Wednesday 20 June 2018

नाटक


" बीज जसे अंकुरते, मनी कल्पना येते
व्याकुळ होते, तीळ तीळ तुटते 
खोल कुठे गलबलते...!
कल्लोळात मनाच्या, वीज चमकूनी जाते
शब्दांचे अन् गीतांचे हे, झाड पुरे मोहरते....!

तिसरी घंटा होते, मखमल ही उलगडते
रंग रंगल्या अभिनेत्याचे भान हरपूनी जाते
कसली जादू होते, भारूनी सारे जाते
रसिकांसाठी आसू आणिक हासू देवूनी जाते...!

हा गौरव रंगकलेचा, हा गौरव कवी मनाचा
हे हृदयपुष्प रसिकांच्या चरणी अर्पण करणाऱ्यांचा...! "

    पाच सहा वर्षांपूर्वी हे गाणं मी झी मराठी वर नाट्यपुरस्कार सोहळ्याच्या उद्घटना वेळी ऐकलेलं, त्यातल्या या काही ओळी. श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेल्या या गाण्याच्या प्रत्येक शब्दाने मला त्यावेळी इतकी भुरळ घातली, की मी ते नंतर अखंड तासभर लूप मध्ये ऐकत बसलेले. कालच्या रविवारी एक नाटक इथे पाहायला गेलेले ते पाहून बाहेर पडताना गोडबोले यांच्या या गाण्याच्या ओळी परत आठवल्या. मग हे गाणं आज तितक्याच उत्कटतेने पुन्हा पुन्हा ऐकलं.

     नाटक बघणं हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा भाग. इथे परदेशात येवूनही ते पाहायला मिळतं हे खरंच खूप समाधानकारक वाटतं. नाटक हे पहिल्या रांगेत बसून पाहता यावं यासाठी मग नेहमी धडपड होते. ते पाहताना भान हरपून, मग्न होवून शब्दा शब्दात गढून जावून, त्या कलाकारांच्या अभिनयातून, चेहऱ्यावरच्या अगदी एकेका रेषेतून उमटणारे भाव टिपणं, त्या अभिनयाशी त्या क्षणी एकरूप होवून जाणं, अशा ताकदीची कलाकृती पाहायला मिळणं हे सुख वेगळंच. 

     नाटकाची तिसरी घंटा झाली की समोरचा लाल, कापडी पडदा हळुवार उघडला जातो आणि आपण एका वेगळ्या जगात पुढच्या दोन तासांसाठी फिरून येतो. जिवंत अभिनयातून समोर सादर होणारी ती सुंदर कलाकृती पुढचे दोन तास आपल्याला एका वेगळ्या विश्वात नेण्याची कमाल करते. अशीच इतर सगळ्या आजूबाजूच्या गोष्टींचा विसर पाडायला लावून समोर साकार होणाऱ्या शब्दकलेच्या, रंगभूमीच्या प्रेमात परत पडायला लावणारी आणखी एक कलाकृती कालच्या रविवारी पाहायला मिळाली. 

    दोन अंकी मराठी नाटक, 'अमर फोटो स्टुडिओ'. मराठी टीव्ही सिरीयल मधील नवीन, पण ओळखीचे चेहरे नाटकात दिसणार होते. या व्यतिरिक्त बाकी कसलीही म्हणजे नाटकाची कथा, आजवरच्या प्रयोगांची संख्या, इतर कोणाकडून नाटकाबद्दल आलेली प्रतिक्रिया अशी कसलीच माहिती आधी मुद्दाम न काढता मी नाटक बघायला गेलेले, पूर्ण कोऱ्या मनाने. कारण तरच लेखकाला  नाटकातून काय सांगायचे आहे हे (त्यातल्या अभिनयातून आणि संवाद लेखनातून) आपल्या पर्यंत पोचतंय की नाही ते ठरवता येते, असं मला तरी वाटतं. 

      असो तर, साधारण कथेचा मथळा असा. भविष्या बद्दल कसलीच शाश्वती मिळत नसल्याने निराशेतून गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू पाहणारा नायक ' अपूर्व ' (सुव्रत जोशी) या प्रसंगाने पहिला अंक सुरू होतो. पुढच्या पाच मिनिटांत त्याची 'so cool' अशी आज- आत्ता - इथे याच तत्वाने जगू पाहणारी नायिका तनु (सखी गोखले) हिचा प्रवेश होतो.  

     सध्याची साधारण दर तासाभराने ' बोअर' होणारी, आयुष्या बद्दलचा फारच गहन विचार सतत करत राहूनही आपल्या आयुष्याचे इप्सित काय हे समजू न शकल्याने ऐन पंचविशीत दारुण नैराश्य वैगेरे आलेली, मोबाईल, इंटरनेट याच्या माध्यमातून सगळयातलं सगळं माहीत असायलाच हवं हा अट्टाहास करत, त्यातच स्वतःला हरवून शोधायला निघालेली, कपडे बदलावेत तसे जोडीदार बदलणं सोप्पं असतं या मतावर स्थिरावू पाहणारी, नात्यात stagnancy yetiy ki Kay asa vatun आधीच घाबरून ब्रेकअप करत कशातच खूप न अडकणं रास्त मानणारी, खरं प्रेम म्हणजे नक्की काय असतं, कसं असतं, कोणत्या नात्यात ते सापडतं, या विचारात पार गोंधळलेली, अशा खरंतर मोठ्या हुशार, उच्च शिक्षित पण अगदी बावचळून गेलेल्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे तरुण नायक आणि नायिका या नाटकात सुरवातीला उभे केले आहेत. जे खरंतर स्वतःच्या नात्याबद्दलच कन्फ्युज आहेत, आणि त्यामुळे चाचपडत आहेत असे साधारण चित्र नाटकाच्या सुरवातीला कधी हलक्या फुलक्या, कधी विनोदी तर कधी गंभीर संवादातून, वेगवेगळ्या प्रसंगातून समोर उभे राहते.

    तर असा आत्महत्येचा प्रयत्न करू पाहणाऱ्या अपूर्वची समजूत काढून त्याला अमेरिकेत PhD करण्याकरिता जाण्यासाठी लागणारे व्हिसाचे फोटो काढण्यासाठी तनु बाहेर घेऊन जाते आणि मग ते दोघे 'अमर फोटो स्टुडिओ' मध्ये येवून पोचतात. जिथे त्यांना फोटो स्टुडिओचे मालक जे अतिशय मिश्किल, भन्नाट विनोदी आणि तरुणांना लाजवतील इतके उत्साही असे अगदी young आजोबा (अमेय वाघ) भेटतात. एकमेकांचे सुंदर टायमिंग सांभाळत त्या तिघांमधील इथले संभाषण प्रेक्षकांना फारच धमाल आणते. तर ते आजोबा त्या दोघांचा त्यांच्या स्पेशल कॅमेरातून फोटो काढतात, आणि त्या बरोबर अपूर्व आणि तनु (त्यांना स्वतःला आणि प्रेक्षकांनाही काही समजायच्या आत)  2018 मधून एकदम जुन्या दोन वेगवेगळ्या काळात (भूतकाळात) जाऊन पोचतात. अपूर्व साल 1942 आणि तनु साल 1972 अशा दोन वेगवेगळ्या काळात. त्या काळात त्यांना त्यांचे तरुणपणीचे वडील, आजोबा भेटतात. नाटकात इथून त्या दोघांच्या अनोख्या सफरीला सुरुवात होते. ज्यांना त्यांचा भविष्यकाळ, जो खरंतर आत्तासाठी (२०१८ साठी) भूतकाळ आहे, पण ते स्वतः भूतकाळात गेल्याने तो relatively भविष्यकाळ होतो. सो त्या भविष्यात काय झाले आहे हे त्यांना आधीच माहीत आहे, अशा वेळी त्यांचा मनात होणारा गोंधळ, त्यांनी त्या भूतकाळात घेतलेले निर्णय, त्यांच्या आई बाबांचं त्या काळात असलेलं नातं, त्यांच्या न पटणाऱ्या गोष्टी, त्यांचे निर्णय, त्यांच्या मानसिकता, त्याची कारणं, त्यांचं वागणं अगदी सुंदर उभं केलं आहे. याच मूळ कल्पनेभोवती हे नाटक आहे. ही कल्पनाच खूप वेगळी असल्यामुळे प्रेक्षकांना भावते. या भूतकाळातल्या प्रवासात, हल्लीच्या तरुण पिढीला असणारी असंख्य टेन्शनस तरुणपणीच्या आपल्या वडिलांना सांगणाऱ्या ('तुमचं किती सोप्पं होतं, आमचं तसं नाहीये, खूप अवघड आहे, हे सांगतानाचा) सखीच्या एक खूप लांब लचक डायलॉग ने प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या.   

     १९४२ चा स्वातंत्र्या पूर्वीचा काळ दाखवताना अमेय वाघ याने व्ही शांताराम समोर उभे केले आहेत. पूजा ठोंबरे हिने खूप struggle करून पुढे येणाऱ्या त्या काळातल्या सिनेमात किरकोळ काम मिळणाऱ्या चंद्रिकेची भूमिका मस्त साकारली आहे. तिचा सुव्रत जोशी बरोबरचा डान्स नाटकात पाहायला अगदी सुंदर वाटतो. 
   

     ज्या जुन्या काळात सध्याचे techno world अस्तित्वातच नाहीये तिथे, मोबाईल, cloud स्टोरेज, angry बर्डस game या हल्लीच्या गोष्टींचा नाटकात खूप चपखल उल्लेख करून दोन्ही काळातले comparison करत मस्त संवाद लिहिले आहेत आणि कलाकारांनी ते साकारलेही उत्तम आहेत. भूतकाळात केलेल्या त्या सफरी नंतर जेव्हा अपूर्व आणि तनु आत्ताच्या काळात परततात तेव्हा त्यांना स्वतःच्या क्षुल्लक प्रॉब्लेम ला उगाच किती फुगवून ठेवलं होतं आणि त्यामुळं सुंदर नात्यात उगाच ताण आणले होते हे लक्षात येतं. या भूतकाळातल्या सफरी दरम्यान भविष्य माहित असूनही शाश्वती कसलीच नव्हती, त्यापेक्षा ते माहित नसताना त्या कोऱ्या पाटीवर खुल्या मनाने लिहीत राहण्यात, दिलखुलास जगत राहण्यातच मजा आहे हे  त्या दोघांना जाणवतं आणि त्या पॉईंटला नाटक संपतं.      


    नाटकात वेगवेगळे काळ दाखवताना, त्यातली माणसं आणि त्यांच्याशी या 2018 मधल्या माणसांचे interaction दाखवताना नाटकाचा flow कधी कधी थोडा हरवला आहे असं वाटतं. मध्येच सुंदर grip घेतलीये असं वाटेपर्यंत परत तो धागा सुटतो आणि वेगळाच भाग चालू झालाय असं होते. पण तरीही हे सगळे असे काळातील बदल नाटकाच्या सेट वर काही मिनिटात बदलणं आणि प्रेक्षकांना त्या काही मिनिटांत जुन्या काळात घेवून जाणं ते ही सिनेमातल्या सारख्या कुठल्याही डिजिटल टेक्नॉलॉजी शिवाय हे नाटकाच्या संपूर्ण टीमने खूप चांगलं जमावलंय. हा या जनरेशन चा वेगळा विषय छान हाताळला आहे. सर्वांनी उत्तम कामे केली आहेतच यात शंकाच नाही... खूप एनर्जेटिक. हे  नाटक बघून संपल्यावर हसऱ्या चेहऱ्याने आणि समाधानाने सोबत एक वेगळा विचार घेऊन आपण थिएटर मधून बाहेर पडतो. 

 --- अश्विनी वैद्य --- 
  २०/०६/१८

2 comments:

राजस्थान डायरी : उदयपूर

उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थाप...