांचा बाबा त्यांचा लहानपणापासूनचा हिरो होता/आहे, ज्यांच्या बाबाने त्यांचे परी सारखे लाड करून सुद्धा त्यांना खंबीर आणि कणखर बनवले आहे, अशा शिकलेल्या, स्वबळावर उभ्या असलेल्या मुलींना हा महिला दिन अजूनही साजरा करावा लागतो त्याबद्दल खंत वाटते. स्त्री आणि पुरुष या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, कोणीच कमी किंवा अधिक नाही, हे ऐकत, शिकत आणि स्वतःत रुजवत मोठ्या झालेल्या पिढीला  'अजूनही मुलींचं समाजातलं स्थान मुलांइतकंच महत्वाचं आहे', हे किंवा त्यांचे हक्कं, त्यांचे अधिकार या गोष्टी या दशकताही समाजाला पटवून द्याव्या लागतात त्याबद्दल खंत वाटते आणि मग हा महिला दिन साजरा करण्यात स्वारस्य वाटत नाही... जे त्यांच्या या दृष्टिकोनातून जराही चुकीचे नाही. पण लहान गावांमध्ये, खेड्यात अजूनही हे चित्र शहरांपेक्षा वेगळे नक्कीच आहे.     

       पुन्हा याचीच दुसरी बाजू म्हणजे आम्ही बायका, आम्ही मुली मुलांपेक्षा कशा वरचढ, आमच्या शिवाय काही होऊ शकत नाही, आमची थोर महती वैगेरे सांगण्यासाठी महिला दिन साजरा करणे आणि म्हणून वर्षातला हा एक दिवस महिलांना पार डोक्यावर घेऊन नाचायचे हे तर अगदीच हास्यास्पद आहे. किंवा एकीकडे  मुलगी म्हणून आरक्षणाचा फायदा घेऊन दुसरीकडे जेन्डर equality वर तावातावाने बोलणे, स्वतःच्या स्त्रीत्वाचे पोवाडे गात फिरणे, हे अगदीच कमीपणाचं आहे. हा विरोधाभास अनुभवावा लागल्याबद्दल स्वतःचीच कीव येण्यापलीकडे यातून काहीही सिद्ध झालेले नाही हेच लक्षात येईल.       

       महिला दिन साजरा करणे न करणे या बद्दल, प्रत्येकाची भूमिका वेगळी असेल, मते वेगळी असतील. पण आज सोशल मीडियावर वाचलेल्या अनेक शुभेच्छा बघून, आनंद, राग, उपहास, हास्य आणि शेवटी केविलवाणेपणा असे मिश्र भाव मनात आले आणि वरचे माझे मत लिहावे वाटले. 
वाचल्याबद्दल धन्यवाद.  

अश्विनी वैद्य 
८ मार्च २०१८ 

(टीप : यात wiki वर खरडलेला UN चा जागतिक महिला दिनाबद्दलचा इतिहास मी वर कुठे कुरतडण्याचा प्रयत्न मुद्दाम केलेला नाही... तसेही आम्ही भारतीय प्रत्येक गोष्टीला एक इमोशनल टच देण्यात अगदी पटाईत. त्यामुळे इंग्लंडात (जिथे IWD बद्दल फारसे कोणाला काही माहितही करून घ्यायचे नाही अशा ठिकाणी) बसून जागतिक महिला दिनाच्या भारतीय (महाराष्ट्रीय (पुणे/ मुंबई)) version बद्दल माझी मते मांडण्याचा आगाऊपण केला आहे.  त्यामुळं न पटल्यास... जाऊदे...देवू सोडून... तसाही संपला आता महिला दिन... !)

राजस्थान डायरी : उदयपूर

उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थाप...