Friday 27 October 2017

उत्खनन


        अशीच पहाटे जाग आली आणि पुढे झोप येईना तेव्हा उठून पहाटेच्या हलक्या थंडीत वाफाळता चहा घ्यायचा आनंद घ्यावा म्हणून उठले आणि चहाचा कप हातात घेऊन खुर्चीवर बसले तेव्हा बरोबर डायनिंग टेबलाच्या समोरच्या bookshelf वर ठेवलेली 'उत्खनन' ही गौरी देशपांडे यांची कादंबरी उघडावी वाटली. बरंच आधीपासून नुसती आणून पडलेली पण वाचायला होत नव्हती. सकाळी 5.30 ला चहाच्या पहिल्या घोटाबरोबर पहिलं पान उघडलं आणि पुढची पानं वाचून उलटत रहण्याखेरिज मी दुसरं काहीच करू शकले नाही. अर्थात पुस्तक खाली संपेपर्यंत ठेवणं शक्यच झालं नाही. ही ११४ पानांची छोटी कादंबरी उत्सुकता ताणणारी रहस्यमय कथा किंवा कोणाचा प्रेरणादायी जीवनपट वैगेरे प्रकारात मोडणारी नव्हती तरीही मध्ये कुठे थांबावेसे एकदाही वाटले नाही. एखादं नाटक किंवा सिनेमा पाहताना त्यातल्या दृकश्राव्य अनुभवामळे त्याचा परिणाम खोलवर होणं स्वाभाविक असतं पण एखादं पुस्तक केवळ वाचताना त्यातली कथा कल्पनेत तितकीच परिणामकारक उभी राहणं यासाठी त्या लेखकाची प्रतिभा तेवढी जबरदस्त असावी लागते हे प्रत्येक पान उलटताना जाणवत होतं. वाचतानाचा तो गाभा तसाच घट्ट पकडून ठेवण्यासाठी मी सगळं सोडून खुर्चीला खिळून पुढचे चार तास तिथेच बसून राहिले आणि पुस्तक संपल्यावरच उठले.



       आता त्यावर चार ओळी खरडाव्या असं वाटलं यावरूनच हे पुस्तक मला नक्कीच आवडलय हे वेगळं सांगणं नकोच. परीक्षण नाही खरंतर पण साधारण पुस्तकाची ओळख नक्की करून द्यावी असं वाटलं. परीक्षण हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते, त्या लेखकाची आधीची वाचलेली पुस्तके, त्यावरून साधारण त्या लेखकाच्या स्वभावाचा काढलेला मागोवा, त्या काळातल्या इतर लेखकांची वाचलेली पुस्तके, साहित्याच्या दृष्टीने त्याचे महत्त्व, त्याचा तुलनात्मक परिणाम, त्यातले वैशिष्टय जाणायची स्वतःची क्षमता, ते नीट शब्दात मांडता येण्याची कला, हे सारं नीट जमायला हवं. शिवाय पुस्तकाबद्दल, लेखकाबद्दल आणि त्यातल्या कथेबद्दल, व्यक्तिरेखांबद्दल स्वतःची मते वाचणाऱ्यावर ठासून न लादता, त्यातला भावार्थ प्रत्येकाच्या विचारसरणी नुसार वेगवेगळा असू शकतो इतके भान ठेवून त्यातल्या वाचनाची उत्सुकता अथवा कंटाळा याचे पडसाद परीक्षणात मांडता यायला हवेत. सध्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीची जाण, वाचनाबाबत लोकांची मानसिकता आणि त्या अंगाने पुस्तकाबद्दलच्या विशेष वाटणाऱ्या किंवा न वाटणाऱ्या बाबी असा सारा आढावा पुस्तक परीक्षणात यायला हवा. अर्थात असं मला अपेक्षित आहे पण जमणं अवघड आहे म्हणून केवळ ओळखच करून द्यावी वाटली. 


      'दुनिया' या अगदी वेगळ्या नावाच्या पुरातत्वशास्त्र विभागात, विद्यापीठात काम करणाऱ्या कथेतील मध्यमवयीन नायिकेने स्वतःचा इतिहास उकरत, आठवणींचे केलेले उत्खनन गौरी देशपांडे यांनी या पुस्तकात मांडले आहे. साध्या, सर्वसामान्य पण थोड्याशा भिडस्त आणि त्यामुळेच साऱ्या जगाचे मिंधेपण उगाच स्वतःच्या अंगावर घ्यायची सवय झालेल्या, साऱ्या जगाचे अपराध स्वतःवर घेवून खंत करत बसणाऱ्या, दुसऱ्यांच्या वाटण्याचा अती विचार करणाऱ्या कथेच्या नायिकेचे भावविश्व, जुन्या अवशेषांचे जे उत्खनन करतो तसे भूतकाळातल्या घटनांमधून उकरून काढत अगदी हळव्या पण तितक्याच परिणामकारक रेखटले आहे. 'दुनिया'चं (नायिकेचं) विश्व्, त्यात तिची म्हणून असणारी कुटुंबातली माणसं, त्यांची स्वभाव वैशिष्ट्य, आई- मुलगी, वडील-मुलगी, मैत्री अशी नाती, त्यातलं प्रेम, समज आणि स्वीकार, भावनिक आणि तर्कशुद्ध विचारसरणीच्या आधारावर घरात असलेले दोन भिन्न मतप्रवाह, त्यामुळं नायिकेच्या मनात चालणारी घालमेल हे सारं, कधी ठसठशीत प्रसंगातून, कधी हळव्या बोलण्यातून खूप सुंदर उभारले आहे. 


      माणसांच्या स्वभावाच्या अनेक सूक्ष्म छटा निरखून त्यांच्या स्वभावाचे हळू हळू उलगडत जाणारे कंगोरे, कुठली रुपकं न लावता अगदी समर्पक आणि सडेतोड भाषेत मांडायची तल्लख प्रतिभा गौरी देशपांडे यांनी उभारलेल्या व्यक्तिरेखांमध्ये दिसते. माणसाच्या गुण दोषांचे सुरेख पण अभ्यासपूर्ण चित्रण यात घडते. त्यांनी उभारलेली स्वयंभू, स्वयंपूर्ण, स्वयंसिद्ध पण आत्ममग्न, आत्मतुष्ट नसलेली 'मणी' या नायिकेच्या मुलीमधून त्यांच्या स्त्रीवादी लेखिकेची मध्येच आपसूक जाणीव होते. एक स्त्रीवादी लेखिका हे लेबल तितकं पटकन न चिकटवता, साहित्य या नजरेतून हे पुस्तक वाचताना (लॉजिकल) तर्कशुद्ध विचार असणारी, परखड, प्रतिभावंत आणि बुद्धीवादी लेखिका अशी गौरी देशपांडे यांची ओळख यात होते. मी त्यांची किंवा त्यांच्या बद्दलची या आधी वाचलेली पुस्तके - 'आहे हे असं आहे' हा कथासंग्रह, 'विंचुर्णीचे धडे' हे ललित लेखन आणि 'महर्षी ते गौरी' हे मंगला आठयलेकरांचं पुस्तक. या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज वाचलेली 'उत्खनन' ही कादंबरी. या साऱ्यातून त्यांच्याबद्दलची मनात तयार झालेली ही प्रतिमा.




      शेवटी काय, नाटक, सिनेमा, कथा, कादंबऱ्या, ही पुस्तकं, रामायण, महाभारत, इतिहास या साऱ्यातून तेच-तेच दिसत राहतं, सापडत राहतं, मनुष्य स्वभावाची परिस्थितीनुसार जाणवणारी वेगवेगळी रूपं, नात्यांचे क्लिष्ट बंध, आणि या साऱ्यात गुंफत जाणारं आपलं आयुष्य, जुना होऊन बाजूला पडलेला परिपक्व् डाव, नव्याने सुरु होऊ पाहणारा कोवळा डाव आणि आत्ता खेळत असलेला आयुष्याचा न उमजलेला डाव, हे सारं सगळं असं आजूबाजूला पसरलेलं, विखुरलेलं पाहत पुढे पुढे वाट काढत जाताना आनंदाचे क्षण वेचण्याचा ध्यास, आणखी काय. एखादं चित्र प्रत्येक चित्रकारानं वेगळ्या पद्धतीनं रेखाटावं, त्यात स्वतःत उपजत असलेल्या कौशल्यानं रंग भरावेत तेव्हा पाहणाऱ्याला त्याच्या रसिकतेनुसार त्या कलाकृतीत दरवेळी वेगळं सौंदर्य दिसावं तसं या कथा रेखाटण्याबद्दलही मला वाटत. अर्थात प्रत्येकच कला ही याच वळणावर जाणारी. असो. नक्की वाचावी अशीच उत्खनन ही कादंबरी.

अश्विनी वैद्य 
२७. १०. १७

Monday 23 October 2017

I believe in GOD...!


    'अगं, परवा तू पाठवलेली ती युट्यूबवरची रांगोळी, तीच काढलेली थोडे changes करून या लक्ष्मीपूजनाला...!',
'आई, तुझ्या हातचे अनारसे...अहाहा...वर्षातून एकदाच खाते गं पण ती चव वर्षभर पुरते अगदी...!',
'अगं, साड्या कुठल्या नेसणं होतंय हल्ली तितकसं, म्हणून मग एक आईची आणि एक सासूबाईंची अशा त्यांच्याच दोन साड्यांचे ड्रेस शिवलेत या दिवाळीला डिझायनर कडून..',
'ए तुला कधी वेळ आहे, ये ना घरी आणि दाखव कसे केलेलेस ते चिरोटे, दिवाळीच्या पाचव्या दिवशी संपतील एवढेच करणार...पण करणारच बाई या वेळी नक्की...!',
'मुलांनो, चला पणत्या रंगवायला, नंतरचा पसाराही नीट आवरून ठेवायचा आहे हां...', ही अशी सगळी गडबड, सणांची तयारी, आईची लेकीला-सुनेला फराळाचा डबा पाठवायची धावपळ, या सगळ्याला किचन मधले तळणाचे वास आणि गप्पांचे, हसण्याचे सुर, background music देतात ते हे उत्सव. नात्यांचा गोडवा, वातावरणातला हलकेपणा हेच काय ते प्रयोजन असावं सणांचं, उत्सवाचं नाही का?


     सण-उत्सव साजरे करणं यामुळं रोजच्या त्याच त्या रूटीनला जरा फाटा मिळून स्वतः मधला उत्साहाचा मोड स्विच ऑन होतो आणि आपल्या आजूबाजूच्या वातावरणात मोकळा श्वास घेता येवून मध्ये मध्ये स्वतःलाच स्वतः मनापासून आवडायला जे विसरलेलो असतो ते आवडायला लागतो... कदाचित. पण मग पुढे, या सगळ्या साजरेपणात सर्वमान्य देवाला कुठेतरी ओवलं, त्याच्या अस्तित्वाला मूर्तीत पुजलं की या सगळ्या करण्याचं पावित्र्य उगाच हातभार वाढल्याची भ्रामक कल्पना तयार होते. आणि या सगळ्यात हे केलंच पाहिजे, ते करावंच लागतं, आमच्याकडे हे नाही चालत वैगेरे धागे देवाला अगदी मध्यवर्ती बसवून त्याभोवती घट्ट व्हायला लागले, की मग मात्र तो मोकळा श्वास आत कुठेतरी गुदमरतोय असं मला तरी होवून जातं...!


       देव वैगेरे अस्तित्वात असण्यावरचे आणि मग त्या देवाला घाबरून त्याच्या पाया पडण्याचे, त्याच्याकडे आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मागण्याचे वैगेरे संस्कार लहानपणी अगदी खोलवर रुजलेले, ते सावकाश मोठे होता होता मात्र हळू हळू निखळून पडत गेले, किंवा आपण असे एकदम वयाने मोठेच झालो आहोत याची जाणीव त्या निखळले पणातून होत गेली. पण म्हणजे 'देव' या मूळ संकल्पनेकडे बघण्याचा दृष्टिकोन हळू हळू बदलत गेला. म्हणजे पूर्वी अगदी लहानपणी परीक्षेला जाताना गणपती स्तोत्र म्हटलं नाही तर पेपर अवघड जाणार किंवा मुलींनी श्रावणी सोमवारचे उपास केले नाहीत तर त्यांना नवरा चांगला मिळणार नाही, किंवा मंगळवारी गणपती मंदिरात जावून पाया पडले नाही तर ही विद्येची देवता आपल्यावर राग धरणार आणि आपल्याला अभ्यासात यश देणार नाही असं अजून बरंच काही...लहानपणी मोठी माणसे करायला लावतात म्हणून अशा अनेक गोष्टी अंगवळणी पडत गेल्या... त्या तशाच असतात असं समजून करत गेलेही.

    मग एका अडनिड्या ना धड लहान ना धड मोठे असतानाच्या वयात बऱ्याच वेगवेगळ्या जाणीवा निर्माण होत होत्या तेव्हा त्याबरोबर अनेक "का?" सुद्धा मनात तयार व्हायला लागलेले...' पोटात आग पडली असतानाही देवाला नैवेद्य दाखवल्या शिवाय का जेवायचं नाही, देवाला आपल्याला उपाशी ठेवून आधी स्वतः खायला कसं आवडत असेल, मुळात तो खातच नाही तर मग जीवाचा इतका आटापिटा कशासाठी...., देवीची ओटी भरली की बायकांचं सौभाग्य(?) चिरकाल वैगेरे कसं काय टिकत असेल, शनिवारी नखं, केस का कापायचे नाहीत.' आईला हे असलं काही विचारलं की तिचं आपलं ठरलेलं उत्तर असायचं, 'माझी आई, माझी आज्जी करत आल्यात या सगळ्या गोष्टी फार पूर्वीपासून...म्हणून आम्ही करतो, सांगितलेलं ऐकावं लहान मुलांनी...!'. मला हे उत्तर आत्ता आठवून तर गंमतच वाटते. हे असं सांगणं म्हणजे आत्ता माझ्या मुलांना मी जसं सांगते की, 'टीव्ही खूप पाहिलात की डोळे चौकोनी होतात बरंका, किंवा पोळी भाजी खाल्ली नाही की पोट दुखायला लागतं हां...' असं काहीही इल्लॉजिकल बोलते तसं आईचं ते बोलणं आत्ता वाटतंय. पण थोडक्यात, त्या सगळ्या 'का?' ची उत्तरं तेव्हा नाही मिळाली.. आणि मग चाबकाच्या फटक्याला घाबरून वाघ जसा सर्कसमध्ये खेळ करून दाखवतो तसे देवाला घाबरून किंवा उलट अर्थी माझ्यावर देवाची कृपा व्हावी म्हणून मी ही या अशा अज्ञात गोष्टी तेव्हा निमूटपणे करत राहिले. 


      पण मग स्वतःचे पाय जमिनीत थोडे रोवले गेले आहेत, किंवा विचारांना पाठबळ मिळण्यासाठी पुस्तकातले आधार उपयोगी पडत आहेत अशी जाणीव ज्यावेळी व्हायला लागली त्या वेळी त्याच 'का?' ची धग परत जाणवायला लागली आणि त्याची पटणारी उत्तरंही मिळायला लागली. देव, कर्मकांड या संकल्पना स्वतःपुरत्या स्पष्ट व्हायला लागल्या. आईनं आणि आजूबाजूच्या लोकांनी लहानपणी माझ्या मनात निर्माण केलेला देव आणि मला आत्ता जाणवत असलेला देव यातला अंधुक फरक स्पष्ट व्हायला लागला.

     देव म्हणजे स्वतःतली सकारात्मक शक्ती, एक ऊर्जा, मनातल्या स्वतःवर विश्वास ठेवून जे करतोय त्या बद्दल ते योग्य आहे याची स्वतःला असलेली खात्री. मग ती कुठल्या मूर्तीमध्ये कुठल्या मंदिरात, कुठल्या रूम मध्ये कशी बांधून राहील, हे पटत गेलं. पण ती ऊर्जा आतमध्ये जाणवण्यासाठी लागणारा शांतपणा, स्वस्थपणा जिथे मिळू शकेल असं ठिकाण, अशी जागा म्हणजे मंदिर, मग ते ठिकाण एखाद्याचं घर असेल, शाळा असेल, एखाद्याचं काम करण्याचं ठिकाण असेल, एखाद्यासाठी एखादी व्यक्तीच असेल किंवा खरोखरचं मूर्ती असलेलं एखादं देवघरही असेल..., ज्याच्यासमोर बसून तो शांतपणा अनुभवत स्वतः मधली ती ऊर्जा स्वतःला जाणवायला लागेल. बऱ्याच आजवरच्या अनुत्तरित प्रश्नांची उकल समोर दिसायला लागेल, स्वतःचा स्वतःशी संवाद होवू लागेल, ते मंदीर, ते देवूळ, ज्याला मूर्ती असण्याची आवश्यकता नाही, हार, फुलं, कुंकू, नारळ याला चिकटलेल्या खोट्या पावित्र्याची गरज नाही, कुठली सक्ती नाही, भीती तर त्याहून नाही, हे केलं नाही तर असं, ते केलं नाही तर तसं अशी कोणतीही गृहितकं नाहीत तर उलट निखळता, सहजता यावर आधारलेली स्वतःमधलीच सकारात्मक ऊर्जा, विश्वास जाणवून देणारं ठिकाण म्हणजे मंदीर, ही जाणीव स्पष्ट झाली. रोजच्या कामातून, जोडलेल्या नात्यांमधून कधी निराशा, कधी साचलेपणा यायचाच...अगदी नैसर्गिक...! अशावेळी त्या मंदिरात मिळालेली ऊर्जा या सगळ्याचं स्विकारलेपण पचवायला उपयोगी पडते माझ्यासाठी तरी. अर्थात ज्याची त्याची देवाबद्दलची कॉन्सेप्ट वेगवेगळी असायचीच आणि त्या नुसार त्यातून मिळणाऱ्या समाधानाचीही...नक्कीच...!, हे स्विकारलेपण समजायलाही मला ती ऊर्जाच मदत करते आणि सण, उत्सव साजरे करताना अपेक्षित असलेला मोकळा श्वास मिळवून देते. 



--- अश्विनी वैद्य
२३.१०.२०१७

Monday 24 July 2017

हार


"अगं चल ठेवते मी फोन...बोलू परत " असं म्हणून मेघानं तिच्या ऑफिसमधल्या मैत्रिणीचा फोन ठेवला. "अगं आई, त्यांनी टॉस जिंकलाय, अँड decided to बॅट, ये लवकर, सुरु झाली मॅच "
"अरे देवा, हो का... त्यांनी जिंकला टॉस, पण ठीक आहे, खेळतील आपल्या पोरी चांगल्या... आलेच मी, स्वयंपाक उरकलाय लवकरच, राहिलेली आवराआवर करते आणि आलेच ५ मिनिटात. "

" झाली का गं मॅच सुरु, मी पण अगदी प्रत्येक बॉल बघणार आहे बाई..." मेघाची आजी आतल्या खोलीतून बाहेर येत म्हणाली. तिला असं लगबगीनं बाहेर येताना पाहून स्वतः सोफ्यावर निवांतपणे टेकत बंडोपंत बोललेच, "आजी तुला काय कळतं गं क्रिकेट मधलं..."
"असू दे रे, पोरी खेळताहेत ना आपल्या... ते बघायचंय मला पण, आणि नाही कळलं तरी तू आहेस कि सांगायला, पोरांचा वर्ल्ड कप बघायला बसलेलात ना घरी दहा जण गोळा करून गोंधळ घालत आणि आपण वाईट्ट हरल्यावर असे लांबट चेहरे करून त्याच खेळाडूंना शिव्या दिल्यात, ज्यांना डोक्यावर घेऊन नाचलात. आज आपल्या पोरी हारो नाहीतर जिंको, इथवर आल्यात ना... म्हणून त्यांचा खेळ बघणार आहे मी आज. "
"गप रे बंड्या, तुला काय त्रास आहे, आजी तू मॅच बघ गं निवांत, मी सांगते तुला आऊट झालं की, फोर-सिक्स मारला की... फुल्ल धम्माल करू आपण लेडीज स्पेशल "
यावर कुत्सितपणे हसत दोन ओव्हरमधल्या ब्रेक मध्ये लागणाऱ्या ऍड बघत बंडोपंत उदगारले "अगदी परवा पर्यंत इंडिया टीमची कॅप्टन कोण हे पण माहीत नव्हतं कि गं तुला मेघा आणि आता फायनलला गेली टीम कि पार लगेच उर अगदी भरून आला तुझा...."
" हो नव्हती माहीत मला कॅप्टन बद्दलची डिटेल इन्फो, पण महिला क्रिकेटचा कॉमन पीपल मधला अवेअरनेस न वाढायची कारणं यावर बरीच वादावादी करून झालीय आपली याआधी, सो तू काही बोलूच नकोस.... परवा घरी आलेल्या तुझ्या मित्राला विचारलं, काय रे वूमेन्स वर्ल्ड कप करतोयस का फॉलो... तर चक्क हसायला लागला जोरजोरात... वर म्हणतोय कसा, काहीही काय, वेडी आहेस का, मी नाही बघत वूमेन्स क्रिकेट, किती स्लो खेळतात त्या. आम्ही इथे ग्राऊंडवर सुद्धा खूपच बरं खेळतो त्यांच्यापेक्षा... आणि यावर अजून गम्मत म्हणजे, त्यानं परवाच्या सेमीफायनल नंतर भारताच्या महिला क्रिकेट संघाचं कौतुक करणारी फेसबुक पोस्ट टाकली. कसले मित्र आहेत रे तुझे.... हाहाहा "
"ए गप गं, बघ मॅच, फिल्डिंग नीट नाहीये आपली. गेला बघ फोर" बंड्या
" किती लहान दिसतीये गं ती चेहऱ्यावरून... कोण आहे ती " इति आजी
"आई, अहो दीप्ती शर्मा आहे ती... एकोणीस वर्षांची फक्त " आई
"अगंबाई हो का... किती लहान पोरी खेळताहेत. अगदी आपल्या सारख्यांच्या घरातून गेल्या असतील या पोरी, नाई.... कधी कुठल्या जाहिरातीत या आधी दिसल्या नाहीत गं, त्या कोहली वैगेरे सारखं"
"तशाही आता मात्र पोचतील या पोरी आपल्या सारख्यांच्या घरा-घरात, ते सचिन, कोहली आपल्याच घरातले लोक असल्यासारखे वाटतात ना सगळ्यांना तसंच." आजी
"येस काढली बघ विकेट त्यांची... धाताड ताताड...टपार टपार... " मेघा
"बसा शांत, अजून वे to गो...!" बंड्या
"अरे वाह, छान... खेळा गं बाई पोरींनो अशाच नीट... अगं ती बघ, अगदी तोंडावर हात ठेवून कशी गोड हसतीये... इंग्लंडच्या पोरी आपल्या पोरींपेक्षा पारच धष्टपुष्ट आहेत बाई, नाई का गं मेघा" आज्जी
"आजी मॅच बघण्यापेक्षा तुझी बडबडच जास्त चालूये... बघूया ना शांतपणे..." बंड्या
" आई, ही बघा... ही आपली कॅप्टन, मिथाली राज, ती पूनम राऊत... हो ती छोटे केस आहेत ना तीच पूनम राऊत, मुंबईची आहे ती" मेघा आणि बंड्याची आई
"खरंच छान वाटतंय गं, यांच्या घरच्यांनी त्यांना क्रिकेट खेळू दिलं नसतं, पोरांचे खेळ कसले खेळता म्हणून हटकलं असतं, पुढं प्रोत्साहन दिलं नसतं, तर कशा आल्या असत्या ना इथवर.... घर, लग्न, संसार, घराला हातभार म्हणून फार तर एखादी नोकरी, आणि मग म्हातारपण, संपलं आयुष्य, सगळ्यांसारखं सरधोपट... हे क्रिकेट खेळणं कुठच्या कुठं उडून गेलं असतं या पोरीचं... म्हणून कौतुक वाटतं गं त्यांचं." आजी
"येय, अजून एक विकेट घेतली आपण आजी...पाहिलंस का तू ? ते बघ रिप्ले मध्ये दिसेल आता. पटापट विकेट घ्यायला हव्या, स्कोरचा डोंगर नको रचू द्यायला... मग आपण जिंकू आरामात... आई मस्त चहा टाक ना सगळ्यांसाठी" मेघा
" आज बंड्या चहा करणार आहे आपल्यासाठी.... मी काही आता इथून लंच ब्रेक शिवाय उठायची नाही. " आई
"फिमेल डॉमिनेटेड घर झालंय आपलं, आज बाबांना पण नेमकं वर्किंग आलंय... ताई, माई आजी टाकतो मी चहा, तुम्ही निवांत मॅच बघा हं... " बंड्या थोडा चिडचिडतच उठला
"दोनशेच्या वर नकोय स्कोर जायला रे, आऊट करा गं पोरींनो पटापट त्या इंग्रज पोरींना, आलं टाक रे चहात" आई
"बंड्या गेलाय तशा पटापट विकेट निघत आहेत ना त्यांच्या, हो ना गं आई. ए बंड्या, तू इकडे येऊच नकोस रे, तिथेच बस, तसही फोन आहे तुझ्याजवळ, व्हाट्सअप वरून अपडेट्स कळतीलच तुला, तू नको येवूस इकडे, तसंही टुकार कमेंट देत बसतो काहीतरी. " मेघा
"हा काय गं वेडेपणा, मिटक्या मारत चहा पिशील की आता, झाला कि आण रे बाळा आणि ये बघायला तू ही" आजी
"अगं आजी, तुला माहितीये का, इंडिया-पाकिस्तान फायनल होती ना ती आठवतीये का, चॅम्पयन्स वर्ल्ड कप पुरुषांचा, त्यासाठी बंड्याचा एक मित्र असतो ना तिकडे इंग्लंडला तो १३०० पौंडचं तिकीट काढून गेला होता ती मॅच बघायला, किती सट्टेबाजी, कितीतरी कोटींची उलाढाल, आणि शेवटी काय तर त्यात नामुष्कीचं हरलो, त्याच दिवशी इंडिया पाकिस्तान वूमेन्स मॅच मात्र आपण जिंकलो होतो पण ते तर कोणाच्या गावी पण नव्हतं...अशी आपली लोकं आहेत बघ. " मेघा
"हं, आठवतंय ना... पण बदलेल आता परिस्थिती, मुलींनी दिलय दाखवून, आम्हाला कमी नका समजू.... आम्ही मुलांपेक्षा कमी नाहीयोत. हे घे रे बंड्या कप, ठेव ओट्यावर, छान झाला होता चहा." आजी
" मुली मुलांपेक्षा कमी कुठल्या, चार पावलं पुढच... २२९ करायचेत ना आपल्याला, आरामात करू ,खेळणार पोरी छान . "

या विश्वासानं आपली इनिंग बघायला साखरेला मुंग्या चिकटव्यात तसे सगळे परत टीव्हीला चिकटले... आई, आजी, मेघा, अगदी ओरडून ओरडून बाऊंड्रीज वैगेरे सेलेब्रेट करत होत्या. पूनमचे ८६ वर आऊट होणे पूनम प्रमाणेच आईलाही लवकर झेपले नाही. त्यानंरच्या प्रत्येक बॉलला धडकी भरत आजीही खुर्चीतून उठत होती. बंड्याला तर अनलकी ठरवून घराबाहेर कधीच काढला होता. कृष्णमूर्तीचा एखादा फोर आजीच्या चष्म्यातून हसरी लकेर सांडत होता. पॉवरप्ले चालू झाला तशा तिघी एकमेकींना सांगत होत्या, आरामात जिंकू आपण, जेवढे बॉल तेवढेच तर रन करायचेत नक्की होतील, फक्त विकेट टिकवल्या म्हणजे झालं. हे तेच तेच परत परत एकमेकींना सांगत बजावत होत्या. आजी तर 'आत्ता माझ्या हातात बॅट असती तर मीच सिक्स मारला असता' या अविर्भात हातवारे करून बोलत होती. पण शेवटी, ज्याची भीती वाटत होती तेच झालं, मनोबळ टिकवायला आपल्या पोरी शेवटच्या घडीला थोड्या कमी पडल्या आणि हातातोंडाशी आलेला वर्ल्डकप हातातून निसटला. मेघा आणि आई एकदम मटकन खुर्चीत बसल्या. आजी अजून तशीच उभी होती. मॅच सुरु झाल्यापासूनचा तिचा आवेश, तिचा उत्साह, हे तिच्या वयाचा तिला विसर पाडत होतं. मुलींना असं इंग्लंडच्या लॉर्डस वर खेळताना बघून झालेला आनंद, अभिमान असं सगळं दाटून आलं होतं. मेघा अगदी कळवळल्या स्वरात म्हणाली, "आजी हरलो गं आपण"

यावर आजी जे बोलली ते ऐकून दारातून येणारे बाबा आणि बंड्या दोघेही तिथेच थांबले, आवाक होऊन आजीचं हे वेगळं रूप डोळ्यात साठवत.

"पोरींनो, तुम्ही मानाने हरलात... वर्ल्ड कप मिळाला नाही देशाला...पण ज्या जिद्दीने तुम्ही इंग्लंड सारख्या बलाढ्य देशाला त्यांच्याच देशात ऐतिहासिक वारसा असलेल्या लॉर्डस वर हारवण्याचे स्वप्न आम्हा सर्व भारतीय महिला मुली बायकांना दाखवलत यासाठी तुम्ही आमच्यापुरत्या तर जिंकला आहात. इंग्लंडला तोंड द्यायचं आव्हान तुम्ही कमकुवत रित्या नाही पेललं.  ज्या मुलींना इतर देशातल्या त्या त्या खेळात प्रावीण्य असलेल्या मुलींसारखा पाठिंबा घरातूनच मिळणं अवघड असतं अशा पार्श्वभूमी मधून तुम्ही आलेल्या....वर्ल्डकप फायनल पर्यंत पोचलात हेही काही कमी नव्हतं. क्रिकेट हा मुलींनी खेळायचा खेळ असतो याला भारतासारख्या देशात भूतकाळ आणि भविष्य या दोन्हींची शाश्वती नव्हती, त्याला तुम्ही भविष्य दिलंत आणि त्यातून इंग्लंड सारख्या प्रगत देशातल्या टीमला तितक्याच ताकदीनं तोंड दिलत याचं खरंच कौतुक आहे." आजी टीव्हीकडे बघत तिच्याही नकळत हे सगळं बोलून गेली.



--- अश्विनी वैद्य 
२४.०७. १७  

Wednesday 19 July 2017

वनवास - शारदा संगीत - पंखा



कोणतीही गोष्ट पहिली, वाचली, जाणवली कि त्यावर विचार करून मनात उमटलेली प्रतिक्रिया इतरांसमोर मांडणे ही एक नैसर्गिक गरज असावी, मग ती समोरच्याला रुचणारी असो अथवा नसो पण तरी ती इतरांबरोबर share करणं मला तरी आवडतं. त्यावरची इतरांची मतंही माहिती होतात, विचारांच्या नवीन वाटा मिळतात म्हणून खरंतर हे सगळं असं लिहिण्याचा हा खटाटोप. पुस्तक परिचय लिहिण्याचा माझा हा पहिलाच अनुभव... !

पुस्तक परिचय : वनवास

फुलपाखरू जसं इकडून तिकडं सतत भिरभिरतं, वेगवेगळ्या फुलांपाशी उडत राहतं, तसं मनात चालू असलेल्या वेगवेगळ्या विचारांभोवती एका पौगंडावस्थेतील मुलाच्या कोवळ्या, नाजूक मनाचं भिरभिरणं प्रकाश नारायण संत यांनी तितक्याच ओघवत्या, सहज पद्धतीनं मांडलेलं वाचणं अतिशय आनंददायी वाटलं. काही गोष्टींशी त्या वयात जडलेलं किंवा आपणच असंच जोडलेलं एक आपलं आपलंच नातं, मग ते काही असो, झाडाचा पार, घराचं फाटक, खोलीची खिडकी, अंथरूण, वह्या पुस्तकं काहीही... त्या वयात अशा साऱ्या बद्दल वाटणारा अव्यक्त जिव्हाळा शब्दात बांधण्याचं लेखकाचं कसब याला तोड नाही. वाचताना सारे प्रसंग, चित्र अगदी डोळ्यांसमोर दिसायला लागतात.


बालपणीचा निरागस, अल्लड वेडेपणा आणि तारुण्याच्या उबंरठ्यावर येऊ घातलेला कोवळा समंजस बाणेदारपणा या दोन्हीच्या मध्ये असणारी ही चंचल, मधाळ अवस्था वेगवेगळ्या प्रसंगातून शब्दात उतरवत वाचणाऱ्याला मोहून टाकते. अगदी साध्या, थोड्याशा अबोल, शांत अशा किशोरवयीन मुलाच्या मनाची त्याचे आई-वडील, आजी-आजोबा, मित्र-मैत्रिणी यांच्या सहवासात वावरताना होत असलेली कधी आनंदी, तर कधी दुखी तर कधी स्वतःलाच पार अबोध अशी अवस्था तितकीच ओघवती मांडली आहे. त्याच्या अबोल, बंद अशा ओठांमागं दडलेलं त्या संवेदनशील वयातलं त्याचं गोड़ भावविश्व् उलगडत जाताना वाचणारा प्रत्येक जण त्यात कुठेतरी स्वतःला नक्की दिसायला लागेल इतकी सहजता त्यांच्या लिखाणात आहे. क्षणात हसरं कि लगेच साध्याशा गोष्टीनं खट्टू होणारं निरागस मन, ज्याला तात्विक प्रौढत्वाचं मिसुरडं अजून फ़ुटायचंय आणि म्हणूनच ते खूप लाघवी आहे अशा सुंदर विश्वाची कधी काळी आपणही अनुभवलेली सफर लंपनच्या भावविश्वात शोधण्याचा कयास म्हणजे वाचनीय वनवास.


पुस्तक परिचय : शारदा संगीत 

लंपनच्या किशोरवयीन भावविश्वाशी जोडलेल्या प्रसंगांना एका वेगळ्या शैलीत बांधत प्रकाश नारायण संत यांनी लिहिलेल्या पाच दीर्घ कथा वनवास नंतरच्या 'शारदा संगीत' या त्यांच्या पुढच्या कथासंग्रहात आहेत.
वनवास मध्ये लंपनच्या व्यक्तिरेखेत वाचक स्वतःच्या भूतकाळात हरवून स्वतःलाच त्यात कुठेतरी सापडत जातो. त्यातून मग तयार होत गेलेली लंपन बद्दलची प्रतिमा या पुढच्या 'शारदा संगीत' मध्ये वेगवेगळी वळणं घेत प्रत्येक कथेत हळू हळू विस्तारत जाते, प्रगल्भ होत जाते आणि वाचताना आपल्याला एकवीस वेळा मॅड करून सोडते...!

कोणताही प्रसंग पाहिल्यावर, अनुभवल्यावर त्यावर लगेच कोणासमोर व्यक्त होण्याआधी मधल्या काही सेकंदात आपल्या मनात आपण स्वतःशी जो अशाब्दिक संवाद करत असतो, तो शब्दांत, चपखल रूपकात बांधलेला वाचताना आपल्या खूप जवळचा वाटायला लागतो. ओघावत्या शैलीत मांडलेल्या त्या संवेदना वाचकाला मोहून टाकतात. त्यामुळंच पुस्तकात लंपनचा एकोणीसशे वेळा येणारा 'मॅड' हा शब्द या आधी कधीच इतका गोड वाटला नव्हता.


वाचनाबाबत तितकी जाण मला लंपनच्या वयाची असताना नव्हती. खरंतर त्या वयात ही पुस्तकं हाती पडायला हवी होती म्हणजे त्यावेळी कोऱ्या मनात तयार होऊ घातलेल्या कल्पनांची रोपं ती मॅड समजून मुळं धरण्याआधी स्वतःच उपटून टाकली नसती.

'वनवास' नंतरचा हा पुढचा अनेक पुरस्कार मिळालेला पाच दीर्घ कथांचा प्रकाश नारायण संत यांचा 'शारदा संगीत' कथासंग्रह, हा लंपनच्या त्याच्या आई-वडील, आजी-आजोबा, बहीण-भाऊ या कुटुंबाव्यतिरिक्त घराबाहेरील जगात कोऱ्या मनाने वावरताना, त्यात उमटत जाणारे भाव, नाजूक संवेदना आणि याची त्याला होत जाणारी हळुवार जाणीव हे सारंच वाचकाला मोहून टाकतं आणि तिथल्या भाषेची सुंदर ढब चाखत, स्वतःच्या भावविश्वात रमण्याचे काही सुखद क्षण नक्कीच देतं.

आभाळ भरून आल्यावर कसं कधी कधी खूप सुंदर वाटतं, मन आनंदानं हलकं, रितं झाल्यासारखं वाटतं, तसं काहीसं हे पुस्तक वाचून संपल्यावर वाटलं. रमण्याचा आनंद तर मिळालाच पण भिजण्याचं सुखंही अजून हवंय ही जाणीवही उत्कट वाटली. कदाचित लेखकाची हीच शैली 'पंखा' हा त्यांचा यानंतरचा पुढचा कथासंग्रह हाती घ्यायला भाग पाडतीये...!

पुस्तक परिचय : पंखा

बरीच वादावादी घालून लेक finally शांत झोपली होती. नेहमीपेक्षा जरा उशिराच. आईला आपल्या बाळाचं असं झोपलं असतानाचं निरागस रूप खूप जास्त भावतं. ती जागी असताना आपल्याशी वाद घालतानाचा तिचा तो आवेश, तिचंच कसं बरोबर आहे हे सांगण्याची तिची धडपड, तिचं म्हणणं आपल्याला पटवून देण्याची तिची उतावीळता, मग आपलं तिच्यावर जरा चिडूनच ओरडणं, या सगळ्यात तिचे बदलणारे चेहऱ्यावरचे भाव, घड्याळाच्या काट्याशी तिचं न जुळणारं गणित सोडवण्याचा आपला आटापिटा, त्यावरून नेहमीच होणारी चिडचिड, गोंधळ हे आणि असे बरेच त्राग्याचे, घाईचे, उलघालीचे, काळजीचे, घाबरण्याचे असे दिवसभरात येणारे वेगवेगळे प्रसंग हे असं तिचं झोपलेलं निरागस रूप बघताना आठवतात आणि मग अगदी कासावीस व्हायला होतं.

नऊ वर्षाची नाजूक, कोवळं मन असलेली माझी लेक, मनात हजार गोष्टीबद्दलचे प्रश्न, शंका, कुतूहल बाळगत मोघम अनुभवावर तयार करत असलेली तिची अगदी ठाम मतं, नावीन्याचं भलतं आकर्षण, वाचनावर आधारित तिच्या मनात नाचणाऱ्या कल्पना आणि त्याचा रोजच्या जगण्याशी जोडलेला भन्नाट ताळमेळ, या अशा चहू बाजूनी सळसळत असणाऱ्या तिच्या सगळ्या जाणिवा, संवेदना या अशा शांत वेळी तिच्या झोपलेल्या निरागस चेहऱ्याकडे बघून जास्त बोलक्या वाटतात. सध्या वाचत असलेलं प्रकाश नारायण संत यांच्या 'पंखा' या पुस्तकात लंपनच्या भावविश्वात हरवताना मला माझ्या लेकीच्या भावविश्वाची पुन्हा नव्यानं जाणीव होत गेली हे नक्की. तिच्याशी निगडित गोष्टींकडे माझ्यापेक्षा तिच्या दृष्टिकोनातून बघण्याचं तंत्र मी गेले काही दिवस विसरले होते, याचं भान मला हे पुस्तक वाचताना झालं.

आधीच्या वनवास आणि शारदा संगीत या नंतर क्रमशः येणारी ही पुढची कादंबरी 'पंखा'. अकरा छोट्या कथांमध्ये गुंफलेलं लेखकाच्या वेगळ्याच शैलीत मांडलेलं लंपनचं कोवळं भावविश्व् आधीच्या दोनही पुस्तकांप्रमाणेच वाचणाऱ्याला बांधून ठेवतं. साधेपणा भावणं हा तो किती सहज आणि सुंदर पद्धतीने समोर येतो त्यावर अवलंबून, पुस्तक वाचताना हे सारखं जाणवत राहतं. शांत, समंजस पण येत जाणाऱ्या अनुभवातून जे काही वाटतं त्याबद्दल मात्र अनभिज्ञ असणारा लंपनचा कोवळा साधेपणा वाचताना खूप भावतॊ. पुस्तकातल्या गोष्टींबद्दल इथे लिहून त्यातलं औत्सुक्य घालवणं मला पटत नसल्यानं मी ते इथे टाळलेलं आहे. केवळ इतकच म्हणता येईल कि, आधीच्या पुस्तकांप्रमाणेच याही पुस्तकात, मनाची संवेदना, त्यावर आधारित स्वभाव वैशिष्टये आणि त्याकडे बघण्याचे दृष्टिकोन ओघवत्या शैलीत मांडत लेखकानं लंपन बरोबरच इतरही व्यक्तिचित्रे खूप सुरेख पद्धतीने उभी केली आहेत. त्यामुळं त्यातल्या गोष्टी वाचणाऱ्याला त्याच्या भूतकाळात रमायला मदत करतात आणि वाचन आनंददायी करतात हे नक्की.


यानंतरचे झुंबर हे चौथे पुस्तक सध्या लगेच वाचणं शक्य होईल असे वाटत नाही. त्यामुळं त्या बद्दल लिहिलेले नाही.

---- अश्विनी वैद्य
१९.७.१७

Thursday 8 June 2017

फसवे शब्द


फसवे शब्द, गहिरे घाव, 
फसवे अर्थ, परके भाव

बोलके शब्द, दिसरे शब्द, 
पांघरती निसटते भाव

फसवी वाट, फसवे घाट, 
पार केल्याचे सुखही फसवे

सुटता शब्दांची फितूर साथ, 
डोक्यावरती आभाळाचा फसवा हात

बोचऱ्या शब्दांची मखमली झालर, 
मिरवण्याचा भावनेचा हट्टही फसवा

उरी जपलेल्या अंकुराचा 
ओला पाचोळाही फसवा 

फसवे शब्द, काटेरी शब्द 
तरीही मना त्यांचाच ओढा... ! 

हलके शब्द, हळवे भाव 
मोकळे श्वास, बाळगून यांची वेडी आस

--- अश्विनी वैद्य
८. ६. १७

  

Friday 19 May 2017

'प्रेम'



'प्रेम' नक्की काय असतं, ही नक्की कसली भावना असते, किंवा जाणीव असते, या सगळ्याचे विचार मध्ये एक पुस्तक वाचायला मिळालं, त्यावरून परत चालू झाले. त्यात असं काहीसं लिहिलेलं, 'प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीचे त्याचा स्वभाव, व्यक्तिमत्व, त्याचे गुण-दोष या साऱ्याचे आपल्या त्या वेळच्या मनातील भावानुसार केलेले सकारात्मक मूल्यमापन... मग ते प्रसंगानुरूप कमी जास्तही होते. जसे आनंद, दुःख या भावना असतात तशीच प्रेम ही भावना... जी इतर भावनांसारखीच उत्पत्ती, विकास, ऱ्हास या अवस्थांमधून जाते.' ही प्रेमाबद्दलची मांडलेली थोडी कोरडी वाटणारी व्याख्या आजवर पाहिलेल्या, अनुभवलेल्या प्रसंगानुसार पडताळून बघणं ओघानंच होत गेलं. 

'आवडणे', 'आकर्षण वाटणे' आणि 'प्रेम वाटणे' या तिन्हीच्या सीमा इतक्या जवळ जवळ आहेत कि त्यात आपली भावना नक्की कोणती आहे हे ओळखता येणं कधी कधी अवघड होऊन बसतं. एखादं पुस्तक आवडणं, एखादा ड्रेस आवडणं, एखादं ठिकाण आवडणं, पदार्थ आवडणं, एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आवडणं, बोलण्याची ढब आवडणं... आवड, ही एक बाब...या बाबतीतली आवड ही जाणीव एका वेगळ्या पातळीवरची असू शकेल, म्हणजे थोडी वरवरची, उथळ नाही पण तितकीशी खोलही नाही. अर्थात एखाद्या गोष्टीबद्दलची आवड, म्हणजे, त्या गोष्टीपासून आनंद मिळाला पण म्हणून ती गोष्ट मिळालीच पाहिजे असं नाही. अट्टाहास नाही.

आता एखादी कलाकृती पाहताक्षणी डोळ्यांत भरणं, मग ते एखादं चित्र असो, नृत्य असो, संगीत असो, कलेचा कोणताही अविष्कार असो, जे परत परत टिपावं असं वाटत राहतं, मग ते एखाद्या व्यक्तीचं सौंदर्य, तिचं दिसणं टिपताना पापणी लवू नये असं वाटणं, तिला न्याहाळत नेत्रसुख मनापासून उपभोगावं वाटणं... हे कदाचित 'आकर्षण' या सीमेपर्यंत पोचत असावं का. जिथे इंद्रियांच्या संवेदनक्षमतेनुसार आकर्षणाची तीव्रता कमीजास्त असू शकते. यात भावनिक ओढ, गुंता ही पानं कोरी राहात असावीत. पण ते मिळण्याची जबरदस्त ओढ मात्र नक्की असते, ते परत परत मिळावंच वाटणं या जाणीवेचा पाया आकर्षणाच्या संकल्पनेभोवती फिरत असावा का?

आणि आता जिथे मनाच्या संवेदनशीलतेचा संबंध येतो ती प्रेम ही भावना असावी. अगदी सहज, कुठलाही कृत्रिमपणा न जाणवता, एखाद्या व्यक्तीच्या जवळ असण्यानं आतून बहरून गेल्याचं फीलिंग येणं, शांत, हलकं वाटणं, त्याला समजून घेता येणं सहज घडणं, व्यवहारापलीकडची त्याची निरपेक्ष आस लागणं, स्वतःची माणूस म्हणून स्वतःला असलेली ओळख न सांगता त्याला जाणवणं, वासनेच्या पलीकडचा स्पर्शानुभव आत खोलवर पोचणं, त्यात अगदी समरसून, जीव ओतून ती हळुवार जाणीव अनुभवणं. या धाग्याभोवती प्रेम ही संकल्पना बांधली गेली असावी का? ज्यात हळवेपणा असेल, सुख, आनंद आणि समाधानही असेल पण ते मिळालंच पाहिजे हा अट्टाहास मात्र नसेल. या जाणिवेत कधी कधी आड येणारी, शिक्षण, हुद्दा, पैसा, ज्ञान याची स्वतःच्या व्यक्तिमत्वाभोवती असलेली वलयं किंवा याच सगळ्यांच्या केंद्राभोवती फिरत असलेली अभिमान, गर्व, आत्मसन्मान ही अजून आतली वलयं, या साऱ्याचे परीघ त्या ज्या एका आंतरिक भावनेमुळे, रुंदावतात, शिथिल होतात, ही जाणीव म्हणजे प्रेम असावं का?

मग ते आईचं/ वडिलांचं त्यांच्या मुलांवरचं प्रेम असेल, बहीण-भावांमधलं प्रेम असेल, किंवा दोन मित्रांमधलं असेल किंवा पती पत्नीमधलं असेल. खरंतर नात्यांची ही अशी नावं ही समाजाभिमुख आहेत. पण त्या नात्यानुसार प्रेम भावनेचे स्वरूप वेगवेगळं कसं असू शकेल. म्हणजे, त्या नाट्यानुसार त्यांच्यातील प्रेम किती दृढ आहे याचे निकष लावणे मला आधारहीन वाटते. थोडक्यात आईचं तिच्या मुलांवरचं प्रेम हे सर्वश्रेष्ठ आणि प्रियकर- प्रेयसी मधलं त्यामानानं कमी दर्जाचं याला काहीच आधार मला सध्या तरी मिळत नाहीये. प्रेम व्यक्त करण्याचे, ते दाखवण्याचे मार्ग वेगवेगळे असू शकतील, म्हणजे आई तिच्या मुलावरचं प्रेम, वेगळ्या प्रकारे दर्शवील आणि मित्र वेगळ्या तर्हेने. पण ते आहे हे अनुभवता येण्याची जाणीव मात्र खऱ्या प्रेमावर आधारित प्रत्येक नात्यात एकसारखीच असावी. मनाच्या संवेदनशीलतेवर त्याची तीव्रता अवलंबून असेल कदाचित, पण ज्या जाणिवेनं, समाधानाची ती एक तृप्त पातळी स्वतःला अनुभवता येणं ही त्या प्रेमाची स्वतःलाच जाणीव करून देण्यासारखं आहे. मग ते नातं रक्ताचं आई-मुलाचं, बहीण-भावाचं असो, किंवा वाटेवर अगदी सहज भेटलेल्या दोन व्यक्तीमधलं असो.


'देण्या-घेण्यावरी उभा हा विश्वाचा बाजार...' हेच आजवर ऐकत, पाहत, जाणत आल्यानं,
निर्व्याज, निरपेक्ष, निर्हेतूक असं काही असतं जगात...हे पटायला बरीच वर्ष जावी लागली...!

पण तुझ्या असण्यात ते पटलं, जाणवलं, तुझ्या नसण्यातंही ते भासत गेलं,
'हक्क', 'अपेक्षा', 'तक्रारी', 'गृहीत धरणं', हे असे नात्याला गुदमरून टाकणारे धागे कधी विणलेच गेले नाहीत...!

जे आहे, जसं आहे, ते तसंच हवं आहे, कारण ते स्वच्छ आहे, खरं आहे, ही जाणीव मोहून टाकणारी होती.
त्यामुळं सौंदर्य बघण्याची आणि त्याला द्रुष्ट न लागता ते अलगद टिपण्याची कला सहजच जमून गेली...!

बोलता न आलेलं ऐकू येणं आणि ऐकलेलं नकळत समजून घेणं, असा मूक संवाद मात्र खूप बोलका होत गेला,
मग त्या साठी दिसण्याची, समोरासमोर असण्याची गरजच उरली नाही, कि स्पर्शाचीही...!

अंतर, संयम, मर्यादा, याच्या जाणिवा नकळत आभासी तट बांधून गेल्या, आणि
'निखळ आनंद' या पायावर मुळं धरु लागलेल्या वेली, विश्वासाच्या आधाराभोवती घट्टं लपेटून बहरू लागल्या...!


अर्थात हे माझे विचार आहेत....कदाचित चुकीचे, न पटणारे असतील. म्हणूनच त्यावर लिहावे वाटले, जेणेकरून त्या बाबतीतल्या माझ्या कल्पना मलाच नीट स्पष्ट होतील. यावर तुमचं मत जाणून घ्यायची खूप इच्छा आहे. 

--- अश्विनी वैद्य 
१९.०५.१७  

Wednesday 29 March 2017

Priorities



    सकाळी जाग आली... नेहमीप्रमाणे ६.३० झाले होते. पापण्यांआड पडलेल्या  स्वप्नांना पांघरुणाबरोबर बाजूला सारून सकाळच्या स्वच्छ, प्रसन्न दिवसाला सुरवात केली. काल बराच उशिरा डोळा लागला आपला. अर्ध्यात सुरु केलेलं ते पुस्तक वाचून पूर्ण केलं आणि त्या ओघानं येणारे विचार मनात घोळवत बरीच  उशीरा कधी झोप लागली कळलंच नाही. नेहमी असंच होतं आपलं, एखाद्या गोष्टीचा वेगवेगळे चष्मे लावून उगाच अती विचार करत बसणं होतं. त्या पुस्तकात लेखकानं उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा जवळच्या वाटल्या खऱ्या पण पटल्याच असं नाही, बरेच संदर्भ अजून खोलवर पोचायला हवे होते. आता उठल्यावर पण तेच सगळं डोक्यात चालू आहे. नेहमीची सकाळची गडबड आहेच पण आत मात्र त्या विचारांनी घेरलंय. 

    एखादं वेगळा विचार मांडणारं पुस्तक हातात आलं कि, स्वतःच्या त्याबाबतच्या विचारांचेही वेगवेगळे धागे आपोआप तयार होतात, आणि मग त्याचा थोड्यावेळाने इतका गुंता होतो कि, कुठली परिमाणं कुठं लावायची सगळाच गोंधळ उडतो. कळत नाही असं नाही, पण स्वतःशीच असलेले स्वतःचे वाद मिटवायला कधी कधी कोणाची तरी मदत लागते. कोणाशी तरी बोलावं असं खूप वाटत होतं. पण कोणाशी बोलणार. वेळ असा कधी नसतोच कोणाकडे, किंवा priorities वेगळ्या असतात. असं एखाद्या पुस्तकाविषयी, त्यात मांडलेल्या मताविषयी वैगेरे तर शक्यच नाही. जिथे आपण केलेल्या मेसेजला उत्तर येणं मुश्किल, तिथं अशी एखाद्या पुस्तकाविषयी चर्चा म्हणजे, काहीही अपेक्षा करते मी. 

    सकाळची सगळी गडबड उरकल्यावर थोडासा वेळ होता, नेमका तेव्हाच फोन वाजला. मोबाईलच्या स्क्रीनवर नाव दिसलं आणि खूप आनंद झाला. किती दिवस झाले होते शेवटचं बोलून, तो आवाज ऐकून... त्यात स्वतः होऊन फोन आला म्हणजे मला बोलायचं आहे हे कळलं असेल का तिला. कोण जाणे... पण आज अगदी भरभरून बोलूयात दोघीजणी, खूप गप्पा मारुयात असं म्हणत पटकन फोन घेतला. पलीकडून अगदी आनंदात येणाऱ्या आवाजावरून, तिच्या चेहऱ्यावरचे भाव मला इकडे जाणवत होते. खळाळत्या झऱ्यासारखी ती बोलत होती. तिचा आवाज, तिचं बोलणं, शब्दाशब्दांतून सांडणारा आनंद हे सारं काही मी फोनवरून टिपत होते. लग्न ठरल्याची गोड बातमी द्यायला तिने फोन केला होता. ते ऐकून मलाही खूप आनंद झाला. तिचं बोलणं थोडं ओसरल्यावर तिला मनापासून शुभेच्छा दिल्या आणि "बाकी तू काय म्हणतेस?" या तिच्या प्रश्नावर "ठीक, मस्त" असं काहीतरी न ठरवता, सहज ओघानं येणारं उत्तर तोंडून निसटलं. "चल, जरा गडबडीत आहे, बोलू परत" असं म्हणत तिने मग फोन ठेवून दिला. किती खूष होती ती...मलाही छान वाटलं. भरभरून बोलणं झालं खरं, पण ते तिचं, तिच्या बाजूनं... मला बोलायचं होतं ते राहिलंच... अर्थात वेळच नव्हता तिला. हरकत नाही, माझे विचार परत माझ्याभोवतीच फिरत राहिले.

    राहिलेली कामं पटापट आवरून मी ही कामाला बाहेर पडले. दिवसभर कामाच्या गोंधळात पुस्तकाचे विचार बाजूला पडले खरे, पण ती अस्वस्थता संपली नव्हती.  त्याच त्याच विचारात अडकून पडलं तर काही वेळानं त्याचं डबकं होतं, ज्याचा नंतर त्रास व्हायला लागतो, पण म्हणून मग ते असेच सोडून देऊन त्याचा पाचोळा  असा मातीमोल झाल्याचं वाईटही वाटतं. प्रवाही विचार मनाच्या cleansing साठी किती आवश्यक असतात ना... मग काय शेवटी, रात्री सगळ्यांची निजानीज झाल्यावर दिवसभर आतल्या आत चाललेली तगमग कागदावर उतरवून मोकळी केली...आणि माझी माझी मी एकटीच शांत झाले.

---अश्विनी वैद्य 
२८. ०३. १७

Wednesday 22 March 2017

सवय


आधी ओढ, मग काहूर, 
मग स्वतःच्याच त्या 'हो-नाही'च्या हेलकाव्यात उगाच जागवलेल्या रात्री, 
चूक-बरोबरची मांडलेली गणितं, अस्वस्थ करणारी घालमेल, 
आणि अचानक एखाद्या बेसावध क्षणी अगदी वाऱ्याच्याही नकळत शहारून टाकणारी ती हलकी झुळुक, 
उसासून कोसळणाऱ्या थेंबागणिक शमत जाणारी ती तहान, त्यातून जाणवलेली एक वेगळीच त्रुप्तता, ती समाधानी शांतता, 
झाकोळून आलेल्या आभाळाला बाजूला सारत अचानक सूर्य डोकवावा आणि 
निवलेला, पार भकास भोवताल त्या किरणांनी अगदी नसानसांतून तरारून यावा, झळाळून निघावा...तशी काहीशी तृप्त जाणीव...!
एकदम काहीतरी वेगळ्याच जगाची नव्यानं होत असलेली ओळख, 
मग दिवसाच्या चारही प्रहरी त्यातच हरवलेलं मन, त्याभोवतीच वेड्यागत चाललेले सगळे काल्पनिक खेळ, 

त्या त्रुप्ततेचीच अजून अजून वाढलेली तहान, ती शमवण्याची परत परतची आस, 
या साऱ्या साऱ्याच्या हिंदोळ्यांवरच तरंगत राहावं असं वाटणारं भाबडं वेड, 

आणि मग या सगळ्याच्या कायमच हव्याशा सोबतीने , 
 त्या भावविश्वाची मनाला नकळत होत गेलेली ती 'सवय'...!

हो सवयच...लौकिकार्थाने नकारात्मक असलेली अशी एक 'सवय'
किती सावधगिरी बाळगली तरी अंगवळणी पडलेली, पार चिकटलेली ती 'सवय' 
 एखाद्या संध्याकाळी विरत जाणाऱ्या प्रकाशाबरोबर कातर करणारी या सगळ्याची जाणीव 
दिवसागणिक वाढणाऱ्या वयाच्या परिपक्वतेच्या उंबरठ्यावर अजूनच अस्थिर करणारी...!  
'बास..आता थांबूया...' ही संयमाची पुसट रेषा कुठल्या वळणावर ठळक करावी याची पावलागणिक नकोशी वाटणारी जाणीव
खरंच, 
ही वाट कधी सापडायलाच नको हवी होती का? का त्या लाटांबरोबर पार खोल कधी बुडत गेलो कळलंच नाही आपल्याला? वाहवत जाण्याचा मूळ स्वभाव इथेही आड येऊ नये का? 
अशी सवय न लागू द्यायचीच सवय मनाला करून घ्यायला हवी होती का?

--- अश्विनी वैद्य 
  २२.०३.१७   


Tuesday 28 February 2017

वादळ


मनातले गोंधळ किनाऱ्याला पोचतच नाहीत ना....
ती अस्थिरता अगदी विषण्ण करते,

त्या त्या शब्दांच्या व्याख्या वेगवेगळ्या कोनातून 
बघूनही कुठल्याच बाजूनं पटेनाशा होतात, 
ती अस्वस्थता आतून कुरतडते...! 
 
बरोबर आणि चूक याचे व्यक्तिसापेक्ष आधार 
वाऱ्यावर तरंगायला लागतात, पार विस्कटतात, 

सगळं अगदी स्वच्छ, शुभ्र दिसतंय खरंतर
पण झेपत नाहीये, पचत नाहीये
ही जाणीव आतून पोखरून टाकते...! 
 
कोणीच नकोय मला समजवायला किंवा आधाराला,
कारण तो माझा मलाच बांधावा लागणार आहे...आतून,
हे कळतंय मला...!  

पण त्या आधाराची रिकामी पोकळीच 
आत्ता कवटाळावीशी वाटतीये, ते शांत किनारे सापडूच नयेत, 
त्या वादळाला आत कोंडून दडपूनच राहूदेत,
विझून जाऊदेत तप्तपणीच...!  

--- अश्विनी वैद्य 
 २७.०२.१७  

Thursday 9 February 2017

'आठवणी'




         हल्ली एकटे असूनही रिकामा वेळ तसा फार कमीच मिळतो, कारण रिकामा वेळ रिकामा आहे ही जाणीवच न होऊ देता तो पूर्णपणे भरून टाकत मनाला कायम बिझी ठेवण्याची जबाबदारी स्मार्ट फोनने नकळत उचलली आहे. त्यामुळं बरीचशी कामं बोटाच्या एका क्लिकने करत कृतीचे वेळेचा सदुपयोग करणे चालू होते. पण मध्येच एकदम डोळ्याच्या पापणीचा केस फोनच्या स्क्रिनवर पडल्याचे तिला दिसले, आणि तिचे इतर सगळे विचार एकदम बाजूला सरकले. फोन बाजूला ठेवून पापणीला हातात घेऊन न्याहाळताना सहज लहानपणीची एक गोड आठवण तिच्या अगदी डोळ्यासमोर उभी राहिली. त्या वयात किती निरागस विश्वास असतो ना मनाचा काही गोष्टींवर... अशी आपसूक पडलेली पापणी हाताच्या उलट्या मुठीवर ठेवून, डोळे बंद करून आपल्याला हवंय ते मागायचं आणि तिला हळूच फुंकर घालायची. मग ती पापणी उडत उडत लांब देवाकडे जाते आणि आपली इच्छा पुरी करते...कित्ती वेडी कल्पना...पण अगदी गोड. कधी कधी अशा आठवणींचा पूर असा दाटून आला की तिला उगाच खूप हळवं व्हायला होतं. मग नकळत त्या आठवांचे पदर हळू हळू सुटत जातात. वाऱ्यावर उडत स्वतःभोवती लपेटून बसतात. बंद डोळ्यांसमोर कल्पनेचं ते विश्व क्षणात अवतरतं. काळाला मागे सारत ती दृश्यं, ते प्रसंग एखाद्या धाग्याने असे एकदम जवळ ओढून आणावेत तसे समोर उभे राहतात. कधी खूप सुखावतात आणि कधी अगदी नक्कोसे असतात. या सगळ्या विचारांमध्ये कृती अगदी हरवून गेली. 

     हे सगळे कल्पनेचे खेळ मनातल्या मनात कधी कधी इतका पसारा मांडतात ना, की आवरायलाही जीव नको म्हणतो. काठावर उभं राहून पाण्यात पडलेलं आपलंच प्रतिबिंब आधी कसं होतं आणि कसं बदलत गेलं हे सारं त्या पसाऱ्यात दिसायला लागतं. पडून राहू देत पसारा तसाच...माझामझाच. तसंही कोणाला डोकावता येत नाही, आतमध्ये पाहता येत नाही. मग वाटेल तेव्हा पसाऱ्यात पडून राहीन तशीच. हवंय ते परत परत गोंजारीन, नकोय ते बाजूला सारीन. काय काय जमवलंय आजवर त्याची होत गेलेली वजाबाकी शून्यावर तर गेली नाही ना ते ही कळेल...हेच काय ते माझं... या आठवणींचं आयुष्यही माझं मीच ठरवलेलं. नकळत आठवणींच्या पसाऱ्यात कृती शांतपणे पहुडली होती. 

      मनाची पण कमाल असते ना, भूतकाळ आणि भविष्य यांची आत्ताच्या वर्तमानात स्वतःपुरती भातुकली मांडून त्यातच रमायला ते बऱ्याचदा आसुसलेलं असतं. कदाचित त्यामुळंच आजच्या क्षणांना मोल यायला 'उद्या' उजाडावा लागतो आणि उद्याची कल्पनेतली स्वप्नं पृथ्वीवर अवतरे पर्यंतच त्याचं काय ते मोल रहात असतं. आठवणी आणि स्वप्नं या दोन काळांना जोडणारा प्रवास म्हणजे आत्ताचा क्षण. पण ही जाणीव एक तर तो क्षण आठवणीत गेल्यावर होते किंवा कल्पनेत...! त्यामुळंच कदाचित तो क्षण प्रत्यक्ष भोगण्यापेक्षा या दोन्हीचीच ओढ जास्त वेड लावत असावी. जुन्या आठवणी आणि भविष्यातील स्वप्नं या आभासी मनोऱ्यावर रचलेला आत्ताचा वर्तमान जीव तोडून जगण्याचा आपण प्रयत्न करत असतो खरंतर. पण जे आहे त्यापेक्षा, जे होतं किंवा जे होईल या आधारावर.... अरे बापरे, कृतीने एकदम दचकून डोळे उघडले. ती पसाऱ्यातून बाहेर आली. आजूबाजूचं सगळं तर तसंच होतं, जिथल्या तिथं. काही हाललं नव्हतं. फक्त पापणीचा केस तेवढा तिथं नव्हता. गेलेल्या वेळेची फुंकर त्याला तेवढी जाणवली असावी कदाचित. 

       असो, आज ती परत त्याच वाटेवरून जात होती. आजूबाजूची झाडं, वस्ती, दुकानं, सारं काही तेच होतं. आजपर्यंत हा रस्ता, हाच माहोल कित्येक वर्ष, कितीतरी वेळा पायाखालून गेलेला. तोच रस्ता, तीच झाडं, पण मनातलं भावविश्व् मात्र दरवेळी निराळं. जेव्हा आनंदी पाऊलं त्या वाटेवरून गेली तेव्हा तीच दृष्यं मन आणखी प्रफुल्लित करणारी वाटलेली, स्वतःचीच वाटलेली आणि जेव्हा काळे ढग मनात भरून आले तेव्हा तीच अगदी नकोशी झालेली, परकी वाटलेली. नंतर तोच रस्ता इतका सवयीचा होत गेला की मनातील भावनिक चढ-उतारांचा त्याच्यावर होणारा परिणाम गृहीतच धरला गेला. 

      आज कितीतरी वर्षांनी जेव्हा त्याच वाटेनं चालताना जाणवतंय, ते कधीच माझं नव्हतं, माझ्यासाठी नव्हतं, ते फक्त 'तिथं' होतं, सुखी असताना मी उगीच त्याची जवळीक मानली आणि दुःखात उगीच त्याचा त्रागा करून घेतला. त्या माझ्याच मानसिक अवस्था होत्या. पण तरी गुंतले होते मी त्यामध्ये इतकी, त्या वाटेने जात होते म्हणून केवळ त्यांच्या असण्याचं अस्तित्व मानायला हवं होतं का? पण मी तर माझ्या सुखदुःखाच्या कल्पनेशीच त्यांचं नातं जोडलं होतं. हे कल्पनेचे, आठवणींचे खेळ अगदी वेडावून सोडणारे, पण तरीही हवेहवेसे.


--- अश्विनी वैद्य 
२५.०१.१७

Friday 6 January 2017

दोन मोती


दोन मोती, शुभ्र डोहातले 
हलकेच सावळे, पण ओलसर चमकणारे 

जरा भिडताच, खोल आतवर उतरू पाहणारे 
अगदी भेदक, मनाचा अवचित ठाव घेणारे 

अबोल सोज्वळतेचे रूप पाझरणारे 
क्वचित किनाऱ्यावर विसावू पाहणारे 

आश्वासक निश्चिन्ततेचा अस्पष्ट पूल सांधणारे 
सुंदर दिसण्याला सुंदर असण्याने स्पर्शिलेले 

बौद्धिक झळाळी ओसंडणारे, 
कल्पनेची नशा चढवू पाहणारे,

कधी अगदीच अगम्य, कधी खूप बोलके 
कधी भावनांचा हात धरत, रुक्षतेलाही जपणारे 

कितीही घेऊ पाहिले, तरी तहानच न भागवणारे, 
अगदी वेडावून सोडणारे, दोन मोती - शुभ्र डोहातले...! 



-- अश्विनी वैद्य 
६. १. २०१७



राजस्थान डायरी : उदयपूर

उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थाप...