Thursday 15 September 2022

कृष्ण किनारा

 कृष्ण किनारा - पुस्तक परिचय 


पुराणातल्या कथा, पोथ्या, दंतकथा यातल्या तत्वज्ञानामध्ये, त्यातल्या मानवी मनाविषयीच्या कुतुहलामध्ये, त्याला जडलेल्या सुखदुःखांमध्ये माणसाला भारून टाकण्याची मोठी ताकद आहे. पण या पृष्टभागावरच्या नवलाई खाली अंधारानं व्यापलेली तळघरंही आहेत. तिथे पुष्कळ बायका देवत्वाचं नख लागून, पातिव्रत्याचं विष पिऊन, समाज पुरुषाच्या मिठीत घुसमटून, कधी झगडून, कधी अबोल सोसून मरून पडल्या आहेत. त्यातल्या काही जणी आजच्या वर्तमानातही वावरताना कुठल्या न कुठल्या रूपात सतत अवती भवती भेटत राहतात आणि पुन्हा पुन्हा आठवत राहतात. अरुणाताईंना अस्वस्थ करणाऱ्या या अनुभवातून बाहेर पडण्याचा एक प्रयत्न म्हणून त्यांनी पुराणातल्या त्या काही जणींविषयी लिहिलं. त्यावरचं त्यांचं एक पुस्तक नुकतच वाचलं, कृष्ण किनारा. आज त्याबद्दल थोडंसं.  



राधा, कुंती आणि द्रौपदी या तिघींच्या बाईपणाभोवती लिहिलेले तीन दीर्घ लेख म्हणजे अरुण ढेरे यांचं कृष्ण किनारा हे पुस्तक. कुंती, द्रौपदी महाभारतातल्या आणि राधा ही भागवत प्रेरित पुराणातली. 

तरुण कृष्णाबरोबर समर्पणाचं, श्रेष्ठ प्रेमाचं प्रतीक होऊन राहिलेली सुंदर युवती राधा आपल्या साऱ्यांच्याच ओळखीची, पण त्यानंतर वय उतरणीला लागलेल्या राधेची हकीकत मात्र पुष्कळ नंतरची. कृष्णाभोवतीचं, त्याच्या सहवासा वाचून त्याच्यात गुंतलेलं राधेचं भावविश्व सांगणारा अतिशय तरल असा या पुस्तकातला त्यांचा पहिला लेख 'राधा'. अनेक वर्षांच्या कृष्ण विरहानंतर आयुष्याच्या संध्याकाळी राधा कृष्णाला भेटायला जाते. सागर किनारी सूर्यास्ता नंतरची राधा कृष्णाची ती भेट, हा असा प्रसंग लिहावा हे वाटणंच मुळात किती कोमल आहे. अरुणा ताईंनी तो अगदी सुरेख आणि ओघवता लिहिला आहे. 

तारुण्यात राधेला गोकुळात तसाच सोडून गेलेला कृष्ण, त्यानंतर कित्येक वर्ष त्याच्या भेटीसाठी तळमळलेली राधा आता इतक्या वर्षांनंतर मथुरेत त्याला भेटायला जाते, तेव्हा त्या भेटीत आजवरच्या सुखदुःखाचे जमा खर्च स्वतःतून उसवून एकमेकांना सांगणं असं अगदी लाघवी आणि मधाळ संभाषण लिहिण्यासाठी प्रतिभेचा वरद हस्तच हवा, त्या खेरीज ते शक्यच नाही, असं वाचताना अगदी शब्दागणिक मला वाटत राहिलं. अरुणाताईंमधली शब्दसरस्वती केवळ अतुलनीय. राधेला कृष्णाबद्दल पडलेले प्रश्न, तिचं सोसणं, त्याच्या वागण्याचं शल्य, त्याचं समजावणं, त्यामागची कारणं, तिचं त्याच्या बरोबर नसतानाही असलेलं त्याच्या भोवतीचं अस्तित्व, कृष्णात राधेचं अगाध अडकलेपण, त्या त्या वेळी कृष्णाचं केवळ राधेसाठीचंच असणं, इतकं गुंतलेपण असूनही त्या पूर्ण पुरुष कृष्णाचं आतून असलेलं शांत अलिप्तपण असं हे सगळं साधणारा त्या दोघांमधला अतिशय परिपक्व, पण तितकाच हळुवार संवाद वाचताना आपल्याही भावनांचा एक तरल प्रवास आपसूक सुरु होतो. 

ते संवाद इतके जिवंत आणि बोलके लिहिले आहेत कि ती सारी दृश्य त्यातल्या भावनांसकट डोळ्यासमोर अगदी उभी राहतात. कृष्णाच्या आवाजातला गहिरेपणा, कधी त्याच्या स्पर्शातला उष्ण भाव, तर कधी राधेच्या नजरेतलं हरवलेपण, कधी तिचा जाणता स्वर हे सारं केवळ वाचण्यातूनही आपल्या आत सहज उतरतं, इतकी परिणामकारक लेखणी. मला राधेचा लेख पाठोपाठ दोन वेळा वाचावा वाटला. आणि दोन्ही वेळा मी तितकंच भारावलेपण अनुभवलं आणि त्यानंतर आलेली शांत शांत अवस्था ही. 

राधा, कृष्णाच्या संवादातला एक छोटंसा भाग उदाहरणादाखल, वयोपरत्वे आलेलं शहाणपण मान्य करत राधा कृष्णाला म्हणते, "माधवा, इतक्या वर्षांनी एक गोष्ट मात्र समजून चुकली, घटनेच्या इतर बाजू समजूनही, फरक पडत नसतो फारसा. घटना घडून जाते, आणि तिच्या बाजूही असंख्य, ही वस्तुस्थिती असते. दरवेळी आपल्याला कापतं नव्या बाजूच्या धारेनं. शहाणं व्हायचं म्हणजे तरी काय रे, दरवेळी नवी बाजू, नवी धार." यावरचं कृष्णाचं उत्तर, "पण जखमांचे अर्थ दरवेळी तेच नसतात राधिके. म्हणून मग त्या जखमांचं काय करायचं हा निर्णयही दर वेळी वेगळा असतो. तिला नकार द्यायचा, कि तिचा स्वीकार करायचा? तिचा प्रतिशोध घ्यायचा कि तिला क्षमा करायची, हे सगळं दरवेळी निराळं ठरतं. आणि ते ठरवताना सर्वस्वी जबाबदार आपण असतो, केवळ आपणच. "       

या पुस्तकातला यानंतर येणारा कुंती हा लेख. कुंतीच्या आईपणाचं कुतूहल त्यांना आधीपासून होतंच पण नंतर ती बाई म्हणूनही थोडी थोडी समजत गेली असं अरुणाताई म्हणतात. भावना आणि व्यवहार सुंदरपणे एक करणाऱ्या गांधारीच्या नशिबी आंधळा, नेभळट, किडका नवरा, असंस्कृत मुलगा आणि धूर्त, नालायक भाऊ आला नि त्यांच्याबरोबर तिचं आयुष्य अगदी फरफटत गेलं असं त्या लिहितात. अशी गांधारी आणि पांडवांची आई कुंती या दोन जावांमधल्या संवादाने या लेखाची सुरवात होते. पुढे मग कृष्ण आणि नंतर द्रौपदी बरोबरचा संवाद त्यांनी लिहिला आहे ज्यातून कुंतीच्या स्त्रीत्वाची जातकुळी वाचणाऱ्याला उलगडत जाते. आयुष्यात केवळ आईपणच वाट्याला आल्याची सल कुंतीला आहे का हे चाचपडण्याचा प्रयत्न तिच्याशी संवाद साधत कृष्ण जेव्हा करतो तेव्हा ते ऐकून स्वतःतली रग अगदी गळून गेल्यासारखी ती त्याला म्हणते, 'माझं आईपण आणि बायकोपण एकमेकांत गुंतलेलं नाही. या दोन वेगळ्या गोष्टी असूनही त्यातलं अंतर मात्र मला कधी दिसलच नाही. नाहीतर पांडवांनी राज्यासाठी झुंजावं एवढं बळ मी कधी खर्ची घातलंच नसतं.' त्यांनी लिहिलेले हे असे संवाद मला फार फार भावले. 
 
घटना इतिहासात घडून जातात, त्याची सत्यता पडताळणे हा वेगळा भाग पण त्या घडतानाच्या भूमिका, वेगळ्या बाजू समजून घेताना मानवी स्वभावाचे पूर्वी पासून आज पर्यंत बदलत गेलेले कोने लख्खपणे समोर येतात ते या अशा लिखाणातून, असं मला कायम वाटतं.  

या पुस्तकातला तिसरा आणि शेवटचा दीर्घ लेख द्रौपदी हा. या लेखात द्रौपदीच्या केसांचे तिच्या दासीने केलेले वर्णन जवळपास दोन पानी आहे. ते वाचताना अरुणाताईंचे शब्द वैभव, त्यांचा कल्पना विलास अक्षरशः भारावून सोडतो.  निष्कांचन आणि अपमानित आयुष्य पदरात बांधून जगणारी ताठ, सुंदर, बुद्धिमान, समंजस अशी ऐश्वर्यवती द्रौपदी. सर्वांपासून दूर, सर्वांच्या नजरेआड, कुणाला जाणीवही नाही, असं या बाईचं एक स्वतंत्र जगणं आहे. बी मधून झाड उगवावं, झोपेमधून स्वप्न उठावं, तसं एका जगण्यातून उगवलेलं दुसरं जगणं - स्वतंत्र.. अशी कृष्णसखी द्रौपदी. तिच्या अथांग आयुष्याचं सार अरुणाताईंनी या लेखात लिहिलं आहे, जे वाचताना बऱ्याच अनुत्तरित प्रश्नांचे किनारे माझ्यासाठी तरी मुडपले गेले.       

या साऱ्या गोष्टी पुराणातल्या. पण तरी सुद्धा याचे दुवे आजही आजूबाजूला सहज सापडतात. अजूनही तेच प्रश्न, तीच तगमग, तशीच धडपड, सारं तसंच. रूपं, काळ कितीही बदलला तरी मानवी मनातली मुळची स्वाभाविकता अजूनही तशीच. यापुढेही ती तशीच राहणार. आणि हाच उसवलेला धागा साधण्याचा अरुणा ताईंचा हे लेख लिहिण्यामागचा उद्देश असावा.
  
एखादं गाणं ऐकत असताना त्या लयीत, त्या स्वरांमध्ये आपण असे रमून जातो कि ते स्वर आपल्या आत खोलवर नंतरही पाझरत राहतात बराच वेळ, तशीच एक सुंदर लय हे लेख वाचताना जाणवली, इतकं प्रवाही, मन शांत करणारं, शब्दांचं सुख देणारं लिखाण, या पुस्तकात ओघळलं आहे ते संपूच नये असं वाटत राहतं, इतकी सुरेल शब्द सरिता. केवळ अप्रतिम. जरूर वाचावं असं अगदी वेडावणारं पुस्तक - अरुणा ढेरे यांचं कृष्ण किनारा 


--- अश्विनी वैद्य 
१४. ०९. २२ 

राजस्थान डायरी : उदयपूर

उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थाप...