Monday 23 November 2015

असाही कधी एक दिवस यावा…. !




घड्याळाच्या गजराशिवाय डोळ्यांना हलकेच उजाडल्याची जाणीव व्हावी….!
पापण्यांना उगाच जड करणारे काल-परवाचे सारे ताण कुठंतरी हरवून जावेत…! 
कोवळ्या उन्हातला हलका गारवा अंगावर घेत वाऱ्याच्या झुळूकेबरोबर आलेल्या मोगऱ्याच्या सुवासानं मन प्रफुल्लित व्हावं.…! 
रेडीओवरचं हलक्या स्वरातलं एखादं अगदी आवडीचं गाणं खूप दिवसांनी बेसावधपणे कानांवर पडावं….! 
आणि या साऱ्याची मधुरता पूर्णत्वानं अनुभवण्यासाठी बुद्धी, मेंदू, मन हे एकत्रितपणे जे काही आहे हे तेवढच शांत असावं…!
ज़ेणेकरुन ती प्रसन्नता मनाच्या गाभाऱ्यात खोल कुठेतरी तळाशी अलगदपणे रुजेल. रुजायला तिला तेवढा शांत वेळ मिळेल. 
रोजच्या ठरलेल्या घाईघाईच्या कृत्रिम दिनचर्येला छोटासा अर्धविराम देत मनाच्या हिंदोळ्यांवर भटकून यावं लांब कुठंतरी स्वतःच्याच जगात….! 
जिथे एखाद्या रानोमाळी पायवाटेने चालताना हलकेच होणारे वेलींचे, पानांचे नाजूक स्पर्श सहज जाणवतील
आभाळात उडणाऱ्या बगळ्यांच्या थव्याला पाहण्यासाठी डोळे आपोआप त्यांवर स्थिरावतील 
पुस्तकात वाचताना केवळ अभासलेली पक्ष्यांची ती गोड गाणी, फुलांचे ते नैसर्गिक रंग प्रत्यक्षात अनुभवता येतील
संध्येच्या शांत केशरी प्रकाशात न्हावून निघणं म्हणजे नक्की काय असतं हे त्या क्षितिजाच्या पलीकडल्या डोंगराला पाहून जाणवेल 
कधी निवांतपणे चहा पिताना होणाऱ्या स्वतःच्याच फुर फुर आवाजाला स्वतःच मनमुराद हसता येईल 
डाएट चा विचार करत केवळ डोळ्यांनीच चाखलेले कितीतरी पदार्थ जीभेनेही चाखत तिचे मनमुराद लाड पुरवता येतील 
स्वतःच केलेल्या आळूच्या भाजीचे स्वतःच कौतुक करत समाधानाने स्वतःचीच पाठ थोपटवता येईल. 
लहानपणी आईने शाळेत खूपदा डब्यात दिलेला तो मलिद्याचा (गूळ-तूप-पोळी चा) लाडू लेकीबरोबर निवांतपणे टीव्ही बघत गट्टम करता येईल
खूप आवडीचा पण प्रसंगाला साजेसा नाही म्हणून उगाच बाजूला राहिलेला ड्रेस स्वतःसाठी आणि त्याच्याही हवापालटासाठी अंगावर चढवता येईल
बरेच दिवस नुसतं ज्याच्याकडे लांबूनच बघत होते त्या आवडीने म्हणून आणलेल्या पुस्तकात अगदी मनसोक्त बुडून जाता येईल, जिथे कोणाच्या आवाजाचा, बोलण्याचा, हाकेचा पार विसर पडेल….!  
आणि तेवढ्यात अचानक हे सारं कल्पनातीत नाट्य मनाच्या पडद्यावर चालू असताना, 'आई, माझा होमवर्क फोल्डर सापडत नाहीये…' या वाक्याने शेवटचा पडदा पडला. 
मग काय 'back to routine' म्हणत गाडी पूर्ववत रुळावरून धावायला लागली…. पण त्या तात्पुरत्या का होईना कल्पित सुखावलेल्या भावाविश्वाने….


          'जगण्याच्या गाण्याचं पालुपद तेच ते आणि तेच ते असं झालं कि आधी आपल्याला आपला कंटाळा येतो, आणि मग भोवतीचही सारं कंटाळवाणं वाटायला लागतं. कोऱ्या चेकप्रमाणं मिळालेल्या आयुष्याला मोल येतं ते प्रयोगशील जगण्यानं. हा प्रयोग कुठल्या बंद भिंतींच्या प्रयोगशाळेत करायचा नसतो, उघड्या डोळ्यानं अन खुल्या मनानं नवेपण स्विकारत तो होत जातो.' हे खूप पूर्वी प्रवीण दवणे यांच्या एका पुस्तकात वाचायला मिळालं होतं. आज परत एकदा ते जाणवलं. रोजच्या त्याच त्या पणाचं ओशाळवाणं रूप जाणवायला लागलं कि मग 'असाही कधी एक दिवस यावा' म्हणत कधी काळी मनात रचलेल्या पण करायच्या राहून गेलेल्या बऱ्याच गोष्टींना मोकळी वाट करून देत मनाचा आणि परिस्थितीचाही तजेलदारपणा जपायला काय हरकत आहे…! 


अश्विनी वैद्य 
२३/११/२०१५






Monday 9 November 2015

दिवाळी 

      भल्या पहाटे उदबत्तीच्या सुगंधानं जाग यावी, आईची अभ्यंग स्नानाची गडबड कानांबरोबर डोळ्यांनीही टिपावी,
पहाटेच्या चंद्रप्रकाशात अंगणात मांडलेल्या पणत्यांची माळ जमिनीवर सांडलेल्या चांदण्यापरी भासावी,
तिथेच शेजारी काढलेल्या सुंदर रेखीव रांगोळीने आणि त्यातल्या रंगांनी दिवाळीच्या त्या गोजिऱ्या सकाळची प्रसन्नता अजूनच वाढवावी…
नवीन कपड्यांचे ते कोरे वास, स्वतः तयार केलेले झुरमुळ्याचे आकाश कंदील-शुभेच्छापत्र, चिखलात बरबटून साकारलेले इटुकले रायगड-प्रतापगड,
'खुसखुशीत झाली कि नाही बघू गं' म्हणत करता करताच संपवलेले चकलीचे अर्धे अधिक घाणे आणि खूप प्रयत्न करूनही लक्ष्मीपूजनाला डोळे मिचकावत हसलेले अनारसे…
दरवर्षी येणारे दिवाळीचे हे इतके लोभस रूप… तेच…तसेच पण अगदी हवेहवेसे वाटणारे…


जगलेल्या क्षणांच्या आठवणी झाल्या कि त्या उगीच मौल्यवान भासू लागतात.
मग आपल्या लहानपणीची दिवाळी मनात सकारात तो आनंदाचा ठेवा पुढच्या पिढीनेही तसाच जपावा यासाठी आपल्याच नकळत सुरु होते एक लगबग, धावपळ.... जी असते यावर्षीच्या दिवाळीच्या स्वागताची जय्यत तयारी…






तुम्हा सर्वाना दिवाळीच्या मनापासून खूप शुभेच्छा.....Happy Diwali 2015 !



                                                                                     -- अश्विनी वैद्य

राजस्थान डायरी : उदयपूर

उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थाप...