Saturday 15 April 2023

मनात




'सुख हे ट्रेड मिल सारखं असतं. ते स्थिर राहण्यासाठी सुद्धा पळावं लागतं. सगळ्यांनी सतत असंतुष्टच असणं हेच या व्यवस्थेला हवं असतं.' 
'आपल्या जगण्यावर आणि एकूणच मानसिकतेच्या घडण्यावर धर्म आणि अर्थ या दोन व्यवस्थाच मुळात कारणीभूत असतात.'  किती कमी शब्दात पण किती चपखल लिहिलेली वरची ही दोन वाक्य!

या आणि अशा संदर्भातलं खूप तपशीलवार लिखाण ज्या पुस्तकात वाचायला मिळालं ते मानसशात्रावर आधारित एक अप्रतिम पुस्तक नुकतच वाचलं ते म्हणजे 'मनात'. अच्युत गोडबोले यांचा हा थोडा क्लिष्ट पण प्रचंड माहितीपूर्ण असा सहाशे पानांचा एक मोठा ग्रंथच आहे. मानशास्त्रामधल्या पूर्वीपासून आत्तापर्यंतच्या वेगवेगळ्या कल्पना, शोध, अनेक शास्त्रज्ञांचा त्यावरचा अभ्यास, त्यांनी मांडलेली मतं, वेगवेगळ्या धर्मामधल्या मन, आत्मा या कल्पना, या आणि अशा बऱ्याच गोष्टींचा परिपाक या पुस्तकात वाचायला मिळाला आणि तो ही अगदी साध्या सोप्या शब्दात.

खरंतर सहा वर्षांपूर्वी अल्बर्ट एलिस या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाचं चरित्र मी वाचलेलं आणि त्याने मांडलेली REBT (रॅशनल इमोटीव्ह बिहेव्हिअर थेरपी) खूप जास्त भावलेली. स्वतःच्या विचारांचं विवेकी पृथक्करण. ते पुस्तकही माझ्यासाठी तरी एक milestone वाटावं असं पुस्तक होतं. पण तरीही मनातले इतर अनेक प्रश्न अनुत्तरितच राहतात. स्वतःच्या दोन मुलांना वाढवताना, त्यांच्या वयाप्रमाणे बदलणाऱ्या मानसिकता समजून घेताना बरेच गोंधळ उडतात. त्यात मुलगा आणि मुलगी यांच्या वागण्यातला, दृष्टिकोनातला फरक, त्यांच्या आकलन करण्याच्या पद्धतीमधला फरक, त्यांच्या भावनिक वाढीतला फरक, मोठ्याची पद्धत धाकट्याला लावणंही शक्य नाही. शिवाय स्वतःबद्दलचे काही प्रश्न जसे की विचार आणि अतिविचार यातली सीमा रेषा नक्की कुठे असते? ती मी कशी ठरवणार? मला आत्ता हे असंच का वाटतंय, राग येतो किंवा भीती वाटते म्हणजे मेंदूत नक्की काय होतं किंवा माझं व्यक्तिमत्व मुळात कसं आहे, हे मला समजलंय का? मी ते आहे तसं आधी स्वतः स्वीकारलं आहे का? संवेदनशीलता म्हणजे नक्की काय, ती कशावरून ठरते. आनंद, दुःख याची तीव्रता भासवणारी कोणती संप्रेरकं मेंदूत त्यावेळी स्रवतात. प्रेम, आपुलकी, वासना याचा परस्पर संबंध असतो का? आणि या भावना स्त्री आणि पुरुष यांच्या मध्ये जेव्हा निर्माण होताना त्यात फरक असतो का? प्रेम, राग, भीती अशा भावना आणि त्याचे उद्रेक मनात येणं हे स्वाभाविक आहे का? त्या भावना बरोबर किंवा चूक आहेत हे  ठरविण्याआधी त्या आहेत तशा मनात येऊ देणं आणि त्या स्वीकारणं गरजेचं का आहे? मुळात त्या स्वतः स्वीकारणं म्हणजे तरी नक्की काय? या आणि अशा बऱ्याच गोष्टींचं कुतूहल या न त्या कारणानं कायम मनातअसतंच. पण त्याची शास्त्रशुद्ध माहिती दर वेळी मिळेलच याची खात्री नसते.

त्यामुळं अच्युत गोडबोले यांचं हे पुस्तक दिसल्या बरोबर मी ते लगेच वाचायचं ठरवलं. मुळात माझ्या डोक्यातल्या वरच्या प्रश्नांचे शास्त्रीय विश्लेषण यात सापडेल या उद्देशाने हे पुस्तक वाचायचं ठरवलं. या सगळ्याची उत्तरं मला या पुस्तकात पटापट मिळाली असं मी अजिबात म्हणणार नाही. पण हे पुस्तक वाचतानाचा माझा मानसिक प्रवास फार सुंदर झाला हे नक्की. कुतूहल शमल्याचं समाधान देणारा आणि नवीन भरपूर काही पहिल्यांदा वाचल्याचा एक आनंददायी असा माझा अनुभव होता.

मुळात मन म्हणजे काय. मन आणि बुद्धी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत का? मेंदू मधली त्याची स्थानं नक्की काय, त्याच्या शोधाचा अगदी इसवीसन पूर्व काळापासून अनेक वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केलेला अभ्यास, मांडलेल्या थेअरी, या सगळ्याचा आजवरचा संपूर्ण इतिहास या पुस्तकात आहे. अच्युत गोडबोले यांनी मानसशास्त्रावर आधारित शंभर एक पुस्तकं आधी स्वतः वाचून मग हे पुस्तक लिहिलं आहे.

या पुस्तकातली मला उपयोगी किंवा संदर्भ/नोट्स म्हणून माझ्याकडे असावी अशी वाटलेली माहिती मी संक्षिप्त रूपात लिहून ठेवली, ती खाली देते. त्यातून पुस्तकाची हलकीशी ओळख नक्की  होईल.

मनात 

ग्रीक भाषेमध्ये आत्म्याला psyci and अभ्यासाला लॉजिया असं म्हणतात. म्हणून मग आत्म्याच्या अभ्यासाला psychology हा शब्द आला. Psychology and neurology यामध्ये फरक आहे का आणि असेल तर तो काय आहे हे एका ओळीत समजून घ्यायचं तर neurology हा वस्तुनिष्ठ आणि Psychology हा व्यक्तिनिष्ठ अभ्यास असं या पुस्तकात वाचायला मिळालं.

ख्रिसतपूर्व पाचव्या शतकात लिहिलेल्या पतंजली त्यांच्या योग सुत्रात मानसशास्त्राचे अतिशय सखोल विश्लेषण केले आहे. ते एक वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले योगी होते. सम्यक ज्ञान, मिथ्या ज्ञान, कल्पनाशक्ती, निद्रा, स्मृती या मनाच्या पाच वृत्ती त्यांनी सांगितल्या. मनाला समजून घ्यायचं असेल तर पतंजलीच्या योगमार्गाला समजून घेतले पाहिजे. योग आंधळेपणाने विश्वास ठेवायला सांगत नाही तर अनुभव घ्यायला सांगतो. चित्तवृत्ती निरोध म्हणजे योग. मनाचं संपून जाणं. समर्पित होणं. मनात कुठलाही विचार नसणं अशी अवस्था म्हणजे योग. माणूस एखाद्या कलेत रमून जातो ती त्याची अमनीय अवस्था असते. (थोडक्यात आत्ताच्या काळात याच्या जवळ असणारी अवस्था म्हणजे मेडिटेशन/ध्यान असं आपण म्हणू शकतो). 

पतंजलीच्या म्हणण्यानुसार निसर्गाला अव्यवस्थितपणा आवडत नाही, त्यामुळं कुठलीही गोष्ट वाऱ्यावर सोडून द्या, तिचा नाद सोडून द्या. ही गोंधळाची अवस्था तात्पुरती असते. ती नैसर्गिक रित्या आपोआप स्थिर होईल असं पतंजली ने सांगून ठेवले आहे.

झेन हा जापनीज शब्द योगामधल्या ध्यान या शब्दावरून आला आहे. उपनिषद, पतंजली, चार्वाक, महावीर, गौतमबुद्ध यांचं तत्वज्ञान, मनाला लक्षात घेवून, दुःख, वेदना आणि मृत्यू यांच्या बद्दल सांगतं. आपल्या इच्छा आणि वासना यावर नियंत्रण कसं ठेवायचं हेही ते सांगतं. मनाच्या प्रवाहाला हवं तसं वाहू दिलं की ते निवळत जातं. जाणिवेची विचलित अवस्था म्हणजे मन.

Aristotal या इसवीसन पूर्व ३०० शतकातल्या विचारवंताने मांडलेले स्मृती, संवेदना, भावना, व्यक्तिमत्व यावरचे फार सखोल विचार, जाणीवेवरचं त्याचं विशेष महत्वाचं लिखाण त्याचे सगळे संदर्भ या पुस्तकात आहेत. त्याच्या म्हणण्या नुसार आत्मा, शरीरापासून वेगळा असतो आणि आत्मा हा आपल्या सगळ्या विचारधारेचे मूळ आहे. आपल्या विचारशक्तीने दुःख आपण बाजूला सारून आनंद मिळवू शकतो असं तो म्हणे.

Sigmond Froid : मनोविकाराचा लैंगिकतेशी संबंध विचारात घ्यायलाच हवा असं ठाम मत असणारा, मानस शास्त्रा च्या अभ्यासात क्रांती घडवून आणलेला हा एक मानसशास्त्रज्ञ. आपल्या कृतींच्या आणि भावनांच्या मागे लैंगिक प्रेरणा असतात असं फ्रॉइड म्हणे. त्यानं १९०० साली लिहिलेलं Interpretation of Dreams हे पुस्तक खूप गाजलं. त्याच्या म्हणण्यानुसार मानवी मन म्हणजे हिमनग. जसा हिमनगाचा जेवढा भाग पाण्यावर दिसतो त्या पेक्षा खूप मोठा भाग पाण्याखाली लपलेला असतो. तसच आपलं मन आहे, त्याने unconscious mind चा खूप सखोल अभ्यास केला. नैतिकतेची बंधनं पळत जगताना माणूस ज्या भावना, इच्छा मनात दडपून टाकून पुढे जात राहतो त्या कल्पना, इच्छा कधी कधी स्वप्नांमधून माणसाला समोर प्रत्यक्ष दिसतात.
सुपर इगो (वास्तव आणि आदर्श यातला फरक) आणि इडिपस कॉम्प्लेक्स या दोन संकल्पना त्याने मांडल्या. इगो अँड इड ही खूप इंटरेस्टिंग थेअरी त्याने मांडली.
त्याची आणखी दोन प्रसिद्ध झालेली पुस्तकं जी त्या काळी खूप अभ्यासली गेली, त्यामुळं समाजात वादंग ही निर्माण झाले ती म्हणजे Psychopathology of everyday life आणि 3 essays on the theory of sexualities. मनो विश्लेषण - psychoanalysis ही टर्म वापरणारा तो पहिला मानशास्त्रज्ञ आहे. त्याच्या म्हणण्यानुसार माणसाच्या आर्ट/ कलेमध्ये ही खूप खोलवर दडलेल्या मनाच्या unconscious भागात आलेल्या अनुभवांचा आरसाच असतो. म्हणून कोणतीही कला (संगीत, नृत्य, चित्र, गायन) माणसाचं मन शांत व्हायला मदत करते आणि समाधानाचे सुख देते. पण पुढच्या संशोधनानं त्याच्या सगळ्या थेअरी सिद्ध होऊ शकल्या नाहीत.

कार्ल ह्युंग - प्रत्येक माणसाची मनोवृत्ती ही मूलतः धार्मिक च असते. आणि धर्माबद्दल अधिक जाणून घेण्यात त्याला रस असतो असं म्हणणारा तो पहिलाच मानसशास्त्रज्ञ मनाला जातो. मनोविकार दूर करण्यासाठी कलेचा उपयोग होतो. असं तो म्हणे. चिंता, भीती, trauma यावर विशेष करून खूप चांगला परिणाम होतो असं तो म्हणे. 1937 डिसेंबर मध्ये तो भारतात आला. माणसाच्या अध्यात्मिक उन्नतीसाठी spiritual cha खूपच वाटा आहे असं त्याला वाटत असे. पौरात्य तत्वज्ञानाचे महत्त्व त्याला होतं. स्वप्नं ही आपल्या unconscious मनाच्या खिडक्या आहेत. त्याच्या मते, कोणत्याही कलेचा उपयोग मानसिक आघात, भीती किंवा चिंता कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो. व्यक्तिमत्वाचे चार प्रकार असतात असं तो मानी - अंर्तमुख, बहिर्मुख, खंबीर आणि निष्क्रिय.

या पुस्तकात इतर अनेक शात्रज्ञ, त्यांचा अभ्यास, त्यांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांनी केलेले प्रयोग याची विस्तृत माहिती वाचायला थोडी क्लिष्ट, काही भाग थोडा स्लो pace चा असला तरी समजून घ्यायला खूप छान वाटली.
वेस्टर्न आर्ट हिस्टरी मधला प्रसिद्ध चित्रकार - Van gogh याला त्याच्या आयुष्याच्या उत्तरार्धात वेड्यांच्या इस्पितळात ठेवलेलं. आणि शेवटी त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या सगळ्या मागची मानसिकता, मनाच्या अशा कुठल्या अवस्था गाठला गेल्या असतील यावरचं विश्लेषण या पुस्तकात वाचायला मिळतं.

मार्क्स - आपल्या सर्व कृतींच्या, विचारांच्या आणि भावनांच्या मागे आपण कुठल्या वर्गातून आलेलो असतो, उत्पादन व्यवस्थेमधलं आपलं स्थान काय अशा गोष्टींचा सगळ्यात जास्त प्रभाव असतो, असं तो म्हणे.

बर्ट्रांड रसेल - निरिश्र्वर वादी, नोबेल पुरस्कार सन्मानित - ब्रिटिश गणितज्ञ, तत्वज्ञ, साहित्यकार त्याचं marriage and morals हे अतिशय गाजलेलं पुस्तक.

रेने देकार्त - मानसशास्त्रमधला हा पहिला विचारवंत (फ्रांस - 1596- 1650) म्हणजे जेव्हा आपल्याकडे महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या लढाया चालू होत्या साधारण तेव्हाचा काळ. आणि इंग्लड मधला न्यूटन चा काळ. देकार्तच्या मते माणसामध्ये 6 मूळ भावना असतात. आश्चर्य, प्रेम, द्वेष, इच्छा, आनंद, दुःख.

फ्रान्सिस गॅल्टन - बुध्यांक हा अनुवांशिकतेनुसार जन्मापासूनच ठरतो आणि बुद्धी ही जन्मजात असते, नंतर ती बदलत नाही असं galton ची थेअरी सांगते. पण फ्रांसच्या बीने या सायकलॉजिस्टच्या थेअरी नुसार मात्र प्रयत्नानं आणि प्रशिक्षणानं बुद्धी वाढू शकते हे सिद्ध केलं.

मनाच्या अभ्यासात क्रांती घडवलेली किंवा प्रचंड गाजलेली ही काही ऐतिहासिक पुस्तकं. 
Thomas Harris चे पुस्तक - I am ok you are ok.
Sons and lovers - Lawrence
Robert Huston - Human mind
कृष्णाजी केशव कोल्हटकर यांचं पातंजली योग दर्शन
Edwin Smith - Egyptian historian - Edwin Smith papyrus granth - 3700 वर्ष जुना आहे.
फ्रान्स mesmer - 1740 - On the influence of the planets
Mat Ridley - red Queen sex and the evolution of human nature

1912 साली William Stern जर्मन मानसशास्त्रज्ञाने mental quotient काढण्याची पद्धत सुचवली. जी त्याकाळी प्रचंड लोकप्रिय झाली. Intelligent quotient = प्रत्यक्ष वय/मानसिक वय *100.

अनेक बिहेव्हिअरिस्टस ने आपलं व्यक्तिमत्व हे आपल्या अनुभव वरून ठरतं आणि त्याचं कंडीशनिंग करून ते बदलता ही येतं, हे प्रयोगांनी सिद्ध केलं. अनुवंशिकता म्हणजे mature आणि अनुभव म्हणजे nurture याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होतो असं त्या काळी मांडलेलं मत आजही मानलं जातं.

कॉग्निटिव्ह बिहेव्हिअर थेरपी - माणूस शिकतो कसा, लक्षात ठेवतो कसा, विचार कसा करतो, भाषा शिकतो कसा, तर्क, निष्कर्ष कसा काढतो याचा विचार आणि संशोधन १९५० च्या दशकात सुरु झाले. computer science चा या संशोधनावर त्या काळात जास्त प्रभाव पडला आणि विकास झाला.

१९६७ च्या नंतर मेंदू बद्दलचं ज्ञान जसजसं वाढत गेलं तसतसं मन ही गोष्टच अस्तित्वात नाही, मन म्हणजेच मेंदू, आणि मनातल्या भावना या मेंदूच्या ठराविक अवस्थेवरून ठरतात. जर मेंदूमधले न्यूरॉन्स आणि रसायनं आपण बदलवू शकलो तर मनो अवस्था ही बदलू शकू अशी थेअरी पुढे येऊ लागली.

दोन न्यूरॉन्स एकमेकांना सिनॅप्सच्या फटीने जोडले जातात. या सिनॅप्समध्ये जेव्हा बदल होतात तेव्हा आपण माहिती मिळवत असतो. जेव्हा काही सिनॅप्स सारखे ऍक्टिव्हेटेड स्टेट मध्ये असतात तेव्हा ती गोष्ट आपल्या मनात पक्की होत असते. म्हणजे आपण ती गोष्ट शिकत असतो. आपल्या मेंदूत दहा हजार कोटी न्यूरॉन्स असतात. मेंदूतली न्यूरॉन्सची पक्की झालेली सर्किट्स आपली स्मृती आणि आपण शिकलेल्या गोष्टी दाखवतं हे हेब या शास्त्रज्ञाने १९७० च्या दशकात मांडलं.

प्रेम मेंदूंत कुठे असते, स्त्री आणि पुरुष त्या बद्दल वेगळा विचार कसा करू शकतात याचे संदर्भ पुस्तकात आहेत. प्रेम आणि कामवासना या दोन वेगवेगळ्या गोष्टी असून त्यांची मेंदूमधली जागाही वेगवेगळी असते.
मेंदू मधल्या कॉर्डेट निक्लिअस या ठिकाणी तीव्र इच्छा, स्मरण शक्ती, भावना आणि अवधान याची निर्मिती होते.
दीर्घकाळ मैत्री, जिव्हाळा हे मेंदूच्या पुढच्या भागात व्हेंट्रल पुटामेन आणि वॅलेडीअन इथे असते.
डोपामाईन - happiness हार्मोन मेंदूमध्ये ventral tengmental इथून स्त्रवते तर स्टरोटोनिन  हे हार्मोन स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात निर्माण होते.

या पुस्तकाच्या सुरुवातीच्या अर्ध्याहून अधिक भागात मनाच्या अभ्यासाची उत्क्रांती कशी होत गेली याबद्दलची खूप विस्तृत माहिती आहे आणि शेवटच्या तीन भागात गेल्या ४० वर्षात मानसशास्त्राच्या, मेंदूच्या अभ्यासात तंत्रज्ञानामुळे जी झपाट्याने वाढ होत गेली त्या बद्दल लिहिले आहे. त्यात अगदी शेवटच्या भागात अल्बर्ट एलिसच्या संशोधनाबद्दल परत वाचायला मला खूप आवडलं. १९८२ साली आठशे मानशास्त्र मानसशास्त्रज्ञानच्या एका सर्वेक्षणावरून एलिस हा दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रभावशाली सायकोथेरपिस्ट मनाला गेला आहे. त्याला मानवता वादी म्हणून गौरवलं गेलं. आयुष्यातलं विनोदबुद्धीचं स्थान तो प्रचंड महत्वाचं मनात असे.

मला या पुस्तकातला शेवटचा भाग खूप जास्त आवडला. ज्यात आत्ताच्या जगातली वास्तविकता, समाधान, जगण्याचा अर्थ, चंगळवाद, सततच्या स्तुतीची अतीव गरज, त्याच्याशी निगडित मानसिक असंतुलन, जगण्याचा वेग, दान, दया, आत्मसन्मान याबद्दल लिहिलं आहे. 

मी हे पुस्तक या इस्टरच्या सुट्ट्यांमध्ये वाचून काढायचं पक्कं ठरवलेलं, ते आज पूर्ण होऊ शकलं याचं अगदी समाधान आहे. ते इतरांनीही नक्की वाचावं यासाठी हे सगळं लिहिण्याचा खटाटोप केला. तेव्हा नक्की वाचा 'मनात'. 
Happy reading!


अश्विनी वैद्य
१५.०४.२०२३

राजस्थान डायरी : उदयपूर

उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थाप...