Monday 8 January 2024

राजस्थान डायरी : उदयपूर



उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थापत्य, तिथला पराक्रमी इतिहास आणि शौर्य गाथा या सगळ्याची अनुभूती देणारा एक सुरेख अनुभव. Every corner of this city has some kind of historic significance and beauty.

उदयपूर मधील सगळ्यात जुना तलाव म्हणजे पिचोला तलाव. १३६२ साली कृत्रिम रित्या तयार केलेल्या या लेक पिचोलाच्या एका किनाऱ्यावर असलेले एक हॉटेल म्हणजे हॉटेल लेक पिचोला, जिथे आम्ही उदयपूर मधले दोन दिवस मुक्काम केलेला. या अतिशय सुंदर आणि भव्य हेरिटेज हॉटेल मध्ये पाऊल ठेवल्या पासून प्रत्येक क्षणाला आम्हाला राजपुताना थाट, कला, वैभव आणि वास्तुकलेची प्रचिती येत होती. हे शाही हॉटेल म्हणजे खूप जुना ऐतिहासिक वारसा असलेली एक भव्य, सुंदर हवेली.

अठराव्या शतकात उदयपूरच्या जहागीरदारांनी त्यांचे खाजगी शाही निवासस्थान म्हणून बांधलेली पिपलीया हवेली म्हणजे हे आत्ताचे हॉटेल लेक पिचोला. १९८५ मध्ये पिपलीया घराण्याचे वंशज ठाकूर चंद्र भानू सिंग यांनी या भव्य हवेलीच्या काही भागाचे हॉटेलमध्ये रूपांतर करून ती पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिली आणि उरलेला भाग राजघराण्यासाठी राखीव ठेवला जिथे आत्ताही त्यांचे पुढचे वंशज वास्तव्यास आहेत. अशा या राजघराण्याशी संबंधित ऐतिहासिक वास्तूमधल्या दोन दिवसाच्या मुक्कामात उदयपूरचा राजपुताना शाही थाट अनुभवणं ही एक जपून ठेवावी अशी आठवण. म्हणून या हवेली बद्दल थोडं विस्तारून सांगावं असं वाटलं.

Hotel Lake Pichola 
  

हॉटेल लेक पिचोलाचा तलावा किनारीचा भाग 

या हॉटेल मध्ये आम्ही जिथे राहिलो ती Lakeview असलेली एक प्रशस्त मोठी रूम होती ज्यामध्ये एका भागात सुंदर सुशोभित भारतीय बैठक आणि दुसऱ्या भागात मोठा झुला होता. शिवाय तलावाच्या बाजूने सूर्योदय, तेव्हाचं केशरी आकाश दिसेल अशी रूमची मांडणी होती. हॉटेल मधल्या प्रत्येक खांबांवर, दरवाजांवर, छोट्या मोठ्या कमानींवर केलेलं नक्षीकाम, उंच छतांवरून खाली दिसणारी मोठमोठी झुंबरं, सुशोभित भिंती, नाजूक एम्ब्रॉयडरी केलेल्या पडद्यांच्या उंच कमानी अगदी नजर हटवता येऊ नये अशा कलाकुसरीने भरलेली तिथली प्रत्येक गोष्ट जुन्या काळाच्या राजपूत वैभवाची साक्ष देत होती.

आमच्या रूमच्या एका भागात असलेली ही बैठक खोली 

दुसऱ्या भागात असलेला सुंदर झोपाळा

Dressing area 

पिचोला हॉटेल रुफटॉप रेस्टॉरंट 

ब्रेकफास्ट हॉल

या हॉटेल मधल्या पहिल्या दिवशीच्या इतक्या सुंदर स्वागता नंतर आता उदयपूर शहर बघण्याची आमची उत्सुकता वाढली.
Beautiful arch 

पुढच्या दोन दिवसात आम्ही महाराणा उदयसिंग-२ यांनी सोळाव्या शतकात बांधलेला सिटी पॅलेस जो भारतातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पॅलेस आहे तो पाहिला. तिथली ऐतिहासिक घटनांच्या वर्णनाने भारावून टाकणारी detailed guided टूर तिथल्या ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेले राजमहालाचे भाग पाहणं फार सुंदर वाटलं. उदयसिंग-२ यांचे पुत्र म्हणजे शूर, पराक्रमी योद्धा महाराणा प्रताप, हळदी घाटची ऐतिहासिक लढाई, अठराव्या शतकात तयार केलेला फतेहसागर तलाव, राणा संग्रामसिंग यांनी त्यांच्या राणीसाठी बांधलेली सहेलियों कि बाडी, सूर्यास्ताच्या सुंदर छटा दाखवणारा गुंगुर घाट, जवळच असलेला (उदयपूर पासून १०० कमी) कुम्भलगडचा किल्ला जिथे महाराणा प्रताप यांचा जन्म झाला. महाराणा कुंभा यांच्या पराक्रमाच्या अनेक कथा या सगळ्या गोष्टी जाणून घेताना, त्यावेळेचे राजपुती वैभव बघताना फार भारावून जायला झालं.

उदयपूर पॅलेस

शीश महल 



राजस्थान मधल्या इतर भागांच्या तुलनेत हा मेवाड भाग माझ्यासाठी जास्त उत्सुकता वाढवणारा होता. खरंतर जयपूर, जोधपूर, जैसलमेर इथल्या आणि जवळपासच्या इतर राजपूत राजांनी मुघल किंवा इंग्रज यांच्याशी मैत्री साधून युद्धे व त्यातली हानी टाळली आणि त्यांच्याच अधिपत्याखाली स्वतःची राज्ये चालवली आणि राजेशाही ऐश्वर्य उपभोगले, जोपासले.

पण त्या तुलनेत मेवाड हा भाग मात्र त्या त्या वेळच्या राजांनी आधी खिलजी मग मुघल आणि नंतर इंग्रज या कुणाच्याही अधिपत्याखाली कधीही येऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न केला, युद्धे केली. मोडेन पण वाकणार नाही हा बाणा राखत मेवाडच्या या स्वाभिमानी राजपुतांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले पण हार पत्करली नाही. चौदाव्या शतकात असलेली मेवाडची राजधानी म्हणजे भव्य असा पसरलेला चित्तोडगड म्हणजे चित्रकूट पर्वत तिथला रंजित इतिहास जाणून घेणे म्हणजे स्तिमित व्हायला झाले. बाजूने भलामोठा पसरलेला अरवली पर्वत, गीरचे घनदाट जंगल, आजूबाजूची इतर अरण्ये अशी सुंदर नैसर्गिक सुबत्ताही लाभलेला राजस्थानचा हा देखणा भाग.

सहेलियोंकी बाडी

Fatehsagar lake

असे हे सुंदर उदयपूर शहर पर्यटन क्षेत्र म्हणून शासनानेही खूप छान विकसित केले आहे. फ्रेंच, जर्मन, डच, अमेरिकन आणि आणखी बऱ्याच देशातले लोक पर्यटनासाठी इथे फिरताना आढळले. इथल्या सगळ्या तलावांची स्वच्छता अतिशय उत्तम राखली आहे. सिटी पॅलेस अजूनही ट्रस्ट स्वरूपात इथल्या राजघराण्याच्याच ताब्यात आहे. इथले राजघराणे कुठल्याही राजनैतिक पक्षाशी जोडलेले नाही. पर्यटक हेच इथले महत्वाचे उत्पन्नाचे साधन. कला कुसरीच्या वस्तूंनी बाजारपेठा गच्च भरलेल्या दिसल्या. संपूर्ण राजस्थान हे कलाकुसरीच्या असंख्य वस्तू (handycrafts), नैसर्गिक रंगांनी काढलेले paintings, पिचवई paintings, हातानी विणलेले कॉटन, लोकर आणि सिल्कचे सुंदर rugs, लहरीया आणि बांधणी साड्या आणि मार्बल यासाठी का प्रसिद्ध आहे हे तिथे गेल्यावर, तिथल्या लोकल आर्टिस्ट्सला भेटल्यावर त्यांची कला प्रत्यक्ष पाहिल्यावर लगेच लक्षात येते. ताजमहाल बांधण्यासाठी लागलेले संपूर्ण मार्बल हे याच भागातून नेले गेले होते, हे नव्यानेच कळले. 

निवांत वेळ काढून नक्की भेट द्यावे असे हे कलात्मकतेने सजलेले, ऐतिहासिक वारसा लाभलेले सुरेख शहर - उदयपूर.


- अश्विनी वैद्य 
८.०१.२४ 

राजस्थान डायरी : उदयपूर

उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थाप...