Wednesday, 22 March 2017

सवय


आधी ओढ, मग काहूर, 
मग स्वतःच्याच त्या 'हो-नाही'च्या हेलकाव्यात उगाच जागवलेल्या रात्री, 
चूक-बरोबरची मांडलेली गणितं, अस्वस्थ करणारी घालमेल, 
आणि अचानक एखाद्या बेसावध क्षणी अगदी वाऱ्याच्याही नकळत शहारून टाकणारी ती हलकी झुळुक, 
उसासून कोसळणाऱ्या थेंबागणिक शमत जाणारी ती तहान, त्यातून जाणवलेली एक वेगळीच त्रुप्तता, ती समाधानी शांतता, 
झाकोळून आलेल्या आभाळाला बाजूला सारत अचानक सूर्य डोकवावा आणि 
निवलेला, पार भकास भोवताल त्या किरणांनी अगदी नसानसांतून तरारून यावा, झळाळून निघावा...तशी काहीशी तृप्त जाणीव...!
एकदम काहीतरी वेगळ्याच जगाची नव्यानं होत असलेली ओळख, 
मग दिवसाच्या चारही प्रहरी त्यातच हरवलेलं मन, त्याभोवतीच वेड्यागत चाललेले सगळे काल्पनिक खेळ, 

त्या त्रुप्ततेचीच अजून अजून वाढलेली तहान, ती शमवण्याची परत परतची आस, 
या साऱ्या साऱ्याच्या हिंदोळ्यांवरच तरंगत राहावं असं वाटणारं भाबडं वेड, 

आणि मग या सगळ्याच्या कायमच हव्याशा सोबतीने , 
 त्या भावविश्वाची मनाला नकळत होत गेलेली ती 'सवय'...!

हो सवयच...लौकिकार्थाने नकारात्मक असलेली अशी एक 'सवय'
किती सावधगिरी बाळगली तरी अंगवळणी पडलेली, पार चिकटलेली ती 'सवय' 
 एखाद्या संध्याकाळी विरत जाणाऱ्या प्रकाशाबरोबर कातर करणारी या सगळ्याची जाणीव 
दिवसागणिक वाढणाऱ्या वयाच्या परिपक्वतेच्या उंबरठ्यावर अजूनच अस्थिर करणारी...!  
'बास..आता थांबूया...' ही संयमाची पुसट रेषा कुठल्या वळणावर ठळक करावी याची पावलागणिक नकोशी वाटणारी जाणीव
खरंच, 
ही वाट कधी सापडायलाच नको हवी होती का? का त्या लाटांबरोबर पार खोल कधी बुडत गेलो कळलंच नाही आपल्याला? वाहवत जाण्याचा मूळ स्वभाव इथेही आड येऊ नये का? 
अशी सवय न लागू द्यायचीच सवय मनाला करून घ्यायला हवी होती का?

--- अश्विनी वैद्य 
  २२.०३.१७   


8 comments:

Split : Croatia

क्रोएशिया - दक्षिण युरोपातला एका बाजूने लांब समुद्र किनारा लाभलेला एक छोटा देश. One of the newly born countries. पण तरी खूप जुना इतिहास असल...