Friday, 12 September 2014

स्कूल चले हम…. !



         गेल्या आठवड्यात अनुष्काच्या नवीन शाळेचा उदघाटन समारंभ खूप दिमाखात पार पडला. दिमाखात म्हणजे सगळीकडे रोशनाई, जोरदार आतषबाजी, मंत्र्यांच्या गाड्या, त्यांची मोठमोठाली मुलांना न समजणारी भाषणं यातलं काहीही नाही, तर सारं काही मुलांसाठी या भावनेतून शाळेच्या प्रांगणात मुलांसाठी वेगवेगळ्या activities ठेवल्या होत्या. एका कोपऱ्यात धनुष्य बाण चालवणे, सर्कस मधले छोटे छोटे खेळ करणे, bubble mixture ने bubbles करणे, face-painting, पुस्तक वाचन अशा वेगवेगळ्या गोष्टी. 

         प्रांगणाच्या दुसऱ्या बाजूला पूर्णवेळ मंजुळ स्वरात वाजणारा ब्यांड चालू होता. जवळपास ३५० पालक या कार्यक्रमाला आले होते. आम्ही बरोबर दिलेल्या वेळेनुसार ११ ला शाळेत पोहोचलो. 

        दारातच शाळेचे मुख्याध्यापक प्रत्येकाच्या स्वागतासाठी थांबले होते. सगळीकडे पालक त्यांच्या पाल्याबरोबर काही न काही कला- कौशल्य कृती करण्यात गुंग होते. सगळी मुलं अगदी उत्साहात इकडून तिकडे बागडत होती. शाळेच्या नवलाईच्या गाण्यावर जणू आनंदानं नाचत होती. सारीकडे अतिशय उत्साही आणि प्रसन्न वातावरण होतं. 

         आम्ही नव्याने ओळख झालेल्या दोन चार पालकांना भेटून, थोड्या गप्पा मारून शाळेच्या इमारतीमध्ये शिरलो. अनुष्काचा क्लास पाहिला. २५ मुलांचा तो वर्ग सर्व गोष्टींनी परिपूर्ण होता. त्यामध्ये प्रत्येक मुलाला लागणारी स्टेशनरी त्याच्या नावाच्या ट्रे मध्ये ठेवलेली, कोपऱ्यात त्यांच्या क्लास् पुरती छोटी library होती. टेबल, खुर्च्या आणि इतर शिकविण्यास उपयुक्त साधनांनी वर्ग अगदी सुसज्ज होता. 

     आम्ही क्लास टीचर ला भेटलो. त्याना दुसर्यांदाच भेटत असूनही अनुष्काचे नाव तिच्या लक्षात होते. शाळेबद्दलची, शाळेतील रोजच्या रुटीन बद्दलची माहिती तिने नीट समजावून सांगितली. तोपर्यंत बरोबर जेवणाची वेळ झाली. 

      तिथे आलेल्या सर्वांसाठी (३५०लोकांसाठी) ब्रिटीश पद्धतीचे लंच होते. अर्थात वेगवेगळी स्यांड विचेस, पिझ्झा, स्प्रिंग रोल्स, डेकोरेटेड कप केक्स , चहा, कॉफी, ज्यूस अशी पेये. 

        त्या नंतर शाळेच्या मागच्या मैदानात साऱ्या मुलांनी (जवळपास १००) गोल करून बसायचे होते आणि पालकांनी त्यांच्या मागे उभे राहायचे. मध्ये शाळेचे मुख्याध्यापक आणि या शाळा उभारणी साठी महत्वाचा हातभार लागलेल्या इतर २ व्यक्ती आणि एका चर्चचे फादर हे साध्या खुर्च्यांवर बसले. शाळेच्या उभारणीची थोडक्यात माहिती देवून 'फीत' कापण्याच्या कार्यक्रमाला सुरवात झाली. 

         त्या साठी बोलावण्यात आलेले प्रमुख अतिथी होते, शाळेतलीच मुले. हो, हि सारी चिमुरडीच आज प्रमुख अतिथीची भूमिका बजावणार होती. हे सारे काही चालले होते ते केवळ या मुलांसाठीच. आणि म्हणूनच एक मोठी, लांब रिबीन गोल करून बसलेल्या मुलांच्या हातात दिली, आणि प्रत्येकाला एक छोटी कात्री दिली. कोणताहि नेता, संस्थाचालक किंवा खुद्द ज्यानं हि शाळा उभारण्यासाठी अक्षरशः जीवाचं रान केलं ते मुख्याध्यापक या पैकी कोणीही नाही तर चक्क सर्व मुलांनी मिळून फीत कापली आणि जल्लोषात शाळेचे औपचारिकरीत्या उदघाटन केले. साऱ्या मुलांना ते महत्वाचे( व्ही आय पी) असल्याची जाणीव करून देवून त्यांच्या कडूनच शाळेचे उदघाटन करण्याची कल्पना मला खूप भावली. यावरूनच मुले हीच कोणत्याही शाळेचा आत्मा असतात याची जाण इथल्या साऱ्या जणांना आहे हे प्रत्यक्षात पाहायला मिळाले. 


          मुलान्च्या चेहार्यावरचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता. अनुष्का तर रिबन कापल्यावर तिचा एक तुकडा हातात मिरवत अगदी हसत माझ्याकडे पळत आली आणि म्हणाली, "आई, I am VIP today. I cut the रिबन". आम्हाला हे सारं अगदी नवीन होतं. या साऱ्या कार्यक्रमाचे क्षण मनात साठवत आम्ही जेव्हा घरी परत निघालो तेव्हा अनुष्का आम्हाला म्हणाली, "I cant wait for tomorrow to come to the school for whole day." आणि अशा प्रकारे शांत पण प्रसन्न वातावरणातील एक वेगळा कार्यक्रम आम्हाला अनुभवण्यास मिळाला. 

        शाळा ही - प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग. कोवळं, निरागस बालपण आणि शाळा हे एक अतूट नातं. संस्कारांची बीजे पेरणारी, ज्ञानाची कवाडं खुली करणारी, स्वतःतील आत्मविश्वास जागवायला मदत करणारी, मैत्रीचे अतूट बंध निर्माण करणारी… थोडक्यात काय जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी आई- वडिलांनंतर तेव्हढीच महत्वाची असणारी शाळा. प्रत्येकाप्रमाणे विद्यार्थी म्हणून मला शाळेकडे बघता आलेच, पण आई- वडील शिक्षण शेत्रात असल्यामुळे त्यांना आलेल्या अनुभवातून शिक्षक आणि प्राचार्य यांच्या दृष्टीनेही शाळा कशी असते हे थोडेफार जाणता आले. 

     मुलांना कायम धाकाच्या ओझ्याखाली दाबत, स्वतःची अधिकारशाही मिरवत, आणि मनात पगाराशी गाठ बांधत शाळेत वावरताना कसले आलेत संस्कार आणि कसलं आलंय ज्ञान…. पुस्तकातला अभ्यासक्रम दिलेल्या वेळेत पूर्ण झाला म्हणजे जबाबदारी संपली. अशा विचार धारेचे शिक्षक असणाऱ्या या विद्येच्या मंदिरात मग काही मुलांना शाळा नको झालेले ओझे वाटू लागते तर काही मुले पाठांतराच्या जोरावर मार्कांचे कागदी certificates मिळवण्यासाठी धडपडत रहातात. पण या दोन्हीतही जगण्याचे धडे गिरवायचे राहूनच जातात. स्वतःची ओळख शोधायची आहे हे कोणी त्यांच्या ध्यानीच आणून देत नाही. 

           आपल्या भारताचे नवे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका भाषणात त्यांनी सांगितलेला एक किस्सा याच अनुषंगाने आठवला. एक B.Com झालेल्या मुलाला त्यांनी विचारले, तुला काय येतं, या वर तो म्हणाला, मी B.Com आहे. यावर ते म्हणाले, ते ठीक आहे, पण तुला येतं काय? मी B.com केलय. त्यावर पुन्हा ते म्हणाले, ''अरे तुला ब्यालंस शिट वैगेरे त्यातल काही येत असेल ना…. मग ते सांग ना, मला हे करता येतं जे कंपनीच्या कामासाठी अशातर्हेने उपयुक्त असतं.'' वैगेरे. खरच किती मार्मिक सत्य आहे ना हे. डिग्रीची certificates हीच स्वतःची ओळख आहे असे मानत एकदा का या विद्येच्या दालनातून बाहेर पडले कि मग खरी कसोटी लागते ती आयुष्याच्या वास्तव शाळेत. आणि मग वास्तवात समोर येते ती अशातूनच तयार होणारी काहीही धड येत नसलेली, पण हातात डिग्री हेच ओळखपत्र बाळगणारी सुशिक्षित बेकार पिढी… नोकरीच्या शोधात फिरणारी. कॉम्पुटर इंजिनिअर होवून कॉम्पुटरचा क्लास लावणारी, इलेक्ट्रोनिक्स इंजिनिअर होवून टी व्ही - रेडीओ उघडू हि न शकणारी, आणि खरच हे खूप भीतीदायक वास्तव आहे जे स्विकारायला मन भांबावतय. असो सगळीकडे अशीच शाळा, कॉलेजे आहेत असे नाही पण याचे प्रमाण नक्कीच जास्त आहे . 

          या साऱ्या आधारावर मला हि अनुष्काची जी नवीन शाळा सुरु होत आहे त्याचे खरच खूप कौतुक वाटले. परदेशी आहे म्हणून कौतुक असे नाही तर तिथे चालणारा स्वच्छ कारभार, मुलांचा केला जाणारा आदर, स्वतःच्या आवडीने या क्षेत्रात पदार्पण केल्यामुळे १०० टक्के झोकून देवून कष्ट घेणारे शिक्षक आणि या साऱ्या मुळे शाळेत जायला कायम तयार असणारी- मुले. हे सारेच खूप स्तुत्य आहे आणि अनुकरण करण्याजोगेही. 

 अश्विनी वैद्य. 
  ९.९.२०१४

No comments:

Post a Comment

Split : Croatia

क्रोएशिया - दक्षिण युरोपातला एका बाजूने लांब समुद्र किनारा लाभलेला एक छोटा देश. One of the newly born countries. पण तरी खूप जुना इतिहास असल...