कितीही organised आहोत असे वाटले तरी शेवटच्या मिनिटाची पळापळ होणे काही चुकत नाही. शाळा असो, स्विमिंग असो, scout असो…कुठेही जाताना घड्याळाबरोबरची आमची कायमची रेस. परवा असेच अनुष्का ला gymnastics ला घेवून जाताना आधी नेहमीची तयारी झाली होती तरीही शेवटच्या ५ मिनिटात सगळा गोंधळ सावरत गाडी मध्ये बसताना, bag, costume, slippers अशी cheklist तोंडाने बडबडत, घाईचा पाढा वाचत शेवटी दोघी गाडीत बसलो. आणि मग रस्त्याला लागल्यावर heavy traffic मुळे गाडीच्या वेगाच्या दृष्टीने असलेल्या स्थिर क्षणी आठवले कि, आपण आपला भ्रमणध्वनी अर्थात 'स्मार्ट फोन' स्मार्टपणे घरीच विसरलो आहोत. ट्राफिक मध्ये स्थिरावलेल्या गाडीबरोबर मी ही क्षणिक स्तब्ध झाले. स्वतःचाच राग येत सगळ्यात आधी डोक्यात विचार आला तो हा की, 'आता भाजीचा ग्यास १० मिनिटांनी बंद कर', हे मंदारला बजावून सांगितलेले आणि तरीही तो १०० टक्के विसरणार हे गृहीत धरून स्मार्ट फोन वरून (whatsapp वरून) आपण त्याला आठवण करून देणार होतो, त्याचे काय करायचे. शिवाय नील ला भरवायची टेबलावरच ठेवलेली वेगळी मीठाची भाजी आख्खे किचन शोधूनही त्याला नक्की सापडणार नाही आणि मग 'ती कुठे आहे' हे विचारण्यासाठी लावलेला फोन तिथेच वाजल्यामुळे दोघांचाही होणारा त्रागा…हे सारं चित्र क्षणात डोळ्यासमोर तरळलं. त्यात गाडी मुंगीच्या वेगाने पुढे ढकलत वेळेशी शर्यत चालू होती ती वेगळीच. या सगळ्या भांबावलेल्या विचारांमधून वाढत चाललेला मनस्ताप थोड्यावेळाने गाडीचा वेग वाढल्यानंतर हळू हळू कमी झाला.
शेवटची ५ मिनिटे राहिली असताना आम्ही मोठ्या मुश्किलीने कसे बसे एक पार्किंग मिळवत क्लास ला वेळेत पोहोचलो. आता ब्रिटन मधील कार पार्किंग या विषयावर मुक्ताफळे उधळण्याचा मोह त्याच्या आकारमानाचा (महाराष्ट्राहूनही लहान) विचार करता टाळलेलाच बरा…! उगीच विषयांतर नको…!
शेवटची ५ मिनिटे राहिली असताना आम्ही मोठ्या मुश्किलीने कसे बसे एक पार्किंग मिळवत क्लास ला वेळेत पोहोचलो. आता ब्रिटन मधील कार पार्किंग या विषयावर मुक्ताफळे उधळण्याचा मोह त्याच्या आकारमानाचा (महाराष्ट्राहूनही लहान) विचार करता टाळलेलाच बरा…! उगीच विषयांतर नको…!
तिथे पोहोचल्यावर अनुष्काला आत पाठवून वेटिंग रूम मध्ये खुर्चीवर बसले त्या क्षणी आपल्या जवळ mobile नसल्याचा राग गाडीत आला होता त्याच्या कितीतरी पटीने जास्त आला. आत्ता पर्यंत घड्याळाशी लावलेली शर्यत एव्हाना संपली असल्यामुळे समोरच्या भिंतीवर लावलेल्या मोठ्या घड्याळातले मोठ-मोठे दोन्ही काटे, 'आता पळून पळून आम्ही दमलोय म्हणून जरा झोपतो', असे भाव आणून कुजकटपणे माझ्याकडे बघत असल्याचा भास मला त्या वेळी झाला. इथून पुढचा एक तास नुसतं बसून राहायचंय, ही कल्पनाच खूप भयंकर वाटली. या सारखी जगात कोणतीही शिक्षा नाही असं त्या वेळी तरी मला वाटलं.
एरवी जात नाही पण आता पर्याय नसल्यामुळे आजूबाजूला जरा लक्ष गेलं. त्या रूम मध्ये बसलेल्यांपैकी ८०% लोक त्यांच्या स्मार्ट फोन च्या स्क्रीन ला नजर स्थिरावून बसले होते. त्या वेळी तरी मला त्यांचा खूप हेवा वाटत होता. काहीजण kindle वर पुस्तकं वाचत होते. नाही म्हणायला २-३ जणं एकमेकांशी बोलत होते. अगदीच रिकामं बसण्यापेक्षा आपणही स्वतःहोऊनच बोलूयात जरा कोणाशीतरी असा विचार मी 'पुणेकर' नसल्यामुळे मनात आला. पण ब्रिटीश आणि पुणेकर यांच्यात आजपर्यंत जाणवलेल्या बऱ्याच सार्धम्यामुळे तो मी मनातच ठेवला. अर्थात 'आम्हाला सगळ्यातलं सगळं कळतं', असे भाव चेहेऱ्यावर असताना, पुढचे संभाषण किती मोकळेपणाने होऊ शकेल याचा अंदाज आजपर्यंतच्या इथल्या वास्तव्यावरुन मला नक्कीच बांधता येवू लागला आहे.
'आपण भले आणि आपले काम भले', हा सुविचार सदैव उराशी बाळगून लांबलचक सरळ नाकासमोरुन तेव्हढीच सरळ चालणारी पण तरीही साधी वैगेरे नसलेली ही इथली ब्रिटीश लोकं आणि समोरचा शब्दात, बोलण्यात कुठे चुकतो याच्या शोधात असलेली, भाषेच्या आधारावर अर्थात सगळ्याच आधारावर स्वतःचे श्रेष्ठत्व स्वतःच ठरवत स्वतःच्याच जगात वावरणारी 'साधी-सरळ' पुणेरी लोकं. या साऱ्याच्या सुखद पार्श्वभूमीवर गप्पा मारणे म्हणजे जरा जास्तच वाटले. त्यामुळे तो ही रस्ता बंद झाला.
'आपण भले आणि आपले काम भले', हा सुविचार सदैव उराशी बाळगून लांबलचक सरळ नाकासमोरुन तेव्हढीच सरळ चालणारी पण तरीही साधी वैगेरे नसलेली ही इथली ब्रिटीश लोकं आणि समोरचा शब्दात, बोलण्यात कुठे चुकतो याच्या शोधात असलेली, भाषेच्या आधारावर अर्थात सगळ्याच आधारावर स्वतःचे श्रेष्ठत्व स्वतःच ठरवत स्वतःच्याच जगात वावरणारी 'साधी-सरळ' पुणेरी लोकं. या साऱ्याच्या सुखद पार्श्वभूमीवर गप्पा मारणे म्हणजे जरा जास्तच वाटले. त्यामुळे तो ही रस्ता बंद झाला.
जवळच्या टेबलावर वाचयला मासिकेही नव्हती. बाहेर जावून मस्त फेरफटका मारून यावा इतके रम्य वातावरणही नव्हते. नेहमीची पावसाची पिरपिर चालूच होती. घरी जावून परत येणेही शक्य नव्हते. घरामुळे एकदम भाजीचा विचार डोक्यात येवून, करपलेले भांडे, घरात झालेला धूर आणि त्यामुळे वाजलेला स्मोकिंग अलार्म हे सारे चित्र क्षणात परत एकदा डोळ्यासमोर तरळले. कदाचित मंदारने केला असेल वेळेत ग्यास बंद असा उगाच स्वतःशी नाईलाजास्तव समज करून दिला. जवळ असलेली स्वतःची bag दोनवेळा परत परत आवरली. आता याउपर अजून काही करण्यासारखे नव्हते, तेव्हा लक्ष परत त्या भिंतीवरच्या मोठ्या घड्याळाकडे गेले. बिचारे झोपेतही माझी दया येवून हळू हळू का होईना पुढे जात होते.
अर्धा तास सरला, अजून राहिलेला अर्धा तास मनाला कुठेतरी अडकवून ठेवायाचे होते. 'फोन नव्हते तेव्हा माणसं अनोळखी लोकांशीही किती मोकळेपणानं बोलायची, गप्पा मारायची, विचारांची देवाणघेवाण व्ह्यायची' आणि आत्ता काय ही परिस्थिती श्या…या digitization मुळे रोजच्या गोष्टी सुखकर सोप्या झाल्या खऱ्या पण त्या सोप्या झाल्याने वाचणाऱ्या वेळचे रिकामे गणित लक्षात आलेच नाही. अर्थात वाचणारा वेळ सत्कारणी लावायचा कसा हे गणित जरी ज्याचे त्याचे वेगळे असले तरी, परत परत त्याच त्या (digital ०-१) शुन्याभोवती फिरणाऱ्या 'एका' मध्येच अडकत राहिले. नवीनवीन गेम्स, whatsapp, facebook आणि तत्सम गोष्टींमध्येच अतिरिक्त गुंतले. हे सगळे विचार त्या वेळी खूप गांभीर्याने डोक्यात पिंगा घालत होते, खरे वाटत होते…त्यामुळे पटतही होते. (आता पिंगा = बाजीराव-मस्तानी + प्रियांका-दीपिका नऊवारी डान्स हा विचार तात्पुरता तरी बाजूला ठेवते).
डोळे बंद करून खुर्चीवर बसून शांतपणे चालू असलेल्या या विचारांची मालिका मोठ्या बेलच्या आवाजाने थांबली. अर्थात ज्याची इतकी वाट बघत होते तो एक तास संपल्याची ती खूण होती. मी आनंदाने त्या भिंतीवरल्या मोठ्या घड्याळाकडे परत एकदा पहिले तेव्हा त्यातले काटे मस्त झोपा काढून ताजेतवाने होवून, 'आम्ही परत शर्यतीला तयार आहोत' असे कुत्सितपणे हसत मला सांगत होते. आणि अशा येन-केन-प्रकारेन तो भला मोठ्ठा एक तास शेवटास संपला.
टीप :- वर मांडलेले पुणेकर आणि ब्रिटीश यांच्याबद्दलचे मत सर्वस्वी वैयक्तिक आहे तरी त्याचा वास्तविक जीवनाशी काही संबंध आढळल्यास तो योगायोग न समजता वरील म्हणणे पटलेले आहे असे समजावे. धन्यवाद.
अश्विनी वैद्य
०३/१२/१५

Ashwini, khoop chan rekhatalayes to ek taas. I can totally relate to your experience :)
ReplyDeletejhakaas! keep writing :)