Monday 25 January 2016

आज काहीतरी वेगळंच वाटतंय...!




खूप भावना भरून आल्यात विचारांत, पण शब्दांचा बांध काही फुटेना, 
केविलवाणा स्वर माझा त्या शब्दांपर्यंत काही पोहोचेना....! 

पानावरच्या अलगद वहात येत खाली पडणाऱ्या त्या पाण्याच्या थेंबावर डोळे तर स्थिरावलेत, 
पण त्या बरोबर वाहणारी विचारांची धारा मात्र का अडकलीये कुठल्याशा बोथट कड्यावर...!

जसं हवं तसं घडत तर गेलंय आत्तापर्यंत बरचसं, 
तरीही खूप काही राहून गेल्याची खंत का उगीच बोचते आहे...! 

मी पणाचा मिरवलेला सदरा आत्ता तुच्छतेचे जळजळीत कटाक्ष झेलतोय, 
तरीही, 'हे माझंच आहे सारं', ही कल्पना तितकीच निर्विवाद आत्मिक सुखही का देतेयं...! 

कल्पनेच्या जगाशी वास्तवतेचे जोडलेले नाते कधीच अस्तित्वात नव्हते,
ही जाणीव ठळक होती तरीही मग का वेड जपले त्या विश्वात हरवून जायचे...! 

पुढे पुढे चालताना विचारांचे कित्येक पैलू मात्र मागे मागे नकळत सांडत गेले, 
तरीही मग प्रत्येक टप्प्यागणिक व्यक्तिमत्वाचे पैलू मात्र वाढतच का जावे...! 

सगळं तर तसंच आहे, जिथल्या तिथं, अनंत काळापासून, अगदी तसंच, 
तरीही बदलाची उर्मी बाळगत तेच चित्र नव्यानं रेखाटण्यात आनंद का मिळाला...! 

या सगळ्याची उत्तरं खरंतर नकोच आहेत समजायला, 
पण मग हे प्रश्न त्यांचं अस्तित्वच का विसरत नाहीयेत...! 

त्या वाऱ्याला, त्या पावसाला, त्या सांजेला तुझ्या हुरहुरतेची छटाच का सारखी लाभावी, 
तू नेहमीसारखा जवळ सुद्धा आहेस रे, कदाचित मीच गेलीये माझ्यापासून दूर थोडीशी...!

आज खरंच काहीतरी अगदी वेगळंच वाटतंय...! 



                                            - अश्विनी वैद्य 
                                                                       २५-०१-१६

Thursday 7 January 2016

गप्पा संस्कृती



        "अगं अगं…समोर बघ…लागलं ना गुडघ्याला…!" गप्पांमध्ये रमली ना कि कशाचं म्हणून भान नसतं मिनू ला….अगदी डोळ्यांची बटणं होतात, हाताची बोटं दुखून येतात, खांदे, मान भरून येते…पण जरा म्हणून शुद्ध नाही या मुलीला. काकूंची हल्ली ही नेहमीची कानावर पडणारी तक्रार…चालता चालता हातातल्या mobile वर गुंतलेल्या नजर आणि मनामुळे समोरचं भलं मोठ्ठं टेबलही मिनुला त्या ४.५ इंच mobile स्क्रीन च्या प्रकाशात दिसलं नव्हतं. 

     "'whatsapp वरच्या गप्पा', हा गप्पांचा एक नवीन प्रकार उदयाला आल्यापासून गप्पा मारून तोंडं दुखण्याऐवजी हे असे वेगवेगळे अवयव दुखावले जावून त्यांच्या अस्तित्वाची ते जाणीव करून देत असतात गं.…!" इति काकूंची पुढची बोचणी मिनुच्या कानांना शिवेपर्यंत ती तिच्या खोलीमध्ये पोचली सुद्धा होती. नशीब headphone सदृश कानातले त्यावेळी तरी तिने अडकवले नव्हते. नाहीतर काकूंच्या त्या वास्तव शब्दांची काय बिशाद कि त्या headphone मधल्या (virtual) आभासी शब्दांना मागे सारून ते तिच्या कानांत घुसतील. 

         असो, तर माझे काम झाले होते, म्हणून मी परत निघाले. 'आम्ही दोन दिवस घरी नाहीओत तर जरा लक्ष असू द्या घराकडे', हा निरोप द्यायला आणि त्या निमित्ताने सहज भेटायला म्हणून मी आमच्या शेजारच्या या काकूंकडे आले होते. मिनू त्यांची या वर्षीच कॉलेज संपवून नोकरीला लागलेली मुलगी. माझ्यापेक्षा पाच-सात वर्षांनी लहान असेल. पण हल्ली साधारण पाच-पाच वर्षांनीच generation बदलतीये बहुदा असं मला तरी वाटू लागलंय, आणि तरीही उलट पूर्वीचा अगदी छोट्या खड्ड्या एवढा असलेला हा generation gap आता पार खोल दरी एवढा झालाय असं भासतंय. त्यामुळे मिनू आणि माझ्यातही ती पाच-सात वर्षांची दरी मला दिवेघाटा इतकी खोल जाणवते. मग काकूंना निरोप देवून घरी परतताना माझ्याही डोक्यात विचार आला, 'आम्ही कॉलेजात असताना ('आमच्यावेळी' हे typical हं) म्हणजे पाच-सात वर्षांपूर्वी नव्हती बाई ही whatsapp, फेसबुक ची थेरं…' अर्थात म्हणूनच कॉलेज वेळेत पूर्ण होऊन गाडी रुळावरून घसरली नव्हती हा भाग निराळा… पण खरच या सगळ्यामुळे हल्लीचा गप्पा मारण्याच्या पद्धतींचा बदलत चाललेला ट्रेंड यावर उगाच विचार सुरु झाले.

              मग काय, भूतकाळात डोकावून 'गप्पांची बदलत गेलेली रूपे' चाचपडण्याचा मोह, गप्पा मारायला त्यावेळी सोबत कोणी नसल्यामुळं आवरता येईना. पण वयाच्या या टप्प्यावर, जिथे अनुभव पाठीशी आहे असे म्हणायलाही केवळ चार दोन गोष्टीच हाती लागतात एवढ्या दांडग्या आधारावर काही सापडणे म्हणजे जरा अवघडच गोष्ट होती, तरी मनात एकटीच्याच चाललेल्या या वायफळ गप्पांना गप्प करत मग आठवले ते अगदी सुरवातीचे 'सूर निरागस….!' गप्पांचे. लहानपणीच्या मित्र-मैत्रीणींबरोबरच्या लुटुपुटूच्या भांडणाचे. तेव्हाच्या त्या गप्पांच्या सुरात बालिश भांडणाचा आवाजच जास्त खणखणीत असायचा…ती मित्र-मैत्रिणींबरोबरची निरागस भांडणं, परत बोलणं, खेळणं यात अख्खा दिवस घालवून, संध्याकाळी परत त्या गप्पांचा पाढा आईला ऐकवण्यात दिवसाची सांगता व्ह्यायची. 

        कधी कधी शाळेतून घरी आल्यावर दुपारी जेवणं वैगेरे आटोपून शेजारच्या काकूवार्गीय बायकांचा गप्पांचा जो फड जमायचा त्याची मला भारी मजा वाटायची. मग कधी पापड-लोणची घालत, हात शेवया करत, त्याच गप्पांमध्ये प्रत्येकाच्या घरचे संध्याकाळच्या जेवणाचे मेनूही ठरत. त्यांच्या गप्पांचे विषय, त्याचे अर्थ, त्याचे महत्व या कशाकशाचीही जाणीव तेव्हा नसायची, वयाच्या मर्यादेमुळे, त्यात सहभागी व्हावेही कधी वाटले नाही पण त्यावेळचा तो जो एक माहोल, ते मनमोकळे हसण्याचे आवाज, गप्पांच्या ओघात त्यांच्या चेहऱ्यावरचे बदलत जाणारे भाव हे सारं लांबूनच खेळता खेळता टिपण्याची मजाही वेगळीच होती. नोकरी करणारी आई असल्यामुळे तिची उणीव मात्र मला त्या घोळक्यामध्ये कायम भासायची. पण ही अशीच गप्पांची मैफल घरी सुट्टीमध्ये सगळ्या मावश्या एकत्र जमल्या की भरायची. संध्याकाळच्या सुग्रास जेवणावर ताव मारल्यानंतर अंगणात पडलेल्या चंद्रप्रकाशात निवांत बसून आईनं घरी केलेलं आईस्क्रीम गप्पांबरोबर चाखत त्याची जी काही गोडी वाढायची ती औरच. आईस्क्रीम कधीच संपून जायचं, पण त्या गप्पांना पूर्णविराम मिळायचा तो पार मध्यरात्रीनंतर कधीतरी. 

        'खूप दिवसात भेटलो नाही, या आज संध्याकाळी निवांत गप्पा मारू' असं अगदी जाता जाता ठरवून सुद्धा त्या संध्याकाळी मग घरी वडा-सांबार चा बेत चापत आमच्या ओळखीतल्या कुटुंबाबरोबर अगदी दिलखुलास गप्पांची मैफल रंगे. 

             त्या हळव्या शाळकरी वयात वास्तविक आयुष्याचे संदर्भ पुस्तकात शोधताना त्यातल्या आभासी पात्रांशी अगदी एकरूप होवून मारलेल्या गप्पाही खूप वेगळ्या होत्या. त्या तेव्हाच इतक्या खोलवर रुजल्या की आजही केवळ 'चाळ' हा शब्द जरी ऐकला तरी सगळ्यात आधी डोळ्यासमोर पटकन येते ती 'बटाट्याचीच चाळ'. त्या चाळीतल्या साऱ्या व्यक्तिरेखा त्यांच्या गप्पांमधून जाणून घेता घेता मीही त्या चाळीचाच एक भाग आपोआप होवून जायचे…. पुस्तकातले टिळक आणि आगरकर जेव्हा संध्याकाळी एकत्र फिरायला जायचे तेव्हा त्यांच्या वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर चाललेल्या गहन गप्पा, खडाजंगी मी पुस्तकातल्या पानाआडून ऐकायचे. 'स्वामी', 'श्रीमान योगी' यातल्या त्या महापुरुषांच्या संवादात आपल्या अजरामर इतिहासाचे चित्र डोळ्यापुढे आपोआप रेखाटले जायचे. या साऱ्या मित्ररूपी पुस्तकांतल्या आभासी गप्पांचा परिणाम म्हणून काही गोष्टींचे संदर्भ मात्र कायमचे मनात कोरले गेले ते आजही तसेच आहेत. 

                       पुढे एका वळणावर, जिथे गप्पा मारायला घरच्यांपेक्षा, पुस्तकांपेक्षा मैत्रिणींची साथ जास्त जवळची वाटू लागली तेव्हा त्या तासनतास मारलेल्या गप्पांचा मोहक सूर आजही अगदी हवाहवासा वाटणारा. त्या गप्पांमध्ये हळुवार उलगडत जाणारी मैत्रीच्या नात्याची वेगळी ओळख जाणवत होती, मग ते अगदी टुकार विनोदावरही पोट धरून हसणं असेल, चेष्टा-मस्करी, पिडणं, धांदल, वडापाव, सिनेमा, धम्माल या साऱ्या साऱ्या रंगानी खुललेला गप्पांचा तो वेगळाच बाज त्या वयाला मोरपिसांचे पंख देणारा होता. त्या साऱ्यात गुंतलेल्या आठवणी आजही अगदी ताज्यातवान्या आहेत. कॉलेज मध्ये रंगलेल्या वेगवेगळ्या विषयांवरच्या औपचारिक वादविवाद स्पर्धा सुद्धा, टीव्हीवरच्या त्यावेळच्या विविध क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या थोरामोठ्यांच्या debate इतक्याच प्रभावी असायच्या. तोपर्यंत भ्रमणध्वनी हा प्रकार जरी वापरात असला तरी त्याचे 'smaartphone' नामक बाळसेदार रूप अस्तित्वात यायचे होते… त्यामुळे 'लिखित गप्पांचा' उदय अजून व्हायचा होता.




         माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अचानक झालेल्या प्रचंड बदल आणि चढाओढीमुळे लोकांच्या पश्चिमेकडच्या देशातल्या तेवढ्याच वेगाने वाढलेल्या कुटुंबासमवेतच्या परदेशवाऱ्यामुळे मग 'skype वर online असणे' या वाक्याला घरोघरी अगदी अनन्य साधारण महत्व आले. सुरवातीला आठवड्यातील सोईचा वार व वेळ ठरवून संगणकाच्या १३-१५ इंची पडद्यावर एकमेकांच्या चेहऱ्यावरच्या खुणा, डोळ्यातील भाव तुटत-तुटत चालणाऱ्या इंटरनेट स्पीडमधून जाणून घेत online गप्पा मारणे सुरु झाले. आजी-आजोबांनाही गप्पांच्या या नवीन प्रकाराने भुरळ घातली आणि त्यांचेही मग संगणक साक्षर होणे ओघाने आलेच. या सगळ्याबरोबर कमालीच्या वेगाने क्रांती झालेल्या 'सोशल मेडिया' या प्रकाराने तर मग गप्पांचा उर अगदी फुटून गेला. कोणेकाळी अगदी तोंड ओळख असलेलेही मग friendlist मध्ये तोंड दाखवू लागले. तर काही उगाच दुरावलेली नाती या सोशल मेडियाच्या खतपाण्याने परत मुळे धरू लागली. फोटोज वर चांगल्या comments करणारे अगदी जवळचे मित्र वाटू लागले आणि न करणारे पार दूरचे झाले. एकमेकांना असे virtually कनेक्टेड असणे या उद्देशाने उदयास आलेला हा प्रकार स्वतःचे अस्तित्व इतर जगासमोर सतत सिद्ध करत रहाण्यासाठी कधी वापरात यायला लागला कळलेच नाही. आणि मग आत्ताच्या या smartphone मुळे तर तो अगदी खिशाखिशात पोहोचला. गप्पा मारण्यासाठी चोवीस तास सेवेला हजर राहू लागला.

     
         गप्पांना लिखित स्वरूपाचा वेगळा थाट मिरवता येवू लागला तो मात्र केवळ whatsapp मुळेच. त्यात मग एखाद्या विनोदावर समोरचा त्याच्या smartphone च्या स्क्रीन पलीकडून कोणत्या frequency ने हसला हे दुसऱ्या smartphone च्या स्क्रीन ला कमीतकमी शद्बात कळवण्यासाठी इमोजी डोळे मिचकावत पुढे आले. सकाळच्या संतवाणी बरोबरच, तत्वज्ञानाची भली भली वाक्य दिवसाच्या कोणत्याही प्रहरी ही अशी स्क्रीनवर फेकताना (फोरवर्ड करताना) शब्द सांडू लागले. इथेही समविचारांचे ग्रुप तयार झाले, त्यांचे वेगवेगळ्या विषयांवर लिखित वादविवाद फुलून येवू लागले आले….मतं मांडली जावू लागली. या गप्पांचीही एक भन्नाट भाषा (असं मला तरी वाटतं) जन्माला आली… "no rey…", "thanks गं", "सकाळी had प्रोजेक्ट relese…" अशी सगळ्याच अर्धवट भाषांमधील चिवित्र वाक्य गप्पांमध्ये वाचताना मजा येवू लागली. जगाच्या चार टोकांना राहणारे चार मित्र एकाच्या सकाळी, तर त्याचवेळी असणाऱ्या दुसऱ्याच्या दुपारी तिकडचे updates देवू लागले. गप्पांचे हे वेगळेच आभासी विश्व वेळेचे भान पाळत सांभाळल्यास सगळ्यांनाच भुरळ घालणारे आहे. 


         शेवटी काय, रूपे, माध्यमे कोणती का असेनात, मनातले भाव समोरच्या व्यक्तीबरोबर दिलखुलासपणे बोलता आले म्हणजे झाले, मग यातून सुरु झालेल्या गप्पा मग त्या शाळेतल्या मुलांच्या असोत, मित्रांबरोबर टपरीवर कटिंग चहा घेता घेता मारलेल्या असोत, कोणाच्यातरी लग्न समारंभात जेवणे आटोपून खुर्च्यांवर गोल करून बसलेल्या खूप दिवसांनी भेटलेल्या नातेवाईकांबरोबर मारलेल्या असोत, पृथ्वीच्या पूर्व-पश्चिम टोकांना विखुरलेल्या कुटुंबाच्या skype वरच्या असोत, अगदी एखाद्या गहन विषयावरच्या असोत, कोणत्याही नात्यामधल्या असोत, वैचारिक असोत, विनोदी असोत कशाही असोत, त्या त्यावेळी मनाला उभारी देण्यासाठी, सावरण्यासाठी, घडवण्यासाठी, वेगळ्या वाटा चाचपडण्यासाठी, कधी मनाला केवळ रिझवण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी आवश्यक असतात हे मात्र अगदी नक्की…! 
            
  अश्विनी वैद्य 
७. १. २०१६

राजस्थान डायरी : उदयपूर

उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थाप...