Friday, 12 February 2016

असंच काहीतरी…!



             बरोब्बर साडे आठला घरात सूर्योदय झाला. फेब्रुवारीच्या थंडीतली ती एका वीकेंडची एक गारेगार सकाळ….दोन्ही मुलं…. माझ्याआधी उठून त्यांच्या खोलीत अगदी आनंदानं खेळत बसली होती. आरडाओरडा, रडणं, भांडणं असा नेहमीचा श्रवणीय सूर आज चक्क गायब होता. मला दोन मिनिटं पु लं च्या त्या चौकोनी कुटुंबातली ती किल्लीवर चालणारी गोजिरवाणी मुलं माझ्या मुलांमध्ये भासली. त्यामुळं स्वर्ग अगदी दोन बोटंच उरला कि काय असं झालं आणि मग मीही लगेच ते दोन बोटांच इटुकलं अंतर पटकन कापत परत बेडमध्ये घुसले. आणि पुढच्या अजून अर्ध्या एक तासाच्या झोपेचं दिवा स्वप्न बघू लागले. जोवर नेहमीचे 'श्रवणीय' सूर ऐकू येत नाहीत तोवर उठायलाच नको असा विचार करत होते, एवढ्यात शंकर महादेवनचे "मन मन्दिरा….!" चे खरोखरच 'श्रवणीय' सूर कानांवर पडले…म्हणजे नवराही उठलेला दिसतोय, त्यानेच हि गाणी लावलीयेत आणि एकूण मूड पण झक्कास असणार याची कल्पना आली. खिडकीतून बाहेर लक्ष गेलं, आज नुसतंच उजाडलं नव्हतं तर कोवळ्या उन्हाने गवतावरचं दवही चमकत होतं. अर्थात आज climate 'bright n sunny' होतं…. हे म्हणजे अतीच झालं. 

          इतकी सगळी सुखं एकावेळी मिळायची सवय बालपण संपलं तेव्हाच सुटली. आज म्हणजे अगदी "आजि सोनियाचा दिनु, वर्षे अमृताचा घनु…." असं झालंय थोडक्यात. पण मग या सगळ्या आनंदाच्या उत्साहात झोप मात्र कुठच्या कुठे पळाली. एवढ्यात mobile पंत, "मी हि उठलोय…बघा मला…" ची आरोळी ठोकायच्या तयारीत होते तोवर मी उचललाच… '68 msgs from 5 chats' असे notification बघून पुढची १० मिनिटे मी उडालेल्या झोपेकडून अगदी कुतूहलाने उसनी घेतली. पण श्या… त्यात काय, तर १०-१२ सुप्रभात चे फोटोज, बरोबर तोंडी लावायला कधीही अमलात आणायला न जमणारं बोजड तत्वज्ञान, जराही हसू न येणारे टुकार विनोद यापलीकडे वाचनीय, प्रेक्षणीय अर्थात इंटरेस्टिंग असं काहीच नव्हतं. चार-दोन valentines day स्पेशल मेसेज वाचून फोन खाली ठेवला आणि मी आवरायला घेतलं . 


             हातात दोन कप चहा, बिस्किटे आणि फ्रेंच टोस्ट ठेवलेला ट्रे घेवून नवरा चक्क डायनिंग टेबलापर्यन्त जाताना दिसला. ते बघून "येय, ब्रेकफास्ट इज रेडी…. " ही मुलांची अगदी मंजुळ आरोळी ऐकू आली, वाह आयता ब्रेकफास्ट…मग तो काहीही, कसाही असला तरी मला खूपच चविष्ट लागतो. नवऱ्याला जेव्हा स्वतःची पाककौशल्ये दाखवायची लहर येते तेव्हा, अंड्यातलं पिल्लू, चिकन किंवा मासे या पैकी कोणा एकाचा तरी बळी गेलेला असतो. आणि वर तो पदार्थ करताना, "स्वयंपाकाला पाककौशल्य वैगेरे म्हणायची काय गरज आहे...किती सोप्पं असतं ते…" त्याचं हे ऐकून घ्यावं लागतं . पण आयतं काहीही मिळणार असेल तर हे असले वाद मी सहसा निमूटपणे टाळते… आणि मग खावून झाले कि, "चला, आज किनई पप्पा मस्त उकडीचे मोदक किंवा सुरळीच्या वड्या झालंच तर भरली वांगी असलं काहीतरी (फ्रेंच, इटालियन, ब्रिटीश पदार्थांना भारी पाडणारं ) जेवायला करणार आहेत रे", असं मुलांना दणक्यात ठोकून देते… हे ऐकून मग पाक 'कौशल्या' तला 'कौ' आवंढया बरोबर गिळून राहिलेलं 'शल्य' (सांगितलेल्यातलं काहीही येत नसल्याचं) बोचल्यानं, "उगाच काहीतरी काय, मुलं कुठे खातात यातलं काहीही, आज लेकीला फिश खायचा आहे, म्हणून मी फिश फ्राय (त्यातल्या त्यात सोप्पं) करणार आहे…" इति पितृप्रेमाच्या स्वरात नवरा…"घाला काय गोंधळ घालायचाय तो….मला काहीही चालेल…." चा सूर ओढत मी ही मग वीकेंडच्या 'unpaid', 'unproductive' कामांना सुरवात केली. अर्थात (मशीनला) कपडे धुणे, वाळल्यावर त्याच्या घड्या घालणे, इस्त्री करणे, आठवड्याच्या भाज्या निवडणे, घराची साफसफाई करणे, मुलांचे पसारे आवरणे इति इति….! यातलं थोडंफार झाल्यावर किचन मधली या तिघांची सगळी कौशल्ये पणाला लागून (थोडक्यात स्वयंपाक घराची पुरती वाट लागून) दुपारचे जेवण खाणेबल होईस्तोवर मी जवळच्याच बागेत फेरफटका मारायला निघाले. अशी संधी सहसा खूप कमी वेळा मिळते, त्यामुळं लागलीच पायात बूट अडकवून मी त्या sunny weather मध्ये थोडंफार का होईना (हल्लीचं स्पेशल deficiencyवालं) विटामिन ड मिळवायला बाहेर पडले. 



             चालताना थोड्यावेळाने आजी-आजोबांच्या एका जोडप्याकडे सहज लक्ष गेलं. लहानपणी बऱ्याचदा घरात वास्तुशांत सारख्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना भेटवस्तू म्हणून आलेल्या ज्या काही निसर्ग चित्रांच्या फोटो फ्रेम असायच्या त्यातलीच एक मूर्त रूप घेवून समोर आली आहे असं भासावं इतकं सारखं त्या आजी-आजोबांचं नदीकिनारीच्या हिरव्यागार निसर्गातल्या लाकडी बेंचवरचं हे चित्र होतं. त्या शांत निसर्गाचे तेवढेच कोमल रूप स्वतःमध्ये सामावत आणि त्यामुळे तेवढेच शांत भाव चेहऱ्यावर आल्याने कोणाचेही अगदी सहज लक्ष जाईल इतके प्रसन्न त्या दोघांचे चेहरे होते. सत्तरीच्या पुढचीच दोघांचीही वयं असावीत…हलकी एम्ब्रोयडरी केलेला नाजूक सोनेरी बटणांचा गुलाबीसर स्वेटर आणि फिकट निळसर आकाशी रंगाचा स्कर्ट, सोनेरी फ्रेम असलेल्या चष्म्यातून चमकणारे निळे मिचमिचे डोळे, कानात छोट्या मोत्यांचे टोप्स, गळ्यात सुरेखशी जीजस चा क्रॉस अडकवलेली स्वेटर वर उठून दिसणारी नाजूक साखळी आणि खांद्याला लावलेली लेदरची एक छोटीशी bag असं आजींचं त्या वयातलही गोड आणि लोभस रूप, आजोबाही अगदी tiptop…एकही घडी न पडलेला पांढरा शुभ्र शर्ट, आणि तेवढीच चमकणारी काळी फोर्मल trousers घालून आजींच्या शेजारी बसलेले. खूप प्रसन्न भाव होते त्या दोघांच्याही चेहऱ्यावर…आयुष्यातले सारे चढ उतार बरोबरीने पार करत, एकमेकांना साथ देत वयाच्या या टप्प्यावर मिळालेल्या समाधानाचे निरागस रूप त्यांच्या चेहऱ्यावरून अगदी ओसंडत आहे असं वाटलं. त्या दोघाना बघून स्वतःच्या भविष्यातील चित्रही हे असंच असेल हा विचार करत मी चालत होते. 

              वाटलं, कुठल्यातरी वळणावर अशीच आपली पण पडलेली गाठ… पुढे इतकी एकमेकांत अडकत गेली कि आता ती सोडवण्याची उकल कधी ठावूकही करून घ्यायची नाहीये. गुलाबाच्या पाकळ्यात हरवलेले तेव्हाचे ते मोहक क्षण वेचता वेचता एकदम आई बाबांच्या भूमिकेत कधी शिरलो हेही कळलं नाही. आणि मग पूर्वी खिशामध्ये असलेल्या फुलांच्या जागा आता लेकीच्या पिना, क्लिपांनी तर लेकाच्या बॉलने, छोट्या छोट्या खेळण्यांनी घेतल्या. सहजीवनाची एक पायरी आपसूक वर चढलोय ही जाणीव गाठीशी जमवलेल्या अनुभवावरून होऊ लागली. वेडेपणा, अल्लडपणा च्या धुक्यातून थोडं बाहेर पडून परिपक्वतेचा बुरखा वयानुसार आपोआप अंगावर चढला. त्यामुळं पूर्वीच्या गुलाबी असलेल्या त्या सगळ्या गोष्टींच्या व्याख्या त्यांचे नवीन अर्थ घेवून उगाच परत नव्यानं प्रकटल्या आहेत असं जाणवू लागलं. 
            पण पूर्वीचे सारखेच बोचणारे त्या गुलाबांचे काटे आता मात्र हळू हळू बोथट होत गेलेत. नाही म्हणायला उडतात खटके आत्ताही पण त्यांचा प्राधान्यक्रम आणि स्वरूप याला थोडी सोज्वळतेची किनार असते. या सगळ्यात एक मात्र जाणवतंय, पूर्वी आपल्यात अजिबात नसलेला 'समंजसपणा' हा गुण अचानक कधी वाढीस लागला कोण जाणे. पण त्यामुळंच कदाचित खटके हे खटकेच रहात आले असतील…असो पण हे मात्र नक्की खरं की, 'साथ' ती ही 'आयुष्यभराची' या सत्याचा भरीवपणा एखाद्या दिवशी उफाळून आलेल्या प्रेमाबद्दलच्या नुसत्याच पोकळ विचारांनी नाही जाणवायचा, नाही का? 




     असो, पुढचा आठवडाभर पुरेल इतकं ड जीवनसत्व मिळवून नवऱ्याच्या पाककलेला भरभरून दाद देण्यासाठी भुकेल्या पोटाने मी घरचा परतीचा रस्ता धरला, ते माझे उद्ध्वस्त झालेल्या स्वयंपाकघराचे करुण चित्र मनातल्या मनात रेखाटतच. 


                                                                                    अश्विनी वैद्य 
                                                                                    १२/०२/१६

टीप :- याच सकाळचे नवऱ्याच्या चष्म्यातून दिसलेले चित्र वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा….  
http://mandaravaidya.blogspot.co.uk/2016/02/blog-post.html





4 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Ashwini, khoop chan, nice read for my Friday lunch break! पाक 'कौशल्या' तला 'कौ' आवंढया बरोबर गिळून राहिलेलं 'शल्य' farach aavadale :) aaji-aajoba che varnan chan jamlay, jodi agadi doly samor ubhi rahili :) muralelya lonachya sarakhe! sunset picture hi bhari :)

    ReplyDelete
  3. Chan ! Gharatla ajun varnan vachayla avadla asta.Pan mast lihila ahes :)

    ReplyDelete
  4. मस्तच!
    एकाच रविवारचे २ views वाचायला मिळाले!

    ReplyDelete

Split : Croatia

क्रोएशिया - दक्षिण युरोपातला एका बाजूने लांब समुद्र किनारा लाभलेला एक छोटा देश. One of the newly born countries. पण तरी खूप जुना इतिहास असल...