Tuesday 31 May 2016

शब्द


                                                               
लिहायचं तर खूप होतं, पण आज शब्दच हरवलेत कुठेतरी…
संदर्भ चुकताहेत, अर्थ लागत नाहीयेत, वाक्य सुचत नाहीयेत, 

जुळवा-जुळव शब्दांची करावी की, त्याला चिकटलेल्या अर्थांची,
कि नुसत्याच भाव हरवलेल्या अर्थहिन शब्दांची, काहीच स्पष्ट नाहीये, 
त्यात समोर असलेली डायरीची ती कोरी पानं स्वस्थ बसूही देत नाहीयेत…! 

ही अस्वस्थता, हे असं हरवलेपण, व्यक्त न करता येणारी ही कासाविसता
आज अगदी छळतीये, नकोशी झालीये, असं वाटतंय, 

मुसळधार पाऊस यावा आणि सगळं मळभ कसं अलगद दूर व्हावं, स्वच्छ व्हावं 
आणि मग त्या भिजलेल्या हिरव्यागार पायवाटेवर सांडलेले, 

हरवलेले सारे शब्द सहज सापडावेत, अगदी नितळ, कोरे, रेखीव, 
त्यांना अलगद उचलून, गोंजारत नवे अर्थ जोडावेत…! 

मनातली कासाविसता त्यांच्या आधाराने कागदावर उतरावी, 
आतल्या साचलेपणाला एक वेगळी पायवाट सापडावी 

पण हे बरसणे, ओघळणे, वाहणे आणि त्या नंतर रित्यापणी निरभ्र होणे, 
याचे समाधान देणारा हा पाऊस हवा तेव्हा पाडायचा कसा हाच मोठा प्रश्न आहे! 




-अश्विनी वैद्य 
३१.०५.१६

Wednesday 11 May 2016

लेक


             "नको रे बोलूस तिला, नांदायला जायची आहे बाई माझी…!" लहानपणी मला कुणी रागावलं की, हे माझ्या आज्जीचं अगदी ठरलेलं वाक्य. मला त्यावेळी कध्धी म्हणून आवडायचं नाही. 'नांदायला वैगेरे काय… शी…' असं वाटायचं. आता मीच एका लेकीची आई झाल्यावर सुद्धा त्या वाक्याचा भावार्थ मला नकोच वाटतो समजून घ्यायला. 

           'माझी लेक'….जन्मल्यानंतर हाताच्या दोन तळव्यांमध्ये मावलेली इवलीशी माझी बाहुली वाढताना रोज दिवसाचे चोवीस तास ती नजरेसमोर असूनही तिच्या बदलत जाणाऱ्या चेहऱ्यावरच्या रेषा, तिची वाढत जाणारी उंची, बोलताना तिच्या शब्दांना येत असलेला सुबकपणा हा दिवसांमागून आपसूक होणारा बदल असा कधी लक्षातच आला नाही. बोबडे बोल तिच्याबरोबर बोलताना ती स्वछ, शुद्ध कधी बोलायला लागली तो दिवस असा काही बिलकुल लक्षात नाही. पहिलं-वहिलं पालकत्व असल्यानं जरा जास्तच जागरुक होवून सुरवातीला तिच्याबरोबर वेगवेगळ्या गोष्टी करताना मीही तिच्या एवढीच होवून गेले. तिच्या इवल्याशा मेंदूत ती काय काय बरं साठवत असेल, काय आणि कसा विचार करत असेल, आपण तिच्याशी बोलतो, तिला जे सांगतो ते ती कसं समजून घेत असेल… दिवसभर याचीच उजळणी माझ्या डोक्यात चालू. मी तिच्यात नि ती माझ्यात इतकी एकवटणं ही जणू माझीच गरज होती कदाचित. 

     व्यावहारिक शहाणपणा, सामाजिक जाण, आणि जन्मानं लाभलेल्या नात्यांव्यतिरिक्त इतर जगाची जवळून ओळख होण्यासाठी सगळ्यांप्रमाणेच तिने शाळेची वाट धरली, तेव्हा मात्र सारखी अशी अवती-भोवती बागडणारी माझी परी अचानक दिवसाचे सहा तास माझ्या शिवाय विद्येच्या मंदिरात आनंदानं घालवू लागली. तिच्या विश्वात आईबरोबरच तिच्या एवढ्याच पिटुकल्या मित्र-मैत्रिणींनी जागा व्यापायला सुरवात केली. 

         माझ्यातलं तिनं निसर्गतःच काय काय वेचलंय याची तिच्या दिसण्यात, तिच्या वागण्यात माझी आपली सारखी पडताळणी. मग कधी कोणी जाता जाता म्हटलंच चुकून, "तुझ्यासारखीच दिसते हो अगदी…!" या वाक्याचा मी क्रेडीट घेण्यासारखं काहीही नसताना मला मात्र उगाच आनंद होई. मग दिसण्याबरोबर माझ्या आणि तिच्या स्वभावातले समान धागे (अर्थातच वाईटही) मनातल्या मनात उगाळत मी आपली परत सुखावे. 

           संध्याकाळी मऊ लुसलुशीत गरम पोळी हातानं चुरून त्यावर गरमागरम वरण ओतून त्या तयार झालेल्या मिश्रणावर नंतर पडणारी तुपाची धार जराही न कालवता ते अलगद चमच्यानं खाणं हा माझा लहानपणीचा आवडता प्रकार…लेकीतही अगदी तस्साच उतरलाय. परवा तिच्या आज्जीने हेच सारं वरण-पोळीच मिश्रण तूप घालून कालवून दिलं तेव्हा तिची झालेली चिडचिड पाहून आज्जी हसली आणि मग वरण-पोळीचं नवीन मिश्रण तूप घालून जराही न कालवता दिल्यावर मात्र लेकीने मिटक्या मारत त्यावर ताव मरला. या अशा सवयी, लकबींबरोबरच बऱ्याच स्वभाव वैशिष्ट्यांची शिदोरी नैसर्गिकपणे तिला आपली आपोआप मिळाली. अशा वेळी मग तिच्यात असलेल्या मला पाहताना, तिच्या विश्वात रमताना, तिच्या इंग्रजी बोलण्यातही अगदी ओघानं येणारा 'आई' हा शब्द ऐकताना, माझ्यातल्या आईत लपलेलं माझं 'मूल' पण तिच्याशी अलगद जोडलं जातं….! 

          अंधारात चालताना, नवीन सायकल शिकताना, शाळेतल्या मैत्रिणींबरोबरची भांडणे रडत रडत share करताना आणि रात्री गोष्ट ऐकत शांतपणे झोपताना तिने तिच्या दोन हातात घट्ट धरलेल्या माझ्या हाताला तिच्या त्या निरागस मायेची एक वेगळीच उब मिळते, जी मलाच जास्त हवीहवीशी असते. 




         परवा, शाळेतून घरी येताना लेक म्हणते कशी, "आज ना, आपण घरी सगळ्यांनी मिळून एकत्र काहीतरी करायचं, आई. किती दिवस झाले, आपण चौघांनी मिळून कोणतीच activity केली नाहीये.", "अगं, पण मला स्वयपाक करायचाय ना, तुम्हालाच भूक लागते मग थोड्यावेळाने…" "मी घरी आले कि, तू सारखीच किचन मध्ये असतेस गं, त्यापेक्षा simple कर ना काहीतरी खायला…आणि आपण together काहीतरी करूया…!." या सगळ्या तिच्या बोलण्यामागे माझा तिला कमी मिळणारा सहवास दडलाय असं अगदी जाणवलं. दिवसांगणिक वाढत जाणाऱ्या तिच्या वयाबरोबर मी तिला देत असलेला वेळ कधी रोडावत गेला कळलेच नाही.

        खरंतर, तिचे बदलत जाणारे कपड्यांचे माप किंवा खेळण्यांचे प्रकार किंवा झोपताना सांगायच्या गोष्टींचे स्वरूप दिवसांमागून बदलत गेले खरे पण माझ्या मनातल्या माझी बाहुली मोठी झाल्याच्या कल्पना मात्र अजूनही तशाच बालिश. 


                                                                        -- अश्विनी वैद्य 
                                                                           ११. ०५. १६

राजस्थान डायरी : उदयपूर

उदयपूर - कॅपिटल ऑफ मेवाड - City of lakes, झिलों का शहर असलेल्या राजस्थान मधील या सुंदर ऐतिहासिक शहराला भेट देणं म्हणजे कला, राजस्थानी स्थाप...