Friday 24 March 2023

आवरण


सध्याचा WhatsApp, FB किंवा एकूणच सोशल मीडियावर येणाऱ्या मोठमोठ्या forwards चा जमाना. मग ती forwards अगदी इमाने इतबारे वाचून पुढच्या अनेक जणांना तशीच पुढे डकविण्याचा आटापिटा करण्यात धन्यता मानणारे बहुसंख्य. म्हणजे यात काही वाईट आहे असं नाही. फक्त वाचणाऱ्यांकडून त्याची कुठलीही सत्यता पडताळून पाहण्याची सुतराम शक्यता नसते आणि शिवाय अशा forwards मध्ये सांगितलं ते खरंच असतं, असं मानणाऱ्याची संख्या सुध्दा खूप पटीत आहे, भीती या गोष्टीची वाटते. कारण अशा बहुतांशी समाजाच्या याच अंधविश्वासाचा दुरुपयोग करून घेणारे तो आपसूक करून घेत आहेत. खऱ्या माहितीपेक्षा त्यांना हवी असलेली किंवा लोकांची एखाद्या गोष्टीबद्दल तीव्र आणि त्यांना अपेक्षित मतं तयार होतील अशीच माहिती या forwards मधून समाजात सावकाश पसरवली जाते. हळू हळू पेरली जाते. या माहितीची कसलीही खातरजमा करण्याचा कोणीही विशेष प्रयत्न करत बसणार नाही, याची त्यांनाही खात्री असते. फार फार तर लोक कानाडोळा करतील पण किमान काही टक्के लोकं तरी त्यावर विश्वास ठेवतीलच ही गोष्ट हेरून अशी forwards पसरवली जातात. खासकरून धर्माबद्दलची, मूलतत्ववादी विचारांबद्दलची, रुढी-परंपरा याबद्दलची, ऐतिहासिक कथांबद्दलची वैगेरे. यात हल्ली सारासार असा विचार बाजूला पडून, टोकाची, प्रक्षोभक मतं बाळगणाऱ्यांची संख्या हल्ली खूप जास्त वाढत आहे. त्याला या अशा काही फुटकळ, आधारहीन forwards चं खतपाणी मिळतं आणि समाजातली दुफळी अगदी मुळातून वाढण्यास हातभार लागतो म्हणून याची भीती वाटते. आणि या सगळ्या मागची किंचितभरही जाणीव बहुतांशी सामान्य लोकांना नसतेच. वस्तुस्थिती किंवा सत्य काय आहे याच्या शोधात जाणारे फार कमी जण असतात.

ही सगळी पार्श्वभूमी सांगण्याचं कारण म्हणजे कालच वाचून संपलेले एक अतिशय सुंदर पुस्तक. आज त्या पुस्तकाबद्दल सांगायचं आहे. पद्मश्री, २०२३ म्हणजे या वर्षीचे पद्मभूषण पुरस्कार सन्मानित S.L. भैरप्पा या कानडी विचारवंत, लेखक, अभ्यासक यांनी २००७ साली सत्याच्या शोधात लिहिलेलं हे एक वादळी पुस्तक म्हणजे आवरण. एका आवरणाखाली झाकल्या गेलेलं किंवा मुद्दाम झाकलेलं सत्य शोधण्याचा प्रवास म्हणजे आवरण हे पुस्तक.


धर्माबद्दलच्या अनेक शतकांपासूनच्या इतिहासाच्या खुणा, अनेक ऐतिहासिक ग्रंथांमध्ये सांगितलेली त्याची सत्यता आणि आत्ताची वस्तुस्थिती हे सगळं शोधण्याच्या प्रवासात लिहिलेली ही एक अतिशय अभ्यासपूर्ण अशी कादंबरी आहे. ही मूळ कन्नडमध्ये लिहिलेली, नंतर उमा कुलकर्णी यांनी मराठीमध्ये अनुवादित केलेली कादंबरी ऑडियो बुक स्वरूपात मी ऐकली.

प्रकाशित झाल्यानंतरच्या पुढच्या पाचच महिन्यांत दहा पुनर्मुद्रण झालेली, अनेक भाषांत अनुवादित झालेली ही एक अतिशय गाजलेली कादंबरी. ही कथा जरी काल्पनिक पात्रांभोवती गुंफली असली तरी त्यातले संदर्भ हे वस्तुनिष्ठ आहेत आणि सत्याच्या शोधात गवसत गेलेला इतिहास स्पष्ट करणारे आहेत.

धर्म ही प्रत्येकाच्याच आयुष्यातली एक अतिशय संवेदनशील गोष्ट. त्यामुळं मुळात धर्म या विषयावर त्यातही हिंदू आणि मुस्लिम या विषयावर लिहावं हाच खूप प्रगल्भ आणि धाडसी विचार. असं लिखाण वादग्रस्त ठरू शकतं, याची पूर्ण कल्पना असतानाही सत्य काय आहे हे वस्तुनिष्ठ संदर्भाच्या आधाराने लोकांसमोर मांडण्याचं धारिष्ट्य दाखवणारे भैरप्पा यांच्याबद्दल मला कमालीचा आदर आणि उत्सुकता वाटते. हे एक पुस्तक लिहिण्यासाठी त्यांनी अनेक ऐतिहासिक ग्रंथांचा सखोल अभ्यास केला आणि मगच ते लिहिलं आहे.

मुळात इतिहास म्हणजे काय? इतिहासाला काही ध्येय आहे का? या प्रश्नाचं उत्तर मला या पुस्तकात मिळालं ते असं, 'समाजवादी, आधुनिक मार्क्सवादी, वस्तुनिष्ठ, वैज्ञानिक चळवळी, सिद्धांत, आदर्श यापासून स्वतःला सोडवून घेवून, घडलेल्या घटनांकडे पाहणं म्हणजे इतिहास समजून घेणं. इतिहासाच्या अभ्यासाचं ध्येय म्हणजे सत्याचा शोध घेणं' इतक्या सोप्या शब्दात भैरप्पांनी ते स्पष्ट केलं आहे.

इतिहासाची सामग्री शोधणं, त्याची निवड करणं आणि वस्तुनिष्ठ व शिस्तबध्द पद्धतीनं त्यावर मत बनवणं, ही खरंतर अत्यंत कठीण गोष्ट. पण त्यांनी ती अचूक साधली आहे. ते म्हणतात, "वर्तमानात निर्माण होणाऱ्या प्रश्र्नांपासून स्वतःला सोडवून घेवून, भूतकाळ कसा समजून घेता येईल? भूतकाळ आपलं सत्य अनेक ग्रंथ, अनेक खुणा, अनेक भग्नावेश यातून स्पष्टपणे दाखवत असतो. पण वर्तमानकाळ आपल्या डोळ्यांवर वेगवेगळी झापडं बांधत असतो. त्यामुळं सत्य आपल्यापासून लपूनच राहतं."

या पुस्तकातल्या कथेतली नायिका ही अगदी आत्ताच्या काळातली, स्वतःचे ठाम विचार असणारी, स्वबळावर स्वतःचं करिअर उभारणारी, पुरोगामी विचारांना जवळ करणारी एक धाडसी मुलगी. धर्माबद्दलच्या तिच्या सुरुवातीच्या संकल्पना म्हणजे अगदी मार्क्सिस्ट विचारांप्रमाणे म्हणजे धर्म ही गरिबांना दिलेली अफूची गोळी आहे, वैगेरे अशा स्वरूपाच्या असतात. पण नंतर तिचं आयुष्य पुढे जाताना तिने अनुभवलेल्या प्रसंगातून, धर्माबद्दलच्या ऐतिहासिक ग्रंथांच्या तिच्या अभ्यासातून, भोवती दिसणाऱ्या वास्तविकतेतून सत्य उलगडत गेल्यानं धर्माबद्दलच्या तिच्या भावना कशा प्रगल्भ होत जातात, हा प्रवास मांडणारी ही कथा आहे. 

भैरप्पा यांच्या या लिखाणाला हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मांवरच्या अनेक ऐतिहासिक ग्रंथांमधल्या ठोस संदर्भांचा आधार आहे. अगदी फारसी भाषेतल्या औरंगजेबच्या मूळ चरित्रात सुद्धा काय लिहिलं आहे याचे दाखले त्यांनी या पुस्तकात दिले आहेत.

मुळातच एखाद्या विशिष्ट धर्मात जन्मलेल्या, ठराविक सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या लोकांच्या धर्माबद्दलच्या भूमिका किंवा मतं ही एक तर परंपरागत रूढींच्या पगाड्यातून किंवा ऐकीव वा तुटपुंज्या माहितीवर आधारित किंवा कोणाचे तरी व्यक्तीपूजक अथवा समर्थक म्हणून किंवा केवळ विरोधाला विरोध म्हणून किंवा अगदी कातडी बचाव या भावनेतून तयार झालेल्या असतात. त्याला बऱ्याचदा कसलाच ठोस आधार वा संदर्भ नसतो. हेच भैराप्पांनी पुस्तकात येणाऱ्या वेगवेगळ्या पात्रांकरावी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

पुस्तकातला काशी विशवेश्वराच्या मंदिराचा इतिहास, बेचिराख केलं गेलेलं नालंदा विद्यापीठ, तिथली जाळून नष्ट केलेली दुर्मिळ ग्रंथसंपदा, हजारो मंदिरांचे आत्ता दिसत असलेले भग्नावशेष याबद्दल वाचून अक्षरशः शहरा येतो अंगावर.

'हे सगळं खूप पूर्वी होऊन गेलं त्याचा आत्ताच्या वर्तमानात संदर्भ आणून कशाला वाद निर्माण करायचे आणि राष्ट्रीय ऐक्य धोक्यात आणायचं' या बद्दलचं अतिशय सुंदर विवेचन भैरप्पा त्यांच्या नायिके करवी असं देतात, "असत्यावर समाज ठाम उभा राहणं शक्य नाही. पाया बळकट करून त्यावरच इमारत नीट उभी राहू शकते. स्वतःच्या गरजेनुसार इतिहासाची मोडतोड करून स्वार्थी राजकारणी आधुनिक इतिहासकारांकरावी ऐतिहासिक व्यक्तीचं त्यांना हवं असलेलं पुनर्चित्रण करण्याचं जे काम करतात ते कितपत समर्थनीय आहे? त्यामुळं मुळात उपलब्ध असलेले पुरावे, संदर्भ यावरून हा सत्याचा शोध घेणं आणि तो मान्य करणं महत्त्वाचं आणि गरजेचंच आहे.

तर असं हे एक वादग्रस्त ठरलेलं पण तरीही अगदी प्रत्येकानं नक्की वाचावं असं एक खूप सुंदर, वैचारिक पुस्तक - आवरण.

- अश्विनी वैद्य
२३/०३/२०२३

राजस्थान डायरी : उदयपूर

उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थाप...