सकाळी जाग आली... नेहमीप्रमाणे ६.३० झाले होते. पापण्यांआड पडलेल्या स्वप्नांना पांघरुणाबरोबर बाजूला सारून सकाळच्या स्वच्छ, प्रसन्न दिवसाला सुरवात केली. काल बराच उशिरा डोळा लागला आपला. अर्ध्यात सुरु केलेलं ते पुस्तक वाचून पूर्ण केलं आणि त्या ओघानं येणारे विचार मनात घोळवत बरीच उशीरा कधी झोप लागली कळलंच नाही. नेहमी असंच होतं आपलं, एखाद्या गोष्टीचा वेगवेगळे चष्मे लावून उगाच अती विचार करत बसणं होतं. त्या पुस्तकात लेखकानं उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा जवळच्या वाटल्या खऱ्या पण पटल्याच असं नाही, बरेच संदर्भ अजून खोलवर पोचायला हवे होते. आता उठल्यावर पण तेच सगळं डोक्यात चालू आहे. नेहमीची सकाळची गडबड आहेच पण आत मात्र त्या विचारांनी घेरलंय.
एखादं वेगळा विचार मांडणारं पुस्तक हातात आलं कि, स्वतःच्या त्याबाबतच्या विचारांचेही वेगवेगळे धागे आपोआप तयार होतात, आणि मग त्याचा थोड्यावेळाने इतका गुंता होतो कि, कुठली परिमाणं कुठं लावायची सगळाच गोंधळ उडतो. कळत नाही असं नाही, पण स्वतःशीच असलेले स्वतःचे वाद मिटवायला कधी कधी कोणाची तरी मदत लागते. कोणाशी तरी बोलावं असं खूप वाटत होतं. पण कोणाशी बोलणार. वेळ असा कधी नसतोच कोणाकडे, किंवा priorities वेगळ्या असतात. असं एखाद्या पुस्तकाविषयी, त्यात मांडलेल्या मताविषयी वैगेरे तर शक्यच नाही. जिथे आपण केलेल्या मेसेजला उत्तर येणं मुश्किल, तिथं अशी एखाद्या पुस्तकाविषयी चर्चा म्हणजे, काहीही अपेक्षा करते मी.
सकाळची सगळी गडबड उरकल्यावर थोडासा वेळ होता, नेमका तेव्हाच फोन वाजला. मोबाईलच्या स्क्रीनवर नाव दिसलं आणि खूप आनंद झाला. किती दिवस झाले होते शेवटचं बोलून, तो आवाज ऐकून... त्यात स्वतः होऊन फोन आला म्हणजे मला बोलायचं आहे हे कळलं असेल का तिला. कोण जाणे... पण आज अगदी भरभरून बोलूयात दोघीजणी, खूप गप्पा मारुयात असं म्हणत पटकन फोन घेतला. पलीकडून अगदी आनंदात येणाऱ्या आवाजावरून, तिच्या चेहऱ्यावरचे भाव मला इकडे जाणवत होते. खळाळत्या झऱ्यासारखी ती बोलत होती. तिचा आवाज, तिचं बोलणं, शब्दाशब्दांतून सांडणारा आनंद हे सारं काही मी फोनवरून टिपत होते. लग्न ठरल्याची गोड बातमी द्यायला तिने फोन केला होता. ते ऐकून मलाही खूप आनंद झाला. तिचं बोलणं थोडं ओसरल्यावर तिला मनापासून शुभेच्छा दिल्या आणि "बाकी तू काय म्हणतेस?" या तिच्या प्रश्नावर "ठीक, मस्त" असं काहीतरी न ठरवता, सहज ओघानं येणारं उत्तर तोंडून निसटलं. "चल, जरा गडबडीत आहे, बोलू परत" असं म्हणत तिने मग फोन ठेवून दिला. किती खूष होती ती...मलाही छान वाटलं. भरभरून बोलणं झालं खरं, पण ते तिचं, तिच्या बाजूनं... मला बोलायचं होतं ते राहिलंच... अर्थात वेळच नव्हता तिला. हरकत नाही, माझे विचार परत माझ्याभोवतीच फिरत राहिले.
राहिलेली कामं पटापट आवरून मी ही कामाला बाहेर पडले. दिवसभर कामाच्या गोंधळात पुस्तकाचे विचार बाजूला पडले खरे, पण ती अस्वस्थता संपली नव्हती. त्याच त्याच विचारात अडकून पडलं तर काही वेळानं त्याचं डबकं होतं, ज्याचा नंतर त्रास व्हायला लागतो, पण म्हणून मग ते असेच सोडून देऊन त्याचा पाचोळा असा मातीमोल झाल्याचं वाईटही वाटतं. प्रवाही विचार मनाच्या cleansing साठी किती आवश्यक असतात ना... मग काय शेवटी, रात्री सगळ्यांची निजानीज झाल्यावर दिवसभर आतल्या आत चाललेली तगमग कागदावर उतरवून मोकळी केली...आणि माझी माझी मी एकटीच शांत झाले.
---अश्विनी वैद्य
२८. ०३. १७

Khup chan lihilay, mast
ReplyDeleteThanks Dhananjay
Deletekhup chan varnan kele ahe didi..
ReplyDeleteThanks ga...☺
DeleteMast :)
ReplyDeleteBest way to express yourself is to write !
Keep writing.
Yup...thank you so much
Deleteअगदी नेमकं लिहिलं आहेस अश्विनी ��
ReplyDeleteThanks Bhavana...for your kind words..☺
DeleteKhup awadla :)
ReplyDeleteThank you...!
Delete