डॉ. प्रकाश बाबा आमटे
डोक्यावर सुरक्षित छप्पर आणि पाठीवर मायेचा भक्कम हात या शिवाय बँकेत भविष्याची तरतूद हेच सारं गाठीशी जमवू पाहणाऱ्या आपल्या सारख्या अतिशय सामान्य लोकांसासमोर जेव्हा, ज्या जगाची पुरेशी माहितीही आपल्याला नाही अशा काळोखी जगात राहणाऱ्या निराधार, असहाय्य लोकांसाठी काम करणारी थोर माणसं प्रत्यक्षात समोर येतात, दिसतात तेव्हा आपलं ते सामान्यपण सुद्धा खूप खूप खुजं वाटू लागतं. परवा डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांना प्रत्यक्षात पाहिल्यावर, त्यांचे जीवनानुभव ऐकल्यावर हि माणसे कोणत्या मातीची बनलेली आहेत हेच कळेना कि बहुदा तीच खरी माणसे आहेत ज्यांच्या जगण्याला मोह, माया आणि लोभ यांची तसूभरही ओळख नाही. आणि आम्ही मात्र सामाजिक संवेदना बोथट झालेली, स्वतःच्या विश्वात दंग असलेली, एकाच कारखान्यातून बाहेर काढलेली मनुष्यरुपी कृत्रिम यंत्र आहोत जी नुसतीच धावताहेत, कधी घर मिळवण्यासाठी, कधी मुलांना चांगल्या शाळेत घालण्यासाठी तर कधी त्यांच्या भविष्याची तरतूद बँकेत साठविण्यासाठी…असो.
या आधीही डॉ. आमटे यांच्या मुलाखती टीव्ही वर पहिल्या होत्या, त्यांच्या आजवरच्या कामाचा आढावा घेणारा सिनेमाही पहिला होता. पण प्रत्यक्षात झालेली त्यांची भेट 'आजी म्या ब्रम्ह पाहिले' ची प्रचीती देणारी होती. माणसाच्या मोठेपणाला त्याचं दिसणं, त्याचे कपडे, त्याचा धर्म- जात, त्याची भाषा किंवा त्याचा प्रांत या कशाकशाचीही बंधनं लागू होत नाहीत, हे माहित होतं पण या दोघांना बघून ते पुन्हा प्रत्यक्षात जाणवलं. स्वछ फिकट निळ्या रंगाचा कुर्ता, पांढरा शुभ्र पायजमा आणि पायात अत्यंत साधी वहाण अशा रुपात जेव्हा स्टेजवर डॉ. प्रकाश आमटे यांची मूर्ती उभी राहिली तेव्हा साधेपणाच्या व्याख्या पुन्हा नव्याने प्रकटल्या असे भासले. बाबा आमटे यांनी आनंदवन येथे केलेल्या कामाचा त्यांच्या (प्रकाश आणि विकास आमटे) बालपणावर झालेला परिणाम कसा सकारात्मक होता हे सांगत त्यांच्या मुलाखतीला सुरवात झाली. पेशाने डॉक्टर नसलेल्या बाबांना महारोग्यांची सेवा करताना आलेल्या अडचणी, लोक-नातेवाइक यांनी केलेली हेटाळणी, त्याबरोबरच बाबांच्या या कामामुळे या दोघा भावांच्या शिक्षणाची लहानपणी झालेली हेळसांड आणि या साऱ्यातून घडत गेलेले त्यांचे व्यक्तिमत्व. हे सारेच कायम comfort zone मध्ये राहणाऱ्या व्यक्तीसाठी कल्पने पलीकडले होते. मोठ्या भावापेक्षा दोन वर्षांनी लहान असूनही MBBS ला एकत्र admission घेवून पुस्तकांचा खर्च वाचवत दोघांनी शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या कामाला सुरवात. हे सगळं ते इतक्या सहजपणे सांगत होते कि यात काही विशेष नाही, बाबांकडून प्रेरणा घेवून पुढे हे असे आयुष्याचे रस्ते आपोआप तयार होत गेले, आणि त्यावरून चालताना तशाच समविचारी लोकांची साथही मिळत गेली असे ते म्हणाले.
कायम security शोधू पाहणाऱ्या आपल्या जगात मुलाची कायम स्वरूपी नोकरी आणि राहण्यासाठी स्वतःचे घर या ठोकताळ्यनवर आधारलेली आपली पारंपारिक लग्नसंस्था पूर्णतः मोडीत काढत त्या काळी, डॉ. प्रकाश आमटे यांच्या, " या पुढील आयुष्य आदिवासींबरोबर काम करण्यात घालवण्याची तयारी आहे का" या प्रश्नाला होकार देत डॉ. सौ. मंदाताईनी त्यांच्याबरोबर लग्न करण्याचा धाडसी निर्णय घेतला. याची दिलखुलास कबुली देताना त्या म्हणाल्या, त्यावेळी एवढा विचार केला नव्हता पण आजवर कधीही त्याचा पश्चातापही झाला नाही. परवडत नसतानाही त्या काळी डॉक्टरकीचे शिक्षण घेवून लग्नानंतर खाण्याचे, राहण्याचे हाल सोसत, नवऱ्याला त्याच्या कामात निर्मोही साथ देत आजही त्या खंबीरपणे त्यांच्या बरोबरीने उभ्या आहेत. त्या दोघांना काम करताना आलेल्या अनेक अडचणी, बिकट प्रसंग, त्यातून त्यांनी शांतपणे काढलेले मार्ग या सगळ्याचा उलगडा करत मुलाखत पुढे छान रंगत गेली. आता त्यांची पुढची पिढी अर्थात त्यांची मुले आणि सुना यांनीही याच कार्याला किती वाहून घेतले आहे हे सांगताना ते म्हणाले, मुले आज तिथे आहेत म्हणून आम्ही इथे येवू शकलो. एकदा मुळे रुजली कि ती त्या मातीतच सौख्याने वाढतात. मुले तर आहेतच पण बाहेरून आलेल्या सुना तर मुलांपेक्षाही या कामात जास्त रमल्या आहेत. आणि मला या सर्वाहून थक्क करणारी जी गोष्ट वाटली ती ही कि, त्यांनी त्यांच्या मुलांना (डॉ. प्रकाश आणि मंदाताईयांच्या नातवांना) कुठल्या CBSE किंवा ICSE अभ्यासक्रमाच्या उच्चस्तरीय शाळेत न घालता तिथल्याच आदिवासी शाळेत घातले आहे. त्या शाळेत त्यांची ही दोनच आदिवासी नसलेली मुले इतर आदिवासी मुलांबरोबर पाटीवर अक्षरे गिरवत आहेत.
काम करायला सुरवात केल्यापासून सतरा वर्ष लाईट पोचू न शकलेल्या, सरकारची मदत न मिळालेल्या अशा दुर्गम भागात जनावारांसारख्या राहणाऱ्या आदिवासींना माणसात आणण्यासाठी, त्यांच्या जगण्याला अर्थ देण्यासाठी, एक डॉक्टर या नात्याने त्यांच्या शारीरिक पीडा, रोग- आजार यांवर सुसह्यपणे मात करण्यासाठी अक्षरशः आयुष्य वेचणारी हि माणसं खूप मोठी आहेत. त्यांच्या थोड्या वेळच्या सहवासानेही मनाला एक वेगळीच शक्ती मिळाली. High commision of India, Nehru Centre, London येथे डॉ प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या मुलाखतीचा हा कार्यक्रम सुट्टीच्या दिवशी, रविवारी आयोजित करून इतिहासातही त्याची नोंद झाली. (नेहरू केंद्र या आधी रविवारी कधीही उघडले गेले नव्हते.) कमीतकमी तो दिवस तरी सत्कारणी लागल्याचा आनंद मनात साठवत आम्ही कार्यक्रम संपवून घरी परतलो.

अश्विनी वैद्य
२८. ०९. २०१५
Lifetime experience and neatly written :)
ReplyDeleteफार सुंदर! ही माणसं खऱ्या अर्थाने दैवी आहेत. आणि त्या वर तुझं अतिशय समर्पक विवेचन.
ReplyDelete