Wednesday 13 April 2016

दवबिंदू


आठवत राहावेत असे कितीसे क्षण सापडतात या रोजच्या जगण्यात 
दवबिंदू प्रमाणे पानाला हळुवार स्पर्शणारे,
आणि ओघळताना मात्र लवलेशही न ठेवणारे 
तरीही त्या पानाला रोजची सूर्यप्रकाशात चमकण्याची सवय मात्र लावून जाणारे
खरंतर, 
आठवणी म्हणून गोंजारावं असं काहीच मिळेना दवाच्या त्या नितळ पाण्यात 
पण तरी त्याच्या नसण्याच्या कोरड्या कल्पनेनंच अगदी सुकल्या सारखं दिसतंय ते पान 

आजच्या सूर्यास्ताबरोबर पुसलं जाणारं त्या दवासह पानाचंही चमकणं,
उद्याच्या नव्या सूर्य किरणांत मात्र स्वतःचं आयुष्यच शोधणारं 

अशावेळी, मग फार फार वाटे, आनंद हा अगदी इवल्याशा गोष्टीतच सापडे,
त्या बेसावध क्षणांना आठवणींच्या पुरचुंडीत जागा जरी नाही मिळाली तरी 
जाताजाता ओघळताना जगण्याला स्पर्श मात्र करणारे…. 



              -- अश्विनी वैद्य
१२/४/१६

Friday 1 April 2016

चलती का नाम…पॉम पॉम



          "चला रे लवकर…अकरा वाजून गेलेत…बारा पर्यंत पोहोचायचंय ना…त्यात traffic असणार…म्हणजे अजून वेळ लागणार…आवरा आता…" नवऱ्याची ही नेहमीची घाई माझ्या अंगवळणी पडलेली. "अरे जेवायलाच जायचंय ना आरुषच्या घरी…पोहोचलो १०-१५ मिनिटं उशीरा तर एवढं काय…मुलांचं आवरून निघेपर्यंत इतके तर वाजणारच ना…त्यात आज रविवार….सकाळी उठण्यापासून सगळ्यांचं सगळंच निवांत…आणि त्यांना पण कुकायला जरा वेळ मिळू दे की…" खांद्याला मोठी bag लटकवून लेकाला कडेवर घेवून पायात शूज अडकवत माझा जरा चिडकाच स्वर लागला. latch ने बंद झालेल्या दाराचा आवाज ऐकून आम्ही चौघेही घराबाहेर पडलो आणि कारपाशी पोचलो…इतक्यात नवरा एकदम ओरडला, "अगं पुढचं टायर पंक्चर आहे माझ्या कारचं…! आता काय करणार…!" 


         "व्वा उत्तम… आता काय काय… जावू माझ्या कार मधून मग…लहान असली तरी आपण चौघे आरामात बसू शकतो त्यात… आहे किल्ली माझ्याकडे…चला… आता अजून उशीर नको…" मी पटकन मार्ग सुचवला. नवऱ्याची गाडी पंक्चर कधी आणि कशी झाली, कुठे झाली असेल असल्या निरर्थक गोष्टींवर चर्चा करून आत्तातरी मला वेळ आणि मूड दोन्हीही घालवायचा नव्हता, त्यामुळे तो विषय तिथेच बंद केला. (टीप: परदेशात मध्यमवर्गीय कुटुंबात दोन कार असणे हे ऐशोआरामाचे किंवा लग्झरी आयुष्याचे प्रतिक नसून… स्वतःच्या सोईसाठी आणि वेळेच्या बचतीसाठी public transport च्या महागड्या सेवेला लाथ मारून काढलेली स्वस्त पळवाट आहे, हे आता सरकार पर्यंत नाही पण किमान वाचकांपर्यंत तरी पोहोचले म्हणजे झालं.) नेहमी आम्ही चौघे जण कुठेही एकत्र जाताना नवर्याच्याच कारने जातो आणि by default कारही नेहमी तोच चालवतो…अगदीच कधी चुकून त्याला झोप वैगेरे आली असेल तरच गाडीच्या त्या सिंहासनावर (ड्रायव्हर सीटवर) मला बसायची संधी मिळते. आज पहिल्यांदाच आम्ही चौघे असे एकत्र माझ्या कारने जाण्याचा प्रसंग आमच्यावर ओढावला होता.…ऐनवेळी plan मध्ये झालेला बदल नवऱ्याला कधीच पटकन पचत-रुचत नाही आणि त्यामुळे नैसर्गिकपणे आलेल्या रागानेच त्याने किल्लीसाठी हात पुढे केला आणि मी ही मग आधीच पेटलेल्या विस्तवाचा उगाच भडका नको उडायला म्हणून काहीही न विचारता लगेच किल्ली त्याला सुपूर्द केली. परत रोजच्याच कार मध्ये बसावे लागणार म्हणून मुलांच्या तोंडाचाही चंबू झाला होता…बिचारी रोज त्याच त्या 'Black Beauty' मध्ये बसून बसून taxi driver झालेली आई बघून कंटाळली होती… त्यांना पप्पाच्या 'White Horse' मध्ये बसायची संधी फक्त वीकेंडलाच मिळते आणि आज नेमकी तीही हुकली. 


          असो, तर सगळे सीटबेल्ट लावून बसलो एकदाचे आणि नवऱ्याने गाडी सुरु केली. त्याला त्याची automatic चालवायची सवय असल्याने आता ही गाडी manual…त्यामुळे clutch कंट्रोल सारखा गंडत होता आणि त्यामुळे गाडी सुरु केल्यापासून पहिल्या दहा मिनिटात दोन-तीन वेळा बंद पडली. परिस्थितीचा साधारण अंदाज घेवून (सगळ्या मुलींच्यात हा गुण अगदी जन्मापासून असतोच नाही का…) विस्तव अजून पेटण्याच्या आत मी शांतपणे माझ्या नेहमीच्या taxi driver च्या सीटचा ताबा घेतला. "बस आज जरा निवांत… मला सवय आहे या गाडीची, मीच चालवते…" असे म्हणून पुढच्या तासाभराच्या प्रवासाला सुरवात झाली. 


          पुढच्या पाचच मिनिटांत पेट्रोल संपल्याचा दिवा dashboard वर लागला. झालं … नवरा अजून कावला… "इतकं तळाला जाईपर्यंत का वाट बघतेस… जरा आधीच भरत जा ना पेट्रोल…घ्या आता पंपावर…!" मगाच्या सगळ्या गोंधळात मी ही हे पेट्रोल चे विसरूनच गेलेले. "अरे हो, काल भरणारच होते पण पर्स घरीच राहिलेली… " असं म्हणत गाडी पेट्रोल स्टेशन वर घेतली. त्यात पटकन टायरमधली हवा पण बघून घेतली, उगीच नंतर गोंधळ नको, आणि लागलो परत रस्त्याला. रहदारीचे, वाहतुकीचे सगळे नियम अगदी काटेकोरपणे पाळत नेहमी प्रमाणे मी गाडी चालवत होते. तेवढ्यात आत्तापर्यंत देवकृपेनं सहकार्य करणारी माझी दोन गोंडस बाळं मागे बसून कुचकुचायला लागलीच. "आई, ते गेरूआ गाणं लाव ना…गेरुआ…!" इति धाकटा . "मला नको ते...smiley च लाव त्यापेक्षा" मोठी. यावर नवरा CD शोधू लागला… त्याची शोधाशोध थांबवत मी म्हणाले "अरे काही गाणी वैगेरे नाहीयेत या गाडी मध्ये, एकही CD नाहीये…! नेहमी नुसती पळापळ असते… घाई, उशीर…त्यात कधी गाणं ऐकणार… आणि गावातल्या गावात टुचुकभर अंतर जायला कशाला गाणी वैगेरे लागताहेत… सो नाहीयेत…बाळांनो, गाणी पप्पाच्या गाडीत…इथे तुम्हीच म्हणा…किंवा दुसरं काहीतरी खेळा…!" तेवढ्यात नवरा ओरडला, "अगं, इथे कुठे वळायचंय आपल्याला… right indicator दिलायेस तू…पुढे आहे turn अजून…" "अरे हा आलाच की, ही काय… satnav सांगतोय तसच चाललीये मी…" इति मी "अगं पण किती आधी indicator देवून ठेवालेलास…असो….पुढे roundabout आलाय, first exit आहे… सावकाश…तुझं अप्प्रोचिंग स्पीड खूप आहे गं…जरा हळू…!" आता मात्र विस्तव दुसऱ्या बाजूला पेटत होता. मी जवळपास चार एक वर्ष तरी गाडी चालवत होते. आणि हा मी नव्यानं शिकल्यासारखं मला सूचना देत होता. पण परत परिस्थितीचा अंदाज घेत, मुलांसमोर वाद घालून वेळ आणि मूड न घालवायचं ठरवून मी शांतपणे driving वर लक्ष केंद्रित केलं. 


          "तहान लागलीये, पाण्याची बाटली कुठे ठेवलीयेस गं…हा मिळाली" असं म्हणत नवऱ्यानं गाडीमध्ये पडलेली 'ती' बाटली उचलली. " अरे थांब, ते नको पाणी पिऊ… कधी काळची आहे ती बाटली…खूप जुनं पाणी आहे ते…!" "अगं पण मग इतके दिवस ठेवलंय कशाला गाडीत ते, टाकून द्यायचं ना आधीच…कचरा पण किती आहे तुझ्या गाडीत…!" यावर मी जराही न चिडता परत परिस्थितीचा अंदाज घेत फक्त "बर" चा सूर ओढत driving वर लक्ष केंद्रित केलं, आणि आपण घरून घेतलेलं पाणी नवऱ्याच्या गाडीतच विसरलंय हे लक्षात येवून, "पोहोचूच आता अर्ध्या तासात…" असं म्हणत वेळ निभावण्याचा प्रयत्न केला. 

       "मला तर आत्ताच भूक लागलीये…थोडं फास्ट जायचं का…?" असं वैतागूनच नवरा म्हणाला. "अरे पण फिफ्टीचं स्पीड लिमिट आहे ना…मी फिफ्टीनंच चालवतीये…स्पीड कॅमेराज आहेत या रस्त्याला, उगाच ओव्हर स्पीडिंग मुळं points यायचे licence वर…!" "सगळे कॅमेरे ऑन नसतात अगं… ते काय… सगळे ओव्हरटेक करून चाललेत आपल्याला…!" " जावूदेत त्यांना, मी फिफ्टीनेच जाणार…" त्यात मागून अचानक लेकाची हाक आली, "आई ते बघ कब्बू (कबुतर)…देअर…देअर… लुक आई…" यावर नवरा "अरे, आई गाडी चालावतीये ना… ती कशी बघणार…" पण नेहमीच्या सवयीने मी ही थोडं बघितल्यासारखं करून "येस बाळा, दिसलं दिसलं मला…वाव… मश्तय कब्बू…!" "अगं काय चालूये, तू समोर बघून गाडी चालव ना… कब्बू कब्बू काय…" यावर मी परत जराही न चिडता परिस्थितीचा (मुलांच्या उपस्थितीचा) अंदाज घेत अतिशय शांतपणे म्हणाले, "अरे, नीटच चालवतीये मी आणि समोरच बघतीये… उगाच काय… लेकाला उत्तर देत नाही तोपर्यंत तो हाका मारतच बसतो. बघ, आता बसला ना शांत "


          त्यात एकदम पुढे मोठ्ठा roundabout आला, या देशात, roudabout ला उजवीकडून येणाऱ्या गाड्यांना प्राधान्य देण्याचा नियम आहे…मी माझी उजवी बाजू clear आहे हे बघून निघाले तर माझ्या डावीकडून एक BMW न थांबता भरधाव गेली, ज्यामुळे मला जोरात ब्रेक लावावा लागला. मग मात्र मी मोठ्ठ्याने त्याला होर्न दिला…अगदी दोन-तीन वेळा दिला…पौं पौं पौं… मगाचपासून परिस्थितीचा अंदाज घेवून घेवून साचलेल्या माझ्या शांतपणाला या होर्नच्या रुपानं मोकळीक मिळवून दिली. सगळा राग त्या BMW वर काढत… पौं जरा जोरातच वाजवला. "अगं… हो हो, गेला आता लांब पुढे तो…जावूदे" इति नवरा. इथे असा होर्न मिळणे हे खूप कमीपणाचे मानले जाते…म्हणून मी त्याचा पुरेपूर फायदा करून घेतला. 

        नंतर साधारण दहा बारा मिनिटांनी मागून एक पोलिस कार आमच्या कारच्याच लेनमधून येताना दिसली. झालं, पोलिस = भीती = न केलेल्या चुकांची क्षणात डोळ्यासमोर उभी राहिलेली काल्पनिक यादी आणि याला हमखास बळी पडणारा नवरा. त्यात आज सारथ्य माझ्या हातात त्यामुळं तर ती यादी त्याला उगाच दुप्पट  झाल्यासारखी वाटत होती. मी मात्र नेहमीप्रमाणे सगळे नियम पाळत बिनधास्तपणे चालले होते. शेवटी ती पोलिस कार माझ्या उजव्या बाजूने शांतपणे पुढे निघून गेली, तेव्हा याचा जीव कुठे भांड्यात पडला.   

"Are we nearly there yet..?" या लेकीच्या आत्तापर्यंत दहापेक्षाही जास्त वेळा विचारलेल्या प्रश्नाला, finally "yes...now we are almost there", असे म्हणत मी पार्किंग शोधू लागले. "तिकडे लाव, बरीच मोकळी जागा आहे…तुला जमेल   पण लावायला नीट…!" मी तशीही तिकडेच लावणार होते, पण नवऱ्याच्या  या सुचनेवर आता मुद्दामच दुसरी अगदी अडचणीची दोन कारच्या मधली जागा शोधून तिथे गाडी पार्क केली, आणि शेवटी ड्रायव्हर सीटवर मांडी घालून बसून मला काय काय जमतंय याची थोडक्यात प्रात्याक्षिके सुरु केली. "तू गाडी चालवताना, मी सांगते का रे कधी…असं कर, तसं कर, इथे लाव, तिकडे नको बघू… हळू चालव…!, रेसिंग कार मध्ये बसल्यासारखं जीव मुठीत घेवून बसते कधी कधी पण तरीही असा सूचनांचा भडीमार करते का…इथे मी सेफ्टी फस्ट सांभाळत इतकी व्यवस्थित गाडी चालवते आणि तरी उगाच सुचना….!" आता मात्र परिस्थितीचा अंदाज घेत शांतपणे फक्त "बर…!" म्हणायची पाळी नवऱ्याची होती.                     

                                                                   अश्विनी वैद्य
                                                                    १. ४. १६ 

राजस्थान डायरी : उदयपूर

उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थाप...