जन्मतःच अगदी भरभरून मिळालेली निरागसता, लहानपणी हि माझी आई, हि ताई, हे पप्पा, हे आजोबा याच कोवळ्या विश्वात रमलेली निरागसता. आईस्क्रीम, चोकलेट मागण्यासाठी आईला बिलगण्यात लपलेली निरागसता, नको असलेल्या गोष्टीसाठी तोंड वेडावून, खट्टू होवून बसण्यातली निरागसता, पप्पानी कशाला नाही म्हटले कि जोरजोराने रडून गोंधळ घालण्यातली निरागसता, 'लोक काय म्हणतील' या जाणीवेचा जराही स्पर्श न झालेली अल्लड निरागसता, पहिल्यांदाच स्टेजवर नाच करताना एकटक आईकडेच बघत राहण्यातली निरागसता, मग हळू हळू मोठे होत, समज येत कधी आईला खूष करण्यासाठी बाहेरून आलेले कपडे न सांगता बदलण्यातली निरागसता, न सांगता स्वतःची रूम नीट अवरण्यातली निरागसता. आई, पप्पांच्या वाढदिवसाला दुकानाच्या एका isle मध्ये उभे राहून कमरेवर हात ठेवून गोड हसत 'हं यातले तुला काय हवे ते घे आई, माझ्याकडून तुला birthday गिफ्ट' हे असे म्हणण्यातली त्याच्या किमतीशी (price) जराही नातं नसलेली मौल्यवान निरागसता. मित्रांशी क्षणात भांडण्यातली आणि लगेच परत खेळण्यातली निरागसता.
मग असेच कधीतरी बालपणीच्या संध्याकाळी थोडीशी maturity कडे वळलेली निरागसता, 'हे असं केलं तर मला लोक हसतात', 'माझं असं वागणं लोकांना नाही आवडत', 'मी हे कपडे घातले तर सगळ्यांना खूप आवडते' या आणि अशा अनेक प्रकारे मनाचं behavioral conditioning वाढत्या वयाबरोबर होत गेल्यामुळे ओहोटीला लागलेली निरागसता, व्यावहारिक समाजात वावरताना जिला जराही जागा नाही आणि म्हणूनच बालीशपणा, खुळेपणा अशी नकारात्मक लेबलं चिकटलेली निरागसता, आणि त्याचमुळे आयुष्याच्या रहाटगाडग्यात, जबाबदार्यांच्या ओझ्यात, आर्थिक जुळवणीत तिचा विचारही मनाला कित्येक दिवस न शिवलेली आणि शेवटी संपून गेलेली निरागसता.
काय आहे हि भावना, एखाद्या घटनेमुळे मनात उस्त्फुर्तपणे उमटलेला प्रतिसाद जगाची, लोकांची कसलीही तमा न बाळगता आपल्याच उघड्या कानांनी ऐकणे यातच निरागसता आहे का? आपल्याला जे आवडेल, पटेल ते त्याच क्षणी करणे याच्याशी जोडली आहे का ही मनाची संवेदना. माहित नाही. पण एक मात्र नक्की, कि ती कोवळी, अल्लड, हळुवार निरागसता कोणत्याही रुपात आपल्या बरोबर असेल तर आपलं मन प्रफुल्लित, तजेलदार आणि हलकं फुलकं राहायला मदतच होईल. आणि म्हणूनच होत असेल कदाचित रम्य ते बालपण.
- अश्विनी वैद्य
beautiful thought and everybody should think about it
ReplyDeleteAshwini its awesome......v v nice....
ReplyDeleteThank you Jignesh and Snehal
ReplyDelete