दहा वर्ष
पावसाच्या पाण्याचा खिडकीच्या काचेवरून वाहत येणारा एखादा ओघळ, शेजारून वाहणाऱ्या दुसऱ्या ओघळाला कधी कधी जितका सहजपणे जाऊन मिळतो ना, तितके सहज आपण एकमेकांना भेटलो आणि तेव्हापासून वाहत आहोत एकत्र... आता तुझं पाणी कुठलं आणि माझं कुठलं होतं...वेगळं कसं मिळायचं रे....!
खरंतर लग्न कशाशी खातात याची जराही जाण नसलेल्या मानसिक वयाची मी असताना बोहल्यावर चढलेले..... आणि अजाणतेची तीच सावली तुझ्याही डोक्यावर.... अर्थात दोघांनाही सगळंच नवखं…!
वाट नवी, अनोळखी पण त्यामुळंच हवीशी... कुठल्याही पूर्वनियोजित (preset) संकल्पना डोक्यात नसल्यानं निखळतेचा आनंद देणारी....!
कितीवेळा पडलो, झडलो, भांडलो, पार टोकाचे वाद घातले... अगदी टुकार गोष्टीवरून... सुरवातीला एकमेकांना समजण्याच्या धडपडीत आणि नंतर समजलेलं एकमेकांवर लादण्याच्या गडबडीत…!
काही साचेबद्ध ठरवलं तरी कुठं होतं आपण कधी, आणि ठरवून तरी ते तसं होतच असही नाही म्हणा...पण आयुष्यं नेतंय तसं वाहतोय अगदी सहज आणि तरीही सुंदर....!
ज्या गोष्टी मिळण्यासाठी नशिबाची साथ लागते असं म्हणतात त्याही बाबतीत भाग्यवान ठरलो आपण.
जीवाभावाची चार माणसं भेटली वाटेवर... दोन गोंडस जीवांची साथ मिळाली एका वळणावर... त्यांच्या जन्माचे एकत्र अनुभवलेले ते सुंदर क्षण... आजही रोमांच आणणारे…
पुढे आपलं असं म्हणणारं जगही बरच विस्तारलं रे, गजबजलं, अगदी भरून गेलं... पण त्याचं कधी ओझं नाही झालं.
आज बरोबर दहा वर्ष झाली,
मागे वळून बघितलं तर आत्ता अगदी गोड गोड वाटणाऱ्या बऱ्याच गोष्टी त्या त्या वेळी खूप अवघड होत्या खरंतर... पण निघाले मार्ग त्यातूनही... नव्हे आपण काढले...एकत्र...मिळून…!
दिवस पुढे जातातच मुळी आठवणी निर्माण होण्यासाठी...आणि नंतर त्या जपत राहण्यासाठी…!
केक, फुलं, कार्ड, भेटवस्तू यात गुंफलेल्या वाढदिवसाच्या सुरवातीच्या सं कल्पना हल्ली तुझ्या डोळ्यांत बघूनच पुऱ्या होतात…नाही वाटत गरज कशाचीच...पण केवळ तुझ्या साथीचीच…!
—— अशु
१२ जुलै २०१६
खूप छान! आणि शुभेच्छा!!
ReplyDeleteThank u so much
DeleteKhuup chhan :)
ReplyDeleteKhuup chhan :)
ReplyDeleteBeautiful aashu di..super like
ReplyDelete