मनातले गोंधळ किनाऱ्याला पोचतच नाहीत ना....
ती अस्थिरता अगदी विषण्ण करते,
त्या त्या शब्दांच्या व्याख्या वेगवेगळ्या कोनातून
बघूनही कुठल्याच बाजूनं पटेनाशा होतात,
ती अस्वस्थता आतून कुरतडते...!
बरोबर आणि चूक याचे व्यक्तिसापेक्ष आधार
वाऱ्यावर तरंगायला लागतात, पार विस्कटतात,
सगळं अगदी स्वच्छ, शुभ्र दिसतंय खरंतर
पण झेपत नाहीये, पचत नाहीये
ही जाणीव आतून पोखरून टाकते...!
कोणीच नकोय मला समजवायला किंवा आधाराला,
कारण तो माझा मलाच बांधावा लागणार आहे...आतून,
हे कळतंय मला...!
पण त्या आधाराची रिकामी पोकळीच
आत्ता कवटाळावीशी वाटतीये, ते शांत किनारे सापडूच नयेत,
त्या वादळाला आत कोंडून दडपूनच राहूदेत,
विझून जाऊदेत तप्तपणीच...!
--- अश्विनी वैद्य
२७.०२.१७
No comments:
Post a Comment