Wednesday, 5 September 2018

" WhatsApp !" (10 min skit)


पात्र -- आजी, आजीची मैत्रीण, आई, आईची बहीण, लेक, शेजारच्या काकू




(वेळ संध्याकाळ ५ वाजताची. घरात आई, आजी आणि लेक असतात)

आई : (फोनवर) हॅलो ताई

आईची बहीण : हं बोल गं.

आई : अगं पाहिलास का मी आत्ता पाठवलेला फोटो? ब्लाउजचा? तशी डिझाईन कर तू, परवा ती सेल मधून साडी घेतलीस ना मोरपीशी, त्यावरच्या ब्लाऊजला. अगं इतकं cute दिसेल ना ते ताई. आणि हो डिझायनर कडे टाक हं या वेळी शिवायला.

आईची बहीण :
(फोनवर) अजून नाही आला गं फोटो मला. इतका नेटवर्क प्रॉब्लेम आहे ना मेला. या बिल्डिंग मध्ये कधी म्हणून सिग्नल नीट येत नाही बघ. अगं, मीही कोणाला इथून व्हाट्सअँप केलं तरी ते ही पटकन सेंड होत नाही.

आई : अरे देवा

आईची बहीण : बघ ना. आधी एक टिक जाऊन दोन टीका दिसतायेत का ते बघा, मग त्या निळ्या झाल्यात का ते बघा. कधी कधी तर त्या चार चार वेळा चेक केल्यावर सुद्धा त्या काळ्याच असतात गं... काय झोपा काढत असतात कि काय लोक कोण जाणे... पाठवलेला मेसेज बघावा कि नाही पटकन. तरी बरं चोवीस तास फोन सगळ्यांच्या हातातच असतो. जाऊदे. बघेन नंतर तो blouse चा फोटो. पण मला सांग परवाच्या माझ्या चिरोट्यांची रेसिपी काल रात्री तुला व्हाट्सअँप केलीये. ती बघितलीस का?

आई : हो हो वाचली मी ती रेसिपी.

आईची बहीण : आता जेव्हा करशील ना चिरोटे की त्याचा फोटो फेसबुक वर टाक लगेच. आणि मिनिमम दहा लाईक्स आल्या शिवाय खायचे नाहीत हं आजिबात. बरं चल ठेवते, खूप आवरायचं राहिलं आहे अजून. या फोन मध्ये फार वेळ जातो बाई.

आई : हो सांगेन नक्की ताई. चिरोट्यांवरून आठवलं, अगं तू ती बाहुबली थाळी पाहिलीस का व्हाट्सअँप वर, काय राक्षसी प्रकार आहे तो, मला पाच ग्रुप मधून सेम msg आलाय काल. काहीही बाई शी. बर चल, माझीही बरीच कामं राहिली आहेत, ती उरकते. बाय.
(असं म्हणून दोघी call cut करतात मात्र व्हाट्सअप बघत तशाच जागेवर उभ्या राहतात.)
(आतून लेकीची हाक येते, कानात हेडफोन घालून ती फोन वर काहीतरी करतच बाहेर येते)

लेक : आई...! आई..!

(तेवढ्यात हॉल मध्ये बसलेली आजी तिला म्हणते )

आजी : अगं जरा समोर बघून चाल. त्या फोन मध्ये बघू बघू डोळ्याची पार बटणं झाली तुझ्या, धडपडशील हो... बघ समोर, अगं अगं...!
(आणि तेवढ्यात लेक टेबलाला धडकते.)

लेक : (लागल्याच्या स्वरात) आई गं... ! काय गं हे आई, कसं ठेवलंय हे टेबल मध्येच. लागलं ना मला. अगं त्या फोन मधून जरा बाहेर ये की, आमच्या कडे बघ. हॅलो आई...!

(आजीकडे बघून लेक) आणि आज्जी तुझा फोन पण बघ कसा तुझ्या हातातच आहे आत्ता. घट्ट चिकटून असतेस तू पण फोनला आणि मला ओरडतेस ते. पूर्वी रुमाल असायचा तुझ्या हातात आता फोन घामेजतो पण बाजूला ठेवत नाहीस. स्स्स्स जोरात लागलं यार...!

आई : बघू कुठं लागलं? अशी कशी धडपडतेस गं?

लेक : आई तू ही किती त्या व्हाट्सअँप वर ऍक्टिव्ह असतेस गं. कंटाळा नाही येत का? सारखं त्या रेसिपीज, डाएट, साड्या आणि दागिने यावरचे बदा बदा मेसेज वाचत असतेस ते. हाऊ इरिटेटिंग !

आई : व्हाट्सअँप वर तेवढंच नाही करत हां मिनू मी. खूप सामाजिक विषयांवर तात्विक चर्चा चालू असतात माझ्या. तुझ्या बाबांबरोबर काय बोलणार? कप्पाळ. ते सगळ्याच गोष्टींना त्यांच्या फोनकडे बघत 'बर' एवढंच म्हणतात. मग मी आपली माझी मतं तावातावाने आमच्या ग्रुप वरच मांडत असते. परवाच राधिका मावशीचा pm (पर्सनल मेसेज) आला मला की, मी किती बरोबर आणि परखड बोलले ग्रुप वर म्हणून. माझे पॉईंट बरोबरच होते, ठासून सांगितले. दिवेकरांची ऋजुता कि दीक्षितांचा डॉक्टर कोणाची वाट धरावी यावर सलग पंचावन्न मिनिटं चर्चा चालू होती आमची ग्रुपवर, मग दिवसभर दर दोन तासांनी कोणीतरी काही मुद्दा मांडून वाद पुढे नेत होतं.

लेक : काय यार आई, काहीही करत असतेस तू.

आई : पण फक्त चर्चेने पोट थोडीच भरणार आहे. नि वजन तरी कुठचं घटणार... भूक लागायची थांबते का, म्हणून मग शेवटी फोन बाजूला ठेवला आणि उठले बाई. कुकर लावला आणि आमटीला फोडणी घातली.

लेक : बर ते जाऊदे, मी बाहेर चालले आहे आत्ता. ट्रेकिंग चा ग्रुप आहे ना माझ् व्हाट्सअँपचा, ते सगळे कॉफीला भेटतोय आम्ही आज. ते तुला सांगायला बाहेर आलेले. पण घरातल्या घरात व्हाट्सअँप करूनच सांगायला पाहिजे होतं, तुझ्या पर्यंत पटकन पोचलं असतं, असं वाटतंय आत्ता. आणि btw, तुझ्या फोन चं सेटिंग change कर ना जरा ते please. दर पाच मिनिटांनी टुंग टुंग वाजत असतं, किती ते messages. वोल्युम तरी कमी ठेव त्याचा. बर चल निघते मी. किती वाजतील यायला ते व्हाट्सअँप करून कळवेन तिकडून नंतर.

आजी : गेली ना मिनू तशीच, तास झालं म्हणतीये तिला, मला ते नूतन चं गाणं पाठवलंय प्रभानं... ते सुरु करून दे म्हणून. त्याच्या खाली लिहिलं होतं, नक्की बघा आणि पुढे ११ जणांना पाठवाल तर तुम्हाला तुमचे तरुणपणीचे दिवस आज रात्री पर्यंत नक्की आठवतील. ते डाउनलोड का काय म्हणतात ते करून दे असं दहा वेळा म्हटलं मिनूला, पण तिच्या हातातल्या फोनपुढे बोललेलं तिच्या कानात घुसेल तर शपथ.

आई : पळाली पोरगी, बघावं तेव्हा नुसती फोन मध्ये गुंग असते. बघू आणा इकडे, मी देते गाणं लावून तुम्हाला. आणि हो आई, आठवलं एकदम. त्याच्या आधी इंदिरा संतांची पण एक सुंदर कविता परवा मला विजू ताईंनी whatsapp केलेली, ती पाठवते तुम्हाला, नंतर निवांत वाचा. तुम्हाला आवडतात ना कविता. आणि हो आत्ता पदमा मावशी येणार होत्या ना आज?
(तेवढ्यात बेल वाजते) आल्याच वाटतं. या मावशी, बसा.

आजीची मैत्रीण (पदमा मावशी) : काय म्हणतेस गं, कशी आहेस? दिसतियेस तरी ठणठणीत. सासूची काळजी घेतेस ना नीट? बरं विसरायच्या आत मुद्द्याचं बोलते लगेच. चहा करायला आत जाशील, त्या आधी माझ्या फोन मध्ये तुझ् वायफाय जोडून दे बाई तेवढं. निघताना लेक म्हणाला whatsapp चालणार नाही माझा. तुझ्या सासूला दोन चार जोक दाखवायचेत गं व्हाट्सअँप वरचे. तेवढं दे बाई करून मला.

आई : हे भारी हां मावशी, एकदम व्हाट्सअँप वैगेरे, आमच्या आईंसारख्याच मॉडर्न आजीबाई आहात कि अगदी. त्या ही बिलकुल मागे नाहीत हां.
(पदमा मावशी आत येऊन बसताना बोलतात.)

आजीची मैत्रीण (पदमा मावशी) : हो, ती मागे कशी असेल? हुश्शारच आहे माझी मैत्रीण. घरात सगळे खाली मुंडी व्हाट्सअँप धुंडी असतील तर ती तरी दुसरं काय करणार, व्हाट्सअँप शिवाय.
आणि तेवढाच जीवाला विरंगुळा गं. मराठी मालिका आणि या whatsapp वरच्या गप्पा, राहिलेल्या दिवसांचे रकाने यातून मिळणाऱ्या आनंदानेच भरतो गं आम्ही म्हाताऱ्या, बाकी काय. लेकाने फोन घेऊन दिला, नातवाने व्हाट्सअँप शिकवला. आता चौघे घरात असो कि बाहेर, एकमेकांशी व्हाट्सअँप करूनच बोलतो.

आजी : बस ग पदमा, फोन चार्जिंगला लावून येते माझा. सकाळपासून चालूच आहे, दुपारी सुनबाईने रामरक्षा लावून दिलेली, माझा डोळा लागला आणि ती तशीच चालू राहिली. संपली बॅटरी. फोन बंद पडेल आता. बुडत्या बॅटरीला चार्जरचा आधार, कसं. बस आलेच. (असं म्हणत आजी तिचा फोन आत चार्जिंग ला लावायला जाते.)

आजीची मैत्रीण (पदमा मावशी) : खरंय गं, आम्ही पण गणपती मध्ये प्रतिष्ठापना, विसर्जन सगळं कसं व्हाट्सअँप मध्ये आलेलं तस्संच केलं अगदी. गुरुजींना बोलावलंच नाही यावेळी. सुनेनं सगळं फोनमध्ये बघू बघू अगदी शास्त्रोक्त पद्धतीने केलं बघ. कुठे काही कमी नाही, विसरलं नाही, की चुकलं नाही. शिवाय गुरुजींची दक्षिणा वाचली.

आजी : हो बाई हे फारच भारी आहे. हिने सुद्धा गौरीला साडी कशी चापून चोपून नेसवली, व्हाट्सअँप वर बघून. एरवी शुभाला दहा फोन करावे लागतात ये साडी नेसवायला म्हणून. यावेळी आम्ही बोलावलंच नाही मग तिला.
(एवढ्यात शेजारच्या काकू परवाची बीटाचे कटलेट्स घालून दिलेली प्लेट परत द्यायला घरी येतात.)

शेजारच्या काकू : आहे का घरात कोणी? तुमची प्लेट परत करायची होती, म्हणून आलेले.

आई : ये की अगं. चहा ठेवलाय बघ, घेऊयात मिळून, बस. आत्ताच बघ गुड इव्हनिंगच्या मेसेजबरोबर चितळ्यांच्या वड्या पाठवल्यात ग्रुप वर कोणीतरी. फोटो बघून चहाबरोबर खाउयात दोघीजणी. ये (दोघी दिलखुलास हसतात)
आजी : काय गं बरी आहेस ना? दोन दिवस झालं कॉलनीतल्या ग्रुप वर मेसेज नाही तुझा? म्हटलं आजारी आहेस कि काय.

शेजारच्या काकू : मी मस्त आहे आजी. गेला आठवडाभर गणपतीत बिझी होते. आणि अगं (आईकडे बघून), चहा वैगेरे नाही घेत बसत मी आत्ता. वडापाव खायला आम्ही सगळे बाहेर चाललो आहोत. आज जागतिक वडापाव दिन आहे ना, म्हणून.

आई : काय सांगतेस काय? वडापाव दिन? आणि तो जागतिक कधी पासून झाला? इथं केरळातल्या लोकांना तरी माहितीये का वडापाव. (आई आश्चर्य दाखवत हसते.)
(आई खुणेने शेजारच्या काकूंना चहा साठी खुर्चीवर बसायला सांगते)

आजीची मैत्रीण (पदमा मावशी) : (हसत) आजच झाला असेल. मुंबईचे वझे बंधू त्यांचा स्पेशल खिडकी वडा, चितळ्यांसारखाच जगभर पोचवतील व्हाट्सअँपवर जाहिरात करून. आणखी काय.

(सगळ्या जणी चहा घेत खुर्च्यांवर बसतात. )

शेजारच्या काकू : (आई कडे बघत) अगं, मला सकाळी गुड मॉर्निगच्या मेसेज मध्ये आजच्या जागतिक वडापाव दिनाचं कळलं. मग म्हटलं चला त्या निमित्ताने येऊ खाऊन.

आजी : यानं एक बाई फार डोकं उठतं. उठसूट गुडमॉर्निंग, गुडनाईट. जोडीला उडणारे पक्षी, फुलांच्या राशी तर कधी योग करणारी बाई, त्यात भर म्हणून कधी गौतम बुद्ध, तर कधी नेल्सन मंडेला, असं कुणाचं तरी उभ्या जन्मांत न पाळलं जाणारं तत्वज्ञान. नको नको होतं अगदी. समोर दिसल्यावर हसत नाहीत आणि व्हाट्सअँप वर काय करायचं डोंबल गुड मॉर्निंग.

आजीची मैत्रीण (पदमा मावशी) : हे बाकी खरंय गं. भरपूर काय काय वाचतो खरं व्हाट्सअँप वर. माझा चष्म्याचा नंबर पण वाढलाय बघ. पण वाचलेलं आमलात कोण कशाला आणतंय कधी.
(आईकडे बोट दाखवत) तूच परवा पाठवलीस ना ती कविता सोसायटीच्या ग्रुपवर. या व्हाटसअँप मुळे किती वेळ जातो, घराकडे कसं दुर्लक्ष होतं, सगळी कामं तशीच राहतात, या पिढीला व्हाट्सअँपचं पार वेड लागलंय वैगेरे सांगणारी. वाचून पटल्यामुळं त्यावर हसून पुढं चार जणांना फॉरवर्ड सुद्धा केली. पण व्हाट्सअँप वापरायचं कमी थोडीच झालंय. छे. सगळे दुसऱ्याला शहाणपण शिकवायला एका पायावर तयार. पण हातातला फोन स्वतः बाजूला ठेवायला मात्र सपशेल 'ना'! पुण्यात बसून अमेरिकेतल्या ट्रम्पबद्दल इंग्लंडातल्या मित्रांशी whatsapp ग्रुपवर चवीनं गप्पा मारतील. पण इथे शेजारी कोण बसलंय याचा मात्र पत्ता नाही. भेट ना गाठ ओन्ली व्हाट्सअँप वर चॅट. बाकी काय.

(पदमा मावशी हे सगळं बोलत असताना आई आणि शेजारच्या काकू मात्र whatsapp मध्ये बुडालेल्या. त्यांना मावशी बोलल्याचे काही ऐकू जात नाही. whatsapp च्या ज्वेलरी ग्रुप वर नुकत्याच पाठवलेल्या oxidised ज्वेलरीचे फोटो त्या एकमेकींना दाखवत असतात. आणि अचानक तेवढ्यात light जाते वायफाय बंद पडते. ओघानेच whatsapp ही बंद. तेव्हा कुठे आई wahtsapp मधून बाहेर येते आणि पदमा मावशींना विचारते.

आई : काय म्हणत होतात मावशी तुम्ही? माझं लक्षच नव्हतं.

पदमा मावशी : राहूदे राहूदे. तुमचं चालुद्यात whatsapp.
(यावर आजी आणि पदमा मावशी दिलखुलास हसतात. )


समाप्त


--- अश्विनी वैद्य
५. ०९. १८

3 comments:

  1. एकदम खरं चित्र उभ केलंस या नाटकातून.

    बाकीची कमेंट WhatsApp वर पाठवतो, रीप्लाय कर हो नक्की. 😁

    ReplyDelete
  2. Pradnya waghmare2 October 2018 at 15:56

    मस्त लिहीलंय वाचताना असं वाटतंय कि ते सगळे प्रसंग समोर घडत आहेत . म्हणी जसे कि खाली मुंडी व्हाट्सअप धुंडी , बुडत्याला चार्जिंग चा आधार .मजा येते वाचताना तुझी creativity दिसते शब्दांचे खेळ अचूक जमतात तुला वाचणाऱ्याच्या मन कधी त्या सोबत प्रवास करून तुझ्या कथेभोवती आनंदाने गिरक्या घालू लागते ते समजत नाही. खूप छान लिहितोस नाटक , कविता , कथा किंवा प्रवास वर्णन तू लिहिलेलं काहीही वाचणं म्हणजे आनंद .
    तूझ्या येणाऱ्या पूढील शब्दांच्या प्रतिक्षेत...प्रज्ञा.

    ReplyDelete
  3. 3 अंकी नाटक सहज लिहू शकतेस.... Try कर... सुंदर लेखन....

    ReplyDelete

Split : Croatia

क्रोएशिया - दक्षिण युरोपातला एका बाजूने लांब समुद्र किनारा लाभलेला एक छोटा देश. One of the newly born countries. पण तरी खूप जुना इतिहास असल...