Friday 27 October 2017

उत्खनन


        अशीच पहाटे जाग आली आणि पुढे झोप येईना तेव्हा उठून पहाटेच्या हलक्या थंडीत वाफाळता चहा घ्यायचा आनंद घ्यावा म्हणून उठले आणि चहाचा कप हातात घेऊन खुर्चीवर बसले तेव्हा बरोबर डायनिंग टेबलाच्या समोरच्या bookshelf वर ठेवलेली 'उत्खनन' ही गौरी देशपांडे यांची कादंबरी उघडावी वाटली. बरंच आधीपासून नुसती आणून पडलेली पण वाचायला होत नव्हती. सकाळी 5.30 ला चहाच्या पहिल्या घोटाबरोबर पहिलं पान उघडलं आणि पुढची पानं वाचून उलटत रहण्याखेरिज मी दुसरं काहीच करू शकले नाही. अर्थात पुस्तक खाली संपेपर्यंत ठेवणं शक्यच झालं नाही. ही ११४ पानांची छोटी कादंबरी उत्सुकता ताणणारी रहस्यमय कथा किंवा कोणाचा प्रेरणादायी जीवनपट वैगेरे प्रकारात मोडणारी नव्हती तरीही मध्ये कुठे थांबावेसे एकदाही वाटले नाही. एखादं नाटक किंवा सिनेमा पाहताना त्यातल्या दृकश्राव्य अनुभवामळे त्याचा परिणाम खोलवर होणं स्वाभाविक असतं पण एखादं पुस्तक केवळ वाचताना त्यातली कथा कल्पनेत तितकीच परिणामकारक उभी राहणं यासाठी त्या लेखकाची प्रतिभा तेवढी जबरदस्त असावी लागते हे प्रत्येक पान उलटताना जाणवत होतं. वाचतानाचा तो गाभा तसाच घट्ट पकडून ठेवण्यासाठी मी सगळं सोडून खुर्चीला खिळून पुढचे चार तास तिथेच बसून राहिले आणि पुस्तक संपल्यावरच उठले.



       आता त्यावर चार ओळी खरडाव्या असं वाटलं यावरूनच हे पुस्तक मला नक्कीच आवडलय हे वेगळं सांगणं नकोच. परीक्षण नाही खरंतर पण साधारण पुस्तकाची ओळख नक्की करून द्यावी असं वाटलं. परीक्षण हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते, त्या लेखकाची आधीची वाचलेली पुस्तके, त्यावरून साधारण त्या लेखकाच्या स्वभावाचा काढलेला मागोवा, त्या काळातल्या इतर लेखकांची वाचलेली पुस्तके, साहित्याच्या दृष्टीने त्याचे महत्त्व, त्याचा तुलनात्मक परिणाम, त्यातले वैशिष्टय जाणायची स्वतःची क्षमता, ते नीट शब्दात मांडता येण्याची कला, हे सारं नीट जमायला हवं. शिवाय पुस्तकाबद्दल, लेखकाबद्दल आणि त्यातल्या कथेबद्दल, व्यक्तिरेखांबद्दल स्वतःची मते वाचणाऱ्यावर ठासून न लादता, त्यातला भावार्थ प्रत्येकाच्या विचारसरणी नुसार वेगवेगळा असू शकतो इतके भान ठेवून त्यातल्या वाचनाची उत्सुकता अथवा कंटाळा याचे पडसाद परीक्षणात मांडता यायला हवेत. सध्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीची जाण, वाचनाबाबत लोकांची मानसिकता आणि त्या अंगाने पुस्तकाबद्दलच्या विशेष वाटणाऱ्या किंवा न वाटणाऱ्या बाबी असा सारा आढावा पुस्तक परीक्षणात यायला हवा. अर्थात असं मला अपेक्षित आहे पण जमणं अवघड आहे म्हणून केवळ ओळखच करून द्यावी वाटली. 


      'दुनिया' या अगदी वेगळ्या नावाच्या पुरातत्वशास्त्र विभागात, विद्यापीठात काम करणाऱ्या कथेतील मध्यमवयीन नायिकेने स्वतःचा इतिहास उकरत, आठवणींचे केलेले उत्खनन गौरी देशपांडे यांनी या पुस्तकात मांडले आहे. साध्या, सर्वसामान्य पण थोड्याशा भिडस्त आणि त्यामुळेच साऱ्या जगाचे मिंधेपण उगाच स्वतःच्या अंगावर घ्यायची सवय झालेल्या, साऱ्या जगाचे अपराध स्वतःवर घेवून खंत करत बसणाऱ्या, दुसऱ्यांच्या वाटण्याचा अती विचार करणाऱ्या कथेच्या नायिकेचे भावविश्व, जुन्या अवशेषांचे जे उत्खनन करतो तसे भूतकाळातल्या घटनांमधून उकरून काढत अगदी हळव्या पण तितक्याच परिणामकारक रेखटले आहे. 'दुनिया'चं (नायिकेचं) विश्व्, त्यात तिची म्हणून असणारी कुटुंबातली माणसं, त्यांची स्वभाव वैशिष्ट्य, आई- मुलगी, वडील-मुलगी, मैत्री अशी नाती, त्यातलं प्रेम, समज आणि स्वीकार, भावनिक आणि तर्कशुद्ध विचारसरणीच्या आधारावर घरात असलेले दोन भिन्न मतप्रवाह, त्यामुळं नायिकेच्या मनात चालणारी घालमेल हे सारं, कधी ठसठशीत प्रसंगातून, कधी हळव्या बोलण्यातून खूप सुंदर उभारले आहे. 


      माणसांच्या स्वभावाच्या अनेक सूक्ष्म छटा निरखून त्यांच्या स्वभावाचे हळू हळू उलगडत जाणारे कंगोरे, कुठली रुपकं न लावता अगदी समर्पक आणि सडेतोड भाषेत मांडायची तल्लख प्रतिभा गौरी देशपांडे यांनी उभारलेल्या व्यक्तिरेखांमध्ये दिसते. माणसाच्या गुण दोषांचे सुरेख पण अभ्यासपूर्ण चित्रण यात घडते. त्यांनी उभारलेली स्वयंभू, स्वयंपूर्ण, स्वयंसिद्ध पण आत्ममग्न, आत्मतुष्ट नसलेली 'मणी' या नायिकेच्या मुलीमधून त्यांच्या स्त्रीवादी लेखिकेची मध्येच आपसूक जाणीव होते. एक स्त्रीवादी लेखिका हे लेबल तितकं पटकन न चिकटवता, साहित्य या नजरेतून हे पुस्तक वाचताना (लॉजिकल) तर्कशुद्ध विचार असणारी, परखड, प्रतिभावंत आणि बुद्धीवादी लेखिका अशी गौरी देशपांडे यांची ओळख यात होते. मी त्यांची किंवा त्यांच्या बद्दलची या आधी वाचलेली पुस्तके - 'आहे हे असं आहे' हा कथासंग्रह, 'विंचुर्णीचे धडे' हे ललित लेखन आणि 'महर्षी ते गौरी' हे मंगला आठयलेकरांचं पुस्तक. या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज वाचलेली 'उत्खनन' ही कादंबरी. या साऱ्यातून त्यांच्याबद्दलची मनात तयार झालेली ही प्रतिमा.




      शेवटी काय, नाटक, सिनेमा, कथा, कादंबऱ्या, ही पुस्तकं, रामायण, महाभारत, इतिहास या साऱ्यातून तेच-तेच दिसत राहतं, सापडत राहतं, मनुष्य स्वभावाची परिस्थितीनुसार जाणवणारी वेगवेगळी रूपं, नात्यांचे क्लिष्ट बंध, आणि या साऱ्यात गुंफत जाणारं आपलं आयुष्य, जुना होऊन बाजूला पडलेला परिपक्व् डाव, नव्याने सुरु होऊ पाहणारा कोवळा डाव आणि आत्ता खेळत असलेला आयुष्याचा न उमजलेला डाव, हे सारं सगळं असं आजूबाजूला पसरलेलं, विखुरलेलं पाहत पुढे पुढे वाट काढत जाताना आनंदाचे क्षण वेचण्याचा ध्यास, आणखी काय. एखादं चित्र प्रत्येक चित्रकारानं वेगळ्या पद्धतीनं रेखाटावं, त्यात स्वतःत उपजत असलेल्या कौशल्यानं रंग भरावेत तेव्हा पाहणाऱ्याला त्याच्या रसिकतेनुसार त्या कलाकृतीत दरवेळी वेगळं सौंदर्य दिसावं तसं या कथा रेखाटण्याबद्दलही मला वाटत. अर्थात प्रत्येकच कला ही याच वळणावर जाणारी. असो. नक्की वाचावी अशीच उत्खनन ही कादंबरी.

अश्विनी वैद्य 
२७. १०. १७

Monday 23 October 2017

I believe in GOD...!


    'अगं, परवा तू पाठवलेली ती युट्यूबवरची रांगोळी, तीच काढलेली थोडे changes करून या लक्ष्मीपूजनाला...!',
'आई, तुझ्या हातचे अनारसे...अहाहा...वर्षातून एकदाच खाते गं पण ती चव वर्षभर पुरते अगदी...!',
'अगं, साड्या कुठल्या नेसणं होतंय हल्ली तितकसं, म्हणून मग एक आईची आणि एक सासूबाईंची अशा त्यांच्याच दोन साड्यांचे ड्रेस शिवलेत या दिवाळीला डिझायनर कडून..',
'ए तुला कधी वेळ आहे, ये ना घरी आणि दाखव कसे केलेलेस ते चिरोटे, दिवाळीच्या पाचव्या दिवशी संपतील एवढेच करणार...पण करणारच बाई या वेळी नक्की...!',
'मुलांनो, चला पणत्या रंगवायला, नंतरचा पसाराही नीट आवरून ठेवायचा आहे हां...', ही अशी सगळी गडबड, सणांची तयारी, आईची लेकीला-सुनेला फराळाचा डबा पाठवायची धावपळ, या सगळ्याला किचन मधले तळणाचे वास आणि गप्पांचे, हसण्याचे सुर, background music देतात ते हे उत्सव. नात्यांचा गोडवा, वातावरणातला हलकेपणा हेच काय ते प्रयोजन असावं सणांचं, उत्सवाचं नाही का?


     सण-उत्सव साजरे करणं यामुळं रोजच्या त्याच त्या रूटीनला जरा फाटा मिळून स्वतः मधला उत्साहाचा मोड स्विच ऑन होतो आणि आपल्या आजूबाजूच्या वातावरणात मोकळा श्वास घेता येवून मध्ये मध्ये स्वतःलाच स्वतः मनापासून आवडायला जे विसरलेलो असतो ते आवडायला लागतो... कदाचित. पण मग पुढे, या सगळ्या साजरेपणात सर्वमान्य देवाला कुठेतरी ओवलं, त्याच्या अस्तित्वाला मूर्तीत पुजलं की या सगळ्या करण्याचं पावित्र्य उगाच हातभार वाढल्याची भ्रामक कल्पना तयार होते. आणि या सगळ्यात हे केलंच पाहिजे, ते करावंच लागतं, आमच्याकडे हे नाही चालत वैगेरे धागे देवाला अगदी मध्यवर्ती बसवून त्याभोवती घट्ट व्हायला लागले, की मग मात्र तो मोकळा श्वास आत कुठेतरी गुदमरतोय असं मला तरी होवून जातं...!


       देव वैगेरे अस्तित्वात असण्यावरचे आणि मग त्या देवाला घाबरून त्याच्या पाया पडण्याचे, त्याच्याकडे आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मागण्याचे वैगेरे संस्कार लहानपणी अगदी खोलवर रुजलेले, ते सावकाश मोठे होता होता मात्र हळू हळू निखळून पडत गेले, किंवा आपण असे एकदम वयाने मोठेच झालो आहोत याची जाणीव त्या निखळले पणातून होत गेली. पण म्हणजे 'देव' या मूळ संकल्पनेकडे बघण्याचा दृष्टिकोन हळू हळू बदलत गेला. म्हणजे पूर्वी अगदी लहानपणी परीक्षेला जाताना गणपती स्तोत्र म्हटलं नाही तर पेपर अवघड जाणार किंवा मुलींनी श्रावणी सोमवारचे उपास केले नाहीत तर त्यांना नवरा चांगला मिळणार नाही, किंवा मंगळवारी गणपती मंदिरात जावून पाया पडले नाही तर ही विद्येची देवता आपल्यावर राग धरणार आणि आपल्याला अभ्यासात यश देणार नाही असं अजून बरंच काही...लहानपणी मोठी माणसे करायला लावतात म्हणून अशा अनेक गोष्टी अंगवळणी पडत गेल्या... त्या तशाच असतात असं समजून करत गेलेही.

    मग एका अडनिड्या ना धड लहान ना धड मोठे असतानाच्या वयात बऱ्याच वेगवेगळ्या जाणीवा निर्माण होत होत्या तेव्हा त्याबरोबर अनेक "का?" सुद्धा मनात तयार व्हायला लागलेले...' पोटात आग पडली असतानाही देवाला नैवेद्य दाखवल्या शिवाय का जेवायचं नाही, देवाला आपल्याला उपाशी ठेवून आधी स्वतः खायला कसं आवडत असेल, मुळात तो खातच नाही तर मग जीवाचा इतका आटापिटा कशासाठी...., देवीची ओटी भरली की बायकांचं सौभाग्य(?) चिरकाल वैगेरे कसं काय टिकत असेल, शनिवारी नखं, केस का कापायचे नाहीत.' आईला हे असलं काही विचारलं की तिचं आपलं ठरलेलं उत्तर असायचं, 'माझी आई, माझी आज्जी करत आल्यात या सगळ्या गोष्टी फार पूर्वीपासून...म्हणून आम्ही करतो, सांगितलेलं ऐकावं लहान मुलांनी...!'. मला हे उत्तर आत्ता आठवून तर गंमतच वाटते. हे असं सांगणं म्हणजे आत्ता माझ्या मुलांना मी जसं सांगते की, 'टीव्ही खूप पाहिलात की डोळे चौकोनी होतात बरंका, किंवा पोळी भाजी खाल्ली नाही की पोट दुखायला लागतं हां...' असं काहीही इल्लॉजिकल बोलते तसं आईचं ते बोलणं आत्ता वाटतंय. पण थोडक्यात, त्या सगळ्या 'का?' ची उत्तरं तेव्हा नाही मिळाली.. आणि मग चाबकाच्या फटक्याला घाबरून वाघ जसा सर्कसमध्ये खेळ करून दाखवतो तसे देवाला घाबरून किंवा उलट अर्थी माझ्यावर देवाची कृपा व्हावी म्हणून मी ही या अशा अज्ञात गोष्टी तेव्हा निमूटपणे करत राहिले. 


      पण मग स्वतःचे पाय जमिनीत थोडे रोवले गेले आहेत, किंवा विचारांना पाठबळ मिळण्यासाठी पुस्तकातले आधार उपयोगी पडत आहेत अशी जाणीव ज्यावेळी व्हायला लागली त्या वेळी त्याच 'का?' ची धग परत जाणवायला लागली आणि त्याची पटणारी उत्तरंही मिळायला लागली. देव, कर्मकांड या संकल्पना स्वतःपुरत्या स्पष्ट व्हायला लागल्या. आईनं आणि आजूबाजूच्या लोकांनी लहानपणी माझ्या मनात निर्माण केलेला देव आणि मला आत्ता जाणवत असलेला देव यातला अंधुक फरक स्पष्ट व्हायला लागला.

     देव म्हणजे स्वतःतली सकारात्मक शक्ती, एक ऊर्जा, मनातल्या स्वतःवर विश्वास ठेवून जे करतोय त्या बद्दल ते योग्य आहे याची स्वतःला असलेली खात्री. मग ती कुठल्या मूर्तीमध्ये कुठल्या मंदिरात, कुठल्या रूम मध्ये कशी बांधून राहील, हे पटत गेलं. पण ती ऊर्जा आतमध्ये जाणवण्यासाठी लागणारा शांतपणा, स्वस्थपणा जिथे मिळू शकेल असं ठिकाण, अशी जागा म्हणजे मंदिर, मग ते ठिकाण एखाद्याचं घर असेल, शाळा असेल, एखाद्याचं काम करण्याचं ठिकाण असेल, एखाद्यासाठी एखादी व्यक्तीच असेल किंवा खरोखरचं मूर्ती असलेलं एखादं देवघरही असेल..., ज्याच्यासमोर बसून तो शांतपणा अनुभवत स्वतः मधली ती ऊर्जा स्वतःला जाणवायला लागेल. बऱ्याच आजवरच्या अनुत्तरित प्रश्नांची उकल समोर दिसायला लागेल, स्वतःचा स्वतःशी संवाद होवू लागेल, ते मंदीर, ते देवूळ, ज्याला मूर्ती असण्याची आवश्यकता नाही, हार, फुलं, कुंकू, नारळ याला चिकटलेल्या खोट्या पावित्र्याची गरज नाही, कुठली सक्ती नाही, भीती तर त्याहून नाही, हे केलं नाही तर असं, ते केलं नाही तर तसं अशी कोणतीही गृहितकं नाहीत तर उलट निखळता, सहजता यावर आधारलेली स्वतःमधलीच सकारात्मक ऊर्जा, विश्वास जाणवून देणारं ठिकाण म्हणजे मंदीर, ही जाणीव स्पष्ट झाली. रोजच्या कामातून, जोडलेल्या नात्यांमधून कधी निराशा, कधी साचलेपणा यायचाच...अगदी नैसर्गिक...! अशावेळी त्या मंदिरात मिळालेली ऊर्जा या सगळ्याचं स्विकारलेपण पचवायला उपयोगी पडते माझ्यासाठी तरी. अर्थात ज्याची त्याची देवाबद्दलची कॉन्सेप्ट वेगवेगळी असायचीच आणि त्या नुसार त्यातून मिळणाऱ्या समाधानाचीही...नक्कीच...!, हे स्विकारलेपण समजायलाही मला ती ऊर्जाच मदत करते आणि सण, उत्सव साजरे करताना अपेक्षित असलेला मोकळा श्वास मिळवून देते. 



--- अश्विनी वैद्य
२३.१०.२०१७

राजस्थान डायरी : उदयपूर

उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थाप...