Saturday 18 June 2016

कै च्या कै


        फार फार पूर्वी किनई नोकरी करणाऱ्या बायकांना कमी समजलं जायचं, (म्हणजे पैसे कमावण्यासाठी बाईला बाहेर पडावं लागणं हे कमीपणाचं मानायचे ना त्या काळातलं बरंका हे) अगदी तसंच तेव्हा हाटिलात खाणाऱ्यानाही कमीच समजलं जायचं ("आई, घरी नीट सैपाक करत नाही का रे" असे टोमणे मिळायचे त्यावेळी.) म्हणजे आज्जी, आई, बायको, बहिण या by default सुगरणच असायच्या ना तेव्हाचं हे…गेला बाजार ३०-४० वर्षांपूर्वीचं. (सध्या आई-आज्जीचे वाढदिवस सुद्धा मोठ्या मोठ्या डायनिंग हॉल मध्येच तिथल्या 'सुगरण' शेफ (स्वयापाकी पुरुषांना पण सुगरणच म्हणत असावेत असं मानते आता)(हे कंसात कंस टाकायची लैच घाणेरडी सवय लावलीये राव....श्या) तर त्या 'सुगरण शेफ' च्या हातच्या चवीचे कौतुक करतच आयोजिले जातात हा भाग वेगळा. असो, तर मुद्दा हा की, ही अशी हाटिलात खायची वाईट सवय तेव्हापासूनची, इतकी जुनी…पण हल्ली मात्र या अशा सवयीला 'ष्टेटस शिम्बोल' वैगेरे मानायला लागल्यापासून हाटेलात खाणे ही एक अभिमानाचीच बाब झालीये हे एक माझ्यासारख्यांसाठी बरंच झालंय. 

         तर ही सगळी प्रस्तावना लिहिण्यामागचे कारण एव्हाना लक्षात आलेच असेल. इथून भारतात यायचे तिकीट काढल्यापासून actual निघे पर्यंतच्या काळात बरीच तयारी (अर्थातच shopping) असते खरंतर… म्हणजे इकडून तिकडे न्यायाच्या गोष्टींची, भेटवस्तूंची खरेदी वैगेरे तर आहेच पण महत्वाचं म्हणजे वेगवेगळं खायची लैच हौस ना जीवाला, त्यात स्वतःच्या स्वयंपाक घरात बरेच प्रयोग यशस्वी-अयशस्वी रित्या पार पाडले असल्याने आता कंटाळा आला होता, त्यामुळं या भारत (पुणे) वारीत कुठं कुठं हादडून यायचं याची मोठी यादीच करायाची मी ठरवलं. म्हणजे खरंतर बऱ्याच दिवसांनी घरी जाणार असल्यामुळं, "आपल्या लेकीला, स्वतःच्या हातचं हे खायला घाल, ते करून घाल, वैगेरे घरचा पौष्टिक खुराक (सासर-माहेरच्या आया) दिवसाचे चार प्रहरी, सगळेच दिवस नेहमी प्रमाणे करत राहणार होत्याच, पण हल्ली कसलं भारी भारी मिळायला लागलंय ना हाटीलात…म्हणजे आत्ता नुसत्या कल्पनेनेच तोंडातून ओघळ वैगेरे पाझरायलेत. म्हणून मग ही अशी लिस्ट handy असणं कधीही सोयीचंच नाईका…! ती बनवणं मग मी फारच मनावर घेतलं ब्वा. वेळ मिळेल तशी माहिती जालावर शोधमोहीम चालू केली. 

        'श्री उपहार गृहातली मिसळ, अनारसे सामोसेवाले, पुष्करणी भेळ, गणेश भेळ, बेडेकर मिसळ, इंद्रायणी आणि मुरलीधरचा उसाचा रस, ग्रीन बेकरीतले व्हेज पाटिस, सुजाता मस्तानी, relax ची पाव भाजी, अप्पाची खिचडी, अमृततुल्यचा चहा…' आमच्या सारख्या बाहेरगावहून पुण्यात आलेल्या लोकांची धाव तुळशी बागेत मिळणाऱ्या या कानातल्या-गळ्यातल्या इथवरच. याच्या पुढे यादी वाढवली पाहिजे म्हणून केलेली ही सगळी उठाठेव. 

       पुण्यातले मॉल्स, तिथली प्रसिद्ध आणि नामांकित restaurants यांची महती बऱ्याच ओळखीच्यांकडून आधीच पोहोचली होती, आणि त्यानुसार त्याची चव चाखालीही होती. पण यावेळी मला छोट्या छोट्या कोपऱ्यावरची साधीच पण स्वर्गीय चव असणारी ठिकाणं शोधायची होती. 'तेव्हा खाण्यासाठीच जन्म आमुचा' या typical कॅटेगरी मध्ये मोडणाऱ्या माहितीजालावर वावरणाऱ्या कधीही न भेटलेल्या पण अस्सल खवैय्यांनी दिलेल्या माहितीने तोंडाला अशक्य पाणी तर सुटलंच पण, ज्या काही नवनवीन ठिकाणांची माहिती मिळत गेली, त्याच्या नावांनी, तिथे मिळणाऱ्या पदार्थांच्या रसभरित वर्णनांनी, त्या सांगण्याच्या पद्धतींनी मला हे सगळं लिहायला भाग पाडलं. 

तर "पुण्यात चांगली बाकरवडी कुठे मिळते? चितळे सोडून !" या धरतीवर आधारित माझ्या टुकार प्रश्नांना मला माहितीजालावर मिळालेली माहिती खालीलप्रमाणे 

ठिकाण : अर्थातच पुणे (इकडच्या ब्रिटीश मैत्रिणीला पुणे जितके अनभिज्ञ दुर्दैवाने तितकेच मलाही… असं मला कायम वाटतं, असो )   
तर मिळालेली माहिती इटालिक फोन्ट मधील आणि ती वाचून त्या क्षणी मनात आलेले भाव त्याच्या खाली लिहिले आहेत.  

* चांदणी चौकातल्या टेस्टी टंग्स मध्ये डॉलर जिलबी आणि मालपुआ अप्रतिम मिळतो. * 

माझे सामान्य ज्ञान जरा जास्तच सामान्य असल्याने आधी कधीही न ऐकलेला हा 'डॉलर जिलबी' प्रकार माझ्या टंगला कितपत टेस्टी लागतोय हे बघण्यासाठी मला डॉलर नाही पण पौंड तरी नक्कीच खर्च करून तिथे जावे लागणार होते. 

*आपटे रोडवरच्या शाहजी पराठा हाउस मध्ये पराठे अप्रतिम मिळतात. थोडे महाग आहेत. पण वर्थ व्हिजिट. इथला चुर चुर नान, अमृतसरी नान आणि बनारसी आलू पराठा केवळ अप्रतिम.*

आता हा 'चुर चुर नान' काय प्रकार असेल ब्वा… म्हणजे तो दाताखाली आला की असा चूर चूर वैगेरे आवाज येत असेल का? की तो भाजण्या ऐवजी चूर्र आवाज करत तळत-बिळत असावेत कोण जाणे. 

*ढोले पाटील रोडवर द्रविडाज बिस्ट्रो नव्याने सुरु झाले आहे. सिटी पॉइंट मध्ये. उत्कृष्ट दाक्षिणात्य पदार्थ मिळतात.* 
एक तर ढोले पाटील हे नाव कानावर पडले की, लेंगा-सदरा-गांधी टोपी घातलेली ढेरपोटी व्यक्ती डोळ्यासमोर येते त्याला जेवायला याच रेश्टोरंट मधील डोसा वाढून त्याच्या पुढ्यात या बिस्ट्रोतले काटे-चमचे देवून, 'हं करा आता डोश्याशी युद्ध' म्हणत स्वतः मात्र मनगटा पर्यंत हात भरवत सांबार-भाताचे गोळे कचाकाच चापत बसलेला लुंगीतला शेट्टी भटारखान्यात बसलाय असलं चित्र डोळ्यासमोर तरळलं. 

याच धरती वरचे 'भाऊ पाटील चौकात दिल्ली चाट दरबार सुरु झाले आहे.' म्हणे 

*कोथरुडला कोकण एक्स्प्रेसच्या गल्लीत मस्ती मिसळ आणि पौड फाट्यावर किमयाच्या पुढच्या (कोथरुड कडुन नळ स्टॉप कडे जाताना) गल्लीतली कोल्हापुरी मिसळ निरातिशय सुंदर.* 
कोथरूड मधली कोकण एक्स्प्रेस नामक गल्ली, तिथली ही मस्ती मिसळ आणि तिला लाभलेली कोल्हापुरी चव… म्हणजे हा सगळा नावांचा योगायोग मानावा की जागेचा 

*कोथरुडलाच करिष्माच्या येथील खाऊ गल्लीत सिन सिटी नावाची बेकरी आहे. येथील सर्वच केक्स सुंदर. खास करुन इटालियन कसाटा, हनी अल्मंड तर लय भारी.* 
माझ्यासाठी खाऊ गल्ली म्हणजे, 'अस्सावा सुंदर चोकोलेटचा बंगला' मधील तो 'बंगला' ज्या गल्लीत आहे ती खाऊ गल्ली… मग तिथे मी वाट्टेल तो खाऊ वाट्टेल तसा खातीये, वाढायला डॉक्टरच बसलेत… 'खा गो पोरी, हवं ते हवं तितकं हावरटा सारखं फक्त खा' असं मला ते म्हणताहेत…शिवाय या सगळ्यामुळे माझे वजन जराही वाढत नाहीये… असलं कै च्या कै वाटायला लागतं. 

*Bounty sizzlers कल्याणीनगर, पुणे. अप्रतिम शाकाहारी आणि मांसाहारी सिझलर्स मिळतात.
कसे जावे: पुणे नगर रस्त्यावर रामवाडी जकात नाक्यच्या चौकातुन उजवीकडे वळावे. बिशप स्कुलची इमारत गेली की पुढच्या बाजुला उजव्या हाताला छोट्याशा रस्त्यावर वळालात की लगेच दिसेल. *
हे मात्र काहीही झालं तरी या ट्रीप मध्ये नक्कीच खाणार… अर्थात डावं-उजवं नीट कळलं की पत्ताही सापडेल म्हणा …!
मागे अशाच एका खादाडीच्या ठिकाणाचा पत्ता कोणाला तरी विचारला होता तेव्हा, "दुर्वांकुरच्या समोरचा बोळ, म्हणजे दुर्वाकुरच्या दारात अलका कडं तोंड करुन उभं राहिलं की डाव्या हाताचा बोळ" असं काहीसं उत्तर आलं होतं, म्हणजे अलका नावाचे टोकीज हे सिनेमा बघण्यासाठी कमी पण पत्ता शोधण्यासाठीच तिथे बांधले गेले आहे असं वाटावं इतक्या वेळा मला त्याचा उपयोग केवळ पत्ता शोधण्यासाठीच  झाला आहे. सिनेमाही दाखवत असावेत म्हणा तिथे.   

*एफ सी च्या वाडेश्वर ची मोहीम हाती घ्यावी आणि नियमित पणे हजेरी लावून सगळे पदार्थ निदान एकदा खाल्ल्याचं पुण्य पदरात पाडून घ्यावं. *
हे बाकी खरंय हो, म्हणजे अंदाजे २५-३० पदार्थ जर यांच्या मेनूकार्डावर असतील तर किमान रोज एक च्या हिशेबाने सगळेच दिवस तिथे जाणे आले. 

*गांधी लॉन्स च्या लायनीत म्हणजे कोथरुड आय्सिआय्सिआय्च्या समोर एक काळुबाई गार्डन वडापाव नावाचं दुकान आहे, अगदी खास मराठी वडे असतात त्याच्याकडे.*
वडापाव हे एकतर समस्त मराठी लोकांचे खूप जिव्हाळ्याचे श्रद्धास्थान आणि ते चिरकाल तसेच राहो यासाठी 'देवी काळूबाई' चा आशीर्वाद त्या गार्डन मध्ये उभा राहून 'काळ्याकुट्ट' तेलात वडे तळणाऱ्या त्या दुकानाच्या मालकाला कायम लाभत राहो, हीच सदिच्छा. बाकी, दोन पावांच्या मध्ये वड्या बरोबर कैरीची बारीकशी फोड घातलेला हा वडापाव सध्यातरी लिस्ट मध्ये टोप लाच ठेवलाय. 

*मॉडेल कॉलनी /शिवाजीनगर मध्ये (खूप आत खोपच्यात आहे हे हॉटेल.) राधिका व्हेज. इथला मसाला पापड ऑस्सम एकदम. * 
पुण्यात लोक मसाला पापड खाण्यासाठी सुद्धा बाहेर जेवायला जातात, खरच शिकण्यासारखी गोष्ट आहे नाई ही. या शोधावरून मला तरी असंच वाटतं, 

*शुक्रवार पेठेत केळकर संग्रहालयाच्या जवळचे बापट उपहारगृह. इथली कारल्याची भाजी, भाकरी, मटकी आणि मटार उसळ एकच नंबर.*
चला म्हणजे हेही नसे थोडके, जिभेचे चोचले पुरवायचे म्हणजे किती चमचमीत खावं, काही भान म्हणून मग हे असं घरगुती ट्राय करायला काहीच हरकत नाहीये. अर्थात घरी रोज याच ढाच्यातलं खातो, त्यामुळं इथं खाण्याचा चान्स तसा कमीच आहे. कधीमधी घरचं खावं लागणारच.   

*कोथरुडला (पौड रोड) स्ट्यु आर्ट हे अतिशय अप्रतिम छोटेसे हॉटेल आहे. वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्यु अतिशय दर्जेदार मिळतात. हंगेरियन गुलाश खास प्रसिद्ध *
जेवढा वेळ नकाशावर हंगेरी शोधायला लागेल त्याच्या निम्म्या वेळात हे हंगेरियन गुलाश का काय आहेत ते नक्कीच चापून होतील….! 

*सदाशिव पेठेमधलं "रस्सा: जसा हवा तसा" झॅक जागा आहे चिकन आणि फिश खायची. *
कधी कधी आपली कल्पना शक्ती किती तोकडी पडते नाई…सदाशिव पेठेत हे असं काहीसं मिळत असेल हे स्वप्नात सुद्धा नसतं वाटलं मला. पण या येळेला नक्की खाणार. 

*हातभर लांबीची सुरमई .. बिनसाउथइंडियन मसाला भरलेली.. काय सॉलिड असते राव.. जोडीला लेयरवाले फ्रूट पंच...*
हे वाचून तर अक्षरशः कोकणात खाल्लेली मालवणी मसाल्यातली ताजी सुरमई क्षणभर तोंडातल्या तळ्यात पोहायलाच लागली. नक्कीच जाणार. 

या पृथ्वीतलावरचे माझे सगळ्यात आवडते पेय म्हणजे 'चहा'. दहावी, बारावीत पहाटे अभ्यासाला उठण्याची सवय लावून घेतली ती केवळ हा चहा मिळणार याच आशेपायी. बाकी अभ्यास वैगेरे उगाच आपलं. तर हा तरतरी देणारा चहा कधीही, कुठेही, कितीही वेळा पिण्याची इच्छा झाली तर माहित असावा या कै च्या कै विचाराने गम्मत म्हणून माहितीजालावर शोधला. 

*माउली चहा (पिंपरीगाव)- कराची चौक, जयहिंद हायस्कूल मागे टाकत सरळ पुढे जायचे. एका ठिकाणी डाव्या बाजूला प्रचंड गर्दी दिसेल तोच माऊली चहा. कुठलाही मसाला न घालता केलेला अतिशय कडक चहा. जबर्‍याच आहे एकदम फक्त १० रूपयांत. वर्षानुवर्ष तीच चव…!*

कसं जमतं ना त्यांना… म्हणजे माझ्या सकाळच्या पहिल्या चहाची चव सुद्धा संध्याकाळच्या चहासारखी नसते आणि हे वर्षानुवर्ष तीच चव कसे मेंटेन करत असतील नै. मला आपले बाहेर पडल्यावर गावात दिसणारे 'अमृततुल्य'च चहासाठी स्वर्गीय वाटलेत आजवर. पण गेलेच चुकून त्या भागात तर नक्की लक्षात ठेवेन माउली चहा. 

आमची घरची बिर्याणी तशी लय भारी असते पण तरीही घरातल्यांना अशीच एकदा सीकेपी style खायची काय हुक्की आली कोण जाणे. मग आम्ही स्वारगेट हून कमिन्स कॉलेज च्या परिसरात असणाऱ्या अशाच एका खोपचीतल्या बिर्याणी स्पॉट कडे भर उन्हाची धाव घेतली. जायचा यायचा उन्हात निथळण्याचा एक-एक तास सोडला तर बाकी कष्ट त्या बिर्याणी च्या चवी पुढे खरच काहीच नव्हते… खावून संपवल्यावर त्यांचे ते बिर्याणी चे स्पेशल भांडे (दम दिलेले) दुसऱ्या दिवशी परत नेवून द्यायला आम्ही पुन्हा कमिन्स कॉलेज गाठले. किती ती खाण्याची हौस ना….असो, 

एकदा असंच माझ्या एका मैत्रिणीच्या सांगण्यावरून अग्रज फूड्स मध्ये जाणं झालं, तिथं शहाळ्याच्या पाण्यात भिजवून तयार केलेले खारेदाणे, कमळाच्या बिया फुलवून तयार केलेल्या 'कोलेस्टेरॉल विरहित लाह्या, उपासाची शिंगाड्याच्या पिठाची कुरडई, उपवासाची मिसळ, उपवासाचे लाडू, बिस्किटे, नाचणी, ज्वारी ची बिस्कीटं, कधी कल्पनाही न केलेल्या धान्यांचे पापड, अनंत प्रकारच्या चटण्या, लोणची,  डाएट चिवडा, काकवी, हे असले अति म्हणजे अतिचहुच्च पदार्थ मी मोठ्या हौसेने विकत घेतले…बिल बघून मिनिटभर मलाच कळेना की मी साड्यांच्या दुकानात आहे की खादाडीच्या…एक तर हे असलं काहीतरी विकत घ्यायची दांडगी हौस आणि मग ते खाताना आणि खाऊ घालताना "कसलं भारीये ना !" म्हणत इतरांना पटवून द्यायचा आटापिटा…शिवाय इकडं परत आल्यावर त्याची जाहिरातबाजी…आणि माझं हे सगळं सहन करावं लागलेला सोशिक पुणेरी नवरा. 

असो, तर पुढे पुढे बार्बिक्यू नेशन, तिरंगा, सावजी, ब्लू नाईल, समुद्रचे सी फूड, नॉट जस्ट जाझ बाय द बे मधला लंच बुफ्फे, रोल्स मॅनियाचे सगळेच सुंदर रोल्स, एम. जी. रोडवरील मार्झोरीन ची सँडवीचेस, काटा किर्र ची मिसळ, ले प्लाझिर चा चीजकेक, कॅम्पातले द प्लेस, म्यारीऑट चा स्पैस किचन चा बुफ़ॆ, इ-स्क्वेअरच्यावर असलेले ऑल स्टर फ्राय, औंधमधल्या स्किप्स कॅफेतला ब्रेकफास्ट आणि सँडविचेस, 'वे डाऊन साऊथ' नावाचं फाईन-डाईन रेस्टॉरंट, मॉडेल कॉलनीतलं हॉल्ली क्रेप्स, बर्मीज खाउ सी, शिवाजी पुतळ्याजवळ कोथरूड ला खत्री यांचे गुलकंद किंवा मैंगो आइसक्रीम, डेरीडोन ची आईस्क्रीम्स…काय नि काय नि काय….बापरे, आता मात्र browser बंद केला. 

यादी चांगलीच वाढायला लागली. म्हणजे, मी भारतात सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त आणि फक्त खाण्यासाठीच निघालीये की काय असं वाटायला लागलं. UK मध्ये राहिल्यामुळं गेल्या वर्षभरात जे काही मिस केलं ते एका महिन्यात रिचवणार असंच एकूण चित्र दिसायला लागलं. या आधी यातल्या नामांकित ठिकाणी खाणे  झाले होतेच, नाही असे नाही. पण त्यात snacking तसे कमीच, खूप वाट्या वाला थाळी प्रकारही तसा थोडा अप्रियच (चव घेण्या ऐवजी वाट्या मोजण्यातच माझा बराच वेळ जातो म्हणून झेपत नसेल कधीच) म्हणून मग हा सगळा कै च्या कै उद्योग. या सापडलेल्या ठिकाणातली सगळीच उत्तम नसतीलही कदाचित, यापेक्षाही भन्नाट ठिकाणं राहून गेलीही असतील. पण या सगळ्यामुळं पुण्यावरचे माझे खाद्यप्रेम कैकपटीत वाढले, हे बाकी 'कै च्या कै' च झाले.    


                                                                                अश्विनी वैद्य 
                                                                                 १८. ०६. १६  

Friday 10 June 2016

Nature's Thoughtful Trail



         असंच एका पहाटे अर्थातच सुट्टीच्या दिवशी, पाठीवर छोटी bag अडकवून (पोटापाण्याची सोय) आणि आवडत्या गाण्यांची playlist load केलेला फोन बरोबर घेवून अगदी एकटीने पायी बाहेर पडले. ठरवले असे काहीच नव्हते. म्हणायला तरी, रस्ता नेईल तिकडे पाय वळवणार होते… पण पायाखालची माती अगदीच अनोळखी नव्हती, त्यामुळे नेहमीच्या रस्त्याने गावाबाहेर पडले. बाहेर पडताना आजवर चिकटलेले किंवा चिकटवून घेतलेले सगळे मुखवटे, सगळ्या जबाबदाऱ्या, सगळी लेबलं, तात्पुरते तरी काढून ठेवून, निदान तसा प्रयत्न करून घराबाहेर पडणार होते. एका मोड मधून दुसऱ्या मोडमध्ये स्वतःला असं पटकन स्विच करणं तितकंसं नाही जमत, पण तरी हे सारं अडकलेपण थोडसं उसवून, गुंता थोडा सैल करायचा होता. 

गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळूदे थांब ना 
हूल की चाहूल तू इतके कळू दे थांब ना 
गुंतलेला श्वास हा, सोडवू दे थांब ना 
तोल माझा सावरू दे थांब ना 

         सुदैवाने आमच्या गावाच्या जवळच एक भरपूर उंच, मोठ-मोठी, दाट झाडी असलेला जंगल वजा विस्तीर्ण भाग आहे, मी चालत असलेली वाट तिकडे वळाली. साधारण अर्ध्या तासात चालत मी तिथे पोहोचले. पहाटेला प्रसन्न करण्याचं कोणतं सामर्थ्य या निसर्गात असतं ना कोण जाणे, मग ते अगदी घनदाट जंगल असो, एखादं लहानसं खेडं असो, गजबजलेलं मोठ्ठं शहर असो किंवा अगदी माळरान असो…पहाट जन्मते तीच मुळी प्रसन्नतेची आणि प्रफुल्लतेची आभूषणं लेवून आणि तेच सौंदर्य नुसतं डोळ्यांनी टिपण्यासाठी नाही तर अगदी कणाकणानं अनुभवण्यासाठीच आज ही पहाटेची वेळ गाठायची होती. 



          नुकतच उजाडू लागलं, उंच झाडांच्या दाट पडद्याआडून कोवळी सूर्यकिरणं जणू लाजत खाली जमिनीकडे हळूच डोकावत होती. त्यातल्या काही खालपर्यंत पोचलेल्या सोनेरी रेषा जमिनीवर वाढलेल्या खुरट्या गवतावर जमलेल्या दवाबिंदुना मोत्याचे रूप देत होत्या, मध्येच पसरलेले जांभळट, गुलाबीसर fuschia चे बहरलेले गुच्छ डोळ्यांना तृप्त करत होते. मधून मधून येणारे वेगवेगळ्या पट्टीतले पक्षांचे गूज कानांना सुखावत होते. पायवाटेवर पडलेल्या पानांचा सडा ती पायवाट आहे हे कळण्या इतपटच विरळ होता. त्या क्षणी तिथे अगदी भरभरून पसरलेली ती प्रसन्न शांतता खूप हवीशी वाटत होती. खूप छान वाटत होतं…कधी कधी हे असं वाटणं व्यक्त करण्यासाठी शब्द किती अपुरे असतात ना.




         निसर्गाने उभारलेल्या त्या शोभिवंत मांडवातून पुढे पुढे तशीच चालत राहिले, थोड्या अंतरावर एक छोटा तलाव पसरलेला दिसला. त्याच्या काठावर कोवळी उन्हं अंगावर घेत चार-सहा बदकं आणि साधारण आठ-दहा canadian geese आरामात बसले होते तर काही जणू शुचिर्भूत होण्यासाठी तलावात पोहत होते. त्यांच्या पोहण्याने पाण्यावर हलकेच उमटलेले तरंग काठावर येवून विरत होते. तलावाच्या दुसऱ्या बाजूने दोन राजहंस माझ्यापासून जवळ असलेल्या काठाकडे येताना दिसले. त्या निळसर हिरव्या अंथरलेल्या पाण्याच्या गालिच्यावर हे देखणे, शुभ्र हंस अगदी राजाच्या डौलात येत होते. 




         आत मध्ये येताना या भागाचा नकाशा आणि इथे दिसणारे पक्षी, प्राणी यांची विस्तृत माहिती दिली होती. त्यामुळं एखादं गोजिरं हरीण या तलावाकडं येताना दिसावं असं खूप वाटत होतं. पण अजून तरी दिसलं नव्हतं. बाकी विशेष काही प्राणी असण्याची शक्यताच नव्हती. पण पानांचा आडोसा घेतलेले पक्षी मात्र बरेच असावेत असा अंदाज बांधायला काहीच हरकत नव्हती, इतकी त्यांची गोड गाणी कानांवर पडत होती. बराच वेळ चालल्यामुळं पायांना जरा विसावा देत बाजूच्या गवतावर मग मी ही खाली टेकले. कुठे कसली गडबड नाही, गोंधळ नाही, कोणाची कशासाठी घाई नाही. सगळं कसं शांत, सुंदर. हे सारं डोळ्यांकरावी आतपर्यंत किती आणि कसं साठवावं, किती भरून घ्यावं कि नुसतच त्यात सामावून जावं, कळेना. बराच वेळ बसले, ती शांतता आत कुठेतरी रुजत होती.  


सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला 
नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला 

            एक इटुकली खार अगदी पायाजवळून गेली, तेव्हा तंद्री भंग पावली…कधी कधी काहीच न बोलताही आपण स्वतःशीच खूप बोलत असतो. माझं ते बोलणं तोडत ती खार पायाजवळून सरसर झाडावर चढली. मग मीही उठले, मगाशी धरलेली ती वाट पुढे कुठे जातीये हे बघण्यासाठी परत चालायला लागले. दोन्ही बाजूंना पसरलेल्या उंच झाडांमधून जाताना निसर्गापुढे असलेलं आपलं खुजेपण परत परत जाणवत होतं. कैक वर्ष कणखरपणे, मजबूतीने उभ्या असलेल्या त्या झाडांना, हलक्या, नाजूक पण त्यांवर विश्वासाने लपेटलेल्या वेलींना, बहारलेल्या फुलांना, त्या स्थितप्रज्ञ राजहंसाना एका पाठोपाठ एक शृंखलेत ओवत ती पायवाट रुंद होत होत जंगलाबाहेर पडली. पुढे एका हमरस्त्याला मिळाली. तिथून मी दोन गावांना जोडणाऱ्या एका आतल्या रस्त्याला लागले. 

        आता उन्हं चांगली डोक्यावर यायला लागली होती. सुट्टीचा दिवस असल्यानं विशेष रहदारी नव्हती. काही उत्साही लोक पळायला बाहेर पडले होते, तर काही सायकलिंग करणारे ग्रूप ने दिसत होते. उन्हाची तीव्रता हवेत असलेल्या गारव्याने नाहीशी होत होती. खूप दिवसांनी मी अशी रस्त्याच्या एका बाजूने पायी चालले होते. एरवी गाडीतून जाताना लक्ष न गेलेल्या बऱ्याच गोष्टी त्यामुळं दिसत होत्या. एकसंध आकाशाला छेदणारे पाखरांचे थवे मधून मधून उडत होते. हलक्या वाऱ्याबरोबर dandelion चे तुरे फुलापासून विलग होवून गवतावर जावून पडत होते. इथून पुढच्या आठवड्याभराच्या तरी उन्हाची खात्री देणारे ladybirds गवतावर मध्येच उठून दिसत होते. या दिवसात हमखास दिसणारे ब्रिटीश रॉबिन अगदी आपल्याकडच्या चिमण्यासारखे जागोजागी उडत होते.


       निसर्गाच्या शांत सानिध्यात जेव्हा जेव्हा जायला मिळतं तेव्हा स्वतःच्याही जरा जवळ जाता येत' असं आपलं मला नेहमी वाटतं. स्वतःपासून थोडं बाजूला होवून स्वतःकडेच पाहता येतं, मग तेव्हा उगाचच खूप बाऊ केलेल्या गोष्टी अगदी क्षुल्लक भासतात, छोट्या गोष्टींमधले आनंद जाणवतात, स्वतःचे चूक-बरोबरचे पारडे अगदी सरळ धरता येते, झालेल्या चुकांमुळे येणारा अपराधी भाव निवायला उभारी मिळते. शेवटी काय तर, घरातून निघताना उतरवून ठेवलेले सगळे मुखवटे दारात वाट बघत थांबले होते, त्यांना परत चढवावे तर लागणार होतेच, पण ते कायम स्वरूपी चिकटून आतल्या खऱ्या चेहऱ्याला कायमचे पुसून तर टाकणार नाहीत ना एवढीच खबरदारी घ्यायची होती ही जाणीव कुठेतरी झाली बस्स एवढंच. 

बावऱ्या माझ्या मनाचे उलगडे ना वागणे 
उसवणे होते खरे कि हे नव्याने गुंतणे 

           पुढे बराच वेळ चालल्यानंतर रस्ता ओळखीचा वाटू लागला. माझ्या गावाच्या खुणा लांबून दिसू लागल्या आणि मगापासून bag मध्ये ठेवलेला फोन गाणी ऐकण्यासाठी मी बाहेर काढला.  




अश्विनी वैद्य 

१०. ०६. १६

राजस्थान डायरी : उदयपूर

उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थाप...