अशीच पहाटे जाग आली आणि पुढे झोप येईना तेव्हा उठून पहाटेच्या हलक्या थंडीत वाफाळता चहा घ्यायचा आनंद घ्यावा म्हणून उठले आणि चहाचा कप हातात घेऊन खुर्चीवर बसले तेव्हा बरोबर डायनिंग टेबलाच्या समोरच्या bookshelf वर ठेवलेली 'उत्खनन' ही गौरी देशपांडे यांची कादंबरी उघडावी वाटली. बरंच आधीपासून नुसती आणून पडलेली पण वाचायला होत नव्हती. सकाळी 5.30 ला चहाच्या पहिल्या घोटाबरोबर पहिलं पान उघडलं आणि पुढची पानं वाचून उलटत रहण्याखेरिज मी दुसरं काहीच करू शकले नाही. अर्थात पुस्तक खाली संपेपर्यंत ठेवणं शक्यच झालं नाही. ही ११४ पानांची छोटी कादंबरी उत्सुकता ताणणारी रहस्यमय कथा किंवा कोणाचा प्रेरणादायी जीवनपट वैगेरे प्रकारात मोडणारी नव्हती तरीही मध्ये कुठे थांबावेसे एकदाही वाटले नाही. एखादं नाटक किंवा सिनेमा पाहताना त्यातल्या दृकश्राव्य अनुभवामळे त्याचा परिणाम खोलवर होणं स्वाभाविक असतं पण एखादं पुस्तक केवळ वाचताना त्यातली कथा कल्पनेत तितकीच परिणामकारक उभी राहणं यासाठी त्या लेखकाची प्रतिभा तेवढी जबरदस्त असावी लागते हे प्रत्येक पान उलटताना जाणवत होतं. वाचतानाचा तो गाभा तसाच घट्ट पकडून ठेवण्यासाठी मी सगळं सोडून खुर्चीला खिळून पुढचे चार तास तिथेच बसून राहिले आणि पुस्तक संपल्यावरच उठले.
आता त्यावर चार ओळी खरडाव्या असं वाटलं यावरूनच हे पुस्तक मला नक्कीच आवडलय हे वेगळं सांगणं नकोच. परीक्षण नाही खरंतर पण साधारण पुस्तकाची ओळख नक्की करून द्यावी असं वाटलं. परीक्षण हे बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते, त्या लेखकाची आधीची वाचलेली पुस्तके, त्यावरून साधारण त्या लेखकाच्या स्वभावाचा काढलेला मागोवा, त्या काळातल्या इतर लेखकांची वाचलेली पुस्तके, साहित्याच्या दृष्टीने त्याचे महत्त्व, त्याचा तुलनात्मक परिणाम, त्यातले वैशिष्टय जाणायची स्वतःची क्षमता, ते नीट शब्दात मांडता येण्याची कला, हे सारं नीट जमायला हवं. शिवाय पुस्तकाबद्दल, लेखकाबद्दल आणि त्यातल्या कथेबद्दल, व्यक्तिरेखांबद्दल स्वतःची मते वाचणाऱ्यावर ठासून न लादता, त्यातला भावार्थ प्रत्येकाच्या विचारसरणी नुसार वेगवेगळा असू शकतो इतके भान ठेवून त्यातल्या वाचनाची उत्सुकता अथवा कंटाळा याचे पडसाद परीक्षणात मांडता यायला हवेत. सध्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीची जाण, वाचनाबाबत लोकांची मानसिकता आणि त्या अंगाने पुस्तकाबद्दलच्या विशेष वाटणाऱ्या किंवा न वाटणाऱ्या बाबी असा सारा आढावा पुस्तक परीक्षणात यायला हवा. अर्थात असं मला अपेक्षित आहे पण जमणं अवघड आहे म्हणून केवळ ओळखच करून द्यावी वाटली.
'दुनिया' या अगदी वेगळ्या नावाच्या पुरातत्वशास्त्र विभागात, विद्यापीठात काम करणाऱ्या कथेतील मध्यमवयीन नायिकेने स्वतःचा इतिहास उकरत, आठवणींचे केलेले उत्खनन गौरी देशपांडे यांनी या पुस्तकात मांडले आहे. साध्या, सर्वसामान्य पण थोड्याशा भिडस्त आणि त्यामुळेच साऱ्या जगाचे मिंधेपण उगाच स्वतःच्या अंगावर घ्यायची सवय झालेल्या, साऱ्या जगाचे अपराध स्वतःवर घेवून खंत करत बसणाऱ्या, दुसऱ्यांच्या वाटण्याचा अती विचार करणाऱ्या कथेच्या नायिकेचे भावविश्व, जुन्या अवशेषांचे जे उत्खनन करतो तसे भूतकाळातल्या घटनांमधून उकरून काढत अगदी हळव्या पण तितक्याच परिणामकारक रेखटले आहे. 'दुनिया'चं (नायिकेचं) विश्व्, त्यात तिची म्हणून असणारी कुटुंबातली माणसं, त्यांची स्वभाव वैशिष्ट्य, आई- मुलगी, वडील-मुलगी, मैत्री अशी नाती, त्यातलं प्रेम, समज आणि स्वीकार, भावनिक आणि तर्कशुद्ध विचारसरणीच्या आधारावर घरात असलेले दोन भिन्न मतप्रवाह, त्यामुळं नायिकेच्या मनात चालणारी घालमेल हे सारं, कधी ठसठशीत प्रसंगातून, कधी हळव्या बोलण्यातून खूप सुंदर उभारले आहे.
माणसांच्या स्वभावाच्या अनेक सूक्ष्म छटा निरखून त्यांच्या स्वभावाचे हळू हळू उलगडत जाणारे कंगोरे, कुठली रुपकं न लावता अगदी समर्पक आणि सडेतोड भाषेत मांडायची तल्लख प्रतिभा गौरी देशपांडे यांनी उभारलेल्या व्यक्तिरेखांमध्ये दिसते. माणसाच्या गुण दोषांचे सुरेख पण अभ्यासपूर्ण चित्रण यात घडते. त्यांनी उभारलेली स्वयंभू, स्वयंपूर्ण, स्वयंसिद्ध पण आत्ममग्न, आत्मतुष्ट नसलेली 'मणी' या नायिकेच्या मुलीमधून त्यांच्या स्त्रीवादी लेखिकेची मध्येच आपसूक जाणीव होते. एक स्त्रीवादी लेखिका हे लेबल तितकं पटकन न चिकटवता, साहित्य या नजरेतून हे पुस्तक वाचताना (लॉजिकल) तर्कशुद्ध विचार असणारी, परखड, प्रतिभावंत आणि बुद्धीवादी लेखिका अशी गौरी देशपांडे यांची ओळख यात होते. मी त्यांची किंवा त्यांच्या बद्दलची या आधी वाचलेली पुस्तके - 'आहे हे असं आहे' हा कथासंग्रह, 'विंचुर्णीचे धडे' हे ललित लेखन आणि 'महर्षी ते गौरी' हे मंगला आठयलेकरांचं पुस्तक. या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज वाचलेली 'उत्खनन' ही कादंबरी. या साऱ्यातून त्यांच्याबद्दलची मनात तयार झालेली ही प्रतिमा.
शेवटी काय, नाटक, सिनेमा, कथा, कादंबऱ्या, ही पुस्तकं, रामायण, महाभारत, इतिहास या साऱ्यातून तेच-तेच दिसत राहतं, सापडत राहतं, मनुष्य स्वभावाची परिस्थितीनुसार जाणवणारी वेगवेगळी रूपं, नात्यांचे क्लिष्ट बंध, आणि या साऱ्यात गुंफत जाणारं आपलं आयुष्य, जुना होऊन बाजूला पडलेला परिपक्व् डाव, नव्याने सुरु होऊ पाहणारा कोवळा डाव आणि आत्ता खेळत असलेला आयुष्याचा न उमजलेला डाव, हे सारं सगळं असं आजूबाजूला पसरलेलं, विखुरलेलं पाहत पुढे पुढे वाट काढत जाताना आनंदाचे क्षण वेचण्याचा ध्यास, आणखी काय. एखादं चित्र प्रत्येक चित्रकारानं वेगळ्या पद्धतीनं रेखाटावं, त्यात स्वतःत उपजत असलेल्या कौशल्यानं रंग भरावेत तेव्हा पाहणाऱ्याला त्याच्या रसिकतेनुसार त्या कलाकृतीत दरवेळी वेगळं सौंदर्य दिसावं तसं या कथा रेखाटण्याबद्दलही मला वाटत. अर्थात प्रत्येकच कला ही याच वळणावर जाणारी. असो. नक्की वाचावी अशीच उत्खनन ही कादंबरी.
अश्विनी वैद्य
२७. १०. १७


पहाटेच्या रम्य वेळी एका सुंदर पुस्तकाची ओळख झाली . आता ते पुस्तक वाचल्याशिवाय गत्यंतर नाही. खूपच सुंदर लेखन .....
ReplyDeleteChan lihile ahe ashu
ReplyDeleteChhan
ReplyDeleteमी आज तुझ्या blog बद्दल मुलांना माहिती दिली ...
ReplyDeleteThanks for the new introduction.Well written :)
ReplyDeleteKeep sharing.