Friday 16 July 2021

मैत्रेयी



मैत्रेयी - पुस्तक परिचय


कधी कधी काही प्रश्नांची उत्तरं मिळतच नाहीत किंवा ती नसावीतच. ती सापडवीत हा हट्ट नाहीच. पण तरीही आत किमान हलकसं तरी शांत वाटावं अशी काही उकल, असं काही स्पष्टीकरण, विचारांची एखादी वेगळी वाट दिसावी, की जी समाधानाच्या वळणावर आपसुक नेवून ठेवेल, शांत करेल असं मला नेहमी वाटत. अशी वाट दाखवणारी काही पुस्तकं जेव्हा हाती लागतात तेव्हा ती इतकी समरसून वाचावी वाटतात ना. त्यातली काही पानं परत परत उघडली जातात, त्यातल्या शब्दांमध्ये आपल्या मनाचे त्यावेळचे हेलकावे, हिंदोळे, सगळं काही पेलण्याची क्षमता आहे ही जाणीव दरवेळी मग भक्कम होत राहते. असच एक सुंदर पुस्तक परवा वाचून झालं.


अरुणा ढेरे यांचं 'मैत्रेयी'. अगदी ओघवती भाषा आणि गुंफण. पौराणिक कथेतल्या मैत्रेयी बद्दल सांगणारं हे पुस्तक असणार असं वाटून मी हे घेतलं. मला या आधी मैत्रेयी फारशी माहीत नव्हती. पौराणिक कथांमधली कोणी एक विदुषी. इतकंच. पण मग या पुस्तकाच्या निमित्ताने तिच्याबद्दल माहिती शोधली. आणि मग हे पुस्तक वाचायला घेतलं.


मैत्रेयी पुस्तक म्हणजे कोणती गोष्ट नाही की पुरणातला एखादा तात्विक विचार गोष्टीरूपाने वाचकांसमोर मांडला आहे असंही नाही. एका वेगळ्याच ढाच्यातलं अरुणा ताईंचं हे लेखन आहे जे मला फार भावलं. म्हणून मग त्या बद्दल लिहावं नि सांगावं वाटलं. हे अगदी छोटसं पुस्तक म्हणजे केवळ 21 लेखांचा संच आहे. लेखही म्हणता येणार नाही या प्रकाराला. प्रस्तावनेतच अरुणा ताईंनी याबद्दल खुलासा केला आहे.


सहा आठ महिने त्यांच्या मनात वावरणाऱ्या मैत्रेयीला त्यांनी त्यांच्या लेखणीतून व्यक्त केलं आहे. त्याचं हे पुस्तक. पुराणातल्या काही आधारांवर, कथांवर, स्वतःचे काल्पनिक विश्व उभारत अरुणा ताईंनी मैत्रेयी आणि तिचा नवरा याज्ञवल्क्य यांच्यातले छोटे छोटे प्रसंग लिहिले आहेत. त्यातून त्या दोघांचं नातं, त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध उलगडत जातात. ते कसे नि किती प्रगल्भ होते, किंवा असावेत याची खरी/ काल्पनिक प्रतिमा वाचताना मनात उमटत जाते. मैत्रेयीचं निसर्गाशी तिने जोडलेलं नातं, त्याचा मानवी स्वभावाशी जोडलेला संबंध, चूक किंवा बरोबर यापेक्षा एका परिपक्व विचाराने त्याकडे पाहण्याचा तिचा दृष्टीकोन हे असं सारं अगदी मोहक शब्दात बांधत लिहिलेलं आहे. ते वाचताना तो पौराणिक काळ, याज्ञवल्क्य ऋषींचा आश्रम, आश्रमात शिकणारे बटू, तिथलं त्या वेळचं वातावरण, झाडं, वेली, झरे, वासरे सगळी दृश्य अशी डोळ्यासमोर उभी राहतात.


मला यातली भावलेली गोष्ट म्हणजे मैत्रेयीचा नवरा याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी या दोघांमधल्या तात्विक चर्चा. त्या दोघांच्याही बाजूने तितक्याच ताकदीने पेलून लिहिल्या आहेत. दोन परस्पर विरोधी विचार एकाच व्यक्तीने तितक्याच तोडीने मांडणं, हे एक लेखिका म्हणून फार कौशल्याचं काम. ते पोकळ युक्तीवाद नव्हेत. मग त्यासाठी त्यांनी केलेला अभ्यास, त्यांची प्रगल्भता, वैचारिक सखोलता आणि ते शब्दांत नीट बांधता येण्यासाठी लागणारा शांतपणा अरुणा ताईंचं हे सगळं कसब हे पुस्तक वाचताना जाणवतं. एखादा विचार स्वतःत नीट रुजल्या शिवाय तेवढ्या परिणामकारकतेने तो शब्दांत उमटू शकत नाही. त्यामुळं मैत्रेयीच्या निमित्ताने अरुणाताई स्वतःचे विचार मांडत आहेत असं मला बऱ्याचदा वाटत गेलं. यासाठी पुस्तकातलं एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालंच तर,
एका प्रसंगात समजावणीच्या स्वरात मैत्रेयी याज्ञवल्क्यला म्हणते, "विसंवादातून नवा संवाद उभा राहतो, पण हा विसंवाद दुबळा नको असतो. सृष्टीपासून दूर कुठेतरी एक वेगळी देवसृष्टी आहे, अशी कल्पना करण्यातच आपण चुकतो. देव आपल्या बाहेर कुठे असा नाहीच. तो आपल्यातच आहे. त्या देवाकडे वळणं म्हणजे खऱ्या संवादाची सुरुवात."
पतन आणि विवेकी भोग या वरचं इतकं सुरेख विवेचन मला पुस्तकात वाचायला मिळालं. मैत्रेयीच्या मते, 'भोगामागं विवेक हवाच. पण तो केवळ पुत्रप्राप्तीसाठीच घडवलेला आहे असं का म्हणावं'. "आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति" या श्लोकात म्हटल्या प्रमाणे तो माझ्याच आत्म्याच्या समृध्दी साठी असतो, हे का समजून घेवू नये.'


मैत्रेयीला चंद्र सूर्यापेक्षा जास्त आवडे, कारण तिच्या मते सूर्य विकासाच्या सलगतेत अलीकडेच थांबतो, तो लहानही होत नाही आणि मोठाही नाही. पण याज्ञवल्क्यला असं वाटतं की या स्थिरतेतच सूर्याचं मोठेपण आहे, तो जीवनदायी आहे, सामर्थ्यवान आहे. मग यावरचा मैत्रेयीचा युक्तीवाद तिच्या शब्दात सांगायचा तर, "सुर्याचं महत्व निर्विवाद आहेच पण त्याचा आवडीशी काय संबंध, गरज वेगळी नि आवड वेगळी. विकासाचा प्रवाह उत्पत्तीपासून सुरू होतो, तो स्थितीनंतर लयाला जातो असं वाटणंच चुकीचं आहे. लय हा एक विकासाचाच भाग नव्हे का? मृत्यूची जाणीव माणसाला विसकित करीत असते. उत्पत्ती, स्थिती लय या दुष्टचक्रातून सुटायला हवं असं मानणं बरोबर नाही, तो विकास प्रक्रियेचा एक भाग आहे असं त्याकडे पाहिलं की सगळं कोडं सहज उलगडतं. हे कोडं चंद्राला उलगडलं म्हणून मला चंद्र भावतो.




अशा बऱ्याच तात्विक चर्चा पुस्तकात वाचायला मिळतात. त्या वाचताना आपल्या मनात विचारांची बरीच उलथापालथ होते. त्यातून वेगळा विचार तर मिळतोच पण इतरांचं आपल्यापेक्षा असलेलं वेगळेपण स्विकारण्याचा, तो सामावून घेण्याचा दृष्टिकोनही नक्कीच मिळतो. त्यामुळं हे अगदी छोटस, मोहक आणि ओघावत्या भाषेत लिहिलेलं वैचारिक पुस्तक एकदा तरी वाचायला हवंच असं आहे. मला फार आवडलं. तुम्हीही जेव्हा मिळेल  अवश्य वाचा अरुण ढेरे यांचं 'मैत्रेयी '.

धन्यवाद.
अश्विनी वैद्य 
१६. ७. २१

राजस्थान डायरी : उदयपूर

उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थाप...